प्रशांत कुलकर्णी – prashantcartoonist@gmail.com

आधुनिक काळात- म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर जगभरातील अनेक साप्ताहिकं, पाक्षिकं, मासिकं, दैनिकांतून हास्यचित्रकलेला मोठय़ा प्रमाणावर प्राधान्य मिळायला सुरुवात झाली. अर्थात यापूर्वीही हास्यचित्रं प्रकाशित होत होतीच; पण संख्या आणि आशय या दोन्ही दृष्टीनं त्यांचं स्वरूप मर्यादित होतं. महायुद्धाच्या महाभीषण ताणानंतर लोकांना रिलीफ हवा होता. नव्या  समाजात घडणारे सूक्ष्म बदल हे नवे व्यंगचित्रकार टिपत होते आणि हास्यप्रधान चित्रं काढत होते. दृष्टी तीच होती; मात्र समाजातील बदल हा मुख्य विषय होता. कधी निव्वळ विनोदी, कधी बोचरा, कधी गंभीर, तर कधी  प्रसन्न असा दृष्टिकोन घेऊन विसंगतींचं, मानवी भावभावनांचं नेमकं चित्रण असणारी ही हास्यचित्रकला वाचकांमध्ये भलतीच लोकप्रिय झाली. त्यासाठी विषयांचं वैविध्यही प्रचंड होतं. साहजिकच दररोजच्या राजकारणावर आधारित राजकीय व्यंगचित्रकलेबरोबरच ही  हास्यचित्रकलाही जगभर फोफावली.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
freedom of artist marathi news
‘कलानंद’ हवा असेल तर ‘कलाकाराचं स्वातंत्र्य’ मान्य करता आलं पाहिजे…
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..

ही हास्यचित्रं लोकप्रिय करण्यात इंग्लंडमध्ये बरीच नियतकालिकं  आघाडीवर होती. हसरी, बोचरी हास्यचित्रं आणि सोबत खुसखुशीत लेख यामुळे ती वाचकप्रियही होती. मात्र, त्यांत प्रसिद्ध होणाऱ्या हास्यचित्रांचा दर्जा हा कायम वरच्या पातळीवर राहील याबद्दल संपादक जागरूक  होते. १८४१ पासून प्रकाशित होत असलेलं ‘पंच’ हे साप्ताहिक यात अग्रेसर होतं. (कारण विनोदामध्ये पंच महत्त्वाचा!!) ‘पंच’मधील  काही महत्त्वाच्या व्यंगचित्रकारांच्या चित्रांचा आस्वाद घेणं खूप आवश्यक आहे.

मायकेल हिथ हे ‘हिथ’ (Heath) या नावाने व्यंगचित्र काढायचे. बारीक नाजूक रेषांनी ते रेखाटन करतात. त्यांचं वैशिष्टय़ म्हणजे ते पेन्सिल न वापरता थेट पेनानंच चित्रं काढतात. त्यांची चित्रकला ओबडधोबड वाटली तरी समाजात होत असलेल्या सुप्त बदलांवर किंवा दैनंदिन घटनांवर ते मजेशीर किंवा बोचऱ्या शब्दांतून भाष्य करतात. अनेक पुस्तकांसाठी त्यांनी रेखाटनं केली आहेत. एकदा त्यांनी त्यांच्या संपादकांवर एक व्यंगचित्र काढलं. देवदूत स्वर्गामध्ये देवांना सांगतोय की, ‘संपादकांना लवकर स्वर्गात यायचं आहे. कारण त्यांना इथे खूप फिरायला वगैरे आवडेल!’ त्यावर देव म्हणतो, ‘ते शक्य नाही! त्यांना सांगा, असं अधेमधे तुम्हाला येता येणार नाही, रांगेतूनच  यावं लागेल!’ हे व्यंगचित्र अर्थातच संपादकांनी खेळीमेळीने घेतलं, हे महत्त्वाचं!

त्यांच्या एका चित्रात आधुनिक काळ अगदी स्पष्टपणे दिसतो. लहान मुलं भातुकलीचा खेळ खेळत आहेत आणि मुलगी वडिलांकडे तक्रार करते की, ‘आम्ही आता घटस्फोट  घेतलाय, पण हा पोटगी द्यायला तयार नाहीये!!’

