News Flash

ते दिवस..

महाराष्ट्राच्या इतिहासात ‘युक्रांद’ चळवळीने एक काळ खूपच गाजवला. या चळवळीच्या नेत्याने त्या काळातील जागवलेल्या आठवणी..

(संग्रहित छायाचित्र)

 

कुमार सप्तर्षी

lokrang@expressindia.com

महाराष्ट्राच्या इतिहासात ‘युक्रांद’ चळवळीने एक काळ खूपच गाजवला. या चळवळीच्या नेत्याने त्या काळातील जागवलेल्या आठवणी..

सत्तरीचं दशक विद्यार्थी आंदोलनांमुळे गाजलं. ही आंदोलनं जगभर चालू होती. प्रस्थापितांचा कडवा विरोध हे जागतिक पातळीवरच्या आंदोलनांचं समान वैशिष्टय़ होतं. अमेरिकेत भांडवलशाहीच्या व्रात्य वर्तनाबद्दल तरुणांमध्ये विरोध होता. बापपिढीचा पलायनवाद, पिढीजात भ्याडपणा, आत्मकेंद्री वृत्ती, राष्ट्रवादाच्या बुरख्याखाली लपलेली प्रस्थापितांची युद्धखोर प्रवृत्ती या गोष्टी तरुण पिढीला स्पष्ट झाल्या होत्या. व्हिएतनाममध्ये अमेरिकेचे लष्कर घुसलेले. तिथल्या मुलांच्या, महिलांच्या, दुबळ्यांच्या रक्तमांसाचा चिखल करण्याचा अधिकार अमेरिकेच्या सरकारला कोणी दिला, आणि सरकारच्या या क्रौर्याला माझा बाप पाठिंबा का देतोय, हे कोडं तिथल्या तरुणांना पडलं होतं.

दुसऱ्या महायुद्धानंतर जन्माला आलेली ही पिढी. जेव्हा ती तारुण्यात आली तेव्हा बापांचं विश्लेषण करू लागली. प्रस्थापितांच्या विरोधात दंड थोपटून उभी राहू लागली. विद्रोही बनली. बापांच्या पापांचं साम्राज्य उद्ध्वस्त करू, असं म्हणू लागली. चंगळवाद हा भांडवलशाहीचा प्राण असतो. जाहिरातबाजी हे संमोहन करणारं तंत्र. गरज नसली तरी वस्तू खरेदी करण्याचं वेड म्हणजे चंगळवाद. त्याविरुद्ध बंड करणारे हिप्पी तरुण घर सोडून जगभर हिंडू लागले. कसेही कपडे घालायचे, कुठंही उघडय़ावर झोपायचं. युवक-युवती प्रेममय होऊन गळ्यात गळे घालून हिंडायचे. ‘प्रेम खरं, संस्कृतीचं अवडंबर खोटं’ असं ते म्हणू लागले. फ्रान्समध्ये सारबोन विद्यापीठ तरुणांनी ताब्यात घेतलं. शैक्षणिक चौकटीविरुद्ध त्यांनी बंड केलं. त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न समाजाला पटले. महिना- दोन महिने फ्रान्स देश ठप्प झाला. चार्ल्स द गॉल नावाचा लोकप्रिय हुकूमशहा तेव्हा फ्रान्सचा राष्ट्रप्रमुख होता. युवकांच्या विद्रोहाने त्याच्या राजवटीचा अंत झाला. रशिया, चीन, जपान, भारत अशा सर्वच देशांत युवक रस्त्यावर आले. क्रांतीचं नेतृत्व करायला संसदीय पक्ष अपुरे ठरले. ही क्रांती नव्हती, पण राजकीय परिवर्तनाची लाट होती. चीनमध्ये सांस्कृतिक क्रांती पसरली. दोन वर्षे महाविद्यालये बंद होती. तरुण देशभर फिरत होते, प्रस्थापित नेतृत्वाला काटेरी प्रश्न विचारत होते.

नेमक्या याच काळात- १९६७ साली महाराष्ट्रात नक्षलवादी संघटना आणि सत्याग्रही युवक क्रांती दल यांची स्थापना झाली. प्रस्थापितांचे पोलीस नक्षलवादी तरुणांची शिकार करू लागले. नक्षलवादाचा गाभा हिंसेचा होता. त्यांना दऱ्याखोऱ्यांचा आश्रय घ्यावा लागला. ‘युक्रांद’चा मार्ग सत्याग्रही होता. जनशक्ती, युवाशक्ती, निर्भयता ही युक्रांदची संघर्षांची पद्धती होती. दडपशाही झाली की त्यांचा पाया आपोआप विस्तारायचा. ‘रस्त्यावर उतरा, सामुदायिक बोंब मारा, येरवडा विद्यापीठाचे पदवीधर व्हा’ हे युक्रांदचे ब्रीदवाक्य होते. कोणत्याही पक्षाकडे हे विद्रोही तरुण सामावून घेण्याचे सामर्थ्य नव्हते. महाविद्यालयीन संस्कृतीपासून मुक्त होत सर्व जातिधर्माच्या नागरिकांना बंधू मानणे, महिलांचा परम आदर करणे, सर्व धर्मामधील सच्चाई आपल्या व्यक्तिमत्त्वाची धारणा बनविणे, अन्यायाविरुद्ध सामुदायिक पुरुषार्थ आणि अहिंसेच्या माध्यमातून संघर्ष करणे, ही युक्रांदची मूलभूत तत्त्वे आहेत. प्रत्येक जनआंदोलनात युक्रांदला अंतिमत: यश मिळत गेले म्हणून आमची प्रतिष्ठा वाढली.

