देवेंद्र गावंडे

devendra.gawande@expressindia.com

विदर्भाची आर्थिक प्रकृती तशी तोळामासाच. त्यात दरवर्षी निसर्गाने फटका देण्याची रीतच पडून गेलेली. अशात करोनाने मूळ धरल्याने, या मागास प्रदेशाच्या अर्थकारणावर यंदा विपरीत परिणाम होणार हे निश्चित आहे.

उपराजधानीत करोनाच्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली त्याच्या दोन-तीन दिवसांनंतरची गोष्ट. हा रुग्ण ज्या आयटी कंपनीशी संबंधित होता तिचे नाव जाहीर झाल्याने सर्वाचे लक्ष त्या कंपनीकडे वेधले गेले. एका मोठय़ा निवासी संकुलात या कंपनीने अतिथिगृहासाठी एक सदनिका भाडय़ाने घेतलेली. दोन महिन्यांपासून ही सदनिका बंदच होती. तरीही संकुलातील रहिवाशांनी नियंत्रण कक्ष, जिल्हा प्रशासनाला वारंवार दूरध्वनी करून भंडावून सोडले. अखेर या सदनिकेला सील ठोकणे भाग पडले. याच पहिल्या रुग्णाचे घर शहरातील ज्या भागात आहे, त्या परिसरात नागरिकांनी जाणेयेणे बंद केले आहे. या रुग्णाच्या घरी मोलकरीणसुद्धा काम करायला तयार नाही. त्यांच्या घरासमोरूनसुद्धा लोक जात नाहीत. या साथीच्या आजाराची दहशत अशी सर्वत्र पसरली आहे. लोक खरे काय व खोटे काय हेसुद्धा ऐकून घेण्यास तयार नाहीत. सामान्यांच्या या घबराटीत भर टाकली आहे ती समाजमाध्यमातून फिरणाऱ्या बव्हंशी खोटय़ा चित्रफिती व संदेशांनी. करोनाविषयी लोकांना अवगत करण्याचा मक्ता जणूकाही आपल्यालाच मिळाला आहे, या थाटात शेकडो लोक राष्ट्रीय कर्तव्य असल्यागत हे संदेश भक्तिभावाने पसरवत असतात. त्यामुळे नको त्या गोष्टींचा गवगवा व्हायला लागल्याने या घबराटीत सतत भरच पडते आहे. राज्याच्या ३१ टक्के भूभागावर पसरलेला व २१ टक्के लोकसंख्या असलेल्या विदर्भात करोनाग्रस्तांची संख्या सध्या तरी एकअंकी आहे. निगराणीखाली बरेच रुग्ण आहेत. शिवाय एका संशयिताचे निधन झाल्याने जनतेत भीतीचे वातावरण आहे. वेळेत उपचार मिळाले तर हा आजार बरा होऊ शकतो, हे तज्ज्ञांनी वारंवार सांगूनही जनतेतील भीती कमी होण्याचे नाव घेत नाही. यानिमित्ताने येथील आरोग्य यंत्रणेच्या मर्यादासुद्धा उघड झाल्या आहेत. सुमारे तीन कोटी लोकसंख्या असलेल्या विदर्भात संशयितांचे नमुने तपासणारे केवळ एक केंद्र आहे, तेही नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यक महाविद्यालयात. येथे २४ तासांत जास्तीतजास्त शंभर नमुने तपासता येतात. अपुरे कर्मचारी असलेल्या या केंद्राकडे शेजारच्या छत्तीसगड, मध्य प्रदेशातूनसुद्धा नमुने येत आहेत. त्यामुळे केंद्रावरचा ताण कमालीचा वाढला आहे. मध्य भारतातील नागपूरचे महत्त्व लक्षात घेऊन येथे संसर्गजन्य आजारावर संशोधन व उपचार करणारी संस्था हवी अशी मागणी जुनी आहे. त्याची दखल घेत संस्था उभारणीची घोषणाही झाली, पण अजून तरी ती कागदावर आहे. या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने अनेक निर्बंध लादले. शैक्षणिक संस्था बंद केल्या. परीक्षा पुढे ढकलल्या. त्याचा मोठा फटका या वर्तुळाला बसला आहे. तीव्र उन्हाळा हे विदर्भाचे वैशिष्टय़. तापमानाच्या उच्चांकामुळे उन्हाळ्यात येथे सर्वत्र शुकशुकाट असतो. आता पुढे ढकललेले हे शैक्षणिक सत्र या