स्त्रीसाहित्य चळवळीच्या अभ्यासक आणि विदुषी डॉ. मीरा कोसंबी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील ज्ञात-अज्ञात पैलूंविषयी त्यांच्या सहप्रवासिणींचं मनोज्ञ हृद्गत!

‘डॉ. मीरा कोसंबी यांचे निधन’ ही बातमी वाचून अनेकजण विस्मयचकित झाले. आत्ताच तर तिचं एक पुस्तक प्रसिद्ध झालंय! नुकतीच तर ती ट्रॅकवर फिरून बाकावर बसलेली पाह्यली! गेल्या वर्षी परिसंवादात भाषण ऐकलं होतं तिचं.. आणि हे अचानक? तरुणपणी शाळा-कॉलेज-विद्यापीठात गुणवत्तायादीत झळकणारी, स्टॉकहोम विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवून २० वर्षे स्वीडनमध्ये अध्यापन करणारी, समाजशास्त्राच्या क्षेत्रातील विषयांबद्दल लिहिलेल्या १३ दर्जेदार इंग्रजी-मराठी पुस्तकांची लेखिका मीरा ही असामान्य बुद्धिमत्तेचा वारसा घेऊनच जन्माला आली होती. धर्मानंद कोसंबींची नात, डी. डी. कोसंबींची मुलगी व स्त्रीविषयक संशोधनात जागतिक मान्यता प्राप्त असलेली संशोधिका ही तिची ओळख! एक lr16प्रकारच्या गूढ वलयात तिचे व्यक्तिमत्त्व गुरफटलेले होते. एकटी राहून ताठ मानेने जगताना संशोधन, लेखन आणि अभ्यासात पूर्णपणे बुडून गेलेली मीरा ही एकलकोंडी व सामान्यांत मिसळण्यास उत्सुक नसलेली असा तिच्याबद्दलचा समज तिच्या भोवतालच्या लोकांमध्ये रूढ होता. आणि याबाबत आश्चर्य वाटण्याचे काही कारण नाही. परंतु तिला जवळून ओळखणाऱ्यांना मात्र तिच्या व्यक्तिमत्त्वातले लोभस पैलूही सहज जाणवत.
१९५६ मध्ये युथ फेस्टिव्हलच्या निमित्ताने तिची ओळख व मैत्री झाली आणि गेली पाच दशके हळूहळू मीरा हे गूढ उलगडत गेले. तिचे अनेकविध विषयांतले नैपुण्य लक्षात आल्यावर दरवेळी मन थक्क होऊन जाई. मीरा उपजतच कलावंत होती. इतकी उच्च पातळीवरची विदुषी एक उत्तम डिझायनरही होती याचे अनेकांना नवल वाटे. स्वत: डिझाइन केलेले कपडे ती स्वत:च शिवत असे. तिचे भरतकाम तर इतके नैपुण्यपूर्ण होते, की पाहतच राहावे. मीराचे आजोळ मुंबईच्या माडगावकर कुटुंबात होते. ती सांगायची की, ‘‘माझी आजी माझी यातली गुरू होती. एकसारखे सुबक टाके नसतील तर ते सर्व उसवून ती परत विणायला लावायची.’’ यातूनच प्रत्येक काम परिपूर्ण करण्याची सवय तिला लागली असावी. तिच्या मैत्रिणींच्या मुला-नातवंडांना तिच्या हातचे सुंदर कपडे शिवून मिळालेले आहेत. ते घालणारी मुलं मोठी झाली तरी ते कपडे शिवणकलेचा उत्तम नमुना म्हणून त्यांच्या आयांनी अजून जपून ठेवले आहेत.
बुद्धिवादी घरातला नास्तिकपणा मीरामध्ये मुरलेला असला तरीही होळी-दिवाळीसारखे सण ती मोजक्या मित्रमंडळींसमवेत आनंदाने साजरी करायची. तिची नाजूक रेघांची रांगोळी व ती काढतानाची तिची तन्मयता पाहण्यासारखी असे. तसेच कुठलेही औपचारिक शिक्षण न घेतलेली मीरा सुंदर चित्रे काढत असे. विशेषत: तिने काढलेली रानफुलांची चित्रे तर कसबी चित्रकारानेच काढलेली वाटत.
