हर्ष भोगले

मी रेडिओवरून समालोचनाला सुरुवात केली. अनंत सेटलवाड, राजसिंग डुंगरपूर, डिकी रत्नागर अशी रेडिओवरील चांगल्या समालोचकांची कितीतरी नावं सांगता येतील. पण समालोचक म्हणून टीव्हीवर तरी माझे आदर्श असे कुणीच नव्हते. माझं काम हे दुसऱ्यांकडून चांगल्या आणि इंटरेस्टिंग गोष्टी वदवून घेण्याचं असतं. मी लोकांना सांगतो की मी ‘नॉन-स्ट्रायकर’ आहे.

जग खूप बदलत चाललंय. पूर्वी आम्ही टाईपरायटरवरून लेख पाठवायचो. १२००-१५०० शब्द. कधी ३००० शब्दही टाईप करावे लागायचे. काही काळाने ‘८०० शब्दच लिहा’ असं सांगितलं जाऊ  लागलं. नंतर हे प्रमाण ४०० शब्द इतकंच झालं. त्यातही प्रत्यक्षात दोनशेच शब्द! कारण..? लोगो महत्त्वाचा! तो लागायला हवा ना. हेदेखील शिकावं लागतं, की आपल्या लेखापेक्षा लोगो अधिक महत्त्वाचा आहे. आता ट्विटरवर तर आणखीनच कमी शब्द. १४० किंवा २८०! ‘आजकाल तुम्ही ट्विटरवर फार असता..’ असं सांगणारे खूप भेटतात. ते वेगळं माध्यम आहे. पण तुम्ही कसोटी खेळता तसे टी-२० देखील खेळता आलं पाहिजे. तसंच हे आहे. या माध्यमाशी आमच्यासारख्यांना जुळवून घ्यावंच लागतं. फरक इतकाच, की या माध्यमात प्रतिक्रिया झटकन् येतात. आणि समाजमाध्यमांमध्ये आपल्या मनातील अव्यक्त अपप्रवृत्ती (काही जणांच्या मते.. राक्षस!) लगेच बाहेर येतात. त्यामुळे खूप काळजी घ्यावी लागते. लहानपणी आमच्या आईने सांगितलं होतं, की शब्द म्हणजे बाण. एकदा सुटला की परत त्याला बोलावू शकत नाही. शिवाय हल्ली टीका ही संकल्पना.. म्हणजे आधी ज्या प्रकारे टीका व्हायची नि आता ज्या प्रकारे केली जाते, यांत बराच फरक पडलेला आहे. आधी जरा नम्रपणे लोक बोलायचे. आता सरळ म्हणतात की, ‘तुम्हाला काही येत नाही.’ हाच आता नम्र अभिप्राय!

