News Flash

ऋजू व्यक्तिमत्त्वाचे भटकळ

रामदास भटकळ यांच्या आजवरच्या वाटचालीचा वेध घेणारा त्यांच्या अनेक वर्षांच्या सुहृद-सहकाऱ्याचा खास लेख..

(संग्रहित छायाचित्र)

मृदुला प्रभुराम जोशी 

mrudulapj@gmail.com

‘पॉप्युलर प्रकाशन’चे संपादक- प्रकाशक रामदास भटकळ आज रोजी ८५ वर्षांचे होत आहेत. लेखक, गायक, वक्ते, गांधी-अभ्यासक अशी त्यांची अनेकविध रूपेही सर्वपरिचित आहेत. त्यांच्या आजवरच्या वाटचालीचा वेध घेणारा त्यांच्या अनेक वर्षांच्या सुहृद-सहकाऱ्याचा खास लेख..

रामदास भटकळ आज वयाची ८५ वर्ष पूर्ण करीत आहेत. आयुष्याच्या या टप्प्यावर जर त्यांनी सिंहावलोकन करायचं ठरवलं असेल तर एक दीर्घ आणि सफल आयुष्य जगल्याचं समाधान निश्चितच त्यांच्या मनात असेल.

माझा आणि रामदासांचा परिचय ५५ वर्षांपूर्वी झाला तो माझे पती प्रभुराम यांच्यामुळे. ते दोघे १९५१ पासून जिवलग मित्र झालेले होते. आणि त्या सुहृद-संबंधांतूनच त्यांनी आमचा विवाह स्वत:च्या घरी लावून दिला होता. साहजिकच आमच्या कौटुंबिक संबंधांची सुरुवात तेव्हापासून झाली आणि नंतर मात्र त्याला व्यावसायिक वळण लागलं. १९७२ पासून मी त्यांच्याबरोबर ‘पॉप्युलर प्रकाशना’मध्ये पुस्तकांची संपादक म्हणून काम करू लागले, ती आज गेली ४७ वर्ष मी रामदासांची सहकारी म्हणून काम करते आहे. या दीर्घ कालावधीत मी रामदासांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पलू जवळून पाहिले आहेत. इतका दीर्घकाळ त्यांच्याबरोबर काम करणारी कदाचित मी एकटीच असेन. त्यामुळेच दोनएक वर्षांपूर्वी आकाशवाणीच्या मुंबई केंद्राने जेव्हा त्यांच्या आर्काइव्हज्साठी रामदासांची मुलाखत ध्वनिमुद्रित करून ठेवायचं ठरवलं तेव्हा ती मुलाखत घेण्यासाठी मला बोलावलं. मी त्याकरता बरेच प्रश्न काढले, खूप चर्चा केली, तरीही रामदासांचं संपूर्ण कर्तृत्व एका मुलाखतीच्या आटोक्यात येईना. शेवटी तीन तासांच्या मुलाखतीसाठी साडेचार तासांचं रेकॉìडग केलं तेव्हा कुठे जरासं समाधान झालं.

रामदासांचं व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्व खरोखर बहुआयामी आहे. १९५२ साली वयाच्या सतराव्या वर्षी, स्वत: कॉलेज विद्यार्थी असताना त्यांनी ‘पॉप्युलर प्रकाशन’ सुरू केलं आणि गंगाधर गाडगीळ (‘कबुतरे’) आणि अरिवद गोखले (‘कमळण’) यांची दमदार पुस्तकं प्रकाशित करून आपल्या भावी यशाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतरची गेली ६७ वर्ष त्यांच्या यशाची ही कमान चढतीच राहिली आहे. इंग्रजीत आणि मराठीत असंख्य दर्जेदार पुस्तकांची निर्मिती करून त्यांनी जागतिक कीर्ती संपादन केली आहे.

त्यांच्याबरोबर काम करताना मला जाणवलेल्या अनेक गोष्टींपैकी एक प्रमुख गोष्ट म्हणजे रामदास हे एक ‘सर्जनशील संपादक- प्रकाशक’ (creative editor- publisher) आहेत. या प्रदीर्घ काळात त्यांनी अनेक लेखक शोधून काढले, अनेकांना लिहितं केलं, कित्येक प्रतिभावंतांचा शोध घेतला. आणि त्याच वेळेला पुस्तकनिर्मितीतही मोठमोठे बदल घडवून आणले. मराठी पुस्तकांच्या मलपृष्ठावर ब्लर्ब (पाठराखण) देण्याची प्रथा सुरू करण्याचं श्रेय रामदासांकडे जातं. तसंच प्रकाशनापूर्वी पुस्तकाच्या लेखकाबरोबर करारपत्र करण्याचा पायंडाही त्यांनीच पाडला. पुस्तकाच्या अंतरंगाला साजेसं मुखपृष्ठ प्रतिभावान चित्रकारांकडून काढून घेऊन तसंच सुयोग्य मांडणी करून पुस्तकाचा घाट बदलून टाकण्याचा प्रघातही त्यांनीच चालू केला. ‘श्रेयस’ ग्रंथमालिका, ‘नवे कवी, नवी कविता’ असे नावीन्यपूर्ण प्रकल्पही त्यांच्यामुळेच रुजू झाले.

