News Flash

विश्वाचे अंगण : अदृश्य अर्थशास्त्र.. निसर्गाचे!

निसर्गापासून फारकत घेण्याची अहमहमिका लागलेल्या काळात सुखदेव परंपरा आणि नवता यांचा संगम घडवत निसर्गाची महत्ता सांगत आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

अतुल देऊळगावकर

atul.deulgaonkar@gmail.com

‘‘आजकाल लोकांना प्रत्येक गोष्टीची ‘किंमत’ समजते, परंतु कशाचेही ‘मूल्य’ त्यांच्या लक्षात येत नाही.’’

– ऑस्कर वाइल्ड

फ्रान्सिस कपोला यांनी ‘अ‍ॅपोकॅलिप्स नाऊ’  चित्रपटातून अमेरिकेने १९६९ साली व्हिएतनामवर लादलेल्या युद्धामधील विध्वंसाचं बहुविध अंतरंग दाखवलं होतं. चित्रपटाच्या आरंभी दूरवर पसरलेलं घनदाट हिरवंगार अरण्य दिसतं. काही क्षणात, प्रसन्न वृक्षांच्या साम्राज्यातील धीरगंभीर शांततेचा भंग करीत एका बाजूने धडधड आवाजाचं हेलिकॉप्टर येऊन पुढे जातं. त्यातून बॉम्बवर्षांव होतो आणि क्षणार्धात वृक्षांच्या दुप्पट-तिप्पट उंचीचे अग्निलोळ एकामागून एक उसळी घेत जातात. मग आकाशात अनेक हेलिकॉप्टर घोंघावू लागतात आणि हिरव्यागार वृक्षांना आगीच्या लाटा जाळत जातात. जमिनीवरील हिरवेपणाच्या जागी अग्नीचे विविध रंग दिसू लागतात. पुढे येणाऱ्या हिंसेच्या मालिकांची चुणूक दाखवणारा- अरण्यविनाशातून दाखवताना कपोला प्रेक्षकांना कासावीस करून टाकतात. मागील ६ महिन्यांत ऑस्ट्रेलियातील १ कोटी हेक्टर, तर अ‍ॅमेझॉनमधील ९ लाख हेक्टर जंगल जळून खाक झालं. तेव्हा ही दृश्ये सतत डोळ्यांसमोर येत होती. ‘विकास’ करण्याची घाई झालेले काही महाभाग अरण्यांना आगी लावून जागा मोकळ्या करून घेत आहेत. दुसरीकडे अरण्यातून कला व विज्ञान समजून घेण्याकरिता अनेक ज्ञानशाखा झटत आहेत. जीवशास्त्र, रसायनशास्त्र, अर्थशास्त्र, मानववंशशास्त्र; इतकंच नाही तर वास्तुकला, मेंदूविज्ञानदेखील समजावून घेणारे वैज्ञानिक व अभ्यासक अरण्याच्या अभ्यासासाठी त्यांचं आयुष्य पणाला लावत आहेत. यंदाचा ‘टायलर पर्यावरणीय सन्मान’ (पर्यावरण क्षेत्रातील नोबल अशी ख्याती असलेला) प्राप्त झालेले पवन सुखदेव हे त्यांपैकी एक! (प्रो. एम. एस. स्वामीनाथन, प्रो. माधव गाडगीळ व डॉ. पार्थ दासगुप्ता हे तीन भारतीय या पुरस्काराचे आधीचे मानकरी होते.) पुरस्कार देणाऱ्या समितीने ‘‘धोरणकर्त्यांची निसर्गाकडे पाहण्याची दृष्टी बदलण्याच्या सुखदेव यांच्या क्रांतिकारी कार्याचा हा गौरव आहे,’’ असं म्हटलं आहे.