दुसरा एक ट्रेंड सुरू झालाय. तो म्हणजे- पत्रकारिता आळसावल्यागत झालेली दिसते. आळशी पत्रकारितेमुळे लोक समाजमाध्यमांवर एखादी पोस्ट बघतात आणि त्याच्यावरून वृत्त(लेख) तयार करतात. अनेकदा अशी बातमी किंवा लेख बनवण्याइतकं काही त्या पोस्टमध्ये नसतंही. त्यामुळे पोस्टवरून बातमी ‘बनवावी’ लागते. त्यातून ज्या प्रकारचे निष्कर्ष ट्विटर किंवा फेसबुकवरील पोस्टवरून काढले जातात, तो विचारही आपल्या मनात आलेला नसतो. त्यामुळे त्याचीही तयारी ठेवावी लागते. पहिल्यांदा जेव्हा ट्विटरवरून माझ्यावर टीका व्हायची, तेव्हा खूप त्रास व्हायचा. वाटायचं, की मी काय चूक बोललो? पण नंतर शिकलो, की तुम्हाला समाजमाध्यमांवर राहायचं असेल तर जाड कातडीचंच असावं लागतं. आता कुणी काही बोललं तरी मला काही वाटत नाही. हा खूप मोठा बदल आमच्या व्यवसायात झालेला आहे. सगळ्या गोष्टी ‘लाइक्स’वर अवलंबून असतात. त्याच्यावर तुमचं मूल्यांकन केलं जातं. एका परीनं ते योग्य असेलही. कारण चांगल्या फलंदाजाची कसोटी खडतर खेळपट्टीवरच लागते ना! पण विचित्र गोष्ट म्हणजे क्रिकेट हा खेळ आहे हे कुणी लक्षातच घेत नाही. उदा. (पाकिस्तानी फलंदाज) बाबर आझमची फलंदाजी आवडली, तर तसं म्हणण्यात काय गैर आहे? मी जेव्हा एखाद्या पाकिस्तानी फलंदाजाचं कौतुक करतो तेव्हा पाकिस्तानातून इतका मोठा प्रतिसाद मिळतो. कारण मला असं वाटतं की, आपण त्यांचं कौतुक करावं ही त्यांची गरज आहे. त्यामुळे खूप आनंदानं ती मंडळी व्यक्त होतात. आपल्याकडून मात्र कधी कधी थोडाफार अभिप्राय मिळतो. तोही अनेकदा ‘पण विराट कोहलीच चांगला!’ अशा शब्दांनीच संपतो. खरं तर ट्विटरवर आणखीही काही घडू शकतं. १९४७ साली माझी आई लाहोरला होती. फाळणीपूर्व तणावाला सुरुवात झाली होती. त्यामुळे ती भारतात आली. आमचे मामा आणि आजोबा नंतर काही दिवसांनी परतले. मध्यंतरी त्यांच्या गप्पा रंगल्या. लाहोरच्या अनारकली भागात आपलं घर होतं.. ते आता कसं असेल? तिथं डीएव्ही शाळा होती.. ती कशी असेल? हे सगळं मी ट्विटरवर एकदा सहज नमूद केलं. ‘माझी आई आणि तिचं कुटुंब त्याकाळी लाहोरला राहायचे. हा पत्ता होता. ते घर आहे का तिथं?’ यावर मिळालेला प्रतिसाद आश्चर्यजनक होता. काही जण तिथं गेले. त्या घराचा दरवाजा ठोठावला. तो उघडल्यानंतर ते घरात गेले आणि तिथले फोटो काढून त्यांनी मला पाठवले. आई आणि मामा बसून त्यावर चर्चा करत.. की अरे, ही खिडकी तिथंच आहे अजून! या गोष्टी अजूनही होतात.

पण आपल्या समाजातील ताणतणाव इतके वाढले आहेत; ज्यामुळे आपण प्रेमाला थारा देत नाही. कदाचित हे अनफॅशनेबल झालं असेल. पण प्रेम आहेच. आजही मी लंडनला गेलो की तिथला पाकिस्तानी टॅक्सीचालक माझ्याकडून पैसे घेत नाही. अर्थात प्रत्येकाची मतं असतात. ती अनुभवातूनही बनलेली असतात. मतं लादता येत नाहीत. हे मान्य करणं, हाच खरा उदारमतवाद. आम्हाला लहानपणी आमच्या आई-वडिलांनी दोन खूप चांगले शब्द शिकवले होते. एक- धर्मनिरपेक्ष आणि दुसरा- उदारमतवादी! पण या शब्दांचं समर्थन करावं लागेल असं कधी वाटलं नव्हतं.

उस्मानिया विद्यापीठाच्या परिसरात माझं बालपण गेलं. त्या भागात भारतातल्या सगळ्या प्रांतांतील मंडळी होती. त्यावेळी हे उत्तरेकडचे, हे दक्षिणेकडचे असा विचार आम्ही करत नव्हतो. होळी असेल तर ती सगळ्यांच्या घरी व्हायची. रमझान ईद व्हायची. बकरी ईदच्या दिवशी बिर्याणी व्हायची. दिवाळीच्या दिवशी सगळ्यांकडे पूजा व्हायची. तो काळ अतिशय साधा होता. आपल्यांत काही फरक आहे असा विचारही त्यावेळी यायचा नाही. कदाचित हैदराबादच्या संस्कृतीचा तो भाग होता. माझे वडील फ्रेंच शिकवायचे. फ्रान्समध्ये वॉल्तेअर नामक सुप्रसिद्ध विचारवंत लेखक होऊन गेले. त्यांचं एक वाक्य मी खूप लहान असताना वडिलांनी सांगितलं होतं. ‘तुमच्या मताशी मी सहमत नसेन, पण ते व्यक्त करण्याचं तुमचं स्वातंत्र्य मलाही मोलाचं वाटतं. ते जपण्यासाठी मी अखेपर्यंत संघर्ष करेन..’ या स्वरूपाचं ते वाक्य होतं. जगण्याचा तो उत्तम मार्ग आहे. परंतु आजकाल असहमतीची परवानगी नसावी असं वाटतं. बहुधा ते माध्यमांपुरतं मर्यादित असेल! त्यामुळे हल्ली मी फार वाचत नाही.

