विजय पाडळकर

नुकतेच दिवंगत झालेले समांतर धारेतील प्रख्यात चित्रपटकार मृणाल सेन आणि त्यांचे समकालीन सत्यजित राय यांच्यातील मतभेदांची सहृदय चिकित्सा करणारा लेख..

Kiran Mane Post Viral
“मी ब्राह्मण, तो कासार हे सांगणं…”, चिन्मय मांडलेकरच्या पत्नीच्या व्हिडीओवर किरण मानेंनी केलेली पोस्ट चर्चेत
Shiv Sena Thackeray Group Leader Chandrakant Khaire Announces His Political Retirement
मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंनी केली राजकीय निवृत्तीची घोषणा, म्हणाले, “अंबादास दानवे..”
Sunita Kejriwal Speech
अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगातून दिल्या ६ गॅरंटी; सुनिता केजरीवाल यांनी सभेत पत्र वाचून दाखवत भाजपाला दिला इशारा
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार

सत्यजित राय, मृणाल सेन आणि ऋत्विक घटक या आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय चित्रपटाला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या दिग्दर्शक-त्रयीपकी शेवटचा कलावंत मृणाल सेन यांच्या रूपाने काळाच्या पडद्याआड गेला. हे तिघेही जवळजवळ समकालीन होते आणि त्यांची कारकीर्दही जवळपास एकाच वेळी सुरू झाली. या तिघांच्या चित्रपटांची स्वतंत्र अशी वैशिष्टय़े होती आणि ती परस्परांपासून खूपच भिन्न होती. असे असले तरी आणि एकमेकांच्या विचारसरणीबद्दल मतभेद असले तरीही तिघांना एकमेकांच्या कार्याबद्दल आदर व विश्वास होता. मात्र, मीडियाने सतत या मतभेदांचीच चर्चा केली आणि त्यांना वाढवून लोकांसमोर सादर केले. या तिघांपकी ऋत्विक घटक हे दुर्दैवाने फार लवकर- १९७६ साली मरण पावले. सत्यजित राय आणि मृणाल सेन मात्र सुमारे पन्नास वष्रे (राय यांच्या निधनापर्यंत) एकमेकांच्या संपर्कात होते. परंतु अधूनमधून त्यांच्यातील मतभेदांची चर्चा कधी कधी अकारणही केली जात असे.

नंतरच्या काळात खूप चíचल्या गेलेल्या या विषयामुळे एक गोष्ट विसरली गेली, ती म्हणजे मृणाल सेन आणि सत्यजित राय हे तरुणपणापासून एकमेकांचे चांगले मित्र होते. सेन राय यांच्या घरी नेहमी जात-येत असत.  चित्रपटांवर त्यांच्या दीर्घ चर्चा चालत. फिल्म सोसायटीच्या कार्यक्रमांच्या निमित्तानेही त्यांच्या सतत भेटी होत आणि त्यांत एकमेकांच्या चित्रपटविषयक मतांची देवाणघेवाण होई. मृणाल सेन यांनी चार्ली चाप्लीनवर लिहिलेल्या पुस्तकाचे मुखपृष्ठ सत्यजित राय यांनी तयार केले होते.

या चच्रेस सुरुवात झाली ती १९६५ साली. या वर्षी मृणाल सेन यांनी दिग्दर्शित केलेला, आशीष बर्मन यांच्या कथेवरील ‘आकाश कुसुम’ हा चित्रपट प्रदíशत झाला. एक मध्यमवर्गीय तरुण त्याला आवडलेल्या एका तरुणीवर छाप टाकावी म्हणून तिला एक थाप मारतो आणि नंतर या असत्याच्या गुंत्यात तो अधिकाधिक गुंततच जातो. यश मिळविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडी व खटपटी आणि मनातील मध्यमवर्गीय मूल्ये यांच्या ओढाताणीत त्याचे जीवन भरकटत जाते- अशी ही कथा होती. ‘डॉन किहोते’प्रमाणे आपल्या स्वप्नांच्या बळावर आपण आपल्या मर्यादा उल्लंघून जाऊ शकू असा भ्रम त्याच्या मनात निर्माण होतो. पण शेवटी त्याच्याजवळ जे असते तेही त्याच्यापासून दूर जाते. या चित्रपटावर ‘स्टेट्समन’मध्ये एक परीक्षण लिहून आले. लेखकाने लिहिले होते, ‘‘ ‘डॉन किहोते’च्या पद्धतीने हा चित्रपट जर विनोदाच्या अंगाने गेला असता तर प्रेक्षकांना नायकाबद्दल थोडी सहानुभूती वाटली असती.’’ या परीक्षणाला उत्तर देताना आशीष बर्मन यांनी लिहिले, ‘‘असे करणे चित्रपटातील समकालीन वास्तवदर्शनाला (topicality) घातक ठरले असते.’’

