गुजरातमध्ये वेगवेगळ्या भागांत पक्षी-आश्रयवने आहेत असं ऐकलं होतं. अहमदाबादजवळचं नाल सरोवर, सौराष्ट्रातलं नारायण सरोवर ही पक्षी-आश्रयवने भुजपासून तशी दूरच. खूप मोठा गवताळ आणि खाजण जमिनीचा बन्नी हा विस्तृत टापू आणि तिथलं ‘छारी धांड’ हे पक्षी- आश्रयवन मात्र त्यातल्या त्यात भुजहून काहीसं जवळ होतं. ठरल्या दिवशी आम्ही भुजला पोहोचलो तेव्हा सगळं भुज रण महोत्सवासाठी सज्ज झालं होतं. पर्यटकांचं स्वागत करणाऱ्या पाटय़ा जिथे तिथे लागल्या होत्या. त्यात साक्षात् अमिताभ बच्चन ‘कच्छ नहीं देखा तो कुछ नहीं देखा’ म्हणत काठेवाडी वेशात हसऱ्या मुद्रेने जाहिरातींतून सांगत होता. आम्ही रणlr27 महोत्सवाला जायच्या आधी छारी धांड पक्षीअभयारण्याची चौकशी करत होतो. आमच्या हॉटेलमध्ये त्याबद्दल कुणाला फारशी माहिती नव्हती. दिवसभरात इतरत्र चौकशी करून हॉटेलवाल्यांनी ८० कि. मी. दूर असलेल्या छारी धांडला जाण्याची आमची व्यवस्था करून दिली. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून आम्ही छारी धांडकडे कूच केलं.
छारी धांड भुजजवळच्या नखतरना तालुक्यात येतं. हा सगळा भाग ‘बन्नी ग्रास लँड’ म्हणून कच्छच्या नकाशावर दिसतो. त्यात छारी धांड २२७ चौ. कि. मी. एवढं पसरलेलं आहे. काहीसा रुक्ष प्रदेश. तुरळक झाडोरा. अधेमधे एरंडाची शेती. छोटी गावं ओलांडत आम्ही नखतरनाला पोहोचलो. गाव ओलांडल्यावर ‘बन्नी ग्रास लँड’च्या तुरळक एक-दोन पाटय़ा दिसल्या, पण छारी धांडचा रस्ता काही सापडेना. इकडे तिकडे चौकशी करत करत आम्ही मग नेमक्या रस्त्याला लागलो. रस्त्याच्या दुतर्फा बाभळ वाढली होती. रस्ता खराब आणि काहीसा निर्जनही होता. अधूनमधून एखादा टेम्पो, छोटा ट्रक अशी वाहनं धूळ उडवत जात होती. हा रस्ता अखेर वळण घेत एका माळरानावर संपला. तिथं ‘छारी धांड इको टुरिझम सेंटर’असं इंग्रजी आणि गुजरातीत पाटी लिहिलेलं एक गेट दिसलं. आत बैठय़ा, स्वतंत्र छोटय़ा गेस्ट रूम्स बांधलेल्या दिसत होत्या. पण सगळीकडे सामसूम होती. हवा गार होती. पण सोबतीला कोवळं ऊनही होतं. ड्रायव्हर गाडी पार्क करून तिथेच थांबला.
आम्ही उतरून माळरानावर चालायला सुरुवात केली. दूरवर झुडपांच्या मागे मोठमोठे पक्षी दिसत होते. काळ्या, उंच मानेचे ते पक्षी ‘कॉमन क्रेन्स्’ होते. ‘सारस’ किंवा ‘क्रौंच’ नावानं ओळखले जाणारे हे पक्षी शेकडोंच्या संख्येत तिथे डेरेदाखल झालेले होते. जरा पुढे गेलं की त्यांचे थवे छोटीशी भरारी घेऊन अजून पुढे जात. काळ्या, उंच माना, खरबट पांढरा- तपकिरी रंग. हे पक्षी उडताना भलतेच देखणे दिसत होते.
माळरानावर एका बाजूला दूपर्यंत पक्षीच पक्षी दिसत होते. आणि त्यापुढे पाण्याची एक निळसर अस्पष्ट रेषा! खरंच, पाणी होतं की मृगजळ, तेही कळत नव्हतं. आम्ही मंत्रमुग्ध झाल्यासारखे माळ तुडवत चालत राहिलो. ते पक्षी पुढे पुढे जात राहिले. किती पुढे गेलो, ते कळलं नाही. सहज मागे वळून पाहिलं तर दूरवर दिसणारी इको टुरिझम सेंटरच्या परिसरातली उंच पाण्याची टाकी ही आमची ओळखीची खूण अदृश्य झाली होती. बहुधा आम्ही खूपच पुढे आलो होतो. ते शेकडो पक्षी वगळता त्या विस्तीर्ण माळावर दुसरं कुणीही नव्हतं. ती नीरव शांतता, देखणे पक्षी आणि दूरवर खुणावणारं पाणी याचा आम्हाला मोह पडला होता.
आता आम्ही मागे फिरायचं ठरवलं. बराच वेळ चालून इको टुरिझम सेंटरजवळ पोहोचलो तेव्हा आमचा ड्रायव्हर कुणाशीतरी बोलत होता. आम्ही पोहोचताच त्याने त्या गृहस्थाची ओळख करून दिली. तो छारी धांड वनविभागाचा गाईड होता. ‘मैं मेमण..’ अशी त्याने आपली ओळख दिली. आम्ही आता जे पाहिलं त्यापेक्षा अजून खूप पाहायचं शिल्लक आहे, हे त्याच्या बोलण्यावरून कळलं.
