चिंतन थोरात
समाजमाध्यमे ही मानवी इतिहासातील एक अभूतपूर्व क्रांतीच होय. त्यांचा वापर उन्नत, ज्ञानसंपन्न समाज घडविण्यासाठी, माणसामाणसांतील दुरी बुजवण्यासाठी करण्याऐवजी आजकाल लोकांमध्ये दुरावा, द्वेष, अफवा, बदनामी आदी हेतूंसाठीच जास्त होताना दिसतो. काही ‘प्रभावशाली व्यक्ती’ (इन्फ्लुएन्सर्स) या माध्यमांच्या वापराने आपले कुहेतू साध्य करताना दिसतात. एकीकडे समाजमाध्यमेही वापरकर्त्यांना आपल्या अधीन बनवण्यासाठी अनिष्ट मार्ग चोखाळतात. हे सारे टाळायचे असेल तर सर्वानीच या माध्यमांचा जबाबदारीपूर्वक वापर करायला हवा. त्याकरता समाजमाध्यम व्यवस्थेच्या साक्षरतेची मोहीमच राबवायला हवी..
आंतरजालाच्या उदयानंतर जगातील मनुष्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला. लोकांना विचारांची देवाणघेवाण करणे अधिक सोयीस्कर झाले. या आंतरजालाच्या क्रांतीपाठोपाठच उदयास आलेल्या समाजमाध्यमांमुळे हजारो वर्षे चालत आलेल्या सामाजिक चालीरीतींच्या परिभाषा पूर्णपणे बदलून गेल्या. मानवाच्या इतिहासात काही स्थिरबिंदू असे आहेत, ज्यानंतर संपूर्ण मानवजातीच्या इतिहासाला कलाटणी मिळत गेली. पहिल्यांदा होमो सेपियन्स या प्रजातीने आफ्रिकेच्या बाहेर ठेवलेला पाय, मेसोपोटेमियामध्ये पहिल्या प्रथम झालेला शेतीचा प्रयोग, रथांचा आविष्कार व पितळाचा वापर, वाफेचे इंजिन, विमान, पेनिसिलीन आणि संगणकाचा शोध या मानवी जीवनाचे परिवर्तन करून टाकणाऱ्या महत्त्वपूर्ण घटनांच्या पंक्तीमध्ये समाजमाध्यमांचा उदयदेखील समाविष्ट होतो. याचे प्रमुख कारण म्हणजे समाजमाध्यमांमुळे मानवाची समूह म्हणून एकमेकांना मदत करायची शक्ती हजार पटीने वाढली. जगविख्यात इतिहासकार युवल नोआह हरारी यांच्या मते, या पृथ्वीवर सर्व प्रजातींवर मनुष्य आधिपत्य गाजवू शकला याची दोन कारणे : एक म्हणजे आपली बौद्धिक क्षमता आणि दुसरं- लाखोंच्या संख्येने एकमेकांना सहकार्य करायची आपली ताकद. जगात कुठलीच अन्य प्रजाती माणसांएवढी एकमेकांना सहकार्य करू शकत नाही. त्यामुळे मानवी इतिहासात गेली हजारो वर्षे जगातील वेगवेगळ्या प्रदेशांतील माणसे एकमेकांना साहाय्य करत निसर्गावर विजय मिळवत गेले आणि मानवाची घौडदौड कायम सुरू राहिली.
