|| डॉ. चैतन्य कुंटे

‘अल्ला तू करीम रहीम सब तेरा देवल मस्जिद…’

‘गायनाचे गौरीशंकर’ उस्ताद अल्लादिया खांसाहेब यांची ही शिवमत भैरव रागातील बंदिश. त्यांचे नातू बाबा अझीजुद्दिन खांसाहेबांना एकदा मी विचारले, ‘या बंदिशीतील आणि कबीर भैरवच्याही बंदिशीतील काही लगाव अझानसारखे वाटतात, नाही?’

ते हसून म्हणाले, ‘बेटा, अझानमध्ये भैरवाचे स्वर सापडतात, हा काही योगायोग नाही. हिंदूंनी शिव, भैरव म्हणो की मुस्लिमांनी अल्ला- त्या परमेश्वराला साकडे घालताना माणसाची आर्त भावना हा भेद जाणत नाही. त्यामुळे प्रार्थनेचे ते स्वर सारखेच निर्मळ आणि भेदरहित आहेत.’

या उद्गारांमुळे उस्ताद अल्लादिया खांसाहेबांच्या बंदिशीची काही निराळीच उमज मला पडली!

इस्लामच्या आद्यकाळापासून संगीतविरोधी आणि संगीतानुकूल अशा दोन्ही पक्षांनी आपापली मते मांडली असली तरी इस्लामचे संगीतविषयक धोरण आजही वादाचेच आहे. ‘घिना’ म्हणजे कंठातून तारताभेदयुक्त दीर्घ ध्वनींची निर्मिती करणे या काहीशा प्राथमिक अवस्थेपासून ‘मौसिकी’ म्हणजे संगीताविष्कारापर्यंत अनेक भेद आहेत. इस्लामने घिना, मौसिकी यांना मनोरंजक, ऐहिक आणि म्हणून पापकर, निषिद्ध ठरवले आहे. परंतु ‘नशीद’ अथवा ‘इन्शाद’ म्हणजे प्रार्थनांचे सस्वर पठण हे इस्लामने मान्य केले आहे. इस्लामी प्रार्थनांत इब्तीहालात (अल्लाची करुणा भाकणे), तस्बीह, तम्जीद वा तक्बीर (अल्लाची स्तुती), मदिह, नात (अल्लाचे गुणवर्णन), वाझ (श्रोत्यांना प्रार्थनेसाठी उत्तेजना देणारी वचने), किस्सा (प्रेषितांच्या जीवनातील प्रसंगकथन), इलम, फिघ, शरिया (उपदेश, नियम, नैतिक वर्तनाचे आदेश) हे प्रधान विषय असतात.

असे मानतात की अल्लाची वचने महंमद पैगंबरांस दिव्य संकेताने प्राप्त झाली आणि मौखिक मार्गाने कुराणचा प्रसार आपल्या अनुयायांत त्यांनी आपल्या हयातीत केला. तेव्हापासूनच कुराण हे दिव्यशब्द म्हणून महत्त्वाचे मानले गेले. इसवी सन ६३२ मध्ये त्यांचे देहावसान झाल्यावर ही वचने एकत्रित केली गेली, तीही मौखिक मार्गानेच. ही वचने गद्य नसून पद्य स्वरूपात आहेत. त्यांत विशिष्ट वृत्ते व काव्यात्म लयबद्धता आहे. म्हणूनच त्यांच्या पठणाची (तिलवा) खास पद्धती (तजवीद) बनू लागली. अल्पस्वरी, परंतु महत्त्वदर्शक आघातांनी लयदार होणारे हे पठण ‘पाठ्यसंगीत’ म्हणून नक्कीच श्रवणीय असते. कुराणाचे लिखित स्वरूप सिद्ध करण्यात उथमान या खलिफाचा मोठा वाटा होता. त्याने कुराणाचे पाठशुद्ध हस्तलिखित अनुयायांत वितरित केले. तरीही कुराणाच्या विशिष्ट प्रकारच्या पठणावरचा भर त्यानेही कमी केला नाही. किंबहुना, भारतात जशा वेदपठणाच्या, स्मरणाच्या, मौखिक परंपरेतून परावर्तित करण्याच्या ज्या अनेक पद्धती आहेत तशाच कुराण पाठाच्याही पद्धती आहेत.