संगीत, नाटक, सिनेमा या सगळ्याची मीरा शौकीन होती. पाश्चात्त्य पॉपपासून ते भारतीय शास्त्रीय संगीत सगळंच तिला प्रिय होतं. तिच्यासारखी विलक्षण बुद्धिमान व्यक्ती इतरांप्रमाणे फक्त मनोरंजनासाठीच त्याचा आनंद घेत नसते. आनंदाबरोबरच त्यातल्या खाचाखोचांची नोंद तिचा मेंदू तत्परतेने घेत असे. फिल्म फेस्टिव्हल्सना हजेरी लावणारी मीरा चांगल्या फिल्मस्वर जे भाष्य करी ते ऐकणाऱ्याला विचार करायला लावी असा अनेकांचा अनुभव आहे. अविवाहित राहिलेल्या मीराचे घर नुसतेच नीटनेटके नाही, तर अभिरुचीपूर्ण व कलात्मक पद्धतीने सजवले होते. जगभर सतत प्रवास करताना वेचक, सुंदर वस्तू विकत घ्यायच्या व त्या कौशल्याने योग्य जागी घरात मांडायच्या हा तिचा छंदच होता. अशा घराला शोभेशी छानशी बागही हवीच. मीरा ज्या ज्या घरांत राहिली तिथे तिने शोभिंवत टवटवीत बागही फुलवली. दुर्मीळ झाडे, रोपे, फुले यांची तिला फार हौस. त्यांची निगराणी ती काळजीपूर्वक करत असे. तिच्या घरी मैत्रिणींचे स्वागत न चुकता चहाने होत असे. चहा हा मीराच्या दिनक्रमाचा अविभाज्य भाग होता. फिक्का, बिनसाखरेचा चहा तिला हवा असे. तीच गोष्ट उत्तम जेवणाची! स्वत: स्वैपाकघरात फारशी न रमणारी मीरा चवदार पदार्थाना मन:पूर्वक दाद देत असे. मासे हा तर तिचा वीक पॉइंट! उत्तम फिश डिशेस कुठल्या रेस्टॉरंटमध्ये मिळतात याच्या ती कायम शोधात असायची.
तिच्यामध्ये एक मूल अखेपर्यंत शाबूत होते. सात-आठ वर्षांपूर्वी एकदा तिची एका उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्याशी ओळख झाली. त्यावेळी निरागसपणे ती त्यांना म्हणाली होती, ‘‘काय गंमत असेल नाही लाल दिव्यांच्या गाडीतून फिरायला! मला न्याल का एकदा?’’
मीराला अनेक भाषा अवगत होत्या. इतकेच नव्हे तर त्यांवर तिचे प्रभुत्व होते. इंग्रजी, मराठी, कोंकणी, पाली, उर्दू, संस्कृत, जर्मन, स्वीडिश या त्यापैकी काही भाषा.
प्रसिद्ध पत्रकार विवेक मेनेझेस् तिची एक गमतीदार आठवण सांगतात. गोव्यात एका परिसंवादासाठी गेलेल्या मीराला एक काश्मिरी प्रतिनिधी भेटला. त्याच्या टी-शर्टवर प्रसिद्ध कवी फैजच्या कवितेतील दोन उर्दू ओळी छापलेल्या होत्या. मीराला ती लिपीही उत्तम समजत होती. तेव्हा तिने त्या ओळी सराईतपणे वाचून दाखवल्या आणि त्या कवितेची पुढची कडवीही म्हणून दाखवली.
बारा-तेरा वर्षांपूर्वी मीराची भाची नंदिता हिला स्टॉकहोम युनिव्हर्सिटीमधून डॉक्टरेट मिळणार होती. त्याप्रसंगी कुटुंबीय म्हणून मीराला आमंत्रण होते. त्यासाठी मीरा स्वीडनला गेली होती. समारंभाला नंदिताच्या वैद्यक विषयातले तज्ज्ञ, तसेच अनेक विद्वान विद्यापीठाच्या भव्य दालनात उपस्थित होते. तेव्हा पारंपरिक कांजीवरम् साडी परिधान केलेली, कपाळावर ठसठशीत बिंदी लावलेली रुबाबदार व्यक्तिमत्त्वाची मीरा सर्वाच्या कुतूहलाचा विषय ठरली होती. समारंभादरम्यान कुटुंबीयांचे मनोगत व्यक्त करण्यासाठी तिला पाचारण करण्यात आले. त्यावेळी अस्खलित स्वीडिशमध्ये मोजकेच, पण नेटके भाषण करून तिने सर्वाना अवाक्  केले.
