आकाशात दिसणाऱ्या प्रत्येक ग्रहगोलाविषयी आज पूर्वीपेक्षा हजारो पटींनी अधिक माहिती मानवाला आहे, याचे कारण म्हणजे केवळ दुर्बिणीच्या माध्यमातून केलेल्या निरीक्षणांवर न विसंबता प्रत्येक ग्रहाच्या दिशेने अमेरिका-रशियासारख्या प्रगत देशांची अंतराळयाने गेली आणि त्यांनी तिथून जी माहिती पाठविली, ती लोकांपर्यंत या ना त्या प्रकारे वेळोवेळी पोहोचवण्यात आली. डॉ. प्रकाश तुपे यांचे ‘स्पुटनिक ते चांद्रयान’ हे पुस्तक अशा अनेक अंतराळ मोहिमांची सचित्र सफर घडवते. माणसाने पहिल्यांदा अवकाशात भरारी घेतली तेव्हापासून आजपर्यंत अवकाश क्षेत्रात झालेल्या प्रगतीचे दर्शन त्यातून घडते.
रशियाचा स्पुटनिक हा उपग्रह अवकाशात झेपावल्यानंतर अमेरिकेने घेतलेली धास्ती, त्यानंतर केवळ या दोन महाशक्तींमधील स्पर्धेतून अमेरिकेने चंद्रावर ठेवलेले पहिले मानवी पाऊल, नंतर सातत्याने अवकाश संशोधन मोहिमांमध्ये टिकवलेली आघाडी या सर्व बाबींचा परामर्श घेताना लेखकाने कुठेही कंटाळवाणेपणा येऊ दिलेला नाही.  चंद्रानंतर मंगळावरच्या विविध मोहिमा व मार्स ग्लोबल सव्र्हेअर यानाने दिलेल्या माहितीतून उजेडात आलेली मंगळाची माहिती, शुक्र व बुधावरच्या एरवी फारशा चर्चेत नसलेल्या मोहिमा यावर या पुस्तकात नवीन प्रकाश टाकलेला आहे. ज्या कोलंबिया अवकाशयानाच्या अपघातात भारतीय वंशाची अंतराळयात्री कल्पना चावला हिच्यासह सात अंतराळवीरांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, त्या मोहिमेची चित्तरकथा अंतराळप्रवासातील धोक्यांची जाणीव करून देणारी आहे. कल्पना चावला हिचा थोडक्यात परिचयही दिला आहे. यासोबत अवकाशस्थानकांची माहिती व त्यांचे अंतराळ संशोधनातील स्थान यावर प्रकाश टाकण्यात आला असून, मीर अंतराळस्थानकाचा शेवट कसा झाला, हेही वाचण्यासारखे आहे. पूर्वी स्कायलॅब कोसळली होती व ती कुठे पडणार, यावर जगभर बरीच चर्चाही झाली होती. त्यामुळे अवकाशातील एखादी वस्तू सुरक्षित स्थळी कशी पाडली जाते, याची हकिकत वाचण्यासारखी आहे.
आता भारताच्या मंगळ मोहिमेचे पडघम वाजत आहेत. पण त्याअगोदर इस्रोने यशस्वी केलेल्या चांद्रयान-१ मोहिमेची रंजक कहाणीही आहे.
मंगळावर सजीव सृष्टी असण्याची शक्यता व त्या दिशेने आतापर्यंत झालेले संशोधन याचाही वेध ‘शोध जीवसृष्टीचा’ यात घेतला आहे. त्यात फिनिक्स लँडर मोहिमेवर विशेष भर दिला आहे. उपयुक्त छायाचित्रे, त्याला चकचकीत कागदावरील सुबक छपाईची जोड यामुळे या पुस्तकाची निर्मिती दर्जेदार झाली आहे.
इंटरनेट मुशाफिरी करून माहिती मिळते हे खरे असले तरी तिथेही अशी संपादित माहिती मिळणे अवघड असते. शिवाय मराठी भाषेतून ही माहिती अतिशय ओघवत्या शैलीत देण्याचा हा उपक्रम दाद देण्याजोगाच आहे. शाळेतील मुलांनी अवांतर वाचनासाठी जरूर हे पुस्तक वाचावे व त्याला संदर्भमूल्य असल्याने शाळांनीही ते संग्रही ठेवावे.
‘स्पुटनिक ते चांद्रयान’-
डॉ. प्रकाश तुपे, अनुबंध प्रकाशन,  पुणे,  पृष्ठे – २२४,
मूल्य – ४५० रुपये.

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
curiosity about indians performance in paris olympic
अन्वयार्थ : असले ‘अव्वल स्थान’ काय कामाचे?