सुधीर रसाळ

पत्रकार, इतिहाससंशोधक व समाजशास्त्रज्ञ स. मा. गर्गे यांचे उद्या (४ नोव्हेंबर) जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा  घेतलेला आढवा..

Raj Thackeray, mahayuti support
राज ठाकरे यांच्या भूमिकेत कायमच सातत्याचा अभाव
central government, appoints manoj panda
वित्त आयोगाच्या सदस्यपदी अर्थतज्ज्ञ मनोज पांडा, डॉ. निरंजन राजाध्यक्ष यांच्या जागी निवड
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी

स. मा. गर्गे यांना मी प्रथम पाहिलं तेव्हा मी नऊ-दहा वर्षांचा असेन. ते पहिल्यांदाच आमच्या घरी आले होते. ‘आहेत का न. मा. घरी?’ असं त्यांनी दारातून विचारलं होतं. उंच आणि शिडशिडीत शरीरयष्टी, गोरापान रंग, नाकावर चष्मा, खादीचा सदरा आणि पायजमा असं त्यांचं पहिलं दर्शन मला झालं. यापूर्वी मी त्यांना कधी पाहिलं नव्हतं. मी जरा वयानं लहान असलो तरी वडिलांच्या सर्व मित्रांना, परिचितांना ओळखत असे. औरंगाबादचं एक छोटंसंच वाङ्मयावर चर्चा करणारं मंडळ होतं. माझे वडीलच या संस्थेचं कामकाज पाहत असत. या बैठकांची आमच्या घरात होणारी चर्चा मी लांब बसून ऐकत असे. या मंडळाचा प्रत्येक सदस्य नेमाने मराठी मासिकं, साप्ताहिकं घेत असे आणि ती वाचण्यासाठी आपसांत फिरवली जात. आमच्याकडे आलेली मासिकं- साप्ताहिकं दुसऱ्या सदस्याकडे पोहचवण्याचं आणि त्यांच्याकडून आमच्यासाठी आणण्याचं काम मीच करीत असे. त्यामुळे मी सर्वाना ओळखत होतो. पुढे गर्गेकाका विचारविकास मंडळांच्या बैठकांना वारंवार आमच्याकडे येऊ लागले. मासिकं- साप्ताहिकं आणण्यासाठी, नेऊन देण्यासाठी मी त्यांच्याही घरी जाऊ  लागलो. तेव्हा ते गुलमंडीजवळच्या रंगात गल्लीत एका छोटय़ाशा सुंदर घरात राहत असत. मंडळाच्या बैठकांशिवाय अन्य वेळीही ते वडिलांना भेटायला येत. वाङ्मय, राजकारण, समाजकारण यांवर त्यांच्या चर्चा होत. या चर्चात गर्गे आपली मतं अतिशय ठामपणे मांडत. त्यावरून हे काका खूप वाचत असले पाहिजेत, असा कयास मी बांधला. मला यातलं जरी काही कळत नसलं तरी चर्चा करणारे गग्र्याच्या मतांना जे महत्त्व देत ते मलाही कळत असे. वाङ्मयीन वर्तुळाबरोबरच रॉयवाद्याचंही एक वर्तुळ होतं. हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे वरिष्ठ नेते गोविंदभाई श्रॉफ यांचे धाकटे बंधू गोपाळभाई श्रॉफ हे या वर्तुळाचे प्रमुख होते. औरंगाबादमधले अनेक तरुण मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारांनी भारावलेले होते. स. मा. गग्र्याचाही समावेश त्यांत होता. गर्गे औरंगाबादेत आले आणि येथल्या वाङ्मयीन आणि वैचारिक जगतातली एक प्रमुख व्यक्ती म्हणून समजले जाऊ लागले. बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातले