05 March 2021

News Flash

इतिहासाचे वर्तमान

काही दिवसांपूर्वी माझ्या मित्राकडे सहजच गेलो तेव्हा त्याचा रुडी नावाचा जर्मन मित्र त्याच्याकडे आला होता.

(संग्रहित छायाचित्र)

लोकेश शेवडे

प्रत्येक देशात थोर व्यक्तीं जशा जन्माला आल्या आहेत, तसंच त्यांचा इतिहास देदीप्यमान करणाऱ्या घटनादेखील घडल्या आहेत. त्यांचा सार्थ अभिमान बाळगण्यात काहीच गैर नाही. परंतु इतिहासात अशाही काही गोष्टी घडलेल्या असतात, ज्यांची लाज वाटायला हवी. त्याबद्दल मनात अपराधी भावना निर्माण व्हायला हवी. तशी ती होणं हे ‘माणूस’पणाचं लक्षण होय. तथापि आपल्याकडे सध्या इतिहासाचं जे सरसकट उदात्तीकरण होतं आहे ते खरंच वास्तवदर्शी आहे का? आपण एकदा अंतर्मुख होऊन याबद्दल विचार करायला हवा.

काही दिवसांपूर्वी माझ्या मित्राकडे सहजच गेलो तेव्हा त्याचा रुडी नावाचा जर्मन मित्र त्याच्याकडे आला होता. मी रुडीला एकदा दहा-बारा वर्षांपूर्वी तिथंच भेटलो होतो. मी त्याला पाहिल्याबरोबर ओळखलं. पण त्याला मी आठवत नव्हतो. त्याला आठवावं म्हणून मागच्या वेळी त्याला भेटलो तेव्हा त्याच्याबरोबर त्याची बायकोदेखील होती याची मी त्याला आठवण करून दिली आणि विचारलं, ‘‘ती कशी आहे? ती आली नाही का तुझ्याबरोबर?’’ त्यावर तो अगदी सहजपणे म्हणाला, ‘‘नाही. ती मजेत आहे तिथे. पण आता ती माझी बायको नाही. आम्ही वेगळे झालोत. आता मी दुसरीबरोबर ‘लिव्ह-इन्’ पद्धतीत राहतो. माझी सध्याची लिव्ह-इन् पार्टनर तिला काम असल्यामुळे जर्मनीतच राहिलीय. मी एकटाच आलोय भारतात.’’ हे ऐकून मला आपण नको ते उगाचच विचारलंसं वाटलं आणि विषय बदलण्यासाठी ‘मी जर्मनीला काही वेळा आलो होतो. मला तिथे फिरायला खूप आवडतं..’ वगरे त्याला सांगितलं. त्यावर त्यानं ‘जर्मनीत काय काय पाहिलं?’ असं विचारलं. मी फ्रँकफर्ट, डुसेलडॉर्फ, कलोन, म्युनिक वगरे शहरांची नावं सांगत तिथले रस्ते, प्रेक्षणीय स्थळांचं वर्णन केलं आणि ‘दाखाऊ’ पाहिल्याचाही उल्लेख केला. ‘दाखाऊ’चा उल्लेख ऐकल्याबरोबर रुडीनं विचारलं, ‘‘ओह! दाखाऊ मीन्स कॉन्सन्ट्रेशन कॅम्प?’’ मी ‘यस..’ म्हणालो.