सत्यजित राय यांना हा चित्रपट आवडला नाही. चित्रपटावरील चर्चेत भाग घेत त्यांनी १० ऑगस्ट १९६५ रोजी ‘स्टेट्समन’ला जे पत्र पाठवले त्यात त्यांनी बर्मन यांच्या समकालीनतेच्या दाव्यावर टीका करीत  लिहिले, ‘‘या चित्रपटाचे आशयसूत्र थेट प्राचीन काळाशी आपले नाते सांगते. प्राचीन इसापकथेतील कावळ्याची येथे आठवण येणे स्वाभाविक आहे.’’

या पत्राला बर्मन यांनी तर उत्तर दिलेच; पण आता मृणाल सेनदेखील या वादात उतरले. १५ ऑगस्ट १९६५ रोजी ‘स्टेट्समन’ला पाठवलेल्या पत्रात त्यांनी लिहिले की, ‘‘एखाद्या आशयसूत्राचे प्राचीन काळाशी नाते असले म्हणजे ते समकालीन नाही असे कसे म्हणता येईल?’’ आपला मुद्दा स्पष्ट करताना त्यांनी चार्ली चाप्लीनचे उदाहरण दिले. त्याच्या चित्रपटांचाही प्राचीन काळाशी संबंध लावता येतो, पण तो आधुनिक आहे. तसेच ‘डॉन किहोते’चेही आहे. या पत्रात त्यांनी शेवटी लिहिले, ‘‘मला चाप्लीन किंवा इसाप किंवा सर्वातीस (‘डॉन किहोते’चा लेखक) यांच्या पंखाखाली आश्रय घ्यायचा नाही. मी ‘आकाश कुसुम’ नावाचा चित्रपट बनविला आहे, इतकेच.’’

मृणाल सेन यांनी त्यांच्या पत्रात दिलेले चार्ली चाप्लीनचे उदाहरण राय यांना मुळीच पटले नाही. त्यांनी २१ ऑगस्ट १९६५ रोजी पत्र लिहून, ‘मृणाल सेन यांना चार्ली चाप्लीनच्या भटक्याचे व्यक्तिरेखाटन समजलेच नाही,’ अशी टीका केली. चित्रपटाविषयी त्यांनी लिहिले की, ‘त्यात जर समकालीनता असेल तर ती पृष्ठस्तरीय आहे.’

उत्तरादाखल सेन यांनी आणखी तीन दिवसांनी लिहिले की, ‘‘सत्यजित राय यांनी चाप्लीनच्या भटक्यामध्ये आपल्याच मनातले काही शोधले आहे. I do not wish to be inventive like Mr. Ray.l

हा वाद आणखी बराच लांबला. या वादात आता अनेक वाचक आणि टीकाकारही उतरले. सेन आणि राय यांच्यातील या चच्रेत प्रकाशित झालेली १९ पत्रे उपलब्ध आहेत. कथेतील कावळ्याच्या प्रतिमेचा संदर्भ घेत राय यांनी काहीसे चिडूनच लिहिले, ‘’a crow-film is a crow-film is a crow-film.’’ हा वाद आणखी चिघळू नये म्हणून शेवटी १३ सप्टेंबर १९६५ रोजी ‘या विषयावरील चर्चा आता बंद करण्यात येत आहे,’ असे जाहीर करून संपादकांनी त्यावर पडदा टाकला.

योगायोगाने त्या दिवशी संध्याकाळीच एका कार्यक्रमात सेन व राय यांची भेट झाली. त्यावेळी राय म्हणाले, ‘‘हे तुम्ही का बंद केलेत? मी अजून खूप पत्रे लिहिली असती.’’ मृणाल सेन यांनी उत्तर दिले, ‘‘माझ्याजवळ तुमच्याइतका जनतेचा पाठिंबा नाही (support base) आणि मनुष्यबळदेखील नाही. मी एकटा आहे. पण तरीही मी तुमच्या सगळ्या पत्रांना उत्तरे दिली असती.’’