स्वत:वर प्रचंड प्रेम असणाऱ्या लोकांवरचं त्यांचं एक चित्र खूपच भेदक आहे. त्यांच्या चित्रातली प्रचंड फॅशन करणारी एक नटखट मॉडेल म्हणते की, (माझ्याकडं सगळं काही नवीन फॅशनचं आहे, फक्त) ‘मी जुनी आहे याचं मला वाईट वाटतंय.’

टेरेंस पार्क्‍स यांना चित्रकलेची आवड होती. त्यातलं थोडंफार शिक्षणही झालं होतं. पण त्यांचा एकूण कल हा चित्रकलेतील नियम न पाळण्यावर  होता. एका शाळेत त्यांना चित्रकला शिक्षक म्हणून नोकरी मिळाली, पण त्यांचं शिकवणं वरिष्ठांना पटेना. मतभेद झाले. त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. पण दरम्यान त्या काळातील एक अभिनेता लॅरी याच्या नावावरून या शाळेतली मुलं टेरेंस पार्क्‍स यांना ‘लॅरी’ या टोपणनावाने हाक मारायची. याचा परिणाम असा झाला की, टेरेंस यांनी पुढे व्यंगचित्रं काढायला सुरुवात केली आणि त्याच्या खाली ‘लॅरी’ अशी सही करायला सुरुवात केली. त्यांनी बहुतेक चित्रं शब्दाविना- म्हणजे विनामथळा काढलेली आहेत. झटपट केलेलं रेखाटन आणि परिस्थिती किंवा प्रसंग कळावा म्हणून चित्रात असलेला एखादा शब्द या सामग्रीवर त्यांनी हजारो चित्रं काढली. अ‍ॅलन कोरिया हे ‘पंच’चे दीर्घकाळ राहिलेले संपादक. ते म्हणतात, ‘‘लॅरी हे एकमेव व्यंगचित्रकार आहेत- ज्यांच्यावर लेखकांचा रोष नसेल. कारण लेखकांना असं वाटतं की, शब्दांवर फक्त  त्यांचीच मालकी आहे! ’’अ‍ॅलन कोरिया हे लॅरी  यांना ‘सायलेंट कॉमेडियन’ असं म्हणायचे.

युद्धोत्तर काळात समाजामध्ये एक महत्त्वाचा बदल असा घडला की पुरुषही स्वयंपाकघरात येऊन काम करू लागले. हा बदल लॅरी यांनी  नेमकेपणाने टिपला आणि अ‍ॅप्रन घालून काम  करणारा नवरा जन्माला आला. या विषयावरची त्यांची असंख्य चित्रं जगभर गाजली. त्यानंतर वाचकांना त्यांच्या ‘वर्डलेस कार्टून्स’ची सवय झाली. जगविख्यात शिल्पकार राँदें याच्या अनेक शिल्पांना त्यांनी हास्यचित्राचा विषय बनवलं. त्यांच्या या अनोख्या चित्रशैलीमुळे त्यांना ‘चित्रं काढणारा कवी’ असंही सन्मानाने म्हटलं जाऊ लागलं. सोबतच्या त्यांच्या चित्रामुळे त्यांच्या चित्रशैलीचा परिचय होईल..

मार्टिन हनीसेट (HONEYSETT) या व्यंगचित्रकारानेही अनेक र्वष वाचकांना हसवलं. विविध दैनंदिन प्रसंगांतील विनोदी शक्यता शोधून काढून त्यांच्यावर चुरचुरीत भाष्य करायचं, ही त्यांची एक खासियत होतीच; पण त्याचबरोबर त्यांची काही चित्रं प्रचंड भेदक भाष्य करणारी होती. ज्यांना निखळ हास्यचित्रं म्हणता येतील अशा चित्रांच्या असंख्य मालिका त्यांनी ‘पंच’ आणि इतर साप्ताहिकांसाठी रेखाटल्या. त्यांचं सोबतचं चित्र फार महत्त्वाचं भाष्य करणारं आहे. एक अत्यंत गरीब आई आपल्या लहान मुलांना बाबागाडीतून फिरायला घेऊन जाताना टीव्हीच्या दुकानासमोर येऊन म्हणते, ‘‘तुम्ही खूप लकी आहात.. इथे पूर्वी पुस्तकांचं दुकान होतं!’’ यातला उपरोध विचार करायला लावणारा आहे.