सिंहगडावर १५० युवक आणि ५०-६० युवतींचे तीन दिवसांचे शिबीर झाले. बिहारच्या दुष्काळात हजार मुले आणि पाचशे महिलांना भोजन देण्यासाठी रसोई चालविणे, मोफत दवाखाना, टय़ूबवेल्स निर्माण करणे या गोष्टींचा या गटाला पूर्वानुभव होता. दुष्काळग्रस्तांना सहाय्य करताना आमच्या व्यक्तिमत्त्वातही परिवर्तन झाल्याचा अनुभव आम्ही घेत होतो. तिथे मदतीचा

ओघ येत होता. पुणेकरांनी आम्हाला भरपूर आर्थिक मदत केली. बिहारमधून आम्ही अनुभवांचे वार्ताकन करून पाठवत असू. आमची अनघड भाषा पुणेकरांना भावली होती. त्यामुळे आत्मविश्वास वाढलेला. तो नोव्हेंबर महिना अन् १९६७ साल होते. तीन दिवस प्रदीर्घ चाललेल्या या चिंतन शिबिराच्या अखेरीस ‘युवक क्रांती दल’ नावाची स्वतंत्र युवक संघटना स्थापन करण्याचा एकमुखी निर्णय झाला. या चिंतन शिबिराच्या अध्यक्षस्थानी होते डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे. ते एस. पी. कॉलेजमधील लोकप्रिय प्राध्यापक. त्यावेळी ते निवृत्त झाले होते. मात्र त्यांना आम्हा पोरांचा लळा लागला होता.

युक्रांदमध्ये संघटनांतर्गत निवडणुका कधीच घ्यायच्या नाहीत असा निर्णय झाला. त्यातून स्पर्धा आणि गटबाजी निर्माण होते. म्हणून मग दरवर्षी वार्षिक शिबीर घ्यायचं, सर्वाना निर्णय पटेपर्यंत पटवून द्यायचं; पण अंतिमत: एकमुखी निर्णय घ्यायचा अशी पद्धत ठरली. धोरणात्मक निर्णय कमीत कमी शब्दांत घ्यायचा. त्या शब्दांमध्ये व्यापक अर्थ भरायचे काम स्थानिक युक्रांदीयांचे! युक्रांदच्या शाखा नसतात. ठिकठिकाणी स्थानिक केंद्र असते. युक्रांदचे शील मात्र सर्व युक्रांदीयांना समान नि बंधनकारक.

युक्रांदचे सर्वानुमते निवडलेले अध्यक्ष झाले डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे. त्यांना ‘डॉक्टर’ या नावाने संबोधत असत. संघटनेचा कार्यवाह (जनरल सेक्रेटरी) म्हणून माझी निवड करण्यात आली. कार्यकारिणी निवडण्यात आली. मध्यवर्ती कार्यालय पुण्यात असणार, हे ठरले. त्यावेळचा एक किस्सा.. डॉ. पु. ग. यांनी त्यांच्या घरी मला बोलावून घेतलं. त्यांची राहणी अगदी साधी होती. त्यांनी रा. स्व. संघाचे बौद्धिक प्रमुख या पदावर काही काळ काम केले होते. त्या पदावरून त्यांची हकालपट्टी झालेली. तो सल त्यांच्या मनात घर करून बसलेला. संघाच्या महिनाभराच्या वार्षिक प्रशिक्षणातील बौद्धिक अभ्यासक्रमात त्यांनी ‘फ्रेंच राज्यक्रांती’ हा विषय घेतला. त्यावरून संघाच्या वरिष्ठांशी त्यांचे तीव्र मतभेद झाले. डॉक्टरांना बौद्धिक प्रमुख हे पद सोडावे लागले. संघाला बुद्धीचा वापर न करणारे मानवरूपी बैल तयार करायचे आहेत, असे त्यांचे ठाम मत बनले. संघाच्या एकेकाळच्या ज्येष्ठ विचारवंताकडून हे ऐकताना मला धक्काच बसला. डॉ. पु. ग. पुढे म्हणाले, ‘‘कोणताही समाज प्रगत होताना त्याला रेनेन्सॉ (प्रबोधन), रिफॉर्मेशन (धार्मिक सुधारणा) आणि क्रांती या तीन अवस्थांमधून जावेच लागते. त्याशिवाय तो समाज अंधश्रद्धा, कुप्रथा, घातक चालीरीती यातून मुक्त होऊ शकत नाही, हा इतिहासाचा दाखला आहे. नव्याने प्राप्त केलेल्या शुद्ध आणि सतेज बुद्धीनेच प्रगत होता येते.’’ मी होकार भरला. ते सद्गदित झाले होते. गळा दाटला होता. डोळे पाणावले होते.