‘दाखाऊ’ या म्युनिकजवळच्या गावात ज्यूंना डांबून छळ आणि हत्या करण्यासाठी हिटलरनं पहिला कॉन्सन्ट्रेशन कॅम्प उभारला होता. ‘दाखाऊ’चा ‘प्रयोग’ यशस्वी झाल्यावर पुढे जागोजाग तसेच कॅम्प उभारून त्यात दाखाऊच्या ‘प्रयोगा’चे अनेक यशस्वी ‘खेळ’ केले गेले. जर्मनीच्या इतिहासातला हा सर्वाधिक काळा कालखंड आहे. अगोदरच मी रुडीच्या मोडलेल्या विवाहाबद्दल विषय काढून त्याला दुखावलं होतं. म्हणून आपली चूक सुधारण्यासाठी विषय बदलायला गेलो, तर तो संदर्भ नेमका पुन्हा कॉन्सन्ट्रेशन कॅम्पसारख्या दुखऱ्या ठिकाणीच गेला. मी खजील होऊन ‘सॉरी’ म्हणून गप्प झालो आणि माझी मान आपोआप खाली गेली. त्याबरोबर रुडी एकदम म्हणाला, ‘‘व्हाय यू से सॉरी फॉर दॅट? आय हॅव टू बी सॉरी. आय मीन- आय एम सॉरी फॉर दॅट पार्ट ऑफ अवर हिस्टरी. दॅट्स द लीस्ट आय कॅन डू अबाउट इट. इट ऑल हॅपन्ड बीफोर माय बर्थ. बट आय नो, माय अ‍ॅन्सेस्टर्स डिड दोज ब्रूटल किलिंग्ज. आय नो, दे टॉर्चर्ड अ‍ॅण्ड किल्ड दोज मिलियन्स इन द नेम ऑफ रिलिजन अ‍ॅण्ड नॅशनॅलिजम.’’ मी अवाक्होऊन त्याचं म्हणणं ऐकत राहिलो.

पाच वर्षांपूर्वी मी म्युनिकला गेलो असताना माझ्या मित्राच्या बायकोनं ( क्लॉडिया हायडर.. ती जर्मन वंशाचीच होती.) ‘दाखाऊ’ला जाण्याबद्दल सुचवलं होतं, त्याची आठवण झाली. तिनंही तेव्हा त्यांच्या स्वत:च्या इतिहासाच्या ‘या’ भागाबद्दल अत्यंत ‘दु:खदायक आणि लज्जास्पद’ असंच वर्णन केलं होतं. तेव्हाही मी असाच अवाक् झालो होतो.

‘इतिहास’ असं नुसतं जरी म्हटलं तरी नाक फेंदारून आजूबाजूला निर्वात पोकळी निर्माण होईपर्यंत हवा ओढून ती बरगडय़ा मोडेपर्यंत छातीत घ्यायची आणि मग मोडक्या बरगडय़ांच्या फुगलेल्या छातीच्या बाजूला फुटलेले हात खांद्यातून निखळेपर्यंत ताणून, लवलवत्या  थूतरातून ‘कोणाची तरी जय’ अशी आरोळी घसा बसेपर्यंत ठोकायची.. अशी एक लांबलचक प्रक्रिया पार पाडणं सक्तीचं असल्याचा भास व्हावा असा अनुभव आपल्याकडे येत असतो. जणू ही प्रक्रिया देशप्रेम सिद्ध करण्याची परीक्षाच आहे. किंबहुना, इतिहासाबद्दल जाज्ज्वल्य अभिमान अशा प्रकारे सिद्ध केल्याखेरीज आधारकार्डच मिळत नसावं असं बहुसंख्य भारतीयांच्या बोलण्यातून हल्ली भासत असतं. आपल्या इतिहासाबद्दल अभिमान असणारी माणसं जगभरच असावीत. आणि इतिहासातल्या चांगल्या बाबींबद्दल अभिमान बाळगण्यात काही आक्षेपार्हही नाही. परंतु आपल्या इतिहासात जशी लोकोत्तर माणसं होऊन गेलीत, जशा चांगल्या घटना घडून गेल्यात, तशीच वाईट माणसं आणि वाईट घटनाही घडून गेल्या आहेत. त्या वाईट बाबींबद्दल आपली भूमिका काय? या प्रश्नावर मात्र आपल्याकडे गुळणी धरली जाते किंवा ‘असं काही घडलंच नाही, हे सगळं मुद्दाम आपल्याला बदनाम करण्यासाठी खोटं पसरवलं गेलंय’ असं उत्तर दाणकन् मिळतं.