कुराणचे पारंपरिक पद्धतीने जे शिक्षण दिले जाते त्यात अरबी भाषेतील उच्चार, आघात, वळणे ही केवळ भाषिक स्तरावर नव्हे, तर सांगीतिक स्तरावरही शिकवली जातात. संपूर्ण कुराण मुखोद्गत करून त्याचे सस्वर पठण करणाऱ्यास ‘हाफिज अल कुरान’ असे म्हणतात. पठणाचा अजून एक प्रकार म्हणजे ‘कीरात.’ यात कुराणशिवाय अन्य वचनेही समाविष्ट असतात. याच्या पाठकाला ‘कारी’ म्हणतात. हे कारी मशिदीतील रात्रीची शेवटची ‘इशा’ ही प्रार्थना म्हणतात. सस्वर पठणाचा ‘नशीद’ हा प्रकारही सांगीतिकदृष्ट्या फार वेधक आहे.

मावलीद किंवा मिलाद म्हणजे महंमद पैगंबरांचा जन्मदिन. रबी अल अव्वल या तिसऱ्या महिन्यात (शियांच्या मतानुसार, सतराव्या दिवशी व सुन्नींच्या मताप्रमाणे, बाराव्या दिवशी) हा जन्मोत्सव साजरा केला जातो. या सणाच्या वेळी खासकरून म्हटल्या जाणाऱ्या अरबी, तुर्की भाषांतील प्रार्थनांनाही ‘मावलीद’ असेच म्हणतात. त्यात ‘कसिदा अल बुर्दा शरीफ’ हे बुसिरी या अरबी कवीचे काव्य, किंवा ‘सिम्तुद दुरार’ हे हबीब अली बिन मुहंमद अल हबशी याचे काव्य आवर्जून म्हटले जाते. या प्रसंगी संपूर्ण रात्र मावलीदचे पठण करतात.

मशीद म्हणजे मुस्लीम समाजाने एकत्र येऊन उपासना करण्याचे अधिकृत प्रार्थनाघर. मशिदीत संगीत, वाद्ये सर्वथा निषिद्ध असतात. मात्र, मशिदींत कुराणातील आयते, दुआ व झियारत म्हटली जाते. या सर्वच पठणांत मुख्यत: चार-पाच स्वरांची सुरावट व कंठध्वनीचे मर्यादित चढउतार असतात. केवळ मौलवी मोठ्या आवाजात प्रार्थना म्हणतो. जमाव मूक राहून मनातल्या मनात मौलवींच्या प्रार्थनेस अनुसरतो.

मशिदीशी संबंधित आणि सर्वांना नेहमी ऐकू येणारा एक प्रकार म्हणजे अधान किंवा अझान. ‘प्रार्थनेचा पुकारा’ हा मूलार्थ. दिवसातून पाच वेळा नमाज पढण्यासाठी मुएझ्झिन जो पुकारा (बांग) करतो, त्यास अधान वा अझान म्हणतात. परिसरातील सर्व समुदायास प्रार्थनेची वेळ झाली हे सूचित करायचे असल्याने मशिदीच्या मीनारावरून मुएझ्झिन (याला ‘बांगी साहब’ असेही म्हणतात.) हा मोठ्या आवाजात, दूरवर ऐकू येईल अशा रीतीने अझान गातो. मुएझ्झिनबद्दलचे दोन रोचक संदर्भ असे : स्वत: महंमद पैगंबराने नियुक्त केलेला बिलाल हा इथिओपिअन पहिला मुएझ्झिन मानला जातो. आधुनिक भारतातील ‘नझरुल गीती’चे प्रवर्तक कवी, गायक काझी नझरुल इस्लाम हे बरद्वान जिल्ह्यातील आपल्या गावच्या मशिदीत मुएझ्झिन म्हणून काम करत होते!