ते म्हणाले, ‘‘कुमार, मी आता सत्तरी ओलांडलीय. आयुष्याच्या अखेरच्या या पर्वात तू माझे एकमेव आशास्थान आहेस. आपल्या समाजाला प्रगतिपथावर आणण्यासाठी प्रचंड प्रबोधन करायला हवे. त्यासाठी मला एक हजार मिशनरी वृत्तीने अविरत काम करणारे पूर्णवेळ कार्यकर्ते हवेत. मी तुला चांगले जोखले आहे. तू कुशल संघटक आहेस. पूर्णवेळ झोकून दे. प्रबोधनाचे कार्य करणारे हजार मिशनरी तयार करण्यावर लक्ष केंद्रित कर. क्रांतीपूर्व काळात मन लावून त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे प्रबोधन कर. हे कार्य पूर्ण होईपर्यंत तुझ्यातील संघर्षशील तरुण काही काळ बाजूला ठेव. तुझ्याआधी या कार्यासाठी मी निवडलेला तरुण म्हणजे विद्याधर पुंडलिक. फार चांगले गुण होते रे त्याच्यात. पण वाया गेला. माझ्या स्वप्नाची माती झाली! अरे, तो साहित्यिक बनला. विशेष सांगायचं म्हणजे तो चक्क कविता करू लागला! मी निराश होऊन माझ्या कोठीत स्वत:ला बंद करून बसलो होतो. अचानक तू भेटलास. मला उभारी आली. आता तू मात्र माझी आशा भंग पावू देऊ नकोस. नाहीतर सगळं संपलंच म्हणायचं!’’

माझ्याही डोळ्यांत पाणी तरळलं. एका बाजूला मनात सुखावलोही होतो. एवढय़ा थोर माणसानं स्तुती केली होती. असा सुखद अनुभव त्यापूर्वीच्या पंचवीस वर्षांच्या आयुष्यात कधीच आलेला नव्हता. मी भारावून गेलो आणि त्यांना म्हणालो, ‘‘डॉक्टर, मी वचन देतो की, मी आयुष्यात कधीच कविता करणार नाही. माझं काम हीच माझी कविता असेल!’’

उतारवयात आपण शिळे होण्याचा धोका असतो. थोरांनी भूतकाळातील रम्यतेची प्रौढी मिरवणं हे तरुणांना फारसं रुचत नाही. माझ्याकडे रोज सायंकाळी मुक्त विद्यापीठ भरतं. कुठून कुठून तरुण मुलं येतात. मुक्त संवाद चालू असतो. मी जुने अनुभव त्यांच्या नजरेतून पारखून घेतो. त्यातून ऊर्जा मिळते. आपण नित्य ताजेतवाने राहतो. पोरं हळूहळू खुली होतात. आपल्या समाजात वयाने ज्येष्ठ माणसं पोरांच्या डोक्यावर उपदेशाचे हातोडे मारतात. मी तसं कधी करत नाही. जे आयुष्यात केलं नाही, करू शकलो नाही, त्याचा उपदेश त्यांना करत नाही. आपल्यानंतर जन्माला आलेला प्रत्येकजण उपजतच अधिक कुशाग्र बुद्धीचा असतो अशी माझी श्रद्धा आहे. कारण तो उत्क्रांतीच्या पुढच्या काळात जन्माला आलेला असतो. ते आपल्याकडे उपदेशाचे घोट घ्यायला आलेले नसतात. त्यांना बोलायचं असतं. बिनधास्त बोलण्यासाठी त्यांना हक्काचं स्थान हवं असतं. ते त्यांना उपलब्ध करून द्यावं, एवढीच माझी धारणा. धाकटय़ांकडे अनंत प्रश्न असतात. त्यांना हवी असतात ती उत्तरं. समवयस्कांकडे फक्त तक्रारी आणि कंटाळवाणा संवादच असतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2020 4:18 am

Web Title: article on yuvak kranti dal yukraund movement kumar saptarshi abn 97
Next Stories
1 दखल : कहाणी.. त्यांच्या लढय़ाची!
2 नव्या क्रांतीची धुरा तरुणांच्या खांद्यावर!
3 सांगतो ऐका : संगीतकार सत्यजित रे
Just Now!
X