लहुरी हे गग्र्याचं गाव. ते बीडहून मॅट्रिक झाले आणि लॉचं शिक्षण घेण्यासाठी हैद्राबादला गेले. लॉ करत असतानाच तेथे विद्यार्थ्यांचा वंदे मातरम सत्याग्रह झाला. त्यात गर्ग्यानीही भाग घेतला असल्यामुळे त्यांना इतर सत्याग्रहांबरोबरच कॉलेजातून काढून टाकलं. त्यामुळे मॅट्रिकच्या सर्टिफिकेटशिवाय त्यांच्याजवळ दुसरं काहीच नव्हतं. ते औरंगाबादला आले आणि त्यांनी सरस्वती भुवन या राष्ट्रीय शाळेत शिक्षकाची नोकरी पत्करली. माझे वडीलही याच शाळेत शिक्षक असल्यामुळे आणि त्या दोघांनाही वाङ्मयात रस असल्यामुळे त्यांची मैत्री झाली. हैदराबाद संस्थानात निझाम सरकारच्या आशीर्वादानं हिंदूंविरुद्ध रझाकारांची हिंसक चळवळ सुरू झाली. लहुरी येथील गग्र्याचे घर रझाकारांनी लुटले. निझामी सत्तेची पुष्कळच झळ गग्र्याना आणि त्यांच्या कुटुंबीयांना लागली. शिक्षक झालेले गर्गे आमच्याही वर्गाला शिकवत असल्यामुळे मी त्यांचा विद्यार्थीही होतो. त्यांचे शिकवणे बरेच बोजड असे. त्यांना शिकवण्यात अजिबात रस नसावा. अनेकदा ते रजेवरच्या शिक्षकाच्या तासाला बदली शिक्षक म्हणून येत. येताना स्वत:च्या वाचनासाठी एखादं पुस्तक घेऊन येत. मुलांना आपआपली पुस्तके काढून अभ्यास करायला सांगत. गडबडगोंधळ करायचा नाही; शांतपणे अभ्यास करायचा, असा मुलांना दम भरत. मुलं त्यांना घाबरत असल्यामुळे फारशी गडबड करीत नसत. मुलांनी थोडा जरी शांतताभंग केला तर ते टेबलावर रूळ आपटत असत. मुलं चुपचाप बसत असत. १९४४ साली औरंगाबादेत मराठावाडा साहित्य परिषदेचं तिसरं संमेलन झालं. स. मा. गर्गे या संमेलनाचे चिटणीस होते. हे संमेलन गग्र्याच्या जीवनात एक महत्त्वाचं परिवर्तन घडून आणणारं ठरलं. या संमेलनात अनेक नाटय़पूर्ण घटना घडल्या. तसेच हे संमेलन गग्र्याच्या कार्यपद्धतीचा कस लावणारंही ठरलं. अनेक नाटय़पूर्ण अडचणींवर मात करून गग्र्यानी हे संमेलन यशस्वी करून दाखवलं. निझाम सरकार कुठलीही राजकीय संस्था काढायला आणि नवा धार्मिक उत्सव सुरू करायला परवानगी देत नसे. वाङ्मयाच्या क्षेत्रात काम करायलाही परवानगीची गरज असली तरी ती मिळणे तुलनेने सोपे होते. हैदराबाद संस्थानात जेव्हा स्टेट काँग्रेस ही राजकीय संस्था स्थापन झाली तेव्हा तात्काळ सरकारने तिच्यावर बंदी आणली. अशा परिस्थितीत वाङ्मयीन कामाच्या माध्यमातून राजकीय जागृती करण्याचे प्रयत्न सुरू झाले. वऱ्हाड प्रांत हा मूळचा निझामी राजवटीखाली होता. तो ब्रिटिश सत्तेखाली गेला असला तरी निझाम तो आपलाच प्रांत असल्याचे मानत होता. निझाम सरकारच्या दृष्टीने तो ‘मुलकी’ भाग होता. विदर्भ साहित्य संघाला हैदराबाद संस्थानात कार्य करायला प्रतिबंध नव्हता. म्हणून विदर्भ साहित्य संघाच्या वतीने १९३९ मध्ये हैदराबाद येथे निझामप्रांतीय साहित्य संमेलन भरवण्याचा घाट घातला गेला. अण्णासाहेब खोपर्डे या संमेलनाचे अध्यक्ष होते. याच सुमारास विदर्भ साहित्य संघाने मराठवाडय़ात काही ठिकाणी आपल्या शाखाही सुरू केल्या. नांदेड येथे दुसरे साहित्य संमेलन १९४३ साली भरवले गेले. या संमेलनात मराठवाडा साहित्य परिषदेची रीतसर स्थापना करण्यात आली. ही साहित्य संस्था आडवळणाने राजकीय जागृतीचे काम करण्यासाठी स्थापन केली गेली. नांदेडचं हे संमेलन दत्तो वामन पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली भरवलं गेलं. दत्तो वामन हे निझाम प्रांतातले प्रजाजन- म्हणजे मुलकी- नसल्यामुळे त्यांना अध्यक्षपद द्यायला सरकारचा विरोध होता. परंतु त्यावेळचे निझाम सरकारचे मुख्यमंत्री नबाब छत्तारी हे इतिहासात रस घेणारे असल्यामुळे त्यांना दत्तो वामनांबद्दल आदर होता. त्यामुळे त्यांच्या अध्यक्षपदाला मान्यता देण्यात आली. ती देताना त्यांनी आपल्या भाषणात निझाम सरकारच्या विरोधात बोलू नये अशी अट घालण्यात आली. उर्दू ही विद्यापीठीय पातळीवर ज्ञानार्जनाचे माध्यम करणारे आणि त्यासाठी विविध ज्ञानशाखांतील इंग्रजी ग्रंथांची उर्दूत भाषांतरे करण्यासाठी प्रचंड खर्चाने स्वतंत्र विभाग चालवण्याच्या निझाम सरकारच्या कृतीची स्तुती करणारे आणि असेच मराठी भाषेबाबतही होणे आवश्यक आहे, अशी इच्छा व्यक्त करणारे भाषण दत्तो वामनांनी केले. तिसरे मराठवाडा साहित्य संमेलन औरंगाबादला भरवले गेले. सुप्रसिद्ध कादंबरीकार आणि पत्रकार ग. त्र्यं. माडखोलकर हे संमेलनाचे अध्यक्ष निश्चित केले गेले. ते वऱ्हाडचे असल्यामुळे ‘मुलकी’ ठरले आणि या निवडीला निझाम सरकारने मान्यता दिली. औरंगाबादचे वकील आणि पुढे खासदार झालेले हनुमंतराव वैष्णव हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते आणि चिटणीसपदाची जबाबदारी स. मा. गग्र्यावर टाकली गेली. वैष्णव वकील संमेलनाच्या कार्यासाठी आवश्यक तो वेळ देऊ शकत नसल्याने, जवळपास सर्वच जबाबदारी गग्र्यावर पडली. या संमेलनाचे उद्घाटन न. र. फाटकांच्या हस्ते होणार होते. त्यांना घेण्यासाठी स्टेशनवर माणूस पाठवला, तो फाटकांना ओळखत नसल्याने त्याला स्टेशनवर फाटक ओळखू आले नाही. घ्यायला कोणीच आले नाही म्हणून रागावलेले फाटक संमेलनस्थळी आले. तेथेही त्यांना कोणी ओळखले नाही. उलट त्यांना संमेलन शुल्क भरण्याचा सल्ला दिला गेला! रागावलेले फाटक काठियावाड लॉजमध्ये जाऊन उतरले. गग्र्याना जेव्हा ही हकीगत कळली तेव्हा ते स्वत: शोध घेत काठियावाड लॉजमध्ये जाऊन पोचले. फाटकांची क्षमा मागितली. फाटक परत जाण्याची भाषा बोलू लागले. तेव्हा गर्गे म्हणाले, ‘‘हैदराबाद संस्थानात लेखक मंडळी येत नाहीत. आम्हालाही संस्थानाबाहेर फारसे जायला मिळत नाही. अशा परिस्थितीत संमेलनाच्या स्वयंसेवकांनी न. र. फाटकांना कसे ओळखावे?’’ हा युक्तिवाद फाटकांना पटला आणि ते शांत झाले. संध्याकाळी संमेलनाचे उद्घाटन. त्यातही पुन्हा विघ्न! सरस्वती भुवन शाळेच्या इमारतीचे बांधकाम अपूर्ण होते. त्यात सभागृहाच्या केवळ भिंतीच बांधल्या गेल्या होत्या. वर छतही नव्हते आणि व्यासपीठाचा ओटाही नव्हता. संमेलनासाठी बांबू-फळ्यांनी तात्पुरते व्यासपीठ उभारले गेले होते. उद्घाटन समारंभप्रसंगी व्यासपीठावर मान्यवरांची खूपच गर्दी झाली. न. र. फाटक उद्घाटनाच्या भाषणाला उभे राहिले आणि व्यासपीठाचा मधला भाग एकदम खचला. उजवीकडे बसलेले डावीकडे आणि डावीकडे बसलेले उजवीकडे फेकले गेले. सभागृहात एकच गोंधळ उडाला. स. मा. गग्र्यानी शांतपणे ही भीषण परिस्थिती हाताळली. जखमींच्या उपचाराची सोय केली. टेबल-खुर्च्या खाली घेतल्या गेल्या आणि कार्यक्रमाला सुरुवात करून दिली. उद्घाटनाचा कार्यक्रम संपल्यावर व्यासपीठ उभारण्याचे काम सुरू केले. रात्रभर जागे राहून आपल्या निगराणीखाली गग्र्यानी हे व्यासपीठ पुन्हा उभारले. दुसऱ्या दिवशी कार्यक्रम या व्यासपीठावर सुरू झाले. परंतु संकटं थांबण्याची चिन्हं नव्हती. दुसऱ्या दिवशी रात्री मो. ग. रांगणेकरलिखित ‘आशीर्वाद’ नामक नाटकाचा प्रयोग होता. नाटकाचं दिग्दर्शन माझ्या वडिलांनीच केलं होतं. मराठवाडय़ात स्त्रीभूमिका करण्यासाठी स्त्रिया मिळणं अशक्य असल्यामुळे पुरुषांनीच स्त्री-भूमिका केल्या होत्या. मेकअप सुरू असतानाच लक्षात आलं की स्त्रीपात्रांसाठी आणले गेलेले केसांचे टोपच गायब आहेत! नाटक सुरू होण्याची वेळ झाली आणि स्त्रीपात्रं सजून तयार नाहीत. येथेही गग्र्यानी ही बिकट परिस्थिती शांतपणे हाताळली. त्यांनी आपल्या परिचित स्त्रियांना स्त्रीप्रेक्षकांत जाऊन काही गंगावने गोळा करून आणायला सांगितलं. आपण गंगावन वापरत नाही, असंच प्रेक्षकातल्या स्त्रिया सांगू लागल्या. शेवटी मिनतवाऱ्या करून काही गंगावने मिळवली. टोपाच्या जागी गंगावनांना कसाबसा टोपाचा आकार दिला गेला. डोक्यावर पदर घेऊन आणि हा हास्यास्पद केशसंभार झाकलेला ठेवून सर्व नटांनी स्त्रीभूमिका सादर केल्या. गंगावनांचे टोप चढवलेले पुरुष – स्त्रीपात्रं मात्र भयानक दिसत होते! औरंगाबादेत सार्वजनिक कामं करण्यासाठी फारसे लोक पुढे येत नसत. सरस्वती भुवन शाळेतले काही शिक्षक आणि स्वयंसेवक बनलेले विद्यार्थी, एवढंच मनुष्यबळ गग्र्याच्या हातात होतं. त्यामुळे कामाचा मोठा बोजा गग्र्याच्या खांद्यावर पडला. तो त्यांनी यशस्वीपणे सांभाळला. संमेलन संपल्यावर माडखोलकर-गर्गे आणि इतर काहीजण मराठवाडय़ातल्या काही महत्त्वाच्या गावी गेले आणि त्यांनी मराठवाडा