ज. शं. आपटे

जगाची लोकसंख्या आज सातशे दहा (७१०) कोटी आहे व भारतासारख्या खंडप्राय देशात आज १३० कोटी लोक राहतायेत. २०५० साली जगाची लोकसंख्या दहा अब्जांहून अधिक आणि भारताची लोकसंख्या दीड अब्जाहून अधिक होईल! एकीकडे हे वास्तव आहे, तर दुसरीकडे प्रजननाच्या तंत्रशास्त्रात होत असलेली प्रगती! या अनुषंगाने जागतिक स्तरावरील प्रजनन तंत्रशास्त्रातील विदारक सत्यावर परखड भाष्य करणारे ‘पॉलिटिक्स ऑफ द वूम्ब’ हे पहिलेच पुस्तक आहे. या पुस्तकाच्या लेखिका पिंकी विराणी  अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून पत्रकारितेचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरा करून गेली अनेक वर्षे वृत्तपत्रांतून लिहीत आहेत. प्रस्तुत पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे तो रेश्मा कुलकर्णी-पाठारे यांनी! पुस्तकात एकूण बारा प्रकरणे आहेत. पुस्तकाच्या शीर्षकाप्रमाणेच या प्रकरणांच्या शीर्षकांचाही अनुवाद न करता ती मूळ भाषेतच ठेवली आहेत. उदा. ‘व्हजायना व्हर्सेस वूम्ब’, ‘अनप्रेग्नंट’, ‘बाय, बाय बेबी’, ‘एग्स्प्लॉयटेशन’, ‘मिन ऑफ अदर फादर्स’, ‘प्रेग्नंट’, ‘मिल्क ऑफ  काइंडनेस’, ‘इन कोल्ड डोमेन’, ‘हँच’, ‘मॅच डिस्मॅच’!

प्रस्तुत पुस्तक समजून घेण्यासाठी एक महत्त्वाचे विधान लक्षात ठेवायला हवे; ते आहे- ‘आपण अशा एका समाजाचे भाग आहोत, ज्याचा तंत्रज्ञान हा एक अविभाज्य भाग आहे. पण तरीही हे तंत्रज्ञान कशाशी खातात, हेसुद्धा बहुतांशी लोकांना ठाऊक नाही.’

विज्ञानाने स्त्रीला संततिनियमनाची विविध साधने देऊन मातृत्वाबद्दल स्वातंत्र्य दिले. परंतु आता त्याच विज्ञानामुळे तिच्या पायात ‘इन-विट्रो फर्टिलायझेशन’ अर्थात आयव्हीएफच्या बेडय़ा झपाटय़ाने टाकल्या जात आहेत. अनादिकाळापासून ‘स्त्री’च्या डोक्यावर समाजाने आणि संस्कृतीने एक बाब लादण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणजे- स्त्री कितीही कर्तृत्ववान असली तरी तिझ्या स्त्रित्वाचा खरा सन्मान आणि जीवनाचे खरे सार्थक तेव्हाच होणार जेव्हा ती एखादे तरी मूल जन्माला घालेल. आणि आताही, जेमतेम वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेल्या मुलीसुद्धा आयव्हीएफसाठी आपली बीजे देऊन मृत्युमुखी पडत आहेत.

‘अनप्रेग्नंट’ या शीर्षकाच्या प्रकरणात वंध्यत्वाविषयी विस्ताराने माहिती, तपशील देऊन विवेचन केले आहे. आयव्हीएफद्वारा जन्मलेल्या मुलांमध्ये ‘ऑटिझम’ आणि ‘मंदबुद्धीपणा’ यांचे प्रमाण अधिक असते. एका संशोधनाद्वारे असे दिसून आले आहे, की १९८२ ते २००७ या २५ वर्षांत जन्मलेल्या २.५ दशलक्ष मुलांपैकी ३०,९५९ मुले आयव्हीएफद्वारा जन्मली होती. ३१ डिसेंबर २००९ पर्यंत या सर्व मुलांची सतत पाहणी करण्यात आली. त्या निरीक्षणातून असा निष्कर्ष निघाला, की आयव्हीएफद्वारा जन्मलेल्या मुलांपैकी १०३ मुलांना ‘ऑटिझम’ होता, तर १८० मुले मंदबुद्धी होती वा त्यांना बौद्धिक विकलांगता होती. आयव्हीएफद्वारे जन्मलेल्या मुलांमधील कर्करोगाचे प्रमाण यासंबंधीही बरेच संशोधन झाले आहे. अशा मुलांना बालपणात कर्करोग होण्याची ३३ टक्के अधिक शक्यता असते. ‘ल्युकेमिया’ होण्याची ६५ टक्के अधिक शक्यता असते, तर मेंदू आणि मध्यवर्ती मज्जासंस्थेचा कर्करोग होण्याची २८ टक्के अधिक शक्यता असते.

