सायंकाळी कचेरीतून घरी यावे आणि पाहावे की घरातील चित्रवाणी संच बंद आहे. मुले एका कोपऱ्यात चिडीचूप अभ्यास करीत आहेत. स्वैंपाकघरातून चहाच्या कपाची किणकिण, फोडणीची चरचर यांसारखे मध्यमवर्गीय ध्वनी येण्याऐवजी भांडय़ांचे दणदण आवाज येत आहेत. फॅन पाचवर असूनही वातावरण तापल्यासारखे वाटत आहे.
अशा वेळी चतुर सद्गृहस्थ काय करतो? गुपचूप बॅगेतला टिफिन काढून ठेवतो. गुपचूप कपडे बदलतो आणि चहाचे सोडा, पाण्याचीही अपेक्षा न करता खाटेवरी पेपर घेऊन बसतो. आता त्यास प्रतीक्षा असते ती निव्वळ वादळ किनाऱ्यावर कधी आदळते त्याची.
त्या दिवशी आम्हीही असेच बसलो होतो. यात लाजण्यासारखे काहीही नसते. सगळेच असे करतात.
तेवढय़ात आतून आवाज आला, ‘‘घरातलं करा, बाहेरचं करा, सगळ्यांचं करा.. पण आहे का आम्हांला काही किंमत?’’
आम्ही गप्पच. काय बोलणार? प्रस्तावना अजून अपूर्ण होती. प्रतिपाद्य विषय नेमका समजला नव्हता.
‘‘लोकांचं बघा.. बायकांना किती किंमत असते! ५० लाख काय, कोटी काय..’’
लाख? कोटी? ही काय बोलते आहे? आम्ही साधे नोकरदार. बँका डेबिट कार्ड देतानाही दहा वेळा विचार करतात! आणि ही कोटींची भाषा बोलते आहे. हिला काय वाटलं? आम्ही गडकरींच्या कंपनीचे संचालक आहोत की काय? आता काही काही लोक करतात असे जोडधंदे. म्हणजे बोवा, दिवसभर कुठं गाडी चालव, घरकाम कर, ज्योतिष सांग आणि फावल्या वेळात आपल्याच खोलीतून कंपनीचा कारभार बघ. जमते काही लोकांना हे! पण आपण नोकरदार. आपल्याला कुठून वेळ मिळणार? शिवाय सगळ्यांचेच मालक काही असे समाजवादी नसतात. गडकरींचे वेगळे आहे. त्यांच्याकडे चेहरा, चाल आणि चारित्र्य आहे. समाजातील खालच्या स्तरापर्यंत उद्यमशीलतेचा द्रुतगती मार्ग नेण्याचा सर्वोदयी ध्यास त्यांनी घेतलेला आहे. भांडवलदार आणि कामगार यांच्यात उड्डाणपूल बांधून सगळ्यांनाच समान पातळीवर आणण्याचा समाजवादी वसा त्यांनी घेतलेला आहे. आपल्याला आहे का तसे कोणी मदत करणारे.. प्रॉव्हिडंट फंडाशिवाय? आणि ही येथे कोटींच्या गोष्टी बोलते आहे.
‘‘येता-जाता त्या टीव्हीवरच्या बातम्या बघत असतात. काही शिका म्हणावं त्यातून..’’
विषय अजूनही ध्यानी येत नव्हता. आता आम्ही सतत वृत्तवाहिन्या पाहतो हे खरे. आहे तेवढी सहनशीलता आमच्यात! आणि बातम्याच पाहतो ना? बिग बॉस तर नाही ना पाहत? हां, आता बिग बॉस आणि बातम्या यात आशयाच्या अंगाने तसा काही फारसा फरक नाही! पण तसा फरक तर साऊथचे डब चित्रपट आणि बातम्या यातही नाही! असा एकदम टीव्ही लावला ना, तर कधी कधी जाम फसगतच होते. म्हणजे समजतच नाही की बुवा हा गोपाल कांडा बातम्यांतला आहे की बी ग्रेड चित्रपटांतला? परवाची गोष्ट. आमचे लाडके नटवर्य चिरंजिवी शपथ घेतानाचा सीन सुरू होता. मनोमनी म्हटले, व्वा! चिरंजिवी! आता पुढे मस्त फायटिंग असणार! नंतर समजले की तो खराखुरा बातम्यांतला सीन होता.