साहित्य परिषदेच्या शाखा स्थापन केल्या. या संमेलनकाळात आणि शाखास्थापनेसाठी केलेल्या प्रवासात माडखोलकर आणि गर्गे अधिक निकट आले. गग्र्याचा सामाजिकशास्त्रांचा व्यासंग, त्यांची विचार करण्याची पद्धती आणि एकूण कर्तबगारी पाहून माडखोलकर प्रभावित झाले असले पाहिजेत. त्यांनी गग्र्याना आपल्या वर्तमानपत्रात उपसंपादक म्हणून आमंत्रित केले आणि स. मा. गग्र्याच्या जीवनाला एक वेगळे आणि त्यांच्या वृत्तीला पोषक असे वळण प्राप्त झाले! आतापर्यंत कथन केलेले सर्व, वयाने लहान असूनही मी प्रत्यक्षात पाहिलेले आणि साक्षी असलेल्यांच्या तोंडून ऐकलेले आहे. माझे वडील सर्व सार्वजनिक कार्यक्रमांना मला सोबत घेऊन जात. गग्र्याच्या नेतृत्वाखाली भरलेल्या या संमेलनाच्या प्रत्येक कार्यक्रमाला मी वडिलांबरोबर उपस्थित राहिलो आहे. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी स. मा. गग्र्याशी पुन्हा माझा संबंध आला. मी मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागात शिक्षक होतो आणि स. मा. गग्र्याना याच विद्यापीठात नव्याने स्थापन झालेल्या वृत्तपत्रविद्याविभागात विभागप्रमुख म्हणून आमंत्रित केले गेले. वस्तुत: वृत्तपत्रविद्येची कसलीही पदवी त्यांच्यापाशी नव्हती. परंतु हा विभाग नव्याने सुरू होत असल्यामुळे त्याची नीट घडी बसवण्यासाठी पुस्तकी पंडिताऐवजी वृत्तसंपादनाचा आणि व्यवसायाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या व्यक्तीची गरज असते. पुन्हा स. मा. गर्गे मराठवाडय़ाचे, त्यामुळे त्यांच्याविषयी आत्मीयता. गग्र्यानी हे आमंत्रण स्वीकारले. गर्गे जरी प्रथम नागपूरला आणि नंतर तेथून पुण्याला गेले असले आणि पुण्यातच स्थायिक झाले असले तरी त्यांनाही मराठवाडय़ाची ओढ असणार. शिवाय येथे त्यांची तरुणवयातली समवयस्क अशी मित्रमंडळी होती. मराठवाडा दैनिकाचे अनंत भालेराव, भगवंत देशमुख, रॉयीस्ट ग्रुपचे अ‍ॅड. प्रभाकरराव देशमुख या सर्वाचा त्यांना पुन्हा सहवास लाभणार होता. गग्र्यानी हे आमंत्रण स्वीकारलं आणि ते विद्यापीठात रुजू झाले. अनंत भालेराव यांच्या मित्रवर्तुळात मी, नरेंद्र चपळगाकर, तु. शं. कुळकर्णी, गो. मा. पवार अशी तरुण मंडळी होती. अनंतरावांच्या घराच्या अंगणात भगवंत देशमुखसारखी ज्येष्ठ मंडळी आणि आम्हासारखी तरुण मंडळी या सर्वाच्या रोज सायंकाळी बैठका होत. त्यात केवळ हास्यविनोदच नव्हे तर राजकारण, समाजकारण, वाङ्मय अशा सर्व गंभीर विषयांवर चर्चा होत असत. स. मा. गर्गेही यात सामील झाले. आता त्यांच्या माझ्या संबंधाचे स्वरूप बदलले. पूर्वी ते माझ्याकडे मित्राचा एक लहान मुलगा म्हणून पाहत असत, आता ते आपला एक तरुण मित्र या नात्याने माझ्याशी वागू- बोलू लागले. गर्गे