सरकारी सुलभ शौचालय (सुशौ) आनुदान योजना जाहीर झाल्या झाल्या घाणेगावच्या ग्रापंनं ग्रामसभा बलावली. ग्रामसभेले झाडून समदं गाव जमा झालं. अनुदान भेटतं हाये म्हनल्यावर समद्या गावालेच lok02आपापल्या घरात संडास बांधून घ्याचा व्हता. ग्रामसभा लयच उत्साहात पार पडली. सुशौ अनुदान योजनेचा जास्तीत जास्त लाभ घिऊन घाणेगाव हागणदारीमुक्त कऱ्याचा संकल्प समद्या गावानं एकमतानं सोडला. योजनेचा गावाले लाभ मिळवून द्याची जबाबदारी झेडपी झगडेच्या डाव्या हाताची करंगळी म्हणून नावारूपाले येल आण्णा विसराळे याहीकडे सोपवण्यात आली. हे जबाबदारी म्हणजे आपला भलामोठ्ठा सन्मानच हाये आस्या समजुतीनं आण्णा विसराळे नागटीच्या वावरात उन्हाळाभर ऊन खात पडल मातीचं ढेकुळ मिरगाच्या पह्यल्या पान्यानं जसं फुलगरून येतं तसे फुलारून आले. घाणेगावच्या हागणदारीमुक्तीचा इतिहास जव्हा लिव्हला जाईल तव्हा त्या इतिहासात आपलं नाव सोन्याच्या अक्षरात लिव्हलं जाईल, या इचारानं आण्णाले धन्य धन्य वाटलं. आण्णाचं ऊर अभिमानानं भरून आलं. हागणदारीमुक्तीचा संकल्प तडीस निवून गावाले ‘निर्मल ग्राम’ म्हणून महाराष्ट्रभर लौकिक मिळवून द्यासाठी विसराळे आण्णानं कंबर कसली.
सुशौ अनुदानाची जबाबदारी विसराळे आण्णाकडे हाये म्हनल्यावर विसराळे आण्णाचा भाव वधारला. जो-तो विसराळे आण्णाले रामराम, नमस्कार कऱ्याले लागला. विसराळे आण्णाची चाल बदलली. आण्णाच्या चालीत र्तुेवाल्या कोंबडय़ाच्या चालीचा डौल आला. परीटघटीचे कपडे कसे, म्हणून ज्या आण्णाले ठाऊक नही व्हतं ते आण्णा आता परीटघडीचे कपडे घाल्याले लागले. हप्त्यातून तीनदा दाढी अन् दोनदा बूटाले पालिस कऱ्याले लागले.
पुंजाबा पारखेकडे आण्णा बुटाले पालिस कऱ्याले आले तव्हा आशाळभूतपनानं पुंजाबा आण्णाले म्हनला, ‘‘आण्णा, मले गरीबालेबी भेटील का हे सुशौचं आनुदान? मह्यासारख्या गरीबालेबी वाटतं, की आपल्या घरच्या बायांहिनंबी भाईर उघडय़ावर परसाकडले जाऊ नही म्हणून. तुम्हीनं मनावर घेतलं आण्णा, तं आमच्यासारख्या गरीबाच्याबी वाटय़ाला यील संडासमधी परसाकडले जायचं सुख.’’
‘‘वा, वा! पुंजाबा, काहून नही येनार तुह्यासारख्या गरीबाच्या वाटय़ाला हे सुख? आरे येडय़ा, गरीबासाठीच तं हाये लयकरून हे सरकाराची योजना. तेच्यात तु आनखी पिवळय़ा कार्डावाला. तुल्हे तं एका फटक्यात मंजूर व्हयीन आनुदान. पाह्यजे ते समदे कागदपत्रं जोडून तू फक्त आर्ज दे मह्याकडे आनुदान मागनिचा; एका मह्यन्यातच मंजूर करून आनतो तुव्हं अनुदान तालुक्यावरून.’’
‘‘लय मेहेरबानी व्हयीन पहा आण्णा गरीबावर. दोन दिवसानं देतो आण्णा मी र्आज तुमच्याकडे समदे कागदपत्रं जमा करून..’’ आसं म्हनत पुंजाबानं पालिस करून बुट आण्णापुढे ठेवला. बुट पायात घातल्यावर खिशात हात घालून खिसा चाचपडत आण्णा म्हनले, ‘‘आऽ रेऽ पुंजाबा, सुट्टे पैसे नही वाटतं गडय़ा खिशात.’’
‘‘राहू द्या आण्णा, राहू द्या.. पैसे सुट्टे नसतील तं.’’
आण्णा आनुदान मिळवून देतो आहे म्हनल्यावर आशेच्यामारे पालिसच्या पैशाकडे कानाडोळा करत पुंजाबा म्हनला.