स्वित्झर्लंड येथे वास्तव्यास असलेले सुखदेव हे नुकतेच मुंबई दौऱ्यावर असताना त्यांच्याशी बातचीत करण्याची संधी प्रस्तुत लेखकास मिळाली. त्यावेळी त्यांना आपल्याला सदैव भेडसावत असलेला ‘आरे’च्या संदर्भातील ‘विकास विरुद्ध पर्यावरण’ यात निर्णय कसा घ्यावा, असा प्रश्न विचारला. ते म्हणाले, ‘‘विकासाची निकड सांगताना ‘दिसत असणारे तात्कालिक फायदे’ सांगितले जातात. परंतु भविष्यातील हानीचा तसेच विकासाच्या टिकाऊपणाचा विचार केला जात नाही. अरण्यामधील वृक्षसंपदा ही एका विराट पर्यावरणीय यंत्रणेचा भाग असते. त्याकडे निव्वळ झाड म्हणून पाहणे योग्य नाही. ‘आरे’च्या जंगलामुळे मुंबईमधील किती क्षेत्रफळातील रहिवाशांना कोणकोणते लाभ मिळतात, याचे मूल्यमापन करता येते. जंगलावर अवलंबून असणाऱ्या गरिबांना आर्थिक लाभ मिळतात. प्राणवायूचा पुरवठा करणारे हे जंगल किती कर्बवायू शोषून घेते! त्यापासून थंडावा मिळतो व उष्णतेच्या लाटेला अटकाव होतो. पावसाचे पाणी मुरवल्यामुळे पुराची आपत्ती टळते.. असा समग्र विचार करून मुंबईचे रक्षण करण्यासाठी ‘आरे’ सुरक्षित ठेवणे आवश्यकच आहे. वृक्षतोड झाली ही सबब असेल तर तिथे पुन्हा वृक्षलागवड करता येते. माझा मेट्रोला विरोध नाही. मेट्रो वा ‘आरे’ ही भूमिकाच सदोष आहे. दुसरी पर्यायी जागा निवडता येणं अजिबात अवघड नाही. ‘आरे’पासून होणाऱ्या सार्वजनिक लाभांचे मूल्यमापन मोफत करून देण्यास मी तयार आहे. काही मोजक्या लोकांच्या नफ्यासाठी लाखो लोकांच्या सार्वजनिक हिताचा बळी जाऊ देणे, हे लोकशाहीत योग्य नाही.’’

२००६च्या अखेरीस जागतिक बँकेचे माजी मुख्य अर्थतज्ज्ञ सर निकोलस स्टर्न यांनी ‘हवामान बदलाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम’ हा प्रदीर्घ अहवाल सादर केला. हा एकविसाव्या शतकातील वळणिबदू ठरला. स्टर्न यांनी ‘‘मी स्वत: पर्यावरणास फारसं मनावर घेत नव्हतो. परंतु २००३ पासून हवामान बदलाच्या अर्थशास्त्राचा अभ्यास करताना मुळापासून हादरून गेलो. हवेचे प्रदूषण पृथ्वीचा अंत घडवू शकते आणि तो काळ फार दूर नाही याचं भान आलं.’’ असं म्हटलं आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या अनेक समित्यांचा अनुभव असल्यामुळे अर्थकारण व उलाढाल यांमागील अर्थशून्यता सुखदेव यांच्या लक्षात आली होती. ‘स्टर्न’ अहवाल वाचूनच त्यांनी डॉयश बँकेतील अगडबंब वेतनाची नोकरी सोडली. २००८ पासून ते निसर्गाच्या अर्थशास्त्राचा अन्वय लावण्यात गुंतून गेले. त्यातूनच त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाकरिता ‘पर्यावरणीय व्यवस्था व जैवविविधता यांचे अर्थशास्त्र (द इकॉनॉमिक्स ऑफ इकोसिस्टिम्स अँड बायोडायव्हर्सटिी)’ आणि ‘हरित अर्थव्यवस्था’ हे दोन अभ्यास प्रकल्प चालू केले. (त्याकरिता जर्मनी आणि युरोपीय महासंघाने त्यांना आर्थिक पाठबळ दिले.) त्यांनी विविध ज्ञानशाखांमधील जागतिक पातळीवरील वैज्ञानिकांना सोबत घेतले. जगातील नैसर्गिक भांडवल, जैवविविधता आणि पर्यावरणीय व्यवस्था यांचं मूल्य ठरवणे, निसर्गाची हानी व त्यामुळे होणाऱ्या परिणामांचे मापन करणे, यातून निसर्गामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला होत असलेले लाभ अधोरेखित करणे हे प्रमुख उद्देश ठरवले होते.