प्राचीन काळापासून आपला देश आणि धर्म हा पूर्णत: निर्दोष आणि सर्वोत्तम आहे असं मानणं आणि ते अद्वातद्वा मांडणं, हे गेल्या काही वर्षांत देशभक्तीचं लक्षण मानलं जाऊ लागलं आहे. आसपासच्या लोकांच्या चर्चा आणि गप्पांमध्ये ‘आपल्या देशात व धर्मात कधीच काही वाईट नव्हतं, जे जे वाईट घडलं ते सर्व परकीयांनी केलं’ अशा मथितार्थाचे मुद्दे अत्यंत औद्धत्याने  मांडले जात आहेत. असं पूर्वी घडत नव्हतं असं अजिबात नाही. पूर्वीही हे होतंच. पण आता त्यास अभिमानाची जोड मिळाल्यामुळे या मांडणीत कमालीचा आक्रमकपणा, धश्चोटपणा आला आहे. आपलं ते सर्वोत्तम, निर्दोष आणि परकं ते सारे निकृष्ट, सदोष हे गृहितक देश/ धर्म यापुरतेच मर्यादित नसून जाती-पोटजातींपर्यंत मुरलेलं होतंच. आता त्यात आक्रमकताही पूर्णपणे मुरलेली दिसते. अशा प्रकारच्या विचारसरणी आणि मांडणीचा परिणाम खोटा इतिहास, असत्य यांच्या फैलावापुरता सीमित असतो असा माझा समज असल्यामुळे मी नेहमीच अशा देश-धर्माभिमान्यांकडे आणि त्यांच्या मांडणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असे. रुडीच्या ‘सॉरी’मुळे बऱ्याच वर्षांनी अचानक माझं लक्ष या विषयाकडे वेधलं गेलं. जर्मनीतले रस्ते, प्रेक्षणीय स्थळांचं वर्णन ऐकताना रुडीच्या चेहऱ्यावर जितका आनंद व अभिमान दिसत होता, तितकीच खंत, लज्जा ‘दाखाऊ’चा उल्लेख केल्यावर त्याच्या चेहऱ्यावर दिसली. त्याची खंत पाहून मला तो त्याच्या देशाशी द्रोह करतो आहे असं वाटलं नाही. उलट, त्यामुळे त्यानं त्याच्या देशाला इतिहासातल्या भल्याबुऱ्या घटनांसकट ‘आपलं’ मानलं आहे असंच वाटलं. ज्या गोष्टीवर आपलं खरोखर प्रेम असतं त्या गोष्टीला आपण तिच्या भल्याबुऱ्या बाबींसकट स्वीकारतो. त्यामुळे रुडीचं ‘सॉरी’ म्हणणं हा त्याच्या देशावर त्याचं अस्सल प्रेम असल्याचा पुरावा वाटला मला.