मनुष्याच्या इतिहासात देव, धर्म, राजकारण, जात, पंथ या पारंपरिक आणि अदृश्य विचारांनी लाखो-करोडो लोकांना संघटित करण्याची किमया केली आहे. परंतु पहिल्यांदाच समाजमाध्यमांमुळे जगातील वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांतील लोक या अदृश्य शक्तींच्या पलीकडे जाऊन नवनवीन विचारांमुळे संघटित होताना दिसत आहेत. हजारो वर्षांच्या काळाच्या ओघात ज्या चुकीच्या आणि अनिष्ट चालीरीती समाजात रूढ झाल्या, त्या ज्ञानाच्या प्रकाशात स्वच्छ धुऊन काढून एक विज्ञानप्रामाण्यवादी समाज निर्माण करण्याची ताकद या आधुनिक समाजमाध्यमांमध्ये आहे. समाजमाध्यमांचा फायदा इथेच संपत नाही. समाजमाध्यमांमुळे जगातील अनेक परंपरागत बंधने अचानकपणे नष्ट झाली आणि प्रतिभावंत व्यक्तींना आपले विचार, कलागुण इत्यादी थेट जगासमोर मांडण्याची मुभा मिळाली. सर्वाना आपला आवाज, आपले विचार, साहित्य, अभिनयकौशल्य इत्यादी जगासमोर मांडण्याची समान संधी प्राप्त झाली. यामुळेच जगाला जस्टिन बिबर-शॉन मेंडेस यांच्यासारखे गायक मिळाले. केट अपटनसारखे नवीन मॉडेल्स आपल्याला पाहायला मिळाले. प्राजक्ता कोळी, मिथिला पालकर या अभिनेत्रींचा उदयदेखील समाजमाध्यमांतूनच झाला. जुलियस येगो हा केनियातील खेळाडू तर यूटय़ूबवर भालाफेकीचे व्हिडीओ बघत हा खेळ शिकला आणि त्यातील जगज्जेत्या खेळाडूंच्या तंत्राचा अभ्यास करत तो सराव करू लागला. त्यातून पुढे जात २०१६ मध्ये त्याने ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत रजत पदक जिंकले. सर्वसामान्य म्हणवल्या जाणाऱ्यांमधील असामान्य प्रतिभा जगासमोर आणण्याची किमया समाजमाध्यमांमध्ये आहे. समाजमाध्यमे जसजशी लोकप्रिय होऊ लागली तसतसे अनेक जण आपले विचार व आपल्या कलागुणांचे सादरीकरण समाजमाध्यमांवरून जगासमोर करू लागले. त्यातील ज्या वापरकर्त्यांचे (‘युजर्स’) ‘आशय’ किंवा ‘सामग्री’ (‘कन्टेन्ट’) लोकांना आवडू लागले, त्यांना लाखोंच्या संख्येने लोक ‘फॉलो’ करू लागले. यातूनच सुरुवात झाली ‘प्रभावशाली व्यक्ती’ (‘इन्फ्लुएन्सर्स’) या नवीन संकल्पनेची!
‘प्रभावशाली व्यक्ती’ (‘इन्फ्लुएन्सर्स’) म्हणजे जनमतावर प्रभाव टाकू शकणाऱ्या व्यक्ती. खरे पाहता ‘इन्फ्लुएन्सर्स’ या संकल्पनेमुळे समाजाला खूप फायदा होऊ शकला असता. किंबहुना, त्याची सुरुवात तशीच झाली होती. परंतु हळूहळू समाजमाध्यमांच्या ‘डोपामाईन-ड्रिव्हन अल्गोरिदम्स’मुळे समाजमाध्यमांचे स्वरूप बदलत गेले. हार्वर्ड विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या एका लेखानुसार, समाजमाध्यमांच्या मालक कंपन्यांनी लोकांना वारंवार आपले अॅप वापरण्यास प्रवृत्त करण्यासाठी माणसाला कुठल्याही गोष्टींबाबतीत व्यसनाधीन करणाऱ्या आपल्या शरीरातील डोपामाईनचे (एक रसायन) प्रमाण कसे वाढत राहील त्यानुसार आपल्या अॅपचे सूत्र बनवले