अल्ला एकच आहे, तोच एकमेव शास्ता आहे, अल्लाचा आदेश पाळल्यानेच आत्म्याची शुद्धी होते… अशा आशयाची वचने या प्रार्थनेत असतात. अझान म्हणताना त्याबरोबर कोणतेही वाद्य वाजवणे वा अन्य आवाजाची साथ घेणे निषिद्ध असते. अझानचा आविष्कार प्रत्येक मुएझ्झिनच्या कसबानुसार निराळा होतो. अझानची ठरावीक अशी एकच चाल नसते. प्रत्येक मुएझ्झिनला मदरशात जसे शिक्षण मिळते त्यानुसार तो चाल गातो. ही चाल दिवसातील पाच वेळा वा वर्षभरातील काळात वेगवेगळी म्हटली जाऊ शकते. मात्र, याविषयी काही निश्चित संकेत वा नियम मला तरी आढळले नाहीत. अझानच्या चालींत मुख्यत: भैरवी, भैरव, अहिरभैरव, आसावरी, क्वचित काफी, किरवाणी यांच्या कोमल सुरावटीशी साम्य आढळते. अझान दीर्घ स्वरसमूहांत कंप, पुकार, गिटकडी यांचा वापर करून विनाताल गंभीरपणे गातात. अझानच्या गायनात आवाजाची गरिमायुक्त, ताकदवान व प्रभावी फेक महत्त्वपूर्ण असते. अझान गाताना चांगलाच दमश्वास लागतो. काही उत्तम मुएझ्झिनच्या अझानमध्ये अत्यंत दीर्घ, कंपमान स्वर आणि प्रतिध्वनी निर्माण होऊन तो विरेल- न विरेल इतपतच विराम ठेवून पुन्हा पुढील चरण उचलणे यांचा फार सुरेख समन्वय आढळतो.

जमातखाना हे इस्माईली शिया मुस्लिमांचे केवळ प्रार्थनाघर नसते, तर सामाजिक केंद्रही असते. येथे सलात, दुआ, इ. प्रार्थनांखेरीज विशेषत्वाने कसिदा, ताजिक आणि गिनान हे प्रकार गायले जातात. गिनान हा प्रकार संगीतदृष्ट्या विशेष लक्षणीय आहे. गिनान म्हणजे शिया इस्माईली मुस्लिमांत- विशेषत: सत्पंथ खोजांत गायली जाणारी धार्मिक वचने. ज्ञान या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश होऊन ‘गिनान’ हा शब्द बनला असे काहींचे मत. तर ‘घिना’ या अरबी शब्दात याचे मूळ असल्याचे दुसरे मत आहे. गिनान हे मुख्यत्वे गुजराती, सिंधी, उर्दू अशा भारतातील प्रांतीय भाषांत असतात. १२ व्या शतकातील पीर सतगुरूनूर हा मुस्लीम संत भारतीय गिनानचा अध्वर्यु मानतात. गिनानमध्ये इस्लामबरोबरच हिंदू तत्त्वज्ञानातील अनेक संकल्पना, शब्दांचा मिलाप झाला आहे. सत्पंथी खोजा मुस्लिमांनी तर इमाम हुसेन यास निष्कलंकी वा निकल्की असे नाव देऊन त्यास विष्णूचा दहावा कल्की अवतार मानले आहे! त्यांच्या सिंधी, गुजराती भाषांतील प्रार्थनांत अनेकदा राधाकृष्णाचे रूपक गोवलेले दिसते. १९५० नंतर मात्र अनेक धार्मिक आणि राजकीय कारणांनी अशा प्रार्थनांत ‘सुधारणा’ वा ‘शुद्धीकरण’ केले जाऊ लागले व त्यांतील हिंदू संस्कृतीचे संदर्भ काढून टाकून त्या अरबी भाषेत म्हटल्या जाऊ लागल्या. मात्र सिंधी, गुजराती भाषांतील गिनान गीते आजही अस्सल भारतीय सुरावटी ल्यायलेली आहेत.