याच कालावधीमध्ये केनिथ माहूद (KENITH  MAHOOD) हे आणखी एक क्रिएटिव्ह व्यंगचित्रकार होऊन गेले. हास्यचित्र मालिकेसाठी एक वेगळाच विषय घेऊन विनोदाच्या सगळ्या शक्यता पडताळून पाहत वेगळ्या प्रकारे भाष्य करणं हे त्यांचं वैशिष्टय़. त्यांनी एक विशेष विषय मालिकांसाठी हाताळला. तो म्हणजे जगभरातल्या गाजलेल्या चित्रकारांबद्दल किंवा त्यांच्या चित्रकृतींबद्दल किंवा व्यंगचित्रकारांच्या चित्रांचा आधार घेऊन भाष्य करणारी गमतीदार  हास्यचित्रं काढणं. उदाहरणार्थ, जगभर प्रत्येक गोष्टीचं कमर्शियलायझेशन वाढत चाललं आहे. याचा परिणाम काही कलाकृतींवरही होऊ शकतो अशी एक शक्यता माहुद यांनी रेखाटली. उदाहरणार्थ, एखादी गॉगल बनवणारी कंपनी जाहिरात करण्यासाठी मोनालिसाला गॉगल घालेल!  सोबतचं चित्र हे नेपोलियनचं प्रख्यात पेंटिंग आहे. आणि नेपोलियनच्या या पेंटिंगसाठी माहुद यांनी अर्थातच एका उत्तम सिगारेटच्या ब्रँडची निवड  केली आहे. तगडा घोडा, शौर्य, मर्दपणा वगैरेसाठी सिगारेट हे उत्तम उत्पादन आहे हे त्यांनी प्रभावीपणे दाखवलं आहे. विशेषत: नेपोलियनच्या हातात सिगारेट दाखवायला ते विसरले नाहीत. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी आपलं पहिलं व्यंगचित्र ‘पंच’ मासिकाला दिलं आणि पुढे काही वर्षांनी ते ‘पंच’चे कलासंपादक   झाले. त्याशिवाय अनेक दैनिकांसाठी त्यांनी राजकीय व्यंगचित्रं आणि पॉकेट कार्टून्स काढली असली तरीदेखील आजही माहुद यांची खरी ओळख ही त्यांच्या हास्यचित्र मालिकांसाठीच आहे, हे महत्त्वाचं.

डेविड मायर्स (DAVID MYERS) यांची चित्रं बघितल्यावर ती प्रसिद्ध कशी झाली याबद्दल आपल्याला आश्चर्य वाटू शकेल. कारण गर्दीत, धावणाऱ्या लोकलमध्ये, उभ्या उभ्या काढलेलं रफ चित्र अशी ही शैली! पण त्यातल्या विनोदामुळे ‘पंच’ने ती मान्य केली आणि मायर्स यांनी शेकडो चित्रं ‘पंच’साठी रेखाटली व रसिकांनीही त्यांना दाद दिली. सोबतच्या चित्रातील चिरंजीव हे शरीरावर  tatoo गोंदवायला बसले आहेत आणि जिथे गुदगुल्या होत नाहीत, तिथेच हे tatoo चं काम  होतंय.

तर असे हे ‘पंच’ व्यंगचित्रकार! अशा प्रकारचे काम करणारे निदान पन्नास जण त्या काळात इंग्लंडमध्ये होते. बहुतेक सगळे गेल्या शतकातील, दुसऱ्या अर्धशतकातील व युद्धोत्तर काळातील! त्यामुळे जग जसं बदलत गेलं तसं त्यांनी ते आपल्या तिरकस दृष्टीने रेखाटलं आणि सादर केलं. हळूहळू जगभरात हा कलाप्रकार पसरत गेला आणि रुजलाही. अगदी भारतात.. आणि मराठीतही!