News Flash

दिवाळी सरताना..

हा लेखांक प्रसिद्ध होईल तेव्हा दिवाळी सरली असेल. एखाद्या परकऱ्या पोरीने नाचत यावे, तिची लक्ष्मीची पावले अंगणभर उमटावीत, तिच्या पायातल्या पैंजणांच्या नादाने चार दिवस खुळावल्यागत

| October 26, 2014 11:02 am

दिवाळी सरताना..

हा लेखांक प्रसिद्ध होईल तेव्हा दिवाळी सरली असेल. एखाद्या परकऱ्या पोरीने नाचत यावे, तिची लक्ष्मीची पावले अंगणभर उमटावीत, तिच्या पायातल्या पैंजणांच्या नादाने चार दिवस खुळावल्यागत व्हावे, अशी आपली सर्वाची अवस्था असेल. ‘येणार.. येणार’ म्हणून उत्कंठा वाढीस लागलेली, चातकाने पाण्याच्या lok05थेंबाची पाहावी, चकोराने चांदण्याच्या चाऱ्याची अपेक्षा करावी, त्याहीपेक्षा कांकणभर अधिक अपेक्षिलेली अशी ही दिवाळी. आज दिवाळी सरल्यानंतरचा पहिला दिवस खऱ्या अर्थाने आपणा सर्वाना सुनंसुनं करून जाईल. ११ वर्षांपूर्वी ‘लोकसत्ता’च्या ‘चतुरंग’ पुरवणीमधून ‘तन-मन’ हे सदर लिहिताना आलेल्या दिवाळीचा मी परामर्श घेतला होता. पुराणातले संदर्भ धुंडाळले होते. नरक चतुर्दशी, यमदीपदान, लक्ष्मीपूजन, जैन संवत्सर या साऱ्या बारकाव्यांचा अभ्यास करणारा एक लेख त्यावेळी लिहिला होता. त्याची उजळणी केली, आणि गेल्या दशकातील सामाजिक संदर्भामध्ये दिवाळीचा नव्या अर्थाने बोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे, हे मला जाणवले.  
नरक चतुर्दशीला काय आठवले? समाजाला भेडसावणाऱ्या, नरकयातना देणाऱ्या अनेक राक्षसांपकी एक प्रमुख राक्षस म्हणजे भ्रष्टाचार. तण माजावेत तसा पसरलेला. नियोजनापासून आरोग्यापर्यंत आणि शेतीपासून दळणवळणापर्यंत असे कोणतेच क्षेत्र उरलेले नाही, की जिथे या राक्षसाने आपली काळी सावली उमटवलेली नाही. याचे निर्मूलन करणे सोपे नाही. ते एका राजकीय पक्षाच्या किंवा व्यक्तीच्या शक्तीपलीकडचे काम आहे. कोणत्याही शासनाला ते थेट जमेल असेही वाटत नाही. याचे कारण नागरिकांचे एकंदरच झालेले आत्मिक स्खलन होय. ‘‘क्ष’ करतोय ना, मग मी केले तर काय बिघडले?’ ही वाळवी संपूर्ण समाजाला पोखरून टाकते आहे. आता यापुढे गरज आहे- सिग्नल तोडला तर आपणहून दंड भरून रिसिट भरणाऱ्या बाबांची. स्कूटरवर पाठीमागे बसलेल्या आपल्या छोटय़ा मुलावर कळत-नकळत संस्कार करण्याची. भ्रष्ट होऊन मिळणारे यश आणि सुखाची प्राप्ती ही अळवावरच्या पाण्यासारखी क्षणभंगूर ठरते आणि वाट पाहून, कष्ट करून मिळालेले यश हे दूरगामी असते, हा विश्वास पुन्हा एकवार निर्माण करण्याची. पायाने चिरोटय़ाचा राक्षस फोडण्याइतके हे सोपे नाही. पण दिवाळीच्या पहिल्या दिवशी स्नान करताना मिळणारा हा संदेश लक्षात ठेवायला हरकत नाही. चिरोटय़ाचा राक्षस फोडावयाचा तर आपल्याला आपलाच पाय उचलावा लागतो, तद्वत् भ्रष्टाचाराचा राक्षस गाडायचा, तर आपल्याला आपल्या हातावर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. पाय काय किंवा हात काय, दोन्ही आपलेच अवयव आहेत. तेव्हा सुरुवात आपल्यापासूनच करावयास हवी.  
