अतुल देऊळगावकर

atul.deulgaonkar@gmail.com

अवघ्या प्राणिमात्रांसाठीही पसायदान मागणारे ज्ञानेश्वर सजीव सृष्टी आणि विश्वाचे आकलन यांतला आंतरसंबंध मोठय़ा खुबीने आणि आर्ततेने सांगतात. याच जातकुळीचं, भोवतालच्या समकालीन सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक घटितांना ‘पर्यावरणीय’ परिप्रेक्ष्यात चौफेर भिडून केलेलं मुक्त चिंतन..

मृत्यू समोर उभा आहे.. फार तर वर्षभराचं आयुष्य उरलं आहे, हे समजल्यावर आपण काय करू? बा देखाव्यासाठी जगताना कधीतरी आत बघण्याचा प्रसंग येतोच. तेव्हा काय होतं? असामान्यत्व दाखवण्याची संधी प्रत्येकाकडे कधी ना कधी येते. त्या कसोटीच्या वेळी कदाचित् आधीसारखंच.. तसंच जगणं चालू राहू शकतं किंवा अंतर्बा बदलही होऊ शकतो. घटना या साध्या व सारख्याच असतात; परंतु घटनेच्या आत शिरून सूक्ष्मदर्शन करता आलं तर त्यातूनच अभिजात कलाकृती निर्माण होते. जपानी चित्रपट दिग्दर्शक अकिरा कुरोसावा यांचा १९५२ मधील ‘इकिरू’ही (जगणे) त्यापैकीच एक कलाकृती!

युद्ध म्हणजे मृत्यूचा जबडा! युद्धापासून दूर दूर असणाऱ्यांना त्या कथा उर भरून येणाऱ्या, रोमहर्षक वगैरे वाटत असतात. मात्र, युद्धातील संहाराचा अनुभव सहन करणाऱ्यांसाठी तो काळरात्रीसारखा यातनादायी असतो. ती दु:स्वप्नं आयुष्यभर मानगुटीवर बसून राहतात. ज्वालामुखी, भूकंप, दोन महायुद्धे आणि अणुबॉम्बचा हल्ला सहन करणारा जपानमधील प्रत्येक नागरिक हा मृत्यूच्या छायेखाली होता. लाखो निरपराध नाहक बळी गेले. अणुबॉम्बच्या स्फोटाने लक्षावधी जपानी नागरिकांना अस यातनांचे अनेक विकार बहाल केले. कित्येक जीव पोटातच मेले. कैक विकलांग झाले. त्यानंतरही अनेक वर्ष पिढय़ान् पिढय़ांना जीवघेण्या रोगांनी ग्रासून टाकलं. मानवी शरीराला विळखा घालून क्रमश: मृत्यूकडे नेणारा (त्याकाळी) कर्करोग हा त्यापैकी एक रोग!

बाहेरचा हा विध्वंस पाहून हताश झालेले कुरोसावा ‘अंतर्मनातील हिंस्त्रतेकडे’ वळले. महाभयंकर विनाश पाहूनही मानवी संकुचितपणा काही नष्ट होत नाही, हे त्यांच्यासाठी वेदनादायी होते. यातून त्यांनी टॉलस्टॉय यांच्या ‘द डेथ ऑफ इव्हान एलिच’ या कथेवर आधारलेल्या चित्रपटाची निर्मिती केली. टोकियो महानगरपालिकेच्या नागरी सुविधा विभागातील एका कर्मचाऱ्यास आतडय़ाचा कर्करोग झाला असून, आपल्या हातात आता फारसा काळ नाही हे त्याला समजतं. त्याचं राहतं घर आणि त्याला मिळू शकणारं निवृत्तीवेतन या स्थावर व जंगम आशेमुळे त्याचा मुलगा व सून हे वरकरणी त्याच्याशी बरे वागत असतात. सोबतच्यांशीही त्याचे संबंध जुजबीच आहेत. कामं घेऊन येणाऱ्या नागरिकांना अडवून स्वत:चं महत्त्व वाढवण्याचा अघोरी आनंद त्यानं ३० वर्ष घेतला आहे. शहरातील सांडपाण्याचं मलकुंड हटवून तिथे मुलांना खेळण्याकरता उद्यान करावं, ही मागणी करणाऱ्या अनेक पालकांना कधी तो ताटकळत ठेवतो, तर कधी विनाकारण पुन:पुन्हा खेपा मारायला लावतो. स्वत:च्या चिमुकल्या सत्तेची व पदाची इतरांना पावलोपावली जाणीव करून देणारा हा गृहस्थ समोर मृत्यू दिसताच हादरून व गारठून जातो. आता उरलेल्या आयुष्यात फक्त चनच करायची असं तो ठरवतो. दारू, क्लब, नृत्य यांत गुंतण्याचा तो प्रयत्न करतो. पण तरीही त्यात त्याचा जीव रमत नाही. मृत्यूची घंटा त्याच्या डोक्यातून जात नाही. आपल्या दु:खात सहभागी करावं असं कोणीही नाही, साथीला कोणीही नाही, हे त्याला उमजलं आहे. अशा विषण्णावस्थेत त्याला इतरांसाठी झटणाऱ्या एका साध्या महिलेमुळे आयुष्याचा अर्थ गवसतो आणि त्याच्याभोवतीचा ‘मीच्या वेलांटीचा फास’ (विंदांनी सांगितलेला) सुटतो. ‘मी’चा लोप झाल्यावर तो साक्षात्कार झाल्यासारखा पूर्णपणे बदलून जातो. मनातून सत्ता व पद यांचा मृत्यू झाल्यामुळे त्याला सर्वाविषयी जिव्हाळा वाटू लागतो. लोकांची कामं तो सहजगत्या हातावेगळी करू लागतो. राजकीय दबाव धुडकावून तो गचाळ जागेचं रूपांतर मुलांसाठीच्या उद्यानात करून दाखवतो. बागेतील झोपाळ्यावर एकटाच झोके घेताना त्याच्या चेहऱ्यावरून निभ्रेळ आनंद ओसंडून वाहतो. त्याच्या मृत्यूनंतर त्याचे सहकारी त्याच्यामधील या बदलाचं गूढ जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.

