News Flash

ब्रिटिश समर

‘ग्रीष्मात सूर्याने त्याच्या कपाटातून ठेवणीचा हिरवा शालू धरणीला बहाल केला आहे..’ कवी पॉल डनवार याने ‘समर’ या कवितेत उत्तर गोलार्धात अनुभवायला मिळणाऱ्या उन्हाळ्याचे केलेले हे

| August 2, 2015 01:01 am

0016‘ग्रीष्मात सूर्याने त्याच्या कपाटातून ठेवणीचा हिरवा शालू धरणीला बहाल केला आहे..’ कवी पॉल डनवार याने ‘समर’ या कवितेत उत्तर गोलार्धात अनुभवायला मिळणाऱ्या उन्हाळ्याचे केलेले हे वर्णन. इंग्लंडला आल्यावर इकडचे लोक उन्हाळ्याची चातकासारखी उत्सुकतेने वाट पाहतात हे पाहून मला आश्चर्यच वाटले होते. मुंबईच्या रणरणत्या उन्हापासून कोकणात वा थंड हवेच्या ठिकाणी जाणे आणि पावसाची वाट पाहणे हा भारतातल्या उन्हाळ्यातला माझा शिरस्ता. परंतु इंग्लंडमध्ये मात्र ख्रिसमस संपला की लोक उन्हाळ्याच्या सुट्टीची वाट पाहतात.
अर्थात् उन्हाळ्याच्या उष्ण वातावरणाची मजा लुटण्यासाठी इंग्लंडमध्ये निदान एखाद् वर्ष तरी राहिले पाहिजे. कारण इथले वर्षांचे दहा महिने कमाल तापमान १० ते १५ डिग्री सेल्सिअसच्या वर जातच नाही. हिवाळा तर अतिशय बोचरा. सततचा पाऊस आणि क्वचितच दिसणारा सूर्य यामुळे जीव हवालदिल होतो. २१ डिसेंबर हा उत्तर गोलार्धातील सर्वात छोटा दिवस. सूर्य पाहायला मिळाला तरी तो दुपारी चारच्या आधीच मावळतो. त्यानंतर वाढत्या दिवसानुसार लोकांच्या आशा पल्लवित होतात. सूर्यमहाशय जास्तीत जास्त वेळा दर्शन देण्याचा प्रयत्न करतात. मार्चमध्ये मधुमासाला सुरुवात होते. एड, सारा, रिकी यांसारखे सायकलपटू ऑफिसमध्ये सायकलवर स्वार होऊन येतात. तर गर्मीची चाहूल लागताच जेम्स जॉगिंग करत ऑफिसमध्ये येतो. हिवाळ्यात बंद पडलेला आमचा ऑफिसचा फुटबॉल क्लब पुनरुजीवित होतो. यंदा तर सहकाऱ्यांच्या आग्रहापुढे मान तुकवून मीसुद्धा फुटबॉलच्या मॅचमध्ये भाग घेतला. हिवाळ्यात काष्टवत झालेल्या झाडांवर नवी पालवी पाहून काहीतरी नवं करण्याचा हुरूप येतो.
स्पेन, इटली, फ्रान्ससारख्या दक्षिण युरोपियन देशांत अनुभवायला मिळणारा उन्हाळा इंग्लंडमध्ये फारच क्वचित आढळतो. इंग्लंड हे एक बेट असल्याने उन्हाळ्यात पारा फार तर ३० डिग्री सेल्सिअसपर्यंत जातो. तेसुद्धा एखादा दिवस आणि दिवसाचा एखादा तास! वारा, पाऊस यांच्या अवचित आगमनाने सूर्याचा पारा चटकन् खाली येतो. त्यामुळे समरविषयी तक्रार करणारेच जास्त आढळतात. ‘३० डिग्री सेल्सियसची हीटवेव्ह’ अशी बातमी बीबीसीवर दिसू लागली की लोक उत्सुकतेपेक्षा साशंकच अधिक होतात.
उन्हाळ्याच्या दिवसांत अख्खे इंग्लंड जीवित होते, हे मात्र खरं! लंडन, बाथ, लीड्स, मँचेस्टर यांसारख्या ठिकाणी मॅरेथॉनचे आयोजन केले जाते. ऑफिसमधून लीन, जेसन हे लवकर घरी जाऊन गार्डनमध्ये काम करण्याचा हुरूप दाखवतात. वसंत ऋतूत फुललेल्या डॅफोडिल्स, गुलाब, लीलीला सूर्याची किरणे अधिक आयुष्य बहाल करतात.