‘‘आय एम सॉरी फॉर दॅट पार्ट ऑफ अवर हिस्टरी..’’ या रुडीच्या विधानानं मला एकदम जागं केलं आणि ‘दॅट्स द लीस्ट आय कॅन डू अबाऊट इट’ या त्याच्या विधानानं मला अंतर्मुखही केलं. आपल्या इतिहासातल्या चांगल्या गोष्टींचा अभिमान बाळगणं अत्यंत प्रेरणादायी आणि अर्थातच योग्यही होय. तसंच ते रुडीच्या बाबतीतही होतं. तथापि वाईट घटना नाकारणं, त्याकडे दुर्लक्ष करणं किंवा त्याचं खापर परकीयांवर फोडणं याचा अर्थ आपल्या पूर्वजांनी इतरांवर केलेला अन्याय, त्यांचं केलेलं शोषण हे सत्य नाकारणं होय. आणि पर्यायानं आपली जबाबदारी नाकारणं होय. तसं न करता रुडीनं ती जबाबदारी स्वीकारली होती. ती स्वीकारताना ‘जर-तर, पण-परंतु’ वगरे काहीही शब्द न वापरता पूर्णत्वाने त्याने ती स्वीकारली होती. क्लॉडिया हायडरनं मला ‘दाखाऊ’ या ठिकाणाचा थांगपत्ता नसताना स्वत:हून ते पाहण्याविषयी सुचवलं होतं आणि ‘मला ते पाहताना आमच्या पूर्वजांच्या कृत्यांच्या जाणिवेनं क्लेश होतात आणि डिप्रेशन येतं’ असं सांगत ती स्वत: मात्र तिथे आली नाही. रुडी, क्लॉडिया यांच्या पूर्वजांच्या कृष्णकृत्यांचा काळ १९३८ ते १९४५.. म्हणजे फार तर सात-आठ वर्षांचा होता. तरीही त्याबद्दल त्यांना कमालीचं दु:ख, क्लेश होत होते. याच काळात आपल्याकडे अस्पृश्यता पाळली जात होती. केवळ आठ वर्ष नव्हे, तर तत्पूर्वी हजारो वर्षांपासून ती पाळली जात होती. अस्पृश्यांवरचा अन्याय केवळ स्पर्शापुरता मर्यादित नव्हता, तर रोजगार, शिक्षण, जेवण, पिण्याचं पाणी, वैद्यकीय उपचार नाकारण्यापर्यंत त्याचं स्वरूप अक्राळविक्राळ होतं. अस्पृश्यता हे काही आपल्या पूर्वजांनी केलेल्या अन्यायाचं एकमेव किंवा अपवादात्मक उदाहरण नव्हे. विधवांचं केशवपन करणं किंवा सती जाण्यासारख्या कराल अन्यायी प्रथादेखील आपल्या पूर्वजांनी निर्माण करून, त्या हजारो वर्ष पाळून लाखो स्त्रियांना बळी दिले. याखेरीज वेळोवेळी असंख्य वेळा अगणित लोकांवर अत्याचार घडले, हत्याकांडे झाली, ते सारे वेगळे आहेच.

त्याचबरोबर आपल्या इतिहासात अनेक थोर, पराक्रमी पुरुषही होऊन गेले. ज्यांना या आपल्या पूर्वजांची थोरवी व पराक्रमाचा अभिमान वाटत असेल त्यांना तसा वाटणं साहजिक, सार्थ आणि योग्यच आहे. तथापि, या इतिहासाच्या अभिमानी लोकांना आपल्या पूर्वजांनी अस्पृश्यता पाळली त्याबद्दल काय वाटते? आपल्या पूर्वजांनी अस्पृश्यांवर, स्त्रियांवर केलेल्या अन्यायाबाबत किंवा इतर अनेक कृष्णकृत्यांबाबत ते काय बोलतात? किती वेळा बोलतात? त्याबाबतीत ते जागरूक तरी असतात का? निदान या अन्यायाबाबत काही संदर्भ आल्यास आपण ‘सॉरी’ तरी म्हणतो का? हे प्रश्न रुडीच्या त्या एका ‘सॉरी’नं माझ्यासमोर उभे केले. या प्रश्नांची जी उत्तरं मिळतात त्यानं माझी मान रुडीपेक्षाही खाली जाते. कारण रुडीला इतिहासातील फक्त आठ वर्षांच्या वाईट भागाबद्दल खंत होती, मला मात्र हजारो वर्षांच्या इतिहासातील वाईट भागाबद्दल आणि त्याबद्दल अभिमानी असलेल्या लोकांच्या बेफिकीर वर्तमानाबद्दलही खंत करणं भाग आहे..

lokeshshevade@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2019 12:46 am

Web Title: article about glorification of history
Next Stories
1 शताब्दी व्यंगचित्राची!
2 ‘कस्तुरी’
3 फुलं आणि फूल्स
Just Now!
X