उन्हाच्या काहिलीत सुरू ठेवावे लागेल. केवळ विद्यापीठांचा विचार केला तर चार लाख विद्यार्थ्यांना हा त्रास सहन करावा लागणार आहे. याशिवाय शाळांचे सत्रही स्थगित झाल्याने शाळकरी मुलांनासुद्धा भर उन्हात परीक्षांना सामोरे जावे लागणार आहे. विदर्भातील लाखो विद्यार्थी पुण्यात शिकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. त्या सर्वाना परत फिरावे लागले. यामुळे अनेक सामान्य कुटुंबांचे अर्थकारणच कोलमडून गेले आहे. विदर्भाची आर्थिक प्रकृती तशी तोळामासाच. त्यात दरवर्षी निसर्गाने फटका देण्याची रीतच पडून गेलेली. अशात या साथीने मूळ धरल्याने या मागास प्रदेशाच्या अर्थकारणावर यंदा विपरीत परिणाम होणार हे निश्चित आहे. जंगल पर्यटन हा विदर्भातील मोठा व्यवसाय. जगप्रसिद्ध ताडोबा, पेंच, मेळघाट, करांडला हे हमखास व्याघ्रदर्शन देणारे प्रकल्प. दरवर्षी उन्हाळ्यात हे पर्यटन ऐन भरात असते. नेमकी तेव्हाच ही साथ उद्भवल्याने हे प्रकल्पच बंद करावे लागले. त्याचा मोठा फटका हॉटेल व्यावसायिक व यावर अवलंबून असणाऱ्या शेकडो गावांना बसणार आहे. दरवर्षी उन्हाळ्यात एकटय़ा ताडोबाला ६० ते ७० हजार पर्यटक भेट देतात. त्याखालोखाल पेंचमध्ये ३० ते ३५ हजार. मेळघाट व करांडला येथे पर्यटक कमी जातात. ताडोबाला भेट देणाऱ्यांमध्ये विदेशी पर्यटकांची संख्या लक्षणीय आहे. यंदा सर्वत्र सुरू असलेल्या बंदीमुळे आता विदेशी पर्यटक ताडोबात येण्याची शक्यता दुरावली आहे. उन्हाळ्यात ताडोबात रोजची आर्थिक उलाढाल ५० लाखांच्या घरात असते. पेंचमध्ये ३० तर मेळघाटात पाच लाखांची उलाढाल होते. यातून अनेकांच्या पोटापाण्याला आधार मिळतो. या साऱ्यांची रोजीरोटी करोनाने हिरावली आहे. याशिवाय शेगाव हे गजानन महाराजांचे देवस्थान उन्हाळ्यात कायम गर्दीने फुलले असते. पश्चिम वऱ्हाडातील अनेकांचे अर्थकारण या मंदिरावर अवलंबून आहे. त्यालाही मोठा फटका बसणार आहे. उन्हाळ्यात विदर्भात तीन मोठय़ा जत्रा भरतात. वऱ्हाडातील सैलानीबाबाच्या जत्रेत दरवर्षी ३ लाख लोक सहभागी होतात. त्यातील आर्थिक उलाढाल १८ ते २० कोटींच्या घरातील आहे. बंजारा समाजाचे दैवत असलेल्या पोहरादेवीच्या यात्रेत ३ ते ४ लाख भाविक येतात. येथेही दहा कोटींची उलाढाल होते. शिवाय चंद्रपूरला भरणाऱ्या महाकाली यात्रेला मराठवाडय़ातून लाखो लोक येतात. येथे तीन ते चार कोटींची उलाढाल होते. या सर्व यात्रा यंदा प्रशासनाने रद्द केल्याने शेकडोंच्या तोंडचा घास हिरावला आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन परीक्षा झाल्या की देश तसेच विदेशात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या विदर्भात खूप मोठी आहे. पर्यटनाच्या व्यवसायात काम करणाऱ्या जाणकारांच्या अंदाजानुसार एकूण लोकसंख्येच्या ४० टक्के लोक उन्हाळ्यात फिरण्यासाठी बाहेर पडतात. याची व्याप्ती थेट काश्मीरपासून मामाच्या गावापर्यंत असते. करोनामुळे फिरण्याची धास्ती घेतल्याने यंदा बहुसंख्य लोक बाहेर पडण्याच्या मन:स्थितीत नाहीत. रेल्वेचे ३० टक्के आरक्षण आताच रद्द झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे प्रवासी