या वादानंतर दोघांत कटुता निर्माण झाली असे जरी म्हणता येत नसले तरी त्यांच्यातील मित्रत्व बऱ्याच प्रमाणात कमी झाले. तरीही दोघांनी आपले व्यावसायिक संबंध मात्र कायम ठेवले. दोघेही आपले नवे चित्रपट पाहण्यासाठी एकमेकांना आवर्जून बोलावीत. सेन यांचा ‘मातीर मानीषा’ हा चित्रपट पाहून राय यांनी त्यांची स्तुती केली होती. मात्र, जे आवडले नाही ते दोघेही स्पष्टपणे सांगत. मृणाल सेन यांना राय यांचे ‘अभिजान’, ‘अरण्येर दिन-रात्री’ आणि ‘अशानी संकेत’ हे चित्रपट आवडले नाहीत व तसे त्यांनी स्पष्टपणे एका मुलाखतीत सांगितले. तर सेन यांच्या ‘भुवनशोम’ या चित्रपटावर राय यांनी लिहिले, ‘‘एक आकर्षक नायिका, कर्णमधुर संगीत वगरे लोकप्रिय संकेतांचा वापर केल्यामुळे विषयाची टोकदार मांडणी हरवली आहे. या चित्रपटाची कथा फक्त सात शब्दांत सांगता येते- ‘Big Bad Bureaucrat Reformed by Rustic Belle.’’

त्यावेळी तरी सेन काही म्हणाले नाहीत, पण पुढे आपल्या आत्मचरित्रात याचा उल्लेख करून त्यांनी लिहिले- ‘‘Ray had reacted rather unwholesomely to my film.’’ मात्र, सेन यांच्या मनात राय यांच्याबद्दल किती आदर होता याचे दर्शन याच चित्रपटात घडते. एका प्रसंगात बंगालमधील महान कलावंतांचा उल्लेख करताना त्यांनी आवर्जून टागोर, विवेकानंद यांच्यासोबत सत्यजित राय यांचेही छायाचित्र टाकले होते.

या दोन दिग्गजांमधील मतभेद हा बंगालमध्ये कायम चच्रेचा विषय राहिला आहे. समीक्षक गौरी रामनारायणने यासंदर्भात एकदा लिहिले होते- ‘‘दोन सिंह एकमेकांकडे पाहून वर्तुळाकार फिरत गुरगुरावेत तसे या दोघांचे वर्तन होते. मात्र, असे असले तरी अंतर्मनात त्यांना ठाऊक होते, की ते एकाच विश्वाचे रहिवासी आहेत आणि एकमेकांनी आपल्याला चांगले म्हणावे अशी दोघांचीही इच्छा होती. १९९१ मध्ये राय यांचा ‘आगंतुक’ प्रदíशत झाला त्यावेळी सेन तो पाहण्यास गेले होते. या संदर्भात राय उद्गारले होते, की मृणाल सेन म्हणाले, ‘चित्रपट उत्तम आहे.’ त्यावर सेन यांनी टिप्पणी केली, ‘मी संवादांबद्दल म्हणालो, चित्रपटाबद्दल नाही.’’

सेन व राय यांच्यातील नाते हे सेन यांच्या बाजूने अधिक गहिरे होते. राय यांच्या महानतेबद्दल त्यांच्या मनात शंका नव्हती. त्यांच्याविषयी सेन यांना अतीव आदर व प्रेम होते. राय यांनी त्यांच्या शेवटच्या दिवसांत चिदानंद दासगुप्ता यांना एक खाजगी पत्र लिहिले. त्यात ते लिहितात, ‘‘तथाकथित आर्ट फिल्मचे निर्माते देशातील प्रेक्षकांशी संबंध वाढविण्यापेक्षा परकीय चित्रपट महोत्सवांत हजेरी लावणे महत्त्वाचे समजतात. None of them, even Mrinal, knows the art of film making.’’  हे खाजगी पत्र राय यांच्या संमतीशिवाय ऑक्टोबर १९९१ मध्ये प्रकाशित झाले. त्यावेळी राय अतिशय आजारी होते आणि या आजारातून ते सावरण्याची शक्यताही कमी होती. राय इस्पितळात असताना मृणालदा सतत त्यांच्या कुटुंबाच्या संपर्कात होते. त्यांना या पत्राबद्दल वाईट वाटले. पण त्यांनी अत्यंत संयत शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली, ‘‘कलात्मकता वगरे गोष्टींची यावेळी चर्चा करणे मला योग्य वाटत नाही. कारण त्यामुळे राय यांची मन:शांती बिघडेल व त्यांच्या रोजच्या औषधांइतकीच ही मन:शांतीही अत्यंत गरजेची आहे.’’