एका भ्रष्ट व स्वार्थी कर्मचाऱ्याचे संवेदनशील व्यक्तीत होणाऱ्या अवस्थांतराचे प्रगल्भ दर्शन म्हणजे कुरोसावा यांचा ‘इकिरू’! चित्रपटाला काव्य आणि संगीताच्या पातळीवर नेऊन ठेवणारे कुरोसावा हे आपल्याला एकाच वेळी अनेक पातळ्यांवरील बारकावे न बोलता दाखवत जातात. गरजू व सामान्य लोकांचा निर्दयतेने व निलाजरेपणाने छळ करणारी नोकरशाही हा त्यांना, ‘लोकशाहीला मरणाच्या दिशेने नेणारा कर्करोग’ वाटला. तसंच उघडानागडा स्वार्थीपणा, संकुचितता, स्वकेंद्री बाणा हा मानवी मनाला व समाजमनाला जडलेला कर्करोग भासला. परंतु कोणत्याही मार्गाने जाऊन कधीतरी आपण ‘असण्याचा’ व ‘नसण्याचा’ अर्थ काय, असले प्रश्न मानगुटीवर बसतात. आयुष्य संपताना आपल्या हातात काहीच नाही, ही रीतेपणाची भावना ‘स्व’ला कुरतडून काढते आणि ‘स्व’ गळून पडल्यावर अस्तित्वाचा अर्थ गवसतो, असं भाष्य ‘इकिरू’तून केलं होतं. (पुढे जगातील अनेक भाषांमधील चित्रपटातून ‘इकिरू’च्या नकला येत गेल्या. त्यावर बेतलेला ‘आनंद’ हा हिंदी चित्रपट आपल्या गुणवत्तेचा ‘आनंद’!)

१९६० च्या दशकात मानवी शरीरातील कर्करोग अतिशय हलक्या पावलांनी पसरत चालला होता. अणुबॉम्बचा किरणोत्सार व कर्करोग, धूम्रपान व कर्करोग याविषयीचं संशोधन व चर्चा चालू होती. तरीही कर्करोग क्वचितच ऐकायला मिळत असे. या काळातच कर्करोगाचं निदान झालेल्या राशेल कार्सन बाई रोगाला न जुमानता पक्षी मरून पडण्यामागे कीटकनाशकं आहेत काय, याचा कसून शोध घेत होत्या. त्यातून त्यांना मूक होत चाललेला वसंत ऋतू दिसला. ‘सायलेंट स्प्रिंग’मुळे मानवी इतिहासाला कलाटणी मिळाली. संपूर्ण जगाचं पर्यावरण धोक्यात येत असल्याचं भान आलं. पर्यावरणीय विनाश करण्यामागील मानसिकता व राजकारण याची जाणीव विद्वानांना झाली. पर्यावरणीय विध्वंस आणि सांस्कृतिक ऱ्हास हे हातात हात घालूनच पुढे जात आहेत याची चाहूल विविध ज्ञानशाखांच्या शास्त्रज्ञांना लागली. त्यातूनच ‘प्रदूषण’ ही संकल्पना पुढे आली.

या काळातच पत्रकार आणि लेखिका जेन जेकब्स यांनी  ‘द डेथ अँड लाइफ ऑफ ग्रेट अमेरिकन सिटीज्’ या पुस्तकातून ‘शहरं ही माणसांसाठी की वाहनांसाठी?’ असा थेट सवाल केला होता. शहर नियोजनात इमारतींना आणि वाहनांना अवाजवी महत्त्व दिलं जात होतं. उपयोगिता हा एकमेव निकष असल्यामुळे शहरांची तुकडय़ा-तुकडय़ात विभागणी क्षाली. सुटय़ा सुटय़ा इमारतींमुळे शहरांमधील मोकळ्या जागा नाहीशा होत गेल्या आणि त्यामुळे त्याआधारे घडणारे नागरी समूहजीवन संपुष्टात येत गेले. आपण उभी करत असलेली शहरे  निर्जीव आणि भकास होत गेली. शहरांचं माणूसपण नाहीसं होऊन ती उर्मट व क्रूर वाटू लागली. जेकब्स बाईंना शहरांचा हा भाव छळत होता. त्यासाठी लेखणी, वाणी व कृतिशीलता यांतून ‘शहर नियोजनात आमूलाग्र बदलाची निकड’ ठासून सांगणाऱ्या जेकब्स या पहिल्या व्यक्ती होत्या.