विख्यात साहित्यिक ऑस्कर वाइल्ड यांनी १०० वर्षांपूर्वी ‘किंमत’ व ‘मूल्य’ याविषयी मार्मिक विश्लेषण केलं होतं. आता जगातील अनेक शास्त्रज्ञ अर्थविज्ञानाच्या आधारे याच निष्कर्षांला येत आहेत. संपूर्ण जग हे बाजारपेठेतील किमतीला मानत आहे. त्यानुसार हिशेब, लाभ व हानी ठरवली जाते. हे अर्थशास्त्रच चुकीच्या गृहितकावर आधारलेलं आहे. निसर्गापासून मिळालेल्या मोफत भांडवलाची आपल्याला यित्कचितही किंमत नसते. निसर्ग गाजावाजा न करता मूकपणे शुद्ध हवा, स्वच्छ पाणी, रोग नियंत्रण, आपत्ती नियंत्रण अशी असंख्य कामे करीत असतो. त्यामुळे सुखदेव यांना निसर्गाची किंमत ही संकल्पनाच मान्य नाही. किमतीपेक्षा कैक पटीने त्यांचे मूल्य अधिक असते. सुखदेव हे अभ्यासाअंती निष्कर्ष सांगत आहेत- ‘‘संपूर्ण जगाला एका वर्षांत पर्यावरणापासून होणारा ऑक्सिजन पुरवठा, कर्ब वायूंचं शोषण, औषध, लाकूड, नवीन संशोधन या सर्व लाभांचं मूल्य २ लाख कोटी डॉलर (आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार) ते ५ लाख कोटी डॉलर इतके आहे. मधमाश्या परागसिंचन करून आपल्याला अगणित अन्नधान्य मिळवून देतात. याकरिता त्या कुठलेही देयक (इनव्हॉइस) पाठवत नाहीत. आपण दररोज ५५० लीटर  प्राणवायू आत घेत असतो. त्याची बाजारातील किंमत किती होईल? निसर्गातील कित्येक उत्पादनं व सेवा या मानवजातीला मोफत मिळत आल्या आहेत. सदासर्वदा बाजारी किमतीत व व्यवहारी जगात मग्न असल्यामुळे आपल्या ते खिजगणतीतही नसते. आपण त्यांना कवडीचीही किंमत देत नसलो तरी त्या सर्व गोष्टी अमूल्य आहेत. जगातील फळफळावळ व अन्नधान्य यांच्या उत्पादनाचा पाया असणाऱ्या परागसिंचनाचे मूल्य दरवर्षी १९० अब्ज डॉलर एवढे निघेल. परागसिंचन करणाऱ्या मधमाश्यांच्या २५० प्रजाती आहेत. १९७४ च्या तुलनेत त्यांच्या संख्येत ३० टक्क्यांनी घट झाल्यामुळे केवळ अमेरिकेला १५ अब्ज डॉलरचा फटका बसत आहे.’’

अजस्र कॉर्पोरेट कंपन्या पर्यावरणाची हानी करत असूनही त्याकडे अनेक देश दुर्लक्ष करीत होते. परंतु २०१० साली ‘बी. पी.’ (ब्रिटिश पेट्रोलियम) कंपनीच्या मेक्सिकोच्या खाडीतील १० कि.मी. खोलीवरील तेलवाहिनाचा स्फोट झाला. उच्च तंत्रज्ञानाची शेखी मिरवणाऱ्या ‘बी. पी.’ला ही तेलगळती ११० दिवस रोखता आली नाही. ८ लाख घनमीटर तेलाने समुद्र भरून गेला आणि जगातील सागरी संपदेची अपरिमित हानी झाली. अमेरिकी न्यायालयाच्या दणक्यामुळे ‘बी. पी.’ला आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक १९ अब्ज डॉलर नुकसानभरपाई सरकारला द्यावी लागली होती. त्यानंतर पर्यावरणाची हानी करणाऱ्या मोठय़ा कंपन्यांच्या सर्व व्यवहारांकडे कसून पाहायला अधिक गांभीर्य आलं. इंडोनेशियामधील ‘एशिया पल्प अँड पेपर’ ही बलाढय़ कंपनी जगाला कागदाचा पुरवठा करते. वृक्षतोडीपासून जंगलातील आगी लावण्यापर्यंत अनेक बेकायदेशीर कृत्यांसाठी ‘एपीपी’चं नाव येत असे. जंगालातील आगींमुळे सिंगापूपर्यंत धुराचं साम्राज्य पसरू लागलं. याविषयी जगभर बदनामी झाल्यावर ‘ग्रीन पीस’ संघटनेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे ‘एपीपी’ने लावलेल्या झाडांचाच कागदासाठी वापर करण्याकडे वाटचाल करण्याचं शाश्वततेचं धोरण जाहीर केलं.