गिनानच्या अनेक रचना या रागाधारित असून अत्यंत सुंदर चाली त्यांत आढळतात. त्यातील काही चाली स्त्रीगीतांच्या धाटणीच्या आहेत, तर काही विशुद्ध रागदारीतल्या. गिनानचे गायन बव्हंशी संथ लयीत, विनाताल केले जाते. काही गिनान हे वृत्तबद्ध असून, विशिष्ट तालांतही गायले जातात. रागप्रधान असूनही त्यांत विस्ताराची अपेक्षा नसते. मात्र, तालीमदार गायकांनी गिनान विस्तारपूर्वक गायल्याची उदाहरणेही आहेत. १९०३ साली मुंबईत लालजी देवराज यांनी स्थापन केलेल्या ‘इस्माईली प्रिंटिंग प्रेस’मधून गिनानचे जवळपास ७०० संग्रह प्रकाशित केले गेले. आणि या प्रकल्पातूनच पुढे साधारण १९४०-५०च्या दरम्यान मुंबईत काळबादेवी भागात ‘दी किंग्ज रेकॉर्डस्’ या लेबलने खास ‘इस्माईली रेकॉर्डस् सीरिज’ काढली होती आणि त्यात गिनान ध्वनिमुद्रित झाले होते. प्रसिद्ध ध्वनिमुद्रिका संग्राहक डॉ. सुरेश चांदवणकर यांच्या सौजन्याने त्यातील काही गीते ऐकायला मिळाली. त्यांत मास्टर जुम्मा ककली नामक कुणा गायकाने गायलेले गिनान अप्रतिम आहेत! ‘गिनान-ए-शरीफ’ या यू-ट्यूब चॅनलवर गिनानचे अलीकडच्या काळातील काही आविष्कार उपलब्ध आहेत, ते जिज्ञासूंनी ऐकावे.

सोज हा एक महत्त्वाचा इस्लामी गीतप्रकार. शिया संप्रदायात सोज, मर्सिया व नौहा अशा शोकगीतांचे त्रिकूट विशेष भावपूर्ण आहे. इसवी सन ६८० मधील करबलाच्या लढाईत हसन इब्न अली अन्य नातेवाईकांसह मृत्युमुखी पडला. शियापंथीय मुहर्रम महिन्याच्या दहाव्या दिवशी तो शोकाचा दिवस ‘अशुरा’ म्हणून पाळतात. एकंदर बारा दिवसांचे सुतक असते. मुस्लीम संगीतकार सुतकाच्या या काळात अन्य कोणत्याही प्रकारे संगीत पेश करत नाहीत. केवळ सोज, मर्सिया, नौहा ही शोकगीते गायली जातात. सोजचा शब्दार्थ आहे शोक, आक्रोश. सोजमध्ये अलीच्या मृत्यूचे दु:ख, तर मर्सियामध्ये मृत्यूच्या प्रसंगाचे दारुण वर्णन असते. नौहा ही शोकगीते समूहाने, छाती पिटत ‘मातम’ करत म्हटली जातात. त्यात अलीच्या मृत्यूचे वर्णन असतेच, शिवाय त्यास मारणाऱ्यांस दूषणेही असतात. भारतात सोज-मर्सिया गीते लिहिणारे कवी आणि ते पेश करणारे सोजख्वानी यांची मोठी परंपरा लखनऊ, जौनपूर, गोरखपूर इ. भागांत आहे. या शोकगीतांच्या भैरवी, जौनपुरी, पिलू, तोडी अशा रागांच्या स्वरांतील काही चाली प्रचलित आहेत. ही गीते कोणत्याही वाद्यांशिवाय, केवळ मानवी कंठाचा आधारस्वर घेऊन आणि अत्यंत करुण स्वरांत गातात.

जुन्या काळातील अनेक नामवंत गायकांच्या सोज-मर्सिया गीतांच्या ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध होत्या. मीर अनीस यांचा ‘हुसेन जब के चले’ हा प्रसिद्ध मर्सिया ‘सरदारी बेगम’ चित्रपटात आरती अंकलीकर यांनी फार भावपूर्ण गायला आहे, हे चित्रपट संगीतप्रेमींना नक्कीच आठवत असेल.

कव्वाली, हम्द, नात इ.बद्दलही पुढे आपल्याला सांगायचे आहे. तूर्तास इथे विराम घेऊ. अझानमध्ये असतो तसा संभवसूचक. आमीन!

keshavchaitanya@gmail.com

(लेखक संगीतकार, संस्कृती-संगीतशास्त्राचे अभ्यासक व ‘डॉ. अशोक दा. रानडे अर्काईव्हज्’ या प्रयोगकला अध्ययन केंद्राचे संस्थापक-संचालक आहेत.)