कारकीर्दीच्या सुरुवातीलाच त्यांना प्रा. वा. ल. कुळकर्णी आणि श्री. पु. भागवतांसारखे सव्यसाची मार्गदर्शक लाभले. मराठीतले दिग्गज कथाकार, कादंबरीकार, कवी आणि समीक्षक त्यांच्यासाठी लिहीत राहिले. पॉप्युलर प्रकाशनाच्या लेखकांची नामावळी आपल्याला थक्क करून टाकणारी आहे. गंगाधर गाडगीळ ते जी. ए. कुलकर्णी (कथा), विंदा करंदीकर ते ग्रेस (कविता), वि. वा. शिरवाडकर ते वसंत कानेटकर (नाटक), भालचंद्र नेमाडे ते श्याम मनोहर (कादंबरी), वा. ल. ते द. भि. कुळकर्णी (समीक्षा) यांच्यासारख्या नावांनी पॉप्युलरची यादी समृद्ध केलेली आहे. मराठीतल्या चार ज्ञानपीठ पुरस्कारविजेत्यांपैकी तीन- कुसुमाग्रज, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे- हे पॉप्युलरचे लेखक आहेत. प्रकाशक म्हणून रामदास भटकळांच्या कारकीर्दीला मिळालेला हा मानाचा मुजरा आहे.

उत्तम संपादक आणि प्रकाशक असणं एवढय़ापुरतंच त्यांचं कर्तृत्व सीमित नाही. एक प्रतिभावान लेखक म्हणूनही आज ते ओळखले जातात. Studies in Relationships हा एक धागा मनात धरून त्यांनी स्वत:चे आईवडील, भावंडं, मित्रमत्रिणी, लेखक, चित्रकार, गायक, संगीतकार यांच्याविषयी लिहायला सुरुवात केली आणि त्यातून ‘जिगसॉ’, ‘जिव्हाळा’, ‘रिंगणाबाहेरून’ अशा एकाहून एक सुरेख पुस्तकांची निर्मिती झाली.

वयाच्या चाळिशीनंतर रामदासांच्या अभ्यासाला दोन महत्त्वाची वळणं लागली. त्यांनी ‘गांधी-अभ्यास’ सुरू केला आणि त्याच वेळी आग्रा घराण्याचे श्रेष्ठ गायक पंडित एस. सी. आर. भट यांच्याकडे शास्त्रीय गायनाचा शिस्तबद्ध रियाझ सुरू केला. या दोन्ही क्षेत्रांत अनेक वर्षांच्या तपस्येनंतर आज ते एक जगन्मान्य गांधी-अभ्यासक आणि आग्रा घराण्याचे बुजुर्ग गायक म्हणून ओळखले जातात. ‘Gandhi and His Adversaries with special referance to Savarkar and Ambedkar’ या विषयावर सखोल चिंतन, मनन करून त्यांनी प्रबंध लिहिला आणि मुंबई विद्यापीठाची पीएच. डी. मिळवली. महात्मा गांधी हा विषय त्यांच्या मनीमानसी इतका मुरलेला आहे की त्यातूनच त्यांना ‘जगदंबा’ हे नाटक लिहिण्याची प्रेरणा मिळाली आणि नंतर गांधीजींच्या ‘हिंदस्वराज’ या मूळ इंग्रजी-गुजराती पुस्तकाचा तितक्याच तोलामोलाचा मराठी अनुवादही त्यांनी केला. ‘मोहनमाया’ हे गांधीजींच्या मित्रपरिवारावरचं त्यांचं पुस्तक तर प्रसिद्धच आहे.

पंडित एस. सी. आर. भटसाहेबांकडून त्यांनी २७ वर्ष तालीम घेतली आणि त्यांच्याकडून मिळवलेल्या ज्ञानाचा त्यांनी स्वत:च्या गायनातून प्रसार तर केलाच; पण स्वप्रेरणेने त्यात भरही घातली. रामदासांनी अनेक बंदिशी रचलेल्या आहेत आणि त्यांतून आपल्या गुरूंना आणि परात्पर गुरूंना आदरांजली वाहिलेली आहे. जोगकंस रागातली त्यांची एक बंदिश आहे..

‘हे सुजन मोरे तात

चतुर विद्या देत

प्रेमपिया रंगीले रंगात

चित आनंद दिनरंग

रसिक सुजनसुत कृष्णदास

नंदनंदन को विद्या देत’

या बंदिशीत त्यांनी मोठय़ा कौशल्याने स्वत:च्या सर्व गुरूंची नावं गुंफली आहेत. सुजन (श्रीकृष्ण रातंजनकर), चतुर (भातखंडे), प्रेमपिया (फैयाजखाँ), चितआनंद (चिदानंद नगरकर), रसिक (राजाभया पूँछवाले), सुजनसुत (के. जी. गिंडे), कृष्णदास (भटसाहेब) अशा दिग्गजांकडून त्यांनी गानविद्या मिळवली आहे आणि त्यांच्याप्रति त्यांनी आपली कृतज्ञता या बंदिशीतून व्यक्त केली आहे.