वरपांगी अलिप्त व क्वचित कठोर भासणारी मीरा प्रसंगी संवेदनशीलतेने वागते, हे अनेकदा अनुभवास येई. गरजूला सढळ हाताने आर्थिक मदत व मानसिक पाठबळ कोणताही गवगवा न करता ती देत असे. तिच्याकडे काही वर्षे काम करणाऱ्या एका मुलीला अपघातामुळे बरेच दिवस दवाखान्यात ठेवावे लागले. त्या मुलीने मीराचे काम सोडून बरेच दिवस झालेले होते. पण ही बातमी समजल्यावर ती केवळ त्या मुलीला आर्थिक मदत करून थांबली नाही; तर तिला दवाखान्यातून थेट आपल्या घरी आणले आणि पंधरा दिवस तिची व्यवस्थित काळजी घेऊन नंतरच तिला तिने घरी पाठवले.
पाच वर्षांपूर्वी एका गंभीर आजारामुळे हॉस्पिटलमध्ये आठ दिवस काढून तिची एक मैत्रीण घरी आली होती. दुसऱ्या दिवशी गुढीपाढवा होता. सकाळी मीरा तिच्याकडे सर्व तयारीनिशी हजर! ‘‘अगं, गुढी उभारून रांगोळीही काढायची आहे ना, म्हणून आलेय.’ असल्या रीतिरिवाजांना ‘फालतू अवडंबर’ म्हणणारी मीरा मैत्रिणीला म्हणाली, ‘‘मला माहीत आहे.. तू करतेस ना हे सगळं दरवर्षी! मग यंदाही करू या की!’’
असामान्य प्रज्ञा असलेली व्यक्ती बऱ्याचदा इतरांमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण करते. मीराबाबतही तसेच होई. तिच्या सहवासात येणारे स्त्री-पुरुष तिच्या व्यक्तिमत्त्वाने दबून जात. खोलवर संशोधन करून लेखन करण्यात ती व्यग्र असे. तिच्या लेखनाच्या वेळी कुणी येऊन तिच्याशी फालतू गप्पा मारणे तिला खपत नसे. अशावेळी तिच्याकडून कधी कधी माणसे दुखावली जात. मग ती दुरावली जात आणि मीरा एकटी पडे.
मीराचे वडील डी. डी. कोसंबी गणित, पुरातनशास्त्र, नाणकशास्त्र अशा अनेक ज्ञानशाखांमधले गाढे विद्वान! त्यांचा घरात दरारा असे. मीराला त्यांच्याबद्दल विलक्षण अभिमान व भीतीयुक्त आदर वाटे. पण आईबद्दल मात्र ती हळवी होती. नलुताई कोसंबी मृदुभाषी, प्रेमळ व घरातल्या सर्वाचे कडक स्वभाव सांभाळून घेणाऱ्या होत्या. मीरा स्वीडनमध्ये काम करीत असताना तिने भारतात एकटय़ा राहणाऱ्या आईची चोख व्यवस्था केली होती. आईला भेटण्यासाठी वारंवार तिच्या भारतात फेऱ्या होत. टेलिफोनवरही सतत संपर्क ठेवून आईच्या बारीकसारीक गरजांकडे तिचे लक्ष असे. तिच्या एका जवळच्या मैत्रिणीला तर तिने आपल्या घरातच आईला सोबत म्हणून ठेवून घेतले होते. माया ही मीराची थोरली बहीण स्वीडनमध्येच स्थायिक झाली होती. मीराच्या स्वीडनमधल्या वास्तव्यात मायाला जीवघेण्या कॅन्सरने ग्रासले. अखेरच्या दिवसांत तिची मीराने जीव ओतून सेवा केली. तिच्या मुलीचे- नंदिताचे संगोपनही केले.
