चंगळवाद म्हणजे पैशांचा अपव्यय. भरपूर खर्च, बचत फारशी नाहीच; उलट क्रेडिट कार्डाचा कमाल वापर असे काहीसे गणित असेल तर चंगळवादी व्हा असे म्हणणे म्हणजे गुंतवणुकीच्या दृष्टीने ‘खड्डय़ात जा’ असे सांगणे ठरेल. पण गुंतवणूकविश्वात चंगळवादाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुंतवणूकविश्वात चंगळवादी व्हा म्हणजे चंगळवादापासून फायदा होऊ  शकणाऱ्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवणे आणि दीर्घ मुदतीत गब्बर होणे.
चंगळवाद म्हणजे काय, त्याचे अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतात, हे सांगणे हा या लेखाचा हेतू नाही. परंतु तरुण पिढीच्या (१५ ते ३५ वयोगट) बदलत्या पसंतीपासून सामान्य गुंतवणूकदार कसा फायदा घेऊ  शकतात, हे बघणे इतकाच मर्यादित हेतू आहे. सर्वसामान्य जनांसाठी चंगळवाद म्हणजे बेसुमार खरेदी, हवे असलेल्या वस्तूंबरोबरच नको असलेल्या (गरज नसलेल्या) वस्तूंची खरेदी, उधळपट्टी, कर्जबाजारीपणा असा एक नकारार्थी शब्द आहे. पण ती आजची वस्तुस्थिती आहे. महात्मा गांधी, साने गुरुजी, विनोबा भावेंच्या साध्या राहणीपासून आपण पूर्वीच दूर गेलेलो आहोत. सकाळी उठल्यावर वापरायच्या टूथपेस्टचे एकाहून अधिक ‘ब्रँड’ एकाच घरात आज दिसून येतात. आंघोळीचा प्रत्येकाचा साबण वेगळा असतो. सकाळच्या न्याहारीसाठी केलॉगचे कॉर्नफ्लेक्स व नेस्लेचे मॅगी नूडल्स असतात. स्मार्टफोन, दुचाकी आणि चारचाकी हा थोडा पुढचा भाग झाला. यावर्षी कोटक आणि अर्न्‍स्ट अँड यंग यांनी तयार केलेल्या ‘टॉप ऑफ दी पिरॅमिड’ या अहवालात भारतीय अतिश्रीमंत व्यक्तींच्या गुंतवणुकांबरोबरच त्यांचे ‘हॉलिडेज्’ व ‘गिफ्टिंग’ याबद्दल स्वतंत्र माहिती देण्यात आली आहे. थोडक्यात, माणूस पैसे कुठे व किती खर्च करतो, याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
‘पैसा फेको, तमाशा देखो’ ही वृत्ती केवळ अतिश्रीमंत मंडळींमध्येच आहे असेही नाही. नवश्रीमंत आणि वाढत्या मध्यमवर्गातही नवनवीन वस्तूंचा व सेवांचा हव्यास वाढतो आहे. कनिष्ठ मध्यमवर्ग व गरीबदेखील याला अपवाद नाहीत. त्यांची सोय ‘सॅशे’ संस्कृतीने केली आहे. वाढता चंगळवाद म्हणजे केवळ पैसा उधळणे नव्हे. त्याला अनेक पायऱ्या आहेत व त्या प्रत्येकाचा गुंतवणुकीवर व त्यापासून उत्पादक कंपन्यांना मिळणाऱ्या उत्पन्नाच्या आकडय़ांवर परिणाम होतो.
सामान्यत: माणूस स्वच्छतेकरता साबणाचा वापर करतो. काही वर्षांपूर्वी आंघोळीला, चेहरा धुवायला आणि हात धुवायलादेखील एकच साबणवडी वापरली जात असे. आता आंघोळीचा साबण, केसांचा शाम्पू, फेसवॉश आणि अँटिसेप्टिक हँडवॉश अशा चार वेगवेगळ्या उत्पादनांचा घरात प्रवेश झाला आहे. शारीरिक स्वच्छता ही एक गरज न राहता त्याची जागा अनेक वेगवेगळ्या गरजांनी घेतली आहे व त्या अनुषंगाने तेवढी जास्त खरेदी सामान्य ग्राहक करतो आहे. जास्त गरजा- जास्त उत्पादने व जास्त खर्च ही चंगळवादाची पहिली पायरी.