२३ एप्रिल १९९२ रोजी सत्यजित राय यांचे निधन झाले. ही बातमी समजल्यावर इस्पितळात धाव घेणारे मृणाल सेन हे पहिले व्यक्ती होते.

निमाई घोष या छायाचित्रकाराने ‘Satyajit at 70’ या पुस्तकात राय यांच्या विविध भावमुद्रा असणारी अनेक छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. या पुस्तकात राय यांच्यावर अनेक दिग्गज कलावंतांनी लिहिलेली टिपणेदेखील आहेत. यातील मृणाल सेन यांचे टिपण ते राय यांना किती मानत हे स्पष्ट करणारे आहे.

मृणालदा लिहितात, ‘‘१७ एप्रिल १९८४ हा दिवस मी किंवा माझी पत्नी केव्हाच विसरू शकणार नाही. त्या दिवशी मला शिकागोला शिकणाऱ्या माझ्या एकुलत्या मुलाचे पत्र आले. माझी पत्नी त्यावेळी स्वयंपाक करीत होती, म्हणून मी ते पत्र तिला मोठय़ाने वाचून दाखविले. त्याने लिहिले होते, ‘‘आई, तुला आठवते का? आपण दोघे राय यांचा ‘अपराजितो’ हा चित्रपट पाहण्यास गेलो होतो. तो पाहण्याची तुझी दुसरी, तर माझी पहिलीच वेळ होती. तू खूप रडली होतीस. घरी आल्यावर तू मला म्हणालीस, ‘तू मोठा झाल्यावर अपूसारखा मला सोडून शिक्षणासाठी दूर निघून जाशील का? जाशील तर पाहा.. मी तुला बजावून सांगते, तू जेव्हा परत येशील तेव्हा या चित्रपटातल्याप्रमाणे मी असणार नाही.’’

काल येथे मी आणि माझ्या मित्रांनी ‘अपराजितो’ पाहिला. तो पाहण्याची माझी ही दुसरी वेळ होती व मी खूप रडलो. माझ्या काही मित्रांना तो आवडला नाही. ते म्हणाले, ‘आयांनी एवढय़ा अपेक्षा ठेवू नयेत. मुलांनी त्यांच्या भविष्याचा विचार करू नये का? आयांनी स्वार्थीपणे मुलांना आपल्या पदराला बांधून ठेवू नये. स्वत: मरून मुलाचा बदला घेणे तर त्यांना शोभत नाही.’  मला त्यांचे बोलणे पटले नाही. ‘आई, विश्वास ठेव- माझे काम झाले की मी येथे थांबणार नाही. नक्की परत येईन.’ ’’ वाचताना माझ्या गळ्यात आवंढा दाटून आला. मी थांबलो. वर पाहिले. माझी पत्नी एकीकडे स्वयंपाक करीत होती आणि रडत होती.

‘अपराजितो’ १९५६ साली प्रदíशत झाला. त्यातील अपूची कहाणी १९२० च्या सुमारास घडते. माझ्या मुलाने हे पत्र १९८४ मध्ये लिहिले. हे वेगवेगळे काळ गूढपणे एकमेकांत मिसळून गेले. माझ्या पत्नीच्या जागी मला सर्वजया- अपूची आई डोळे पुसताना दिसली. मी आणि माझ्या पत्नीने सत्यजित राय या महान कलावंताला आणि त्यांच्या कलाकृतीस वाहिलेली ती आदरांजली होती.’

हा लेख मी आज २०१९ साली लिहितो आहे आणि लिहिताना माझ्याही डोळ्यांत पाणी आहे. सत्यजित आणि मृणालदा या दोन श्रेष्ठ कलावंतांना वाहिलेली ही माझी आदरांजली..

vvpadalkar@gmail.com