मंग पाह्यजे ते कागदपत्रं जमा कऱ्यासाठी पुंजाबानं दोन दिवस कामाले खाडा देल्हा. शे-सव्वाशे रुपये खर्च करून समदे कागदपत्रं जमवले. तिसऱ्या दिवशी समदे कागदपत्रं जोडून सुशौ आनुदान मागनीचा आर्ज आण्णाकडे नेऊन देल्हा.
एका म्हयन्यात आनुदान मंजूर करून आनतो म्हणून आण्णानं सांगिटलं तं खरं; पण आर्ज दिऊन दोन म्हयने उलटले तरी पुंजाबाच्या आनुदानाचा काही ठावठिकाना नही व्हता. मधल्या काळात सुट्टे पैसे नसल्याच्या नावाखाली आण्णाचं फुकट पालिस करून घेनं सुरूच व्हतं. कधीमधी पुंजाबानं आनुदानाचं इचारलंच तं, ‘परवा मिटींग हाये पुंजाबा तालुक्यावर. त्या मिटींगमधी घेतो मंजूर करून तुव्हा आनुदानाचा आजर्ं..’ हे पालुपद आण्णानं पाठच करून ठेवेल व्हतं.
एक दिवस पालिसची डबी आन्याची म्हणून पुंजाबा शेजारच्या दिवाकर झोपेच्या दुकानावर गेल्हता. झोपेच्या दुकानातल्या कपाटात आपल्या आनुदान मागनीच्या आर्जासारखाच आर्ज पाहून पुंजाबाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली- ‘साला.. आपला तं आर्ज नसील?’ तेन्हं झोपेले इचारलं, ‘‘का हो दादा, हे कपाटात कशाचे कागदं हायेती?’’
‘‘कोन्हाले मालूम भौ. कोन्हीतरी इसरून गेल्हं वाटतं दुकानात. लय दोन मह्यने झाले पडले हायेती ते कागदं दुकानात. मीन्हं म्हनलं, आलं कोन्ही मांघ्याले, तं दिऊन टाकू. म्हनून ठेवले एका बाजूले कपाटात.’’

‘‘मले दाखवता कां जरा?’’
‘‘पहाय नं भौ..’’ आसं म्हणून झोपेनं कागदं पुंजाबाकडे देल्हे. पुंजाबा पाह्यतो तं काय? त्येचाच सुशौ आनुदान मागनीचा आजर्ं. आपला आजर्ं आझून इठीच पडेल हाये हे पाहून पुंजाबाच्या आंगाचा संतापानं तिळपापड झाला. आण्णा विसराळेवरच्या रागानं तो मनातल्या मनात धुमस्याले लागला. पण आता करीलबी काय? समदा राग गिळून तो झोपेले म्हनला, ‘‘का हो दादा? हा तं मव्हाच आर्ज आहे. हे पहा मव्हं नाव..’’
‘‘तुव्हां हाये तं जाय नं भौ घिऊन. येऱ्ही मीबी लय कटाळलो व्हतो आता ते कागदं संभाळून संभाळून.’’ मनातल्या मनात विसराळे आण्णाच्या सात पिढय़ांचा उद्धार करत पुंजाबा पालिसच्या डबीसोबत आपला आर्जंबी घिऊन आला.
पुंजाबा र्आज तं् घिऊन आला, पण त्येनं आण्णाले काही सांगटलं नही. पुंजाबाच्ये र्आज आता पुंजाबाजवळच हाये हे आण्णाच्या गावीच नही व्हतं. आण्णाचं आपलं सुरूच व्हतं.. ‘परवाच्या मिटींगमधी घेतो पुंजाबा मंजूर करून तव्हां आर्ज.’ आण्णाचं असं बोलनं ऐकून पुंजाबा मनात म्हणे- ‘काय चेंढाळणी करता साले हे गावपुढारी गरीबाची! बेश्रमपणाबी करा तं किती करा म्हनतो मी मान्सानं. निवडनुका आल्या की सुईच्या भोकात मावता नही हे गावपुढारी. अन् काम कऱ्याचं म्हनलं की हे आसं! थांब म्हना बेटय़ा, आता चांगला तोंडघशीच पाडतो तुल्ये चारचौघांत. आसील तू गावपुढारी तुझ्या घरचा. मले काय तेचं!’
मंग आनखी मह्यन्या-पंधरा दिवसानं एक दिवस पुंजाबानं संधी साधली. आजूबाजूले भवतीनं चांगले धा-पंध्रा लोकं हायेती आसं पाहून पुंजाबानं सभागत इचारल्यावानी आण्णाले इचारलं, ‘‘का हो आण्णा, काय झाले आनुदानाचं?’’
आण्णाचं आपलं तेच.. ‘‘परवाच्या मिटींगमधली घेतो मंजूर करून पुंजाबा तुव्हां र्आज.’’
‘‘बरं आण्णा..’ आसं म्हनत पुंजाबानं बूट पालिस करून आण्णापुढे ठेवला. बूट पायात घालून हमेशासारखं खिसा चाचपडत आण्णा म्हनले, ‘‘आऽरेऽ पुंजाबा, सुट्टे पैसे