समालोचनाकडे..

आपण क्रिकेट समालोचन करायचं असं काही मी ठरवलं नव्हतं. हैदराबादचं वैशिष्टय़ म्हणजे इतर भागांत दिवसाचे २४ तास असतात तसे आमच्याकडे ३५ तास असायचे! त्यामुळे वेळच वेळ. तेव्हा आम्ही क्रिकेट खेळायचो. कॉलेजमध्ये असतानाही वेळ मिळायचा. तिथं मी पहिल्यांदा समालोचन केलं. एका सामन्यात मी आमचा भलामोठा टेपरेकॉर्डर घेऊन गेलो होतो. तिथं मी माझं समालोचन ध्वनिमुद्रित केलं आणि ते ऑल इंडिया रेडियोकडे पाठवलं. ते त्यांनी बरेच दिवस ऐकलंच नव्हतं. अखेरीस ऐकलं. तिथं पहिला ब्रेक मिळाला. सुरुवात झाली. मग काही काळ दूरदर्शन. १९९२-९३ मध्ये पहिला मोठा ब्रेक मिळाला. तोपर्यंत मी फ्री-लान्स करायचो. पण घरी याबाबतीत काहीच दडपण नव्हतं. आमच्या हैदराबादमध्ये म्हणतात, ‘करके देखो मियाँ!’ याच भावनेतून मी पुढे गेलो. काही गोष्टी जमल्या, काही जमल्या नाहीत. समालोचनाच्या विश्वातही आज काळ बदललाय. आजकाल लोकांना सामना बघताना एक साउंडट्रॅक हवा असतो. जुन्या पिढीतले म्हणतात, कमी बोला. नवीन पिढीतले सांगतात की- तुम्हाला बोलण्याचे पैसे मिळतात. या दोन्ही पिढय़ांमध्ये आमची पिढी काहीशी अडकली. माझ्याबाबतीत इतकंच सांगेन, की कसोटीमध्ये मी कमी बोलतो. टी-२० सामन्यात अधिक बोलतो. सामन्याचा वेग असतो तो आम्हाला समालोचनातही दाखवावा लागतो. मी त्याच पद्धतीनं समालोचन करतो. ही एक जबाबदारीदेखील असते. तुम्हाला प्रेक्षकांपर्यंत काहीतरी पोहोचवायचं असतं. आणि योग्य तेच पोहोचवायचं असतं. बोलायला काही नसेल तर विनाकारण ओढूनताणून बोलल्यास चुका होतात. मी रेडिओवरून समालोचनाला सुरुवात केली. देवराज पुरी, अनंत सेटलवाड, राजसिंग डुंगरपूर, डिकी रत्नागर अशी कितीतरी चांगली नावं सांगता येतील. टीव्हीवर असं कुणीही नव्हतं. त्यामुळे कोणाकडे पाहायचं? मग मी तंत्रज्ञांकडे पाहायचो. काही चांगले कॅमेरामन होते. त्यांच्या कौशल्याला न्याय मिळावा असं मला वाटायचं. पण समालोचक म्हणून टीव्हीवर तरी माझे आदर्श असे कुणीच नव्हते. माझं काम हे दुसऱ्यांकडून चांगल्या आणि इंटरेस्टिंग गोष्टी वदवून घेण्याचं असतं. मी लोकांना सांगतो की मी ‘नॉन-स्ट्रायकर’ आहे.

ती पिढीच वेगळी होती..