सांख्यांनी स्त्री हीच प्रकृती व कर्तीधर्ती, तर पुरुष हा केवळ निमित्तमात्र असल्याचा सिद्धान्त सांगून ठेवला आहे. पण केवळ स्त्री असल्यामुळे निसर्गाशी एकतानता साधणारं स्त्रीमन आपसूक लाभू शकत नाही. ती आच व ओढ आतूनच असावी लागते. किरकोळ पक्ष्याच्या मृत्यूकडे कोण कशाला लक्ष देईल? निसर्गाशी तादात्म्यता असणारी संवेदनेंद्रिये असल्यामुळेच कार्सनबाईंच्या ते ध्यानी आले. जेकब्सबाईंना शहरांच्या भेसूर चेहऱ्याची लक्षणे पाहून शहरांचा मृत्यू टोचणी लावू लागला. यात माणुसकीचा बळी जात असल्यामुळे या दोघीही अस्वस्थ झाल्या. त्यांच्या तीक्ष्ण दृष्टीमुळे त्यांना सृष्टीच्या हाका आधीच ऐकू आल्या होत्या. जीवसृष्टीतील एकेका प्रजातीचा अंत होताना पाहून कासावीस होऊन कंठशोष करणारी ग्रेटा थुनबर्ग याच जातकुळीतली! निसर्गाची बिघडलेली प्रकृती पाहून या तिघी आतून हलल्या, म्हणूनच त्यांचे कार्य अद्वितीय होते; अन्यथा पुरुषी मजल ‘झाडे लावा, प्राणी वाचवा’ इथपर्यंतच येऊन थांबते.

आता प्रदूषणानं सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय व पर्यावरणीय क्षेत्रं पादाक्रांत केली आहेत. परंतु याचा आरंभ आधी मनातून होतो, या वास्तवाला कार्सन व जेकब्सबाईंनी भिडवलं. आता निखळ, शुद्ध व स्वच्छ काही दिसूच नये अशा थराला प्रदूषण गेलं आहे. विश्वाच्या अंगणाला आंदण मानून मुक्त विहार करायचा तर स्वत:ला उणे करावे लागेल, हे कवी ‘बी’ यांनी सांगून ठेवलं आहेच. त्यामुळेच कुरोसावांना व्यक्तींमधील स्वकेंद्रीपणा डाचत होता.

चित्रपटातून क्वचित कधीतरी दिसणारा व ऐकू येणारा कर्करोग आता सर्रास जागोजागी व घरोघरी दिसू लागला आहे. तो आता कौटुंबिक व सार्वजनिक जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. कर्करोगात नको त्या पेशी शरीरात तयार होतात व त्यांची अनिर्बंधपणे वाढ होते. त्या पेशी कोणत्याही अवयवात घुसतात. बाहेरून काही दिसत नाही. त्या व्यक्तीलासुद्धा स्वत:च्या आतमध्ये काय चाललंय याचा पत्ता लागत नाही. तोवर बांडगुळी पेशींनी शरीराचा ताबा घेतलेला असतो. शरीरातील सर्व क्रिया थांबल्यावरच बांडगुळी पेशींचे कार्य पूर्ण होते. कुरोसावा यांना जाणवलेला- माणसाला व लोकशाहीला लागलेला प्रतीकात्मक आणि वास्तवातील कर्करोग- दोघांनीही जगाला व्यापून टाकलं आहे. बांडगुळांनी असंख्य शरीरांवर व लोकशाहीतील व्यवस्थांवर नियंत्रण मिळवलं आहे. आता व्यक्ती किंवा शहरच नाही, तर संपूर्ण पृथ्वीच्या मृत्यूचं निदान केलं जात आहे. बांडगुळी पेशींना नष्ट करण्यासाठी रसायनोपचार आवश्यकच आहेत. ‘इकिरू’चा आरंभ क्ष-किरण तपासणी अहवालाने होतो. शरीराच्या आतील पाहणीसाठीचं हे तंत्रज्ञान तेव्हा नुकतंच दाखल झालं होतं. कुरोसावांनी तो क्ष-किरण टाकून शरीर व मन, व्यक्ती व समाज, नोकरशाही व लोकशाही यांच्या आत डोकावायला लावलं. आजच्या काळात आपल्या जगण्याला अर्थ देणारा कुरोसावा यांचा प्रतिनिधी आपण शोधणार कुठे? आपल्या अंतरीचा ठाव घेऊन आतमध्येच ना?