सर्जनशील संपादक-प्रकाशक, प्रतिभावान लेखक, पंडित गायक, गांधी-अभ्यासक या झाल्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या काही बाजू. एक विचारवंत मार्गदर्शक, सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ता म्हणूनही त्यांनी समाजात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. आजच्या पिढीला माहीत नसेल, पण १९७५ च्या आणीबाणीत आणि नंतर ‘ग्रुप ७७’ च्या माध्यमातून रामदास आणि त्यांच्या समानशील सहकाऱ्यांनी फार मोलाचं कार्य केलेलं आहे.

उत्कृष्ट वक्ता म्हणूनही ते ओळखले जातात. संथ, शांत लयीत ते अतिशय अल्पाक्षरांत अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडतात आणि सभा जिंकून घेतात. त्यांच्या वक्तृत्वासंबंधी गिरीश कुलकर्णी यांनी काय म्हटलंय ते पाहा..

‘एकदा त्यांचं भाषण ऐकण्याचा योग आला. अहाहा! एखादं गाणं जसं मुरून बसतं किनई मनात, तसं ते भाषण! त्यातल्या भाषेच्या लालित्यानं, शब्दांच्या लयीनं, प्रासांच्या नादातनं अन् अर्थाच्या साकार अर्थातनं मी शिकलो बरंच काही.’

रामदास हे शांत स्वभावाचे, अनुभवी समुपदेशकही आहेत. अनेकांना त्यांनी अबोलपणे निरनिराळ्या तऱ्हेची मदत केलेली आहे. स्वत:विषयी बोलायला त्यांना अजिबात आवडत नाही. त्यांनी कुणाला कसली मदत केली आहे, ते या कानाचं त्या कानाला कळत नाही. कुणी त्याचा उल्लेख करावा असंही त्यांना वाटत नाही. त्यांना ते आवडतही नाही.

अलीकडे काही दिवसांपासून रामदासांना कवितेतूनही अभिव्यक्ती करावीशी वाटते. अनेक कवींना प्रकाशात आणणाऱ्या या प्रकाशकाचा स्वत:चा कवितासंग्रह मात्र अजून उजेडात येण्याची वाट पाहत आहे.

बाहेरच्या जगात एक यशस्वी प्रकाशक, संपादक, लेखक, गायक म्हणून वावरणारे रामदास घरात अगदी पूर्णपणे कौटुंबिक व्यक्ती म्हणून वावरताना दिसतात. त्यांच्या आयुष्यात सर्वस्वाने समर्पित झालेली पत्नी आणि मत्रीण म्हणजे ललाताई यांची समर्थ साथ आजवर मिळाल्यामुळेच रामदास ही यशस्वी वाटचाल करू शकले आहेत. रामदासांचा मूळ स्वभाव सर्वावर प्रेम करण्याचा असल्यामुळे घरातले हर्ष आणि सत्यजित हे मुलगे, स्मिता आणि स्वाती या सुना आणि तन्वी, मिताली, नयनतारा आणि निशांत ही नातवंडं यांच्यावर रामदासांच्या प्रेमाचा सतत वर्षांव होत असतो. त्यामुळे ते सर्वाचा आधारवड बनले आहेत.

त्यांच्या कुठल्याही सर्वसाधारण दिवसाची सुरुवात मॉìनग वॉकने तसंच योगासनांनी होते. नंतर त्यांच्याकडे शास्त्रीय गायन शिकायला येणारे शिष्य-शिष्या येतात. दुपारी पॉप्युलर प्रकाशनाच्या ऑफिसमध्ये बौद्धिक, वैचारिक संवाद, संध्याकाळी नवीन नाटक किंवा चित्रपट पाहणे, अनेकदा सभासमारंभांत अध्यक्ष किंवा वक्ता वा श्रोता म्हणून उपस्थिती अशा दिवसभरातील भरगच्च कार्यक्रमांतून वेळात वेळ काढून त्यांचं नवीन लेखन, मनन, चिंतन सतत चालूच असतं. स्वत:कडे असलेलं विचारधन निरनिराळ्या मार्गानी समाजाला समर्पित करण्यासाठी लागणारी अक्षय ऊर्जा त्यांच्याकडे आहे. ती अधिकाधिक वृद्धिंगत होवो, हीच आज त्यांच्या पंच्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2020 4:14 am

Web Title: article on ramdas bhatkal abn 97
Next Stories
1 दखल : निरागस बालपण जपण्यासाठी..
2 कहाण्या विज्ञान विदुषींच्या..
3 सांगतो ऐका : ‘हर फिक्र को धुएँ में उडाता चला गया’
Just Now!
X