आहे. त्यामुळे त्यांचे हे सूत्र सतत असाच ‘आशय वा सामग्री’ (‘कन्टेन्ट’) आपल्या ‘फीड’वर दाखवतात; ज्यामुळे आपल्या शरीरातील डोपामाईन व तत्सम हार्मोन्स प्रवृत्त होत राहतात आणि आपण त्या अॅप व त्यातील ‘कन्टेन्ट’शी भावनिकदृष्टय़ा जोडले जातो. लोकांचा समाजमाध्यमांतील ‘लाइक्स’ आणि लोकप्रियतेचा हव्यास वाढू लागला आणि त्यासाठी वाट्टेल त्या पद्धतीने ‘कन्टेन्ट’ वापरकर्त्यांच्या माथी मारण्याची स्पर्धाच सुरू झाली. खरे तर समाजातील विविध विषयांतील विद्वान किंवा प्रतिभावान मंडळींनी समाजमाध्यमांवर ‘इन्फ्लुएन्सर्स’ होणे अपेक्षित होते. त्यातून त्यांचे चांगले विचार आणि असामान्य प्रतिभा समाजात सर्वदूर पोहोचणे शक्य झाले असते. आणि जगातील लाखो लोकांनी त्यांना ‘फॉलो’ केले असते तर विचारांची आणि प्रतिभेची एक नवी उंची समाज म्हणून आपण गाठू शकलो असतो. परंतु प्रत्यक्षात झाले भलतेच! समाजमाध्यमांच्या या राक्षसी अल्गोरिदममुळे आणि झटपट लोकप्रिय व्हायच्या लोकांच्या हव्यासापोटी आज ‘इन्फ्लुएन्सर्स’ या संकल्पनेने चुकीचे वळण घेऊन भलतेच उग्र स्वरूप धारण केले आहे.
जगभरात आज जवळपास तीन अब्जांपेक्षा जास्त लोक समाजमाध्यमांचा वापर करतात. सध्या शेकडो प्रकारची समाजमाध्यमे अस्तित्वात आहेत. परंतु जिथे असंख्य लोक परस्परांशी संवाद साधू शकतात अशी पाच सर्वात जास्त वापरली जाणारी समाजमाध्यमे म्हणजे फेसबुक, ट्विटर, यूटय़ूब, इन्स्टाग्राम आणि लिंक्डइन्! या पाचही समाजमाध्यमांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा ‘कन्टेन्ट’ लोकांपर्यंत पोहोचवला जातो. फेसबुकवर जास्तकरून फोटो आणि लिखित ‘कन्टेन्ट’ तयार केला जातो. फेसबुकवर शक्यतो लिखित ‘कन्टेन्ट’चीच संख्या आधिक्याने असते. शब्दमर्यादा नसल्यामुळे फेसबुकवर एखादा विषय विस्ताराने मांडता येतो. गेल्या काही वर्षांत फेसबुकवर व्हिडीयोदेखील मोठय़ा प्रमाणात पाहिले जाऊ लागले आहेत आणि खासकरून फेसबुक लाइव्हची लोकप्रियता तर काही औरच आहे. यूटय़ूब हे प्राथमिकत: व्हिडीयो कन्टेन्ट पोस्ट करायचे माध्यम आहे. व्हिडीयोद्वारे बातम्यांपासून ते लघुपटांपर्यंत विविध प्रकारचा कन्टेन्ट आपल्याला इथे पाहायला मिळतो. इन्स्टाग्राम हे सुरुवातीला फक्त फोटोंना समर्पित माध्यम होतं, पण नंतर भारतात टिकटॉकच्या बंदीनंतर तिथे टिकटॉकसदृश्य छोटय़ा व्हिडीयोंचे (इन्स्टाग्राम रील्स) प्रमाणही वाढू लागले. ट्विटर हे सामाजिक जीवनातील सर्वात महत्त्वाचे समाजमाध्यम समजले जाते. इथे २८० शब्दांमध्ये विविध विषयांवरचे आपले विचार लोक मांडतात. ही सर्व समाजमाध्यमे वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही दृष्टीने वापरली जातात. लिंक्डइन् मात्र व्यावसायिक नेटवर्किंगसाठीच समर्पित समाजमाध्यम आहे. त्याचे सर्व फीचर्स फेसबुकसारखीच आहेत, पण उद्देश वेगळा आहे.