आता दुसऱ्या पायरीकडे वळू. आंघोळीकरता साबणवडी आवश्यक आहे, हे एक सर्वसामान्य गृहितक आहे. पूर्वी साधारणत: २० ते ३० रुपयांच्या साबणवडीने सर्व कुटुंबाचे काम भागत असे. पण आता प्रत्येकाच्या गरजेनुसार ‘प्रीमिअम’ साबण बाजारात मिळतात. २० रुपयांच्या साबणापासून ते १२० रुपयांच्या साबणापर्यंतचा प्रवास सहज होतो. फार पूर्वीपासून मुलींना गोरे करणाऱ्या वस्तूंची खूप मोठी बाजारपेठ अस्तित्वात आहे, पण आता पुरुषांसाठीही फेअरनेस क्रीम्स आली आहेत. पस्तिशीच्या पुढच्या ‘आँटी मत कहो ना!’ स्त्रियांसाठी चेहऱ्यावरच्या नव्याने येऊ घातलेल्या सुरकुत्या लपवणारी क्रीम्स बाजारात उपलब्ध आहेत. उत्पादकांचा ‘प्रीमिअम’ व ‘निश’ (Niche) उत्पादनांवर वाढीव भर आहे. कारण इतर उत्पादनांपेक्षा ही उत्पादने महाग आहेत आणि ग्राहकांच्या खिशातला बराचसा पैसा खेचत आहेत.
त्यानंतरची पायरी आहे ब्रँड्सची. फोटोकॉपी किंवा छायाप्रत हवी आहे असे दुकानदाराला सांगितले तर तो गोंधळण्याची शक्यता जास्त आहे. पण त्याच्याकडे झेरॉक्स मागितली तर तो लगेच काढून देतो. यालाच ‘ब्रँड’ म्हणतात. ब्रँड आम्हा ग्राहकांच्या मनावर ठसला आहे. ब्रँड म्हणजे केवळ साबण, शाम्पू व गाडय़ा नाहीत. अंतर्वस्त्रांचेही ब्रँड महत्त्वाचे आहेत. जॉकी या अंतर्वस्त्र ब्रँडने ‘पेज इंडस्ट्रीज’ या कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत मोठी वाढ घडवून आणली आहे. ब्रँडचे महत्त्व सर्वच क्षेत्रांत वाढताना दिसत आहे. ‘अनब्रँडेड वस्तूंकडून ब्रँडेड वस्तूंकडे’ असा ग्राहकांचा प्रवास होताना दिसत आहे. पूर्वी कुटुंबाचे सोनार ठरलेले असत. घरात काहीही शुभकार्य निघाले की त्याच सोनाराकडे खरेदी होत असे. आताची पिढी मात्र तनिष्क, टी बी झेड, पी सी ज्वेलर्स, पेठे, गाडगीळांकडूनच दागिने खरेदी करते. यातील तनिष्क, टी बी झेड व पी सी ज्वेलर्सचे शेअर्स बाजारात सूचिबद्ध आहेत. तनिष्कमध्ये (टायटन इंडस्ट्रीज) राकेश झुनझुनवालासारखा गुंतवणूकदार वर्षांनुवर्षे भागधारक आहे. उपभोग्य वस्तू असो की सिमेंट-स्टीलसारख्या कमॉडिटी प्रवर्गातील वस्तू असोत, सर्वच उत्पादक ब्रँडिंगचा प्रयत्न करून ग्राहकांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न करतात.
नवनवीन वस्तू व सेवांच्या हव्यासावर सर्वच थरांतील ग्राहक त्यांच्या उत्पन्नापैकी बराच भाग खर्च करतात. हा खर्च उत्तरोत्तर वाढत जाण्याची शक्यता आहे. कमी होण्याची शक्यता फारच कमी. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनशिवाय आठवडा घालवण्याचा प्रयत्न करा, किंवा महिनाभर हॉटेलिंग, सिनेमा, मॉलभेटी पूर्णपणे बंद करता येतात का, ते पाहा. महिनाभर घरचेच जेवण व इतर पदार्थ खाऊन राहा. या गोष्टी जवळजवळ अशक्य आहेत.