सूर्य एव्हाना डोक्यावर आला होता. पण मेमण उत्साहाने दूरवरचं तळं, पक्षी वगैरे दाखवायला उत्सुक होता. आता आमचा वाटाडय़ाबरोबर गाडीतून प्रवास सुरू झाला. बाभळी आणि कुठल्याशा झाडाझुडपांतून वाट काढत आम्ही निघालो. रस्त्यात पक्षीनिरीक्षणाचे वॉच टॉवर्स लागत होते. मघा दूरवर दिसणारी पाण्याची रेष आता जवळ येऊ लागली. अखेर त्या पाणथळ जागेजवळ आम्ही पोहोचलो. पाण्यात सारस पक्ष्यांबरोबर फ्लेमिंगोही विहरत होते. पण ते पक्षी आणि आम्ही यामध्ये उंटाचा एक मोठा तांडा पाण्यात आंघोळ करत होता. हे उंट वेगळेच होते. काहीसे रानटी. माणसाळलेल्या उंटांपेक्षा निराळे. या भागात रबारी, मालधारी असे भटके लोक राहतात. उंटपालन हाच त्यांचा व्यवसाय. त्यांच्यापैकी एक गुराखी मुलगा ते २५-३० उंट घेऊन पाण्यावर आला होता. उन्हात पाणी छान चमकत होतं. आम्हाला पाहून उडणारे ते पक्षी पाण्यात उंटांबरोबर अगदी आरामात उभे होते. मासे मटकावत होते. उंटांची ती लांबलचक रांग पाण्यातून पुढे सरकत होती. तो छोटा गुराखी काहीतरी गात होता. आमच्या नागर जीवनापेक्षा ही काहीतरी वेगळीच अनुभूती होती!
छारी म्हणजे सिंधीत ‘खारी’ आणि धांड म्हणज ‘तळं’! सीमेजवळच्या कच्छ भागात गुजराती भाषेत सिंधी शब्द सहज मिसळून गेले आहेत. बन्नी ग्रास लँडच्या या विस्तारित भागात एकेकाळी ‘गांडो बाभूळ’ म्हणजे वेडय़ा बाभळीची शासनानेच लागवड केली. पण त्यामुळे या पाणथळ जागेची जैवविविधता धोक्यात आली. हे लक्षात आल्यावर ही बाभूळ उपटण्याचा मोठा कार्यक्रम हाती घेण्यात आला. पण तिथली मूळची जैवविविधता हरवून गेली ती गेलीच. मेमणनीच ही माहिती आम्हाला पुरवली. त्यात गेली काही वर्षे इथलं पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे तळ्यात पूर्वीसारखं पाणी नसतं, हेही कळलं. पण असं असूनही स्थलांतरित पक्ष्यांचं सातत्य इथं टिकून राहिलं आहे, हे आश्चर्यच!
पुन्हा गाडीत बसून आम्ही तलावाच्या दुसऱ्या बाजूकडे निघालो. झाडाझुडपांतून मेमणनी दाखवलेल्या वाटेवरून धुरळा उडवत गाडी निघाली. एवढय़ा मोठय़ा टापूमध्ये माणसांचा वावर अजिबातच नव्हता. दूरवर परत एक पाण्याची रेषा दिसू लागली. पाण्यामागे दूरवर दिसणारा धिंडोधर डोंगर आता स्पष्ट दिसायला लागला. पाहता पाहता पाण्याचा तलाव दृष्टिक्षेपात आला.
गाडी थांबली. तलावात शेकडो पक्षी उतरलेले दिसत होते. सूर्य डोक्यावर होता तरीही थंडीमुळे ऊन जाणवत नव्हतं. ओलसर जमिनीत बूट रुतायला लागले. मेमणकडे मोठी दुर्बीण होती. दुर्बिणीतून फ्लेमिंगो अगदी पुढय़ात उभे असल्यासारखे स्पष्ट दिसत होते. तांबूस लाल पंख आणि मोतिया रंगाची शेकडो फ्लेमिंगोंची एक लांबलचक माळ निळ्या आकाशाच्या आणि पाण्याच्या पाश्र्वभूमीवर शोभिवंत झाली होती. मोठय़ा चोचींचे पेलिकन्सही पाण्यात उभे होते. फोटो काढण्याच्या नादात जरा पुढे जाताच पाय दलदलीत गेला. मेमणनी आम्हाला लगेचच रोखलं. ‘दलदलीत पाय गेला तर बाहेर येणं अवघड!’ असं त्यांनी बजावलं. दलदल ओलांडून कुणीही पुढे येणार नाही, या खात्रीने ते शेकडो पक्षी निवांतपणे पाण्यात विहरत होते. ही जलक्रीडा पाहण्याचं भाग्य दुर्लभच होतं.
फार पूर्वी पाहिलेल्या मृणाल सेन यांच्या ‘भुवनशोम’ चित्रपटातील दृश्यं डोळ्यांसमोर तरळून गेली. सारस पक्ष्यांच्या उडणाऱ्या रांगा, डोळ्याला गॉगल, गळ्यात दुर्बीण, हातात बंदूक आणि शिकारी वेशातले उत्पल दत्त अर्थात् भुवनशोम आणि जखमी पक्षी हातात धरलेली गौरी- म्हणजे तरुण सुहासिनी मुळे यांची कथा इथेच घडली की काय असं वाटत राहिलं.
फक्त पक्ष्यांचीच नाही, तर त्या निसर्गदृश्याची, नीरव शांततेची, मंद वाऱ्याची एक अद्भुत मोहिनी मनावर पडली होती. तिथून पायच निघेना. आम्ही उभे होतो तिथे फ्लेमिंगोंची मोतिया, लाल तांबूस पिसं पडली होती. ती उचलून परतीच्या वाटेने निघालो. छारी धांड पक्षी-आश्रयवनाने आमची कच्छची भेट सार्थकी लावली होती.