या सर्व समाजमाध्यमांमधील ‘कन्टेन्ट’ जरी भिन्न असला तरी सर्वामध्ये काही गोष्टी समान आहेत. त्या म्हणजे त्यांच्यातील डोपामाइनवर्धक अल्गोरिदम्स आणि त्यांच्या वापरकर्त्यांना झटपट लोकप्रिय होण्याचा हव्यास! या दोन्हीमुळे समाजमाध्यमांच्या बाबतीत आणखी एक समान गोष्ट झालेली दिसते. ती म्हणजे ही समाजमाध्यमे विचारांपेक्षा मांडणीला अधिक महत्त्व देताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या वापरकर्त्यांनी त्यावर टाकलेल्या ‘कन्टेन्ट’मधील विचारांच्या खोलीपेक्षा त्याच्या आकर्षकतेवर आणि भावनात्मकतेवर जास्त भर दिला जातो. उदाहरणार्थ, फेसबुकवर अर्थसंकल्पावर एखाद्या तज्ज्ञाने अतिशय मुद्देसूद आणि सर्व बाजूंचा विचार करून पुढील वर्षभराची दिशा समजावून सांगणारा लेख लिहिला तर कदाचित त्याला १००-२०० लाईक्स मिळतात आणि एक ते दीड हजार लोकांपर्यंत तो लेख पोहोचतो. पण जर का एखादा असा ‘इन्फ्लुएन्सर’ असेल; ज्याला त्या विषयाचे फार ज्ञान नाही, परंतु त्या विषयाची गंभीरता न समजून घेता केवळ भाषेच्या प्रभुत्वाद्वारे त्याने अर्धवट माहिती देणारा, भावनाविवश करणारा लेख लिहिला तर त्याला हजार-दोन हजार ‘लाईक्स’ मिळून जवळपास दहा-पंधरा हजार लोकांपर्यंत त्याचा ‘कन्टेन्ट’ पोहचतो. ट्विटरवरदेखील लोकप्रिय व्हायचे असेल तर एखाद्याला ट्रोल करणे किंवा विनाकारण लोकांशी भांडणे हा सोपा मार्ग बनला आहे. तेथेही अनेकदा तज्ज्ञांपेक्षा खिल्ली उडवणाऱ्या किंवा टोकाची भूमिका घेऊन जोरजोरात वादविवाद करून भावना भडकावणाऱ्या लोकांना जास्त लोकप्रियता मिळताना दिसते. यूटय़ूब हे मुळातच दृक्श्राव्य माध्यम असल्यामुळे दिखावा हा यूटय़ुबचा महत्त्वाचा भाग आहेच; पण आश्चर्यकारकरीत्या इथे ‘कन्टेन्टला’देखील तेवढंच महत्त्व आहे. बऱ्याचदा अनेक व्हिडीओंना फक्त आणि फक्त त्यातील कन्टेन्टमुळेच लाखो ‘वूज्’ मिळालेले बघायला मिळतात. अर्थात यूटय़ूबवर ज्यांच्या व्हिडीओज्ची प्रकाशयोजना व ध्वनियोजना चांगली असते त्यांना जास्ती ‘फॉलोअर्स’ मिळतात असे एक संशोधन सांगते. लिंक्डईनची अवस्था तर ‘कहॉं से निकले और कहॉं पहुंच गये’ अशी झाली आहे. जे समाजमाध्यम व्यावसायिक नेटवर्किंगसाठी तयार केले गेले होते, ते आता जागतिक निबंध स्पर्धेचे व्यासपीठ बनले आहे. लिंक्डईनमधील पोस्ट्समध्ये विचार १०-२० टक्केच असतो, बाकीचा भर अलंकारिक भाषा वापरून ‘कन्टेन्ट’ आकर्षक करण्यावरच असतो असे येथील ‘इन्फ्लुएन्सर्स’ खासगीत सांगतात. असेच काहीसे इन्स्टाग्रामवर आहे. इथे आकर्षकता विचारांपेक्षा कित्येक पटीने महत्त्वाची ठरते. इन्स्टाग्रामवर फार गंभीर स्वरूपाचा कन्टेन्ट नसतो. शक्यतो अन्न, प्रवास, संगीत, अभिनय इत्यादीबद्दलचा ‘कन्टेन्ट’ जास्त असतो. पण इथेही सौंदर्य व आकर्षकतेवरच अधिक भर दिसतो. इन्स्टाग्रामवरचे ‘इन्फ्लुएन्सर्स’ नक्की कुठल्या विषयात ‘इन्फ्लुएन्सर्स’ आहेत हे समजण्यात बऱ्याचदा गोंधळ होतो. स्वत:चे शरीरसौष्ठवाचे फोटो टाकून लाखो फॉलोअर्स मिळवलेले युजर्स अनेकदा जीवनाविषयीच्या तत्त्वज्ञानावर भाष्य करताना दिसतात. तर वेगवेगळ्या प्रकारे सेल्फी काढून आणि टिकटॉक व्हिडीओ बनवून लाखो फॉलोअर्स मिळवलेले युजर्स पाच हजार वर्षांपूर्वी भारतात उडणारी विमाने कशी होती, हे लोकांना पटवून देताना आढळतात. प्रत्येकाला आपले विचार मांडायचा पूर्ण अधिकार आहे, पण अशा लोकांमुळे आज समाजासमोर मोठे प्रश्न उभे राहताना दिसतात.
‘इन्फ्लुएन्सर्स’ना काहीच ज्ञान नसते, केवळ दिखाव्यामुळे ते लोकप्रिय होतात असे अजिबात नाही. त्यांच्या लिखाणात किंवा फोटो/ व्हिडीओंमध्ये काही अर्थ नसता तर लोकांनी त्यांना फॉलोच केले नसते. पण त्यांना सर्व प्रकारची माहिती असते असेही नाही. काही इन्फ्लुएन्सर्सना आपल्या विषयाची थोडी माहिती असते, तर काहींना भरपूर. परंतु सर्वानाच सगळ्या विषयांची माहिती असते हे मानणे अपरिपक्वतेचे लक्षण होय. मात्र, आज नेमकी हीच समस्या उभी ठाकलेली आहे. बहुतांश इन्फ्लुएन्सर्स आपल्याला सगळ्याच विषयांतले सारे काही कळते अशा आविर्भावात व्यक्त होताना दिसतात. सगळेच जण असे असतात असे नाही, परंतु अचानक समाजमाध्यमांमुळे प्रसिद्धीचा चस्का लागलेले अनेक इन्फ्लुएन्सर्स या प्रकारचे वर्तन करताना आढळतात. त्यामुळे समाजमाध्यमांवर जो ट्रेंडिंग विषय असतो त्यावरचे तज्ज्ञ रातोरात निर्माण झालेले पाहायला मिळतात. हा प्रकार समाजासाठी घातक बनत चालला आहे. अचानक मिळालेल्या लोकप्रियतेमुळे बऱ्याच इन्फ्लुएन्सर्सना जबाबदारीचे भान नसल्याचे दिसून येते. त्यामुळे बऱ्याचदा चुकीची माहिती किंवा द्वेषपूर्ण विचार त्यांच्याकडून समाजमाध्यमांवर पोस्ट होताना दिसतात. त्यांच्या लक्षात येत नाही की, आपल्या या कृतीमुळे लाखो लोकांच्या विचारांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यांच्यासाठी त्यांनी फक्त फोनवरून एखादे बटण दाबलेले असते, परंतु वास्तवात हजारो लोकांच्या मनामध्ये त्यांनी चुकीची माहिती ‘इन्स्टॉल’ केलेली असते. अशा बेजबाबदार वर्तणुकीमुळे आज समाजात चुकीची माहिती, द्वेष, अज्ञानाची प्रचंड वाढ होताना दिसते. ज्या समाजमाध्यमांमुळे समाजातील दुरी कमी होऊन तिमिरातुनी तेजाकडे प्रवास होणे अपेक्षित होते, त्याच माध्यमांच्या चुकीचे वळण घेतलेल्या इन्फ्लुएन्सर पद्धतीमुळे समाजाची ज्ञानाकडून अज्ञानाकडे वाटचाल होताना दिसते आहे. हे सर्व पाहिल्यावर असा प्रश्न पडतो की, पाश्चात्त्य देशांमध्ये काही जण इन्फ्लुएन्सर्स पद्धतीला ‘समाजमाध्यमांना झालेला इन्फ्लुएंझा’ असे म्हणतात, ते बरोबर तर नसेल? कदाचित नाही. पण एवढे मात्र नक्की, की ही पद्धत बदलणे गरजेचे आहे.
