28 February 2021

News Flash

थांग वर्तनाचा! : ‘आपण’ आणि ‘ते’ची फॉल्ट लाइन

साधारण लाखभर वर्षांपूर्वी वंश हीसुद्धा आपली ‘ओळख’ नव्हती. कारण सर्व माणसं एकाच वंशाची होती!

अंजली चिपलकट्टी

‘‘तुझी ओळख काय?’’ असा प्रश्न जर कोणी तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर अमुक एक नाव, गाव, शिक्षण, व्यवसाय असं जरी तुम्ही देत असलात तरी त्यापलीकडे सुप्त किंवा उघडपणे वंश, देश, धर्म, जात यांचीसुद्धा या ओळखीत ऐसपैस जागा तयार झाली आहे. यातला वंश सोडला तर बाकी सर्व ओळखी नैसर्गिक नाहीत. जेमतेम दोन-तीन हजार वर्षांपूर्वीपासून माणसाने त्या निर्मिलेल्या आहेत. साधारण लाखभर वर्षांपूर्वी वंश हीसुद्धा आपली ‘ओळख’ नव्हती. कारण सर्व माणसं एकाच वंशाची होती!

पाच-दहा हजार वर्षांपूर्वीच्या माणसाला हा प्रश्न विचारला असता तर त्यानं स्वत:चं नाव (?) आणि अमुकतमुक टोळीचा सदस्य असं याचं उत्तर दिलं असतं. आजही आपली ओळख टोळीशीच बांधलेली आहे; फक्त आता आपण एकाऐवजी देश, धर्म, जात वगैरे अशा अनेक मोठय़ा टोळ्यांचे सदस्य असतो. ज्या वेळी जी उपयोगी पडेल ती आपण वापरतो! ही ‘टोळीपणा’ची ओळख आपल्यात इतकी भिनलेली असते की त्याशिवाय आपलं व्यक्तित्व जणू अपुरंच आहे असं वाटावं. मात्र, आपल्या अनेक समस्यांची मुळं या आपल्या लांबलचक ‘ओळखी’त आहेत.

जगातली गेल्या दोन-तीन हजार वर्षांतली युद्धे, दंगे, खून, दडपशाही वगैरे गोष्टी पाहिल्या तर त्या नेमक्या आपल्या ओळखीत समाविष्ट असलेल्या देश, जात, वंश, लिंग, धर्म, आर्थिक स्तर अशा टोळीभेदांमुळेच घडलेल्या आहेत. या टोळ्यांना विभागणाऱ्या रेषा आपल्या मनात आहेत. या विभाजन रेषा का तयार होतात आणि त्या रुंदावण्याचं काम कोण करतं याची उत्तरं आपल्या उत्क्रांतीत आणि संस्कारांत आहेत. अलीकडचंच एका युद्धाचं उदाहरण घेऊ. युद्धाच्या कथा रम्य नक्कीच नसतात. पण यानिमित्ताने मानवी मनाचा तळ पाहता येतो.

१९९० मध्ये कुवेतने इराकची काही कुरापत काढली म्हणून इराकने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात अमेरिकेने पडायचं की नाही, याबाबत बराच काळ तिथल्या काँग्रेसमध्ये चर्चा चालली होती. दुसऱ्या देशांच्या भानगडींत शिरून ‘पोलिसी’ खाक्या मिरवण्यात अमेरिकी सत्ताधाऱ्यांना नेहमीच रस असतो. इथे तर क्रुड तेलाचे हितसंबंधही गुंतलेले होते. पण सबळ असं ‘सभ्य’ कारण मिळत नव्हतं. अचानक कुवेतमधून पळून आलेल्या एका नर्सने (नायरा) काँग्रेससमोर सनसनाटी साक्ष दिली. कुवेतवर आक्रमण केल्यानंतर इराकी सैनिकांनी हॉस्पिटलमधल्या नवजात अर्भकांना इनक्युबेटर्समधून काढून कसं ठार मारलं याची दु:खभरी कहाणी तिनं रडत ऐकवली. ही साक्ष बऱ्याच टीव्ही चॅनेल्सवर प्रसारित केली गेली. अमेरिकी नागरिकांनी सद्दाम हुसेनच्या विरोधी मोर्चे काढले आणि काही दिवसांतच काँग्रेसनं युद्धाच्या बाजूने कौल दिला. या युद्धात इराकबरोबरच इराकी जनताही उद्ध्वस्त झाली. पुढे वर्षभरातच बातमी बाहेर आली की, जिने ही साक्ष दिली ती नर्स नसून अमेरिकेतील कुवेती राजदूताची मुलगी होती! ‘हिल अँड नोल्टन’ नावाच्या एका जाहिरात कंपनीला कुवेतनं तगडी किंमत देऊन हे ‘नाटय़’ घडवून आणलं होतं. कशासाठी? अमेरिकी जनमत युद्धाला तयार करण्यासाठी! अमेरिकी जनतेच्या मनात सद्दाम हुसेन हा कसा माणुसकीला काळिमा फासणारा ‘अ-मानुष’ शत्रू आहे, हे भरवलं की काम झालं! हे काम सोपं होतं ते आपल्या मनातल्या ‘फॉल्ट लाइन’मुळे! मानवी मन फार पटकन ‘आपण आणि ते’ अशी विभाजन रेषा तयार करतं आणि जे लोक ‘ते’मध्ये सामील असतात त्यांच्याविषयीची माणुसकीची भावना आपल्या मनातून नष्ट होते. का बरं? तीच ही ‘फॉल्ट लाइन’!