वंध्यत्वावर मात करण्यासाठी स्त्रीने केलेल्या औषधाचे सेवन आणि तिच्या मुलांमधील कर्करोगाचे प्रमाण या संशोधनाचे निष्कर्ष २०१३ सालच्या ऑक्टोबरमध्ये कोपनहेगन येथील ‘डॅनिश कॅन्सर सोसायटी रीसर्च सेंटर’च्या डॉ. मारी हारग्रीव्ह यांनी जाहीर केले होते. वर दिलेली आकडेवारी त्याच संशोधनाच्या निष्कर्षांचा एक भाग होती. वंध्यत्वाच्या उपचारपद्धती, प्रजनन साहाय्य प्रक्रिया आणि जनुकांच्या कार्यपद्धतीमुळे हे होऊ शकते. त्यासंबंधी डॉ. हारग्रीव्ह म्हणतात, ‘सदर प्रक्रियेमुळे ज्या उपप्रक्रिया असतात आणि ज्या काही विशिष्ट परिस्थिती निर्माण होतात, त्यामुळे हे बदल घडून येतात. उदा. कृत्रिम संप्रेरके वापरणे, शुक्राणू तयार करणे, फलित अंडी थिजवणे. तसेच फलित अंडी कोणत्या वातावरणात वाढवली जात आहेत, रोपण प्रक्रिया किती कालांतराने केली जात आहे यावरही हे अवलंबून आहे.’

‘फर्टिलिटी अ‍ॅण्ड स्टरिलिटी’ या नियतकालिकाने १९९० ते २०१० या काळात अमेरिका, ब्रिटन, डेन्मार्क आदी १२ विकसित देशांतील २५ अभ्यासांचा आढावा घेतला होता. या अभ्यास-प्रकल्पांमध्ये ज्या मुलांची पाहणी केली गेली होती, त्यापैकी बहुतेकांचा जन्म आयव्हीएफद्वारा झाला होता. तर उर्वरित मुलांचा जन्म ‘आयसीएमआय’ (इन्ट्रासायटोप्लाज्मिक स्पर्म इंजेक्शन) किंवा ‘आययूआय’ (इन्ट्रॉटेरिन इन्सेमिनेशन) या तंत्रांनी झाला होता. या अभ्यास-प्रकल्पांबद्दलही पुस्तकात वाचायला मिळते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या व्याख्येनुसार ‘आरोग्य’ म्हणजे केवळ शारीरिक स्वास्थ्य नसून त्यामध्ये मानसिक स्वास्थ्याचाही समावेश आहे. भारतात मानसिक विकार, अस्वास्थ्य यांना फारसे महत्त्व दिले जात नाही. उलट आपल्या कुटुंबात कुणाला मानसिक आजार असल्यास त्याबद्दल कधीच उघडपणे कबुली दिली जात नाही. जेव्हा एखाद्या व्यक्तीमधील दोष ठळकपणे दिसून येतात तेव्हा त्याला वेडा, मेंटल अशा सर्वसामान्य पद्धतीने संबोधले जाते. परंतु ‘स्किझोफ्रेनिया’सारखा जटिल मानसिक विकार इतक्या सहज पद्धतीने संबोधला गेल्यास त्यावर योग्य ते उपचार केले जाऊ शकत नाहीत. भारतात बऱ्याचदा स्किझोफ्रेनिया असलेल्या मुलाचे वा मुलीचे लग्न लावून दिले जाते. अशी दुभंगलेले व्यक्तिमत्त्व असलेली मुले वा मुली आपले आयुष्य आनंदाने, सुखाने घालवू शकत नाहीत.

या पुस्तकात स्किझोफ्रेनियाशी निगडीत काही अभ्यासांबद्दल वाचायला मिळते. उदा. न्यू यॉर्क येथील मानसोपचारतज्ज्ञ आणि पर्यावरणशास्त्राच्या प्राध्यापिका डॉ. डोलेरेस यांनी केलेला अभ्यास. त्यांच्या संशोधनात हे सिद्ध झाले की, स्किझोफ्रेनिया झालेल्या २५ टक्के अपत्यांमध्ये हा आजार होण्याचे प्रमुख कारण त्यांच्या जन्मावेळी असणारे त्याच्या पित्याचे प्रौढ वय हे होते. इतरही अनेक संशोधनांनुसार, स्किझोफ्रेनिया असलेल्या मुलांपैकी ५०-६२ टक्के मुलांच्या पालकांमध्ये स्किझोफ्रेनिया आणि निगडित व्याधी दिसून आल्या. परंतु ज्या पालकांना स्किझोफ्रेनिया नाही, त्यांच्या मुलांमध्येही स्किझोफ्रेनिया होण्याचे प्रमाण अधिक आहे. २०१२ मध्ये तर एका संशोधनात हे सिद्धच झाले आहे की, केवळ भारतातच नव्हे तर कुठल्याही देशातील प्रौढ वयाच्या पुरुषाचे शुक्राणू अपत्याला धोका पोहचवू शकतात आणि तसेच आईचे प्रौढ वयसुद्धा अपत्यासाठी हानिकारक ठरू शकते.

मातृत्व संकल्पना आणि तिच्याशी निगडीत सर्व अंगांचा वेध घेणाऱ्या या पुस्तकात जगभर चाललेल्या प्रजनन तंत्रशास्त्रातील संशोधनाबद्दल विस्ताराने लिहिले आहे. स्त्रीरोगतज्ज्ञ, प्रसूतिशास्त्रज्ञ व जनुकशास्त्रातील संशोधक – अभ्यासकांनी हे पुस्तक अवश्य वाचावे!

पॉलिटिक्स ऑफ द वूम्ब’

मूळ लेखिका- पिंकी विराणी,

अनुवाद – रेश्मा कुलकर्णी-पाठारे,

मेहता पब्लिशिंग हाऊस,

पृष्ठे- ३४२, मूल्य- ३९५ रुपये.