हे थांबण्यासाठी कोणीतरी याची जबाबदारी घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे. एक तर समाजमाध्यमांच्या मालक कंपन्यांनी ही जबाबदारी घेऊन आपले अल्गोरिदम बदलले पाहिजेत; आणि खऱ्या तज्ज्ञ व प्रतिभावान व्यक्तींना ‘इन्फ्लुएन्सर’ बनवण्यासाठी सिस्टिम निर्माण केली पाहिजे; नाहीतर आत्ताच्या इन्फ्लुएन्सर्सनी तरी जबाबदारीचे भान राखून आपल्याला माहिती नसलेल्या विषयावर अधिकारवाणीने बोलणे थांबवले पाहिजे. किंवा मग लोकांनी स्वत:च जबाबदारी घेऊन अशा इन्फ्लुएन्सर्सना फॉलो करणे थांबवले पाहिजे. जोपर्यंत जबाबदारीचे भान राखले जाऊन हे बदल घडत नाहीत तोपर्यंत समाजमाध्यमे कशी वापरावीत याची साक्षरता मोहीम राबवून लोकांना त्यांच्या समाजाप्रतीच्या जबाबदारीची जाणीव करून देणे ही आज काळाची गरज बनली आहे. कुठलीही नवी माहिती समाजमाध्यमांवरून मिळाली तर ती कशी पडताळून घ्यावी, कुठलीही पोस्ट करताना भावनेच्या आहारी न जाता सारासार विवेकबुद्धीने कशा प्रकारे समाजमाध्यम वापरावे, समाजमाध्यमांचे व्यसन लागण्यापासून स्वत:ला कसे वाचवावे, या गोष्टींचे प्रशिक्षण सर्वानाच देणे गरजेचे आहे. आपण अशी अपेक्षा करू या की, समाज म्हणून समाजमाध्यमे हाताळण्याचा आपला ‘लर्निग कर्व’ लवकरच पूर्ण होईल आणि समाजमाध्यमांचा वापर मानवी समाजाला एका अनन्यसाधारण उंचीवर नेऊन ठेवण्यासाठीच केला जाईल.
chintanthorat@protonmail.com
(लेखक माध्यमतज्ज्ञ असून, निवडणूक व राजकीय संभाषणकौशल्य या विषयांचे अभ्यासक आहेत.)
समाजमाध्यमांच्या ‘डोपामाईन-ड्रिव्हन अल्गोरिदम्स’मुळे त्यांचे स्वरूप बदलत गेले. समाजमाध्यम कंपन्यांनी लोकांना आपले अॅप वापरण्यास प्रवृत्त करण्यासाठी व्यसनाधीन करणाऱ्या आपल्या शरीरातील डोपामाईनचे प्रमाण कसे वाढत राहील त्यानुसार अॅपचे सूत्र बनवले. हे सूत्र सतत असाच ‘कन्टेन्ट’ आपल्या ‘फीड’वर दाखवतात, ज्यामुळे आपल्या शरीरातील डोपामाईन व तत्सम हार्मोन्स प्रवृत्त होत राहतात आणि आपण त्या ‘कन्टेन्ट’शी भावनिकदृष्टय़ा जोडले जातो.