मराठा समाजाच्या संरजामी वृत्तीबद्दल बरेच लिहिले गेले आहे. त्यामानाने मराठी स्त्रियांच्या शोचनीय आणि दुर्धर स्थितीविषयी मात्र फारसे लेखन झालेले नाही. कथा-कादंबऱ्यांमध्येही त्याचे फारसे चित्रण झालेले नाही. या समाजातील स्त्रियांनी आपली आत्मकथनेही फारशी लिहिलेली नाहीत. त्यामुळे मराठा स्त्रीजीवनाचा एक मोठा कप्पा साहित्यापासून काहीसा वंचित राहिला आहे. अलीकडच्या काळात त्याविषयी थोडेफार लिहिले जाऊ लागले आहे, ती त्यातली समाधानाची बाब आहे. प्रस्तुत पुस्तक त्यापैकीच एक चांगला प्रयत्न म्हणावा लागेल. पेशाने शिक्षिका असलेल्या लीला अंजिरे यांनी आपल्या आईविषयी लिहिलेले हे पुस्तक आहे. ते रूढार्थाने चरित्र नाही, तर आठवणीपर म्हणावे असे आहे. मराठा पुरुषांच्या संरजामी मानसिकतेमुळे त्यांच्या स्त्रियांच्या वाटय़ाला साध्या साध्या गोष्टींमध्येही कशी मानहानी येते, याचे अतिशय संयत चित्रण लेखिकेने केले आहे. त्यामुळे प्रभावी आणि वेधक झाले आहे. याचबरोबर यातून ५०-५५ वर्षांपूर्वीची खेडी, त्यातील मराठा समाज, त्यांच्या स्त्रियांचा भागधेय, या समाजाचा आपल्या नातेवाईकांशी असलेला संबंध, रागलोभ, मानापमान अशा गोष्टींवरही चांगला प्रकाश पडतो. त्यामुळे या पुस्तकाला मराठा समाजाच्या एका प्रातिनिधिक दस्तावेजाचे स्वरूप येते.
‘जिजी’- लीला अंजिरे, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर, पृष्ठे- १७२, मूल्य- २०० रुपये.