सुखदेव यांनी अनेक कंपन्यांच्या कृत्यांची व पुरवठा साखळीची काटेकोर चिकित्सा केली आहे. ‘कॉर्पोरेशन २०२० ट्रान्सफॉìमग बिझनेस फॉर टुमारो’ या पुस्तकात १०० कॉर्पोरेट कंपन्यांमुळे जगातील पर्यावरणाची दरवर्षी ७.३ लाख कोटी डॉलरची हानी होत आहे, हे सविस्तर दाखवून दिलं आहे. मागील २० वर्षांत कॉर्पोरेशन कंपन्या याच सत्ता गाजवत आहेत. कंपन्यांचा खाजगी नफा आणि समाजाचा सार्वजनिक तोटा एकाच वेळी वाढत आहे. त्या कंपन्या प्रदूषणाची किंमत मोजत नाहीत. त्यांना मजूर, कच्चा माल, भांडवल व पायाभूत सुविधा सर्व काही अतिशय स्वस्तात उपलब्ध होते. ग्राहकांच्या नकळत त्यांचे मन वळवून इच्छांचे रूपांतर गरजेत करण्यासाठी जाहिरातींचा मारा केला जातो. सरकारवर दबाव आणून कंपन्या त्यांच्या हितानुसार कायदे व नियम वळवून घेतात. अनुदान मिळवतात. याविषयीची सखोल चिकित्सा करून सुखदेव म्हणतात, ‘‘सध्या कॉर्पोरेट कंपन्यांचे ‘अदृश्य पाय’ हेच बाजारपेठ चालवतात. (१७५९ साली अ‍ॅडम स्मिथ यांनी ‘अदृश्य हात’ बाजारपेठ चालवतात अशी संकल्पना मांडली होती. त्याची अशी पुनर्माडणी!) अशा दूषित आर्थिक पर्यावरणातून बाहेर पडण्यासाठी सुखदेव हे अनेक कॉर्पोरेट कंपन्यांना पर्यावरणास होणारी हानी कमी करण्यासाठी वेळोवेळी सल्ला देत असतात. मोठय़ा, मध्यम व छोटय़ा आकाराच्या सर्व प्रकारांच्या उद्योगांमुळे पर्यावरणास होणाऱ्या हानीचे मापन करण्यासाठी सुखदेव यांनी ‘पाय’ (प्रोफाइल ऑफ इम्पॅक्ट्स ऑफ एन्व्हायर्नमेंट) हे गुणपत्रक तयार केले आहे. ऑस्ट्रेलिया,  सिंगापूर, फ्रान्स, जर्मनी, स्वीडन या देशांत कोणतेही व्यवहार करण्यासाठी त्या उद्योगाचे ‘पाय’गुण पाहिले जातात. ते जेवढे कमी तितकी त्यांची गुणवत्ता अधिक मानली जाते. पादत्राणे करणाऱ्या ‘प्युमा’ कंपनीने त्यांना उत्पादन व पुरवठा याकरिता लागणारे पाणी, जमीन, वाहतूक, होणारे प्रदूषण यांमुळे दरवर्षी पर्यावरणास १९ कोटी डॉलरची  हानी पोहोचते. हे लक्षात आणून दिल्यावर कंपनीने लक्षपूर्वक ती हानी ४ वर्षांत २५ टक्क्यांनी कमी केली. यामुळे ‘प्युमा’ कंपनीची प्रतिमा उंचावली आहे. ‘द इकॉनॉमिस्ट’ने तीन वर्षांपूर्वी ‘नेतृत्वाची समस्या’ या आवरण कथेत ‘जगभरात राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातच नव्हे, तर कॉर्पोरेट क्षेत्रातदेखील प्रगल्भ नेतृत्वाची वानवा आहे,’ असं विश्लेषण केलं होतं. कॉर्पोरेट जगातही काळानुरूप सुसंस्कृत, सभ्य व उदार नेतृत्व लाभावे याकरिता सुखदेव यांनी ‘जिस्ट’ (ग्लोबल इनिशिएटिव्ह फॉर सस्टेनेबल टुमॉरो) ही संस्था स्थापली आहे. जगातील अनेक कंपन्या त्यांचा सल्ला घेत आहेत.