आपण अमेरिकी संस्कृतीच्या आहारी गेलो आहोत का? की पाश्चिमात्य विचारसरणीचा पगडा आपल्या डोक्यावर बसला आहे? की सर्वसामान्य माणसाप्रमाणे शक्य तेवढा जास्त आराम, मजा करण्याच्या प्रवृत्तीमुळे (leisure seeking tendency) चंगळवाद फोफावतो आहे? कारणे काहीही असोत, पण वस्तू व सेवांकरता बंदा रुपया मोजणाऱ्या ग्राहकांमुळे अनेक मोठय़ा कंपन्या उदयास आल्या व भरभराट पावल्या. यात टायटन, पेज इंडस्ट्रीज, इमामी, ज्यूबिलांट फूडवर्क्‍स, एअरटेल, कॉक्स अँड किंग्ज ही व अशी अनेक नावे सहज घेता येतील.
अशा कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास दीर्घ मुदतीत चांगले उत्पन्न मिळू शकते. अर्थात सरसकट चांगला ब्रँड आहे म्हणून कंपनीचे शेअर्स विकत घेतले म्हणजे आपल्या हाती खूप मोठे घबाड आले अशाही भ्रमात कोणी राहू नये. उपभोग्य वस्तूंची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचा नफा फारसा घसरत नाही. अशा कंपन्यांची विक्री व नफा यांचा आडाखा बांधणे तुलनेने सोपे असते. त्यामुळे या वर्गातील कंपन्यांच्या शेअर्ससाठी जास्त पैसे मोजावे लागतात. जास्त पैसे म्हणजे या कंपन्यांचे शेअर्स नेहमीच उच्च किंमत उपार्जन गुणोत्तर (पीई रेशो)ला उपलब्ध असतात. मूल्यांकनाच्या दृष्टीने हे शेअर महाग असतात. त्यामुळे हे शेअर घेताना सावधतेने पडझडीच्या संधी हेरून विकत घेणे आवश्यक ठरते. तसेच लघु मुदतीत हे शेअर्स एकाच किमतीच्या पट्टय़ात फिरत राहू शकतात. त्यामुळे संयम फारच महत्त्वाचा ठरतो.
कमी भावात, कमी पीई रेशोला एखादा असा शेअर मिळाला तरीही तो घेताना नीरक्षीरविवेक बाळगणे फार महत्त्वाचे आहे. केवळ नाव मोठे आहे म्हणून एखादा शेअर घेऊ  नये. हे एका उदाहरणाच्या साहाय्याने समजून घेऊ. जनसामान्य आता ब्रँडेड दागिन्यांकडे वळत आहेत, म्हणून दीर्घ मुदतीत ब्रँडेड दागिन्यांचे रिटेलिंग करणारी कंपनी चांगले उत्पन्न देईल असा आडाखा काही गुंतवणूकदार बांधतील. कमी पारदर्शकता असणाऱ्या सोनारकामाच्या क्षेत्रात टाटांच्या टायटनने तनिष्कच्या रूपात मोठी क्रांती घडवून आणली. दहा वर्षांपूर्वी ज्यांनी टायटनची ही क्षमता ओळखून त्या कंपनीचे शेअर्स विकत घेतले त्यांनी चांगला नफा कमावला. आजही तनिष्क दागिन्यांच्या व्यवसायातील आघाडीचा ब्रँड आहे. पण त्याचा अर्थ सर्वच गुंतवणूकदारांना टायटन आता गुंतवणूकयोग्य वाटेलच असे नाही. टायटनचे घडय़ाळनिर्मिती व दागिनेनिर्मिती हे व्यवसाय आहेत. पण आता टायटन चष्मे, अत्तरे अशा उत्पादनांकडेही वळली आहे. त्यामुळे केवळ दागिनेनिर्मिती क्षेत्रात रस असणारे गुंतवणूकदार टायटनपेक्षा टी बी झेड किंवा पी सी ज्वेलर्सच्या शेअर्सना पसंती देतील. टायटन एक चांगलीच कंपनी आहे, पण नवीन उत्पादनांकडे वळल्याने कंपनीतील गुंतवणुकीशी संबंधित जोखीम व उत्पन्नाचे प्रमाण बदलते. ज्यांना केवळ दागिनेनिर्मितीमध्ये रस आहे त्यांना टायटनमध्ये तितकासा रस वाटणार नाही.