मेंदू वैज्ञानिकांनी याबाबत जो सखोल अभ्यास केला, त्यातला एक मूलभूत प्रयोग असा : त्यांनी काही गौरवर्णीय लोकांना त्यांना अनोळखी असलेले अनेक चेहरे काही सेकंदांसाठी दाखवले आणि त्याच वेळी त्यांच्या मेंदूचा ‘एमआरआय’ (fMRI) घेतला. यावरून असं लक्षात आलं की, दुसऱ्या वंशाचा अथवा रंगांचा चेहरा डोळ्यासमोरून जात असताना मेंदूनं नकारात्मक प्रतिक्रिया दिली. पण गोरे चेहरे दिसताना मात्र मेंदू सकारात्मक प्रतिक्रिया देत होता. या प्रयोगात सहभागी असलेल्या गोऱ्या व्यक्ती जाणिवेच्या पातळीवर, वागणुकीतही अजिबात वर्णद्वेषी वा वंशद्वेषी नव्हत्या. त्यांनाही त्यांच्या मेंदूनं दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल आश्चर्य व खंत वाटली. म्हणजेच मेंदूची ही प्रतिक्रिया अव्यक्त होती, जी मेंदूतील जैविक जडणघडणीतून येत होती.

या जैविक प्रतिक्रियेचा संबंध असुरक्षित वाटण्याशी किंवा भयाच्या भावनेशी असतो. मानवी उत्क्रांतीत आपण टोळी करून राहत होतो त्यावेळी तग धरून राहण्यासाठी काही वृत्ती विकसित झाल्या. टोळीत कळपानं राहिल्यानं व इतर सदस्यांशी सहकार्य करत जगल्यानं त्याचे भरपूर फायदे मिळाले. उदा. अन्न आणि निवारा मिळवणं, वन्यजीवांपासून संरक्षण, कामांचं वाटप, मानसिक सुरक्षितता. यातून एका टोळीशी बांधिलकी तर तयार झाली, पण इतर टोळ्यांशी झालेल्या संघर्षांमुळे ‘परक्या’ टोळीतल्या माणसांबद्दल भीती वाटणं, तिटकारा वाटणं अशी वृत्ती विकसित होऊन हा ‘आपला’ आणि तो ‘परका’ असा भेदभाव मेंदूत पक्का झाला. परंतु गंमत म्हणजे ‘आपला-परका’ ठरवणारे निकष मात्र मेंदूत पक्के नाहीत! त्यामुळे या विभाजन रेषा चक्क सोयीप्रमाणे तयार केल्या जातात. कशा?

मागील लेखात आपण भय ‘शिकू’ शकण्याच्या मेंदूच्या क्षमतेबद्दल पाहिलं होतं. माणसाची बोधनक्षमता इतर प्राण्यांपेक्षा जितकी जास्त, तितकीच भय शिकण्याची क्षमताही जास्त. तीच आता आपल्या बोकांडी बसलीय. आता सर्व जुळून येतंय का, पाहा. ‘.. खतरे में..’च्या घोषणा सर्व धर्माचे ठेकेदार मोक्याच्या वेळी करतात, लढाया बहुतेक वेळा निवडणुकांच्या तोंडावर होतात, तेव्हा कोणत्या तरी रँडम टोळीकडून धोका आहे असं आपल्याला वाटू लागतं. त्यातून येणाऱ्या भयावर मेंदूतल्या विभाजन रेषा पोसल्या जातात. अशी भीती ‘तयार’ करून आपल्याला सुरक्षेची तकलादू हमी देणाऱ्यांना आपण मत देतो. अगदी रोजच्या व्यवहारातही अमुक लोकांमुळे तुमच्या नोकऱ्या जातील, संस्कृती बिघडेल, आत्ताच गुंतवा- नंतर किमती वाढतील.. अशा धोक्याच्या ना-ना घंटा सतत वाजवत ठेवून मने भीतीयुक्त ठेवणं हे ‘वरच्या’ लोकांच्या फायद्याचं असतं, हे आपल्याला अनुभवातून माहीत आहे.