सचिन तेंडुलकरवर सर्वाधिक दडपण हे त्याची नेहमी स्वत:शीच तुलना होण्याचं होतं. याच्यापेक्षा भीतिदायक गोष्ट आणखी काय असू शकते? दरवेळेस तो फलंदाजीसाठी जायचा त्यावेळी सचिन जितक्या धावा करतो तितक्याच त्यानं कराव्यात या अपेक्षा नेहमीच असायच्या. पण सचिनच्या मागे त्याला सांभाळायला खूप जण होते. कुटुंबाचा आधार होता. प्रथम भाऊ आणि पुढे लग्न झाल्यावर त्याची पत्नी यांनी त्याला सांभाळलं. शिवाय त्याची विचार करण्याची पद्धत वेगळीच होती. त्याच्याशी बोलताना वाटायचं, अरे, हे मला ठाऊकच नव्हतं! त्याची सामन्याची तयारी करण्याची पद्धत वेगळीच. एकदा मला म्हणाला, फलंदाजीसाठी जाताना माझ्या मनात कोणतेही विचार नसतात. कारण कम्प्युटरप्रमाणे सारी माहिती ‘फीड’ केलेली असते. पुढचा सगळा खेळ ‘इन्स्टिंक्ट’वरच! एखादा फटका मारला जातो इन्स्टिंक्टवर.. पण तो फटका कोणत्या गोलंदाजाला, कोणत्या मैदानात, कोणत्या खेळपट्टीवर मारला याची माहिती आधीच तयार असते. हा विचार सामन्याच्या आदल्या दिवशी व्हायचा. त्यामुळे त्या दिवशी सचिन कोणताही कार्यक्रम ठेवत नसे. त्या दिवशी केवळ विचार. एकदा सौरव गांगुलीनं सचिनला वेगळ्या तऱ्हेच्या ‘ग्रिप’नं खेळताना पाहिलं. हे काय, या त्याच्या प्रश्नावर सचिन उत्तरला : काल रात्री विचार केल्यावर लक्षात आलं की डेल स्टेनच्या गोलंदाजीवर ही पद्धत अधिक चांगली वाटते! ‘तो बदल अंगिकारायला मला सहा आठवडे लागले असते,’ असं सौरवनं मला सांगितलं. सचिननं त्या दिवशी १०० धावा केल्या. त्याला सगळे ‘जिनियस’ म्हणतात. पण त्याची मेहनतही लक्षात घ्यावी.

राहुल द्रविड हा आणखीनच वेगळा. तो खूप मेहनत घ्यायचा. शिवाय प्रचंड वाचायचाही. त्याची कौटुंबिक पाश्र्वभूमीच तशी होती. त्याच्यासमोर गेलो की, अमूक एक पुस्तक वाचलंस का, असं तो विचारायचा. त्यामुळे मला भीती वाटायची. कोणत्याही आव्हानाला तो कधी नाही म्हणायचा नाही. यष्टिरक्षण, सलामीला फलंदाजी.. आव्हान स्वीकारलं नाही तर आपले दोष कळणार कसे? अपयशाची भीती बाळगली तर प्रगती होणार कशी? हा त्यामागचा त्याचा दृष्टिकोन असे. ती पिढीच वेगळी होती. अनिल कुंबळे, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, सचिन तेंडुलकर.. त्या पिढीबरोबर माझा उत्कर्ष झाला, हे माझं भाग्य. त्यांच्या सर्वोत्कृष्ट वर्षांबरोबरीने माझीही सर्वोत्कृष्ट वाटचाल झाली. हल्लीची पिढी मात्र वेगळी आहे. त्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. आजचे खेळाडू मेहनतीत कमी नाहीत. महत्त्वाकांक्षेतही कमी नाहीत. त्याच्याच जोडीने ते इन्स्टाग्रामवरही असतात. पूर्वीची मंडळी साधी होती. राहुल आणि लक्ष्मण इन्स्टाग्रामवर फोटो अपलोड करताहेत अशी मी कल्पनाही करू शकत नाही.

टॅलेंट म्हणजे काय?

मी आणि माझी पत्नी अनिताने अनेक कार्यशाळांमधून ‘टॅलेंट’ या संकल्पनेचा वेध घेतला आहे. एखादा फलंदाज उत्तम कव्हर ड्राइव्ह मारतो म्हणजे ते केवळ टॅलेंट असतं का? की टॅलेंट वा गुणवत्ता म्हणजे परिस्थितीशी तादात्म्य पावण्याची क्षमता? किंवा अभिनव बिंद्रा म्हणतो त्याप्रमाणे- टॅलेंट म्हणजे मेहनत? परिस्थिती बदलल्यानंतर काय करावं याची माहिती असणं हीदेखील गुणवत्ताच. गुणवत्तेची तुलना होऊ शकत नाही. काही वेळा एखाद्या टप्प्यावर एखादा खेळाडू सामान्य वाटतो. पण तोच खेळाडू पुढे जाऊन असामान्य कामगिरी करू लागतो, तेव्हा तीदेखील गुणवत्ताच असते. कुंबळे, द्रविड त्या प्रकारचे खेळाडू होते. मला ते जवळचे वाटतात. त्यांच्याप्रमाणे मलाही वेगळं काहीतरी करून दाखवावं लागतं. अधिक प्रयत्न करावे लागतात.