२१ डिसेंबर ते २१ जून- उत्तर खंडातील सर्वात मोठा दिवस- यादरम्यान कडक हिवाळ्याकडून ग्रीष्माच्या चाहुलीमुळे लोकांचा हुरूप वाढलेला असतो. आऊट डोअर उपक्रमांना तेजी येते. टेनिस, पेटाँग, क्रिकेटच्या सीरिज सुरू होतात. खरं तर इंग्लंडमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांत परदेशांत जाण्यापेक्षा इथेच फिरणे आल्हाददायक असते. कॉर्नवॉन, डोरसेटसारख्या समुद्रकिनारी लोकांची वर्दळ वाढते. अर्थात तिथल्या मौजमजेसाठी महिनोन् महिने आधी बुकिंग करावे लागते.
इंग्लिश स्ट्रॉबेरी, ब्लुबेरी, चेरीच्या उपस्थितीने ग्रीष्माची लाली आणखीनच वाढते. बऱ्याचदा दुपारी लंच ब्रेकमध्ये आम्ही जवळच्या गार्डनमध्ये जाऊन फलाहार करतो. वीकेंडला एखादे आवडीचे पुस्तक घेऊन निळ्या आकाशाखाली उंच झाडांच्या छायेत सूर्याशी पाठशिवणी करत पहुडणे, हा अनेकांचा विरंगुळा असतो. इंग्लंडमध्ये पब्लिक गार्डनची वानवा नाही. बाथमध्ये परेड गार्डनलगतची एव्हॉन नदी लोकांच्या उत्साहात खळखळ आणते. तर लंडनला  हॅमस्टेड दिदला असणारे छोटे तलाव पोहण्याचा आनंद देतात.
यंदा मात्र समर सॉलिस्टीस आले तरीही उन्हाळी वातावरण निर्माण झालेले नाही. २१ जूनला येथील सर्वात मोठा दिवस. पण पाचच्या आधी सूर्योदय झाला आणि रात्री साडेनऊपर्यंत सूर्याची किरणे अधूनमधून दर्शन देत होती. ढगाळ हवामान आणि शीतल वाऱ्यांच्या सान्निध्यात आम्ही सहकाऱ्यांनी एमिलीच्या गार्डनमध्ये बार्बेक्यूचा आनंद लुटला. ग्रील्ड भाज्या आणि चिकनवर ताव मारल्यावर स्ट्रॉबेरी आणि क्रीमने उन्हाळ्याची चव ओठांवर आणली. मात्र, वातावरणात अजूनही गारवा आहे. हिवाळ्याचे कपडे जरी बासनात गुंडाळले असले तरी एखादा स्वेटर जवळ ठेवावाच लागतो.
इंग्लंडच्या या अशाश्वत उन्हाळ्यामुळे अनेकजण परदेशांत जाणेच पसंत करतात. त्यामुळे ऑगस्टला लंडनमध्ये ऑफिसेसही बरीच ओकीबोकी असतात. शाळांना सुट्टय़ा असल्याने पालकही समुद्रकिनारा असलेल्या गरम हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी उत्सुक असतात.
अंगावर सनस्क्रीन लावून गार्डनमध्ये सनबाथ घेणे किंवा खुल्या नाटय़गृहात आणि म्युझिक फेस्टिव्हलमध्ये सामील होण्यातही सूर्यकिरणांचा आनंद लुटणे हाच मुख्य हेतू असतो. उन्हाळ्याच्या सरत्या दिवसांत सप्टेंबरच्या शेवटी कधी कधी अचानक गरमीचा ताप वाढतो. ‘इंडियन समर’ म्हणून प्रसिद्ध असलेला हा उन्हाळय़ाचा भाग. मात्र, याचे नाते भारतीय उपखंडाशी किंवा उत्तर अमेरिकेतील खंडाशी आहे, यावर आजही मतभेद आहेत. असो! ग्रीष्माच्या या नरमगरम वातावरणाची सुगी करावी; जेणेकरून वर्षांचे बाकीचे थंड दिवस सहनशील होतात, याबाबतीत मात्र कोणाचेच दुमत नाही!
प्रशांत सावंत – wizprashant@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2015 1:01 am

Web Title: british summer
Next Stories
1 हात : तिचे आणि त्याचे!
2 स्पर्धा.. जिवंत पुतळ्यांची!
3 मैत्री.. फ्रेंडशिप.. नातं.. रिलेशनशिप वगैरे..
Just Now!
X