मीराच्या आयुष्याचे अखेरचे पर्वही सर्वाना आश्चर्यचकित करून गेले. अचानक उद्भवलेला आजारही तिने तिच्याच पद्धतीने हाताळला. सुमारे दोन वर्षांपूर्वी तिच्या
बोनमॅरोडिस्प्लेफिया या आजाराचे निदान केले गेले. त्याचे पुढे ल्युकेमियात रूपांतर झाले. कुणीही आपली कींव करता कामा नये यासाठी तिने तीन व्यक्तींखेरीज कुणालाही याचा पत्ता लागू दिला नाही. तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर, एक जवळची मैत्रीण मीनाक्षी व तिचे बालमित्र डॉ. सुभाष काळे या तिघांखेरीज अखेरच्या महिन्यापर्यंत कुणालाच तिच्या आजाराविषयी माहीत नव्हते. मात्र, यादरम्यान तिच्या आजाराची कुणकुण एका मैत्रिणीला लागली होती. माधवी कोल्हटकर आपणहून मीराकडे रोज सोबतीला जाऊ लागली. आजाराचे गांभीर्य समजल्यानंतरही मीराने खचून न जाता एकच उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवले. डॉक्टरांना तिने बजावले, ‘‘मला माझ्या दोन पुस्तकांचे काम पूर्ण करायचे आहे. तेवढा वेळ मला हवा आहे!’’
डॉक्टरांचा सल्ला घेत मीराने आपले काम सुरू ठेवले. एकीकडे लेखन चालू असताना दुसरीकडे परिसंवादांत भाग घेणे, शोधनिबंध वाचण्यासाठी अमेरिकेचा प्रवास करणे, लेखन पुढे नेणे हेही सुरूच होते. पुढे ब्लड ट्रान्सफ्युजनही सुरू करावे लागले. तरीही ‘आनंदीबाई जोशी’ व ‘पंडिता रमाबाई’ या दोन्ही पुस्तकांवर अखेरचा हात फिरवून ती प्रकाशनास देण्यायोग्य करण्याचा खटाटोप तिला केवळ मनोधैर्याच्या जोरावरच पार पाडता आला. पुस्तकांच्या मुखपृष्ठाबद्दलचे निर्णय, मुद्रितशोधन, छपाईतील बारकावे यांबाबत तिचे सूक्ष्म लक्ष असे.
आजार बळावत गेला तसे तिच्या घराचे स्वरूपही बदलले. तिचा बिछाना हेच तिचे कार्यालय झाले. बिछान्यावर पाय पसरून त्यावर लॅपटॉप, एका बाजूला कागदपत्रे व दुसऱ्या बाजूला असंख्य औषधे.. काम पुढे जात होते. त्यादरम्यान तिची दोन्ही पुस्तके पूर्ण झाली. आजाराचे पाऊल पुढे पडल्याने उपचारासाठी वारंवार हॉस्पिटलमध्ये जाणे गरजेचे होते. उपचार करणारे डॉ. शशी आपटे मीराच्या धैर्याने, तिच्या काम करण्याच्या जिद्दीने इतके प्रभावित झाले, की उपचारासाठी शक्यतो त्यांच्या हाताखालच्या डॉक्टरांना ते तिच्या घरीच पाठवू लागले. मीनाक्षी व माधवी सावलीप्रमाणे मीराजवळ राहत होते. जानेवारीअखेर मीराला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलवावे लागले. शरीर थकले होते, पण मेंदू मात्र अखेपर्यंत तल्लख होता. सोबतीला आलेल्या मैत्रिणींबरोबर शब्दकोडे सोडवणे, सुडोकू करणे हे जमेल तसे चालू राहिले. हॉस्पिटलच्या सेवकांनाही हा पेशंट वेगळा व खास आहे याची जाणीव होती. २६ फेब्रुवारीला मीराचे निधन झाल्यानंतरच तिच्या आजाराविषयी परिचितांना कळवले गेले. तिच्या मित्रमंडळींना पुन्हा एकदा तिने विस्मयचकित केले होते!