सुखदेव यांनाही ‘‘सध्याचं दशकच पृथ्वीचं भवितव्य ठरविणार आहे.’’ असंच वाटतं. ‘‘लाभ-हानी, आनंद-दु:ख, यांच्या बाजारपेठेतील अत्यंत चुकीच्या संकल्पनांचा प्रसार करणारे शिक्षण हाच निसर्गाचे मोल समजून घेण्यातील मोठा अडथळा आहे. बेजबाबदार दूरचित्रवाणी वाहिन्या व उथळ सामाजिक माध्यमवीर यांमुळे नको त्या शिक्षणाचाच प्रसार होत आहे.’’ असं ते स्पष्टपणे सांगतात. सुखदेव यांना विकासाचे प्रचलित मापनही मंजूर नाही. ते ‘‘एतद्देशीय उत्पादनातून (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट- जीडीपी) हाताला काहीही लागत नाही. गरिबांचा ‘जीडीपी’ हा कळीचा आहे. त्याचं मापन करणं आवश्यक आहे. गरिबांचा ‘जीडीपी’ सुधारला की अर्थव्यवस्था भरभराटीला लागेल,’’ असं म्हणतात. गरिबांसाठी निसर्ग हेच भांडवल असते. जगातील १२० कोटी लोकांचं अन्न, औषध, जळण व रोजगार म्हणजेच संपूर्ण जीवन हे जंगल अथवा समुद्र या पर्यावरणीय व्यवस्थेवर अवलंबून आहे. बाष्पोत्सर्जन करून पावसाला हातभार लावणारे हेच जंगल आपत्तिरोधक संरक्षक कवचसुद्धा आहे. तेच नाहीसे झाले तर कोटय़वधींचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. (या आगींमुळे आदिवासींचं जगणं अशक्य झालं आहे. रोकड भाषेत १०० अब्ज डॉलरची हानी!) समाज व निसर्ग यांचं आदिकालापासून घट्ट व जिवाभावाचं (सेंद्रिय) नातं आहे. देवराईला स्पर्शसुद्धा न करण्याचं शहाणपण हे त्यातूनच आलं आहे, याचं मोल सुखदेव जाणतात.

निसर्गापासून फारकत घेण्याची अहमहमिका लागलेल्या काळात सुखदेव परंपरा आणि नवता यांचा संगम घडवत निसर्गाची महत्ता सांगत आहेत. मूल्य कालबा झाली आहेत, असा समज झालेल्या काळात ‘मूल्य’ या संकल्पनेचे अनेक ‘अर्थ’ समजून सांगत आहेत. संयुक्त राष्ट्रसंघ तसेच युरोपीय महासंघ यांनी सुखदेव यांना निसर्गाच्या अदृश्य अर्थशास्त्राच्या सिद्धांतांची अंमलबजावणी करण्यासाठी सल्लागारपद दिलं आहे. महाराष्ट्र राज्याला त्यांच्या सल्ल्यानुसार पर्यावरण धोरण आखता येईल. त्यांना निती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीवकुमार यांनी नुकतंच सल्लामसलतीसाठी दिल्ली भेटीचं आमंत्रण दिलं आहे. त्यातून काही सुवार्ता हाती यावी. आपल्यासकट इतर अनेक देशांनी व कॉर्पोरेट कंपन्यांनी हा ‘पवन मार्ग’ वेगाने आपलासा करावा. १९४१ साली ‘डॉक्टर’ चित्रपटात पंकज मलिक यांनी गायलेलं प्रदीप यांचं ‘जग में चले पवन की चाल’ हे गीत लोकप्रिय झालं होतं. हे गीत ८० वर्षांनंतर ‘नवीन’ अर्थाने वास्तवात उतरावं, अशी आशा आपण करू शकतो. तसं झाल्यास निसर्ग अवघ्या जगाला भरभरून आनंद देईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2020 3:09 am

Web Title: article on invisible economics of nature abn 97
Next Stories
1 मुद्रणकला अन् कला-संस्कृतीचे उपासक
2 सांगतो ऐका : भारतीय सांगीतिक सर्वसमावेशकता
3 अफसाना लिख रही हूँ.. : ‘घर’
Just Now!
X