कंपनी नवीन उत्पादन किंवा सेवा बाजारात आणते तेव्हा कंपनीच्या नफा कमावण्याच्या क्षमतेवर त्याचा निश्चितच परिणाम होतो. मारिको ही कंपनी ‘पॅराशूट नारियल तेल’ची, सफोला तेलाची उत्पादक म्हणून आपल्या चांगल्याच परिचयाची आहे. त्यांची इतरही अनेक उत्पादने आहेत. त्यातून या कंपनीची विक्री व नफा गेल्या दोन दशकांत चांगलाच वाढला. परंतु या कंपनीने ‘काया स्किन क्लिनिक’ ही साखळी सुरू केली. त्या व्यवसायात कंपनीला अपेक्षित यश मिळाले नाही व कंपनीच्या नफ्याचे प्रमाण घटले. काही गुंतवणूकदार या कंपनीपासून दूर गेले. गेल्या वर्षी कंपनी व्यवस्थापनाने काया स्किन केअर हा व्यवसाय वेगळ्या कंपनीत नेण्याचा निर्णय घेतला. आता पुन्हा एकदा फक्त उपभोग्य वस्तूनिर्मिती करणाऱ्या मारिकोमध्ये गुंतवणूकदारांचा रस वाढेल असे दिसते. थोडक्यात काय, तर कंपनीच्या बिझनेस मॉडेलकडे व भांडवल गुंतवणूक धोरणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
काही गुंतवणूकदार फक्त अशाच कंपन्यांचे शेअर्स खरेदी करतात, की ज्या कंपन्या त्या उत्पादनाच्या क्रमांक १ किंवा २ च्या उत्पादक आहेत. उदाहरणार्थ नेस्ले- शिशूंचा आहार, नूडल्स या वर्गात नेस्लेला स्पर्धा जवळजवळ नाहीच. या कंपनीचे शेअर्स उच्चतम पीई रेशोला मिळतात. पण काही गुंतवणूकदार असेही आहेत, की ते या कंपनीचे शेअर्स हळूहळू गोळा करत राहतात.
चंगळवादाच्या फायद्यांचे काही अप्रत्यक्ष भागीदारदेखील आहेत. बँका सर्व गरजांसाठी कर्जपुरवठा करतात. वैयक्तिक (पर्सनल) कर्ज, वस्तूंसाठी, वाहनांसाठी कर्ज देऊन बँका चंगळवादाचा मार्ग सुकर करतात. ग्राहक खरेदी करताना क्रेडिट कार्डचाही मोठय़ा प्रमाणावर वापर करतात. या सर्वाचा फायदा बँकांना होतो. आयसीआयसीआय व एचडीएफसी बँकांच्या नेत्रदीपक व्यवसायवृद्धीचे उदाहरण आपल्यासमोर आहेच.
चंगळवादाशी संबंधित व्यवसायांमध्ये पैसे गुंतवणे हा जरी एक चांगला पर्याय वाटत असला तरीही बाजारात उत्साहवर्धक वातावरण असले तर हे शेअर्स थोडे मागे पडतात. सध्यादेखील सर्वजण अभियांत्रिकी व कॅपिटल गुड्स कंपन्यांच्या मागे लागले आहेत. अशावेळी उपभोग्य वस्तूंचे उत्पादक गुंतवणूकदारांच्या नजरेआड झाले आहेत. त्यामुळे या कंपन्यांत गुंतवणूक करताना दीर्घ मुदतीच्या दृष्टिकोनातून (पाच ते दहा वर्षे) करावी.
स्वत:ला शेअर्सची निवड करणे शक्य नसेल किंवा खरेदी-विक्री करणे जमत नसेल तर म्युच्युअल फंडांच्या योजनांचा लाभ घ्यावा. बिर्ला व मिरे म्युच्युअल फंडांनी अशा योजना बाजारात आणल्या आहेत. त्यातदेखील पैसे गुंतवायला हरकत नाही. अर्थात एकूण गुंतवणुकीच्या दहा टक्क्य़ांपेक्षा जास्त पैसे अशा फंडांत गुंतवू नयेत.
तळटीप : उपरोक्त शेअर्स हे उदाहरण म्हणून चर्चिले आहेत. ते सध्या गुंतवणूकयोग्य असतीलच असे नाही.     

Using Plastic Chopping Board Can Harm Stomach Throw These Four Items From Kitchen
Earth Day: तुमच्या किचनमधून आजच बाहेर काढा ‘या’ ४ वस्तू; पर्यावरणच नव्हे तर पोटाच्याही ठरतात शत्रू
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: माणसांबाबत तरी संवेदनशील आहोत?
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क
priya bapat says she will not do fairness cream endorsement
“मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा,” फेअरनेस क्रीमबद्दल प्रिया बापटचं स्पष्ट मत; शरीरयष्टीबाबत म्हणाली….