वाहतुकीच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेकांना आर्थिक झळ सहन करावी लागणार आहे. कोळसा, सिमेंट व लाकूड वगळले तर विदर्भ हा उत्पादक प्रदेश म्हणून ओळखला जात नाही. नागपूर अमरावती ही व्यापारी केंद्रे म्हणून ओळखली जातात. सध्या तरी करोनाची साथ उच्च उत्पन्न गटापुरती मर्यादित आहे. त्यामुळे कोळसा व सिमेंट निर्मिती उद्योगाला त्याचा फटका बसला नाही. अजूनही रोज ११ कोटींचे उत्पन्न रेल्वेला मिळत आहे. शेजारच्या छत्तीसगडमधून येणारे लोखंड व लोहखनिजाचे उत्पादन रोडावले आहे. शिवाय इतर वस्तूंची निर्यातसुद्धा मंदावल्याने येथील कंटेनर डेपोला एक हजार कोटींचा फटका बसला आहे. सरकारने वेळीच दक्षता घेतल्याने विदर्भात मोठय़ा संख्येत असलेल्या कामगारवर्गाला अजून करोनाची लागण झाली नाही. त्यामुळे औद्योगिक उत्पादनावर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. विदर्भातील सर्वात मोठय़ा बुटीबोरी औद्योगिक वसाहतीत वर्षांकाठी ५४ हजार कोटींची उलाढाल होते. मिहानमधील १८ कंपन्यांनी गेल्या वर्षी १६९ दशलक्ष डॉलरची निर्यात केली होती. यंदा हा आकडा आताच २६५ वर पोहोचला आहे. हा आजार वेगाने पसरला तर येत्या पंधरा दिवसांत उत्पादनात १० ते १५ टक्क्यांनी घट होईल असे बुटीबोरीचे उद्योजक नितीन लोणकर सांगतात. येथील पहिल्या रुग्णामुळे चर्चेत आलेल्या आयटी कंपन्यांनी सर्वच कर्मचाऱ्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’ ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या उत्पादकतेवर परिणाम झाला नाही. विदर्भातील कापड बाजार शेजारच्या छत्तीसगड, मध्य प्रदेश व तेलंगणामध्ये प्रसिद्ध आहे. उन्हाळ्यात लग्नाचा मोसम असल्याने या बाजारात तेजी असते. यंदा सर्वत्र शुकशुकाट आहे. मोठमोठे शॉपिंग मॉल्स व गर्दी खेचणारी दुकाने प्रशासनाने बंद केल्याने यावर रोजीरोटी असणाऱ्या अनेकांचा रोजगार हिरावला आहे. या अत्यंत आणीबाणीच्या काळात सुगीचे दिवस आले आहेत ते संत्र्याला. या फळामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते असे डॉक्टर सांगू लागल्याने संत्र्यांना बराच उठाव आला आहे. विदेशात मागणी वाढली आहे. दरवर्षी निसर्गाचा कोप झेलणाऱ्या वैदर्भीय शेतकऱ्यांना हंगाम संपल्यावर ही साथ आल्याने बराच दिलासा मिळाला आहे. यंदा कापसाच्या भावात तेजी होती. आता निर्यात जवळजवळ ठप्प झाल्याने भावात चढउतार झाला तरी शेतकऱ्यांनी कापूस आधीच विकला असल्याने त्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता नाही. भर उन्हात लग्नकार्ये आटोपणे ही वैदर्भीयांची खासियत. यंदा र्निबधामुळे बहुतांश लग्ने पुढे ढकलली गेली आहेत. प्रशासनाने मंगल कार्यालयांनासुद्धा जमावबंदीचे आदेश लागू केल्याने बहुतांश ठिकाणची आरक्षणे रद्द करण्यावाचून अनेकांना पर्याय उरला नाही. एकूणच या आजाराचा प्रसार होण्यापासून रोखण्यात प्रशासनाला सध्या तरी यश आले असले तरी भीतीच्या वातावरणामुळे विदर्भात सर्वदूर स्मशानशांतता आहे. अनेकांच्या पोटावर पाय देणारी व या प्रदेशाला आर्थिकदृष्टय़ा पंगू करणारी ही साथ लवकर आटोक्यात यावी, अशीच भावना सर्वत्र बोलून दाखवली जात आहे.