आणि या बातम्यांतून आम्ही काय शिकायचे? उलट बातम्या पाहून पाहून आमचे गणित कच्चे होत चालले आहे. तो टूजी घोटाळा, ते कोळसाकांड, ते सिंचन प्रकरण.. आकडय़ांचा तर डोक्यात नुसता गोंधळ झालेला आहे. परवा कंडक्टरने सुटे चार रुपये मागितले, तर आम्हांस सुटे चार हजार कोटी असे ऐकू आले, म्हणजे बघा! खरेच, भारताने नसता लावला शून्याचा शोध तर किती बरे झाले असते!
‘‘बायकोचं किती कौतुक असतं लोकांना. नाहीतर आमचं! सासू, वन्सं, भिशीतल्या बायका, सगळ्या काय काय टोमणे मारत असतात आम्हांला. पण एवढय़ा वर्षांत एकदा साधं मेलं ट्विटसुद्धा केलं नाही यांनी!..’’
अरेच्चा! आत्ता आमचा सीएफएल पेटला!
हे सगळे आमचे प्रिय प्रेमपुजारी शशीजी थरूर यांच्या त्या एका ट्विटमुळे चालले होते. ‘माझ्या पत्नीची किंमत तुमच्या त्या कपोलकल्पित ५० कोटी रुपयांहून कितीतरी अधिक आहे. ती माझ्यासाठी अनमोल आहे. पण हे समजण्यासाठी तुम्ही कुणावर तरी प्रेम केलं असलं पाहिजे,’ असं ट्विट त्यांनी नुकतेच केले. ते त्यांनी का केले? तर भारताचे िहदुहृदयसम्राट नंबर दोन व गुजरातचे सरदार नंबर दोन नरेंद्रभाई मोदी यांनी, मंडीतल्या सभेत थरूरांच्या पत्नीची किंमत ५० कोटी आहे अशी टिप्पणी केली. आता नरेंद्रभाई मोदी हे संघाच्या संस्कारांत वाढलेले सत्पुरुष! ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते’वाले! त्यामुळे ते मंडीत जे बोलले ते बाजारू कसे असणार? ते सुसंस्कृत सद्भावनेचेच असणारच! त्यात एवढे चिडायला काय झाले? पण थरूर चिडले. आणि हे असे नवराई माझी लाडाची छापाचे ट्विट करून बसले, आणि त्यांच्या त्या ट्विटची फळे आज आम्ही भोगतो आहोत.
या सर्व जबाबदार व्यक्तींना आमचे एकच हात जोडून सांगणे आहे की मायबापांनो, तुम्हांस जी काही कौटुंबिक जिव्हाळ्याची नाटके करावयाची असतील ती खुशाल करा. पण ती चुकूनही बातम्यांत येऊ देऊ नका.
काय आहे, आज आमची ही एका ट्विटचा हट्ट करून बसली आहे. तो काय, सायबर कॅफेमध्ये जाऊन करता येईल. पण उद्या आम्हांस जावई येणार आहे. कदाचित परिस्थिती सुधारलीच अन् पाण्यावर वाहनं चालू लागली तर दारात कारही येईल. मग चालक, नोकरचाकर येतील. त्यांनी जर हट्ट धरला की आमची कामना-पूर्ती करा. आम्हांला एखाद्या कंपनीच्या डायरेक्टर बोर्डावर घ्या. जावई म्हणू लागला की, बिनव्याजी कर्ज काढून द्या. भूखंड घेऊन द्या. सासू म्हणू लागली की, सोसायटीत फ्लॅट मिळवून द्या. मित्र म्हणू लागले की, दोन कामे तुमची करतो, दोन कामे आमचीही करा, तर आमच्यासारख्या पामरांनी जायचे कुठे?
तेव्हा आमच्या भाग्यविधात्यांनो, कृपया हे असले अवघड आदर्श आमच्यासमोर जाहीर ठेवू नका! आपापसात काय ती सीबीआय चौकशी लावून सगळे एकदाचे मिटवून टाका!