लक्ष्मीपूजनाचा मान धनराशीला द्यावयालाच हवा. पण ते धन ‘जोडूनिया धन उत्तम व्यवहारे’ या सन्माननीय राजमार्गानेच आलेले असले पाहिजे. राजमार्ग सोडून मिळालेले धन ही फक्त स्विस बँकेची संपत्ती होते. आणि ज्या धनाचा आपल्या राष्ट्राला आणि पर्यायाने पुत्र-पौत्रांना थेट उपयोग नाही, जे अंगावर उघडपणे वागविता येत नाही, ते काय कामाचे, हा विचार सर्वाच्या मनात पक्का व्हावयास हवा. लक्ष्मीचा झगझगाट नको, तर तिचा उजेड पडायला हवा. त्या प्रकाशाने ‘नाही रे’ यांच्या घरात एखादी तरी रेख पोहोचावयास हवी. इतरांच्या चेहऱ्यावर स्मितरेषा फुलविणारे तुमचे हास्य वृद्धिंगत व्हावयास हवे. आनंद आणि सौख्य संसर्गजन्य रोगासारखे पसरावयास हवे. देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक ते कर भरणे हे आपले आद्य कर्तव्य असावे आणि त्याच्यात पलायन वाटा काढणे म्हणजे आपण आपल्याला फसविणे होय, हे दिवाळीच्या निमित्ताने लक्षात घेणे गरजेचे आहे. लक्ष्मी ही अशी वाटल्याने वाढावी आणि तिने सरस्वतीची सोबत करावी.  
पाडवा म्हणजे तर आनंद उधाण. सहवासातून प्रेम वाढते, आप्तस्वकीयांमध्ये सौहार्द निर्माण होते. पण इथे केवळ आपल्याच घरच्यांचा विचार अप्रगल्भ ठरावा.  सीमेवर उभे असणारे सीमा सुरक्षा दल आणि आपले सन्य, पोलीस दल आणि अग्निशमन दल यांचाही विचार मला अभिप्रेत आहे. विक्रमादित्याच्या राज्यारोहणाचा आणि पर्जन्यास्त्रापासून गावकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी कृष्णाने गोवर्धनगिरी उचलला, तो हा दिवस. तेव्हा याला संदर्भ इतरांच्या रक्षणाचा आणि राज्यकल्याणाचा आहे हे लक्षात ठेवायला हवे. जे आपले रक्षण करतात, त्यांचे स्मरण करणे आणि त्यांच्याही पोटात अन्न घालणे महत्त्वाचे.  
दिवाळीचा अखेरचा दिवस म्हणजे भाऊबीज- अर्थात् यमद्वितीया. रावणाचा पराभव करून अयोध्येत परतणाऱ्या रामाचे स्वागत म्हणजे दिवाळी. तेजाचा लखलखाट म्हणजे दिवाळी. मांगल्याचा प्रसाद म्हणजे दिवाळी. धनराशींचा विनम्रतेने केलेला आदरसत्कार म्हणजे दिवाळी. थंडीची चाहूल म्हणजे दिवाळी. सुखाची सुरुवात म्हणजे दिवाळी. सौजन्याची बरसात म्हणजे दिवाळी. आणि स्नेहाची रुजवात म्हणजे दिवाळी. भाऊबीजेचा संदर्भही रक्ताच्या आणि मानलेल्या नात्यापलीकडे जाऊन मानवाच्या नसíगक स्नेहबंधाकडे झुकावा आणि बहीण-भावाचे ते अलौकिक नाते देश-खंडांच्या सीमा ओलांडून वैश्विक स्नेहाचे प्रतीक बनावे, फेसबुक आणि ट्विटरवर चॅट करणारे बहीण-भाऊ इंडियन-अमेरिकन- आफ्रिकन संस्कृतींतही अकृत्रिम स्नेहाची संकल्पना रुजवते व्हावे. आणि दिवाळीचा सण हा िहदुस्थानच्या सीमा ओलांडून अतिपूर्व-पाश्चात्य संस्कृतीतही रुजावा.. हा ‘ग्लोबलायझेशन’चा इफेक्ट आहे की जग जवळ आल्याची पोचपावती? मला असे वाटते की, आम्ही जर ख्रिसमस साजरा करतो, तर इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया यांनी दिवाळी का साजरी करू नये? कारण शेवटी सण माणसा-माणसांमध्ये पूल बांधतात आणि स्नेहभाव निर्माण करतात.  
दिवाळी म्हणजे फटाके, दिवाळी म्हणजे रेलचेल, दिवाळी म्हणजे उधळपट्टी, दिवाळी म्हणजे भपका आणि दिवाळी म्हणजे ऋण काढून साजरा केलेला सण. या संकल्पनांना मात्र आपण मूठमाती देणे गरजेचे आहे. कारण दिवाळी हा केवळ चार दिवसांचा लखलखाट नाही, तर तो मानवी अस्तित्वातील मांगल्याचा दीपस्तंभ आहे. गरज आहे ती आता ‘चार दिवसांच्या सुट्टी’पलीकडचा विचार करण्याची, घराचा उंबरा ओलांडण्याची आणि आपल्या आचार-विचारांनी हे जग अधिक सुंदर बनविण्याची.
‘लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया’ या ५० वर्षांपूर्वीच्या गाण्यात जी घरादाराला खिळवून ठेवण्याची ताकद आहे, ती आता साऱ्या जगाला दाखवू या.  चला, नव्या सहजीवनाचा संकल्प करू या.                                

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2014 11:02 am

Web Title: after diwali
टॅग : Diwali
Next Stories
1 निकाल लागताना..
2 दोन सावल्या
3 कानाने गहिरा..
Just Now!
X