विद्यापीठात दीर्घकाळ राहिले नाहीत. ते विद्यापीठात सामान्यपणे दोन वर्षे असावेत. ते पुण्याला गेले तरी औरंगाबादेतील आम्हा तरुण मित्रांशी त्यांचे संबंध कायम राहिले. आम्ही सर्वानी प्रत्येक वर्षी दोन एक दिवस कोठेतरी एकत्र रहावे, चर्चा कराव्यात, अशी कल्पना अनंत भालेरावांना सुचली आणि अनंतरावांसह स. मा. गर्गे, भगवंत देशमुख, अ‍ॅड. प्रभाकरराव देशमुख, मुंबईत स्थायिक झालेले यशवंत कानिटकर या ज्येष्ठ मंडळींसह आम्ही सर्व तरुण एकत्र जमू लागलो. आमचा हा कार्यक्रम पाचएक वर्षे चालला. महाबळेश्वर, पैठण, कोल्हापूर अशा ठिकाणी आम्ही एकत्र राहिलो. वेगवेगळ्या विषयांवर अनौपचारिक चर्चा केल्या. एकमेकांच्या भूमिका खोडून काढल्या, मतभेद व्यक्त केले. या सहलींत एक विचारवंत म्हणून स. मा. गग्र्याचे परिपूर्ण दर्शन घडले. एरव्ही गंभीर वाटणाऱ्या गग्र्यामध्ये विनोदबुद्धीही आहे हे लक्षात आले. स. मा. गग्र्यानी समाजविज्ञान कोश सिद्ध करून मराठी भाषेत केवळ मोलाची भर टाकली नाही, तर त्याद्वारे मराठीला ज्ञानभाषा म्हणूनही एक रूप मिळवून दिले. राज्यशास्त्रावर दर्जेदार पाठय़पुस्तके निर्माण केली. गो. स. सरदेसाईंच्या ‘मराठी रियासत’ आणि ‘ब्रिटिश रियासत’ या इतिहासावरील ग्रंथमालिकांचे अद्ययावतीकरण केले. ते करण्यासाठी नव्या पुराव्यांवर संशोधन केले. करवीर संस्थानाचा अधिकृत इतिहास ‘करवीर रियासत’ सिद्ध करून प्रथमच उजेडात आणला. महाभारतावर संशोधन केले. ‘शांतिपर्वातील कथा’सारखे पुस्तक लिहिले. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास या ज्ञानक्षेत्रांत मराठीत सैद्धांतिक स्वरुपाचे लेखन केल्यामुळे एक ज्ञानभाषा म्हणून मराठी भाषा समृद्ध करण्यात त्यांचा मोलाचा हातभार लागला. मराठवाडय़ातील या महान ज्ञानसाधकाचा उचित गौरव मराठवाडय़ाने केला नाही याची खंत आम्हा मंडळीच्या मनात होती. मी अ. भा. साहित्य महामंडळावर असताना महामंडळाच्या वर्धापन दिनाचे सन्माननीय अध्यक्ष म्हणून महामंडळाने त्यांना आमंत्रित केले. हा वर्धापनदिन गग्र्याची पहिली कर्मभूमी असलेल्या नागपूरमध्ये आयोजित करण्यात आला. लातूर जिल्ह्यातील शिरूर ताजबंद येथे भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करून मराठवाडा साहित्य परिषदेने त्यांच्या ज्ञानसाधनेचा उचित गौरव केला. समाजविज्ञान कोशाचे काम पूर्ण झाल्यावर प्रा. भगवंतराव देशमुख आणि मी पुण्याला गग्र्याना भेटायला गेलो होतो. त्यांच्या वयाची ऐंशी वर्षे उलटून गेली होती, पण कामाचा उत्साह कायम होता. ते आम्हाला म्हणाले, ‘‘तुम्हा दोघांची तयारी असेल तर आपण ‘मराठी बृहद् शब्दकोशा’चा प्रकल्प हाती घेऊ या.’’ परंतु स. मा. गग्र्यासोबत काम करण्याचे भाग्य मला लाभू शकले नाही.