टोळीभेद करणं ‘काही’ माणसांनी इतकं आत्मसात केलेलं असतं की त्यांना एक टोळी पुरत नाही. टोळीभेदासाठी ते माणसांमधले भेद आणखीनच उकरून काढतात. म्हणजे समजा, कोणी हिंदू-मुस्लीम-ख्रिश्चन असा भेद मानत असेल तर असे बहुतांश लोक धर्मातर्गत उच्च-नीचताही पाळताना दिसतात. जसे की- जात, पंथ, वंश, श्रीमंत, गरीब. अशा लोकांमध्ये ‘ते’ गटातल्या माणसांना ‘कमी प्रती’चा मानण्याची वृत्ती दिसून येते.

यातलंच पुढचं संशोधन म्हणजे या टोळीभेदाच्या समस्येवरची जणू किल्लीच आहे! वैज्ञानिकांच्या असं लक्षात आलं की, हा ‘टोळीभाव’ लवचीक असतो. म्हणजे मेंदूतल्या या जोडण्या परिस्थितीनुसार बदलताही येतात.पुढच्या टप्प्यातल्या प्रयोगात संशोधकांनी गौरवर्णीय लोकांना दुसऱ्या वंशाचे चेहरे दाखवले, जे त्यांना ‘परिचित’ होते. आता त्यांच्या ऋटफक स्कॅनमध्ये पूर्वीची नकारात्मकता नव्हती! म्हणजेच त्यांना त्या चेहऱ्यांची भीती वाटत नव्हती. अधिक खोलात जाऊन संशोधकांनी याचा अर्थ लावला तो असा.. मेंदूने प्रतिक्रिया जेव्हा एक ‘व्यक्ती’ म्हणून दिली तेव्हा ती सकारात्मक होती; पण जेव्हा चेहरे अनोळखी होते तेव्हा त्यांच्याकडे परक्या टोळीचा सदस्य म्हणून बघितलं गेलं.

वेगवेगळ्या वंशांच्या/ वर्णाच्या/ जाती-धर्माच्या माणसांमधलं व्यक्तिगत पातळीवरचं वर्तन अधिक विश्वासाचं असतं; मात्र तीच माणसं जेव्हा एकमेकांकडे दुसऱ्या टोळीचा सदस्य म्हणून बघतात तेव्हा त्यांचं एकमेकांशी वर्तन खडूसपणाचं, आक्रमक बनतं.

समजा, एखाद्या वेगळ्या धर्माचा एक ‘भला’ माणूस तुमच्या चांगल्या परिचयाचा आहे, तर मनातल्या मनात आपण ‘हा माणूस ‘त्यांच्यातला’ नाही वाटत’ असं म्हणतो! पण त्याच माणसाशी काही खटकलं तर मात्र आपण ‘शेवटी तो त्यांच्यातलाच..’ असं म्हणतो. (का?) नेणिवेतल्या फॉल्ट लाइनचं असं रॅशनलायझेशन हा आपल्याच पदरातला पुरावा!

मग आता ‘आपण- ते’ची फॉल्ट लाइन नैसर्गिकच असेल तर काय करणार? याला दोन उत्तरं आहेत. १) जे जे नैसर्गिक, ते ‘चांगलं’ असतं असा काहींचा समज असतो. तर ते तसं नाही. निसर्ग अशी कोणतीच नैतिक भूमिका बजावत नसतो. अनेक प्राणी ‘नैसर्गिक’ गुणांमुळे नामशेषही झाले आहेत. २) मेंदूतली ही फॉल्ट लाइन म्हणजे उत्क्रांतीच्या प्रवासातली नुसती अडगळच नाही, तर ‘एक्सपायर’ झालेलं हत्यार आहे; जे वापरून ‘आपण- ते’ असे भेद ठरवून घडवले जातात. हे हत्यार कोणालाही वापरू न देणं म्हणजे जाणीवपूर्वक सावध राहून भीती न ‘शिकण्याचं’ आपण ठरवू शकतो! अशी भीती ‘न शिकणारी’ हजारो माणसं होती आणि आहेत.  म्हणूनच मानवजात अजून टिकून आहे.

njalichip@gmail.com

((लेखिका वैज्ञानिक व विवेकवादी विचारपद्धती (दृष्टिकोन) या विषयाच्या अभ्यासक व प्रसारक आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2021 1:03 am

Web Title: brain movement fault line in the brain zws 70
Next Stories
1 चवीचवीने.. : आफियेत ओऽसून्.. पोटभर जेवा!
2 पडसाद : जगणं खरंच बदललं
3 प्रेम, कुटुंब आणि करंटेपणा
Just Now!
X