टी-२० मुळे या खेळात प्रचंड पैसा आला. पण त्यातून प्रचंड दडपणही आलं. ही हल्लीची क्रिकेट खेळणारी पोरं २०-२१ वर्षांची असतात. त्यांना आयुष्यातील जबाबदाऱ्यांविषयी किती, काय ठाऊक असतं? तरीही आपली अपेक्षा त्यांनी सद्गुणांचे पुतळे म्हणून वावरावे अशीच असते. हे शक्य नाही. अतिशय वेगळी पाश्र्वभूमी असलेले क्रिकेटपटू हल्ली येतात; ज्यांनी इतका पैसा कधीच पाहिलेला नसतो. तो अचानक मिळू लागल्यानंतर कशा प्रकारे ती परिस्थिती हाताळावी, हे प्रत्येकाला जमेलच असं नाही. आयपीएलमुळे पैसा मिळाला की त्याचं दडपणही वेगळं असतं. मी पाहिलं आहे की खूप पैसा मिळणारे युवक काही वेळा अपयशी ठरतात. या सामन्यात मी धावा केल्या नाहीत तर इतके पैसे मिळतील का, असा विचार त्यांच्या मनात सुरू होतो. या सगळ्यांना आपापली दडपणं असतातच. तशात २०-२२ व्या वर्षी सर्वासमोर अपयशी ठरणं, हे आव्हान पचवणं जड असतं. आपणही चुका करतो, पण त्या खासगीत असतात. यांची चूक दोन कोटी लोक पाहतात. त्यावर टीका सुरू होते. समाजमाध्यमांवर काहीबाही लिहिलं जातं. आपल्याकडे तर जणू घरावर दगड फेकण्याचीही मुभा आहे!

क्रिकेट आणि जीवन

कसोटी क्रिकेट हा माझा सर्वाधिक आवडीचा प्रकार. खरं म्हणजे क्रिकेटचा जगभर प्रसार होण्यासाठी आता टी-२० क्रिकेट हाच एकमेव मार्ग आहे. पण कसोटी क्रिकेट हा असा एकमेव प्रकार आहे, ज्यात तुम्हाला दुसरी संधी मिळते. नव्याने डाव सुरू करता येतो. जीवनातही प्रत्येकाला दुसरी संधी हवी असते आणि ती मिळायलाही हवी. पण कसोटी क्रिकेटला आता वाढण्याची फारशी संधी नाही. पाच दिवसांनंतर सामना अनिर्णीत ठरू शकतो आणि तीदेखील एक चांगली कामगिरी असू शकते, ही बाब चिनी आणि अमेरिकनांच्या गळी उतरवणे कठीण आहे.

आव्हानांचा सामना

२०१६ मध्ये म्हणजे वयाच्या ५५ व्या वर्षी मी मुख्य प्रवाहातून बाहेर गेलो होतो. तो काळ आव्हानात्मक होता. पण मी त्यातही संधी शोधली. प्रत्येकानं तशी ती शोधली पाहिजे. अमिताभ बच्चन यांच्या संपर्कात होतो. ५५ व्या वर्षी लोक निवृत्त होण्याच्या मार्गावर असतात. त्या वयात मला अस्तित्व नव्याने निर्माण करण्याची गरज होती. पण मी खंबीर होतो. त्यावेळी मला एक गोष्ट विशेषत्वानं जाणवली. तुमचे कुटुंब हीच तुमची खऱ्या अर्थाने टीम असते. त्याच टीमसाठी तुम्ही खेळत राहिले पाहिजे. संकटांमध्ये हीच टीम मदतीला धावून येते. काही वेळा एखाद्या परिस्थितीबद्दल कुढत बसल्यास जग आपल्या विरोधात आहे, ही भावना आणखीनच पोखरू लागते. टीव्हीपासून दूर झाल्यानंतर डिजिटल माध्यमांचं विश्व माझ्यासाठी खुलं झालं. त्या टप्प्याचा मला खरं तर खूप फायदा झाला. नवीन चाहतावर्ग लाभला. त्यानंतर मला अनेक ठिकाणी भरपूर संधी मिळाल्या. पण ते अपयश नसते आले, तर अनेक चांगल्या गोष्टींना मी मुकलो असतो.

शब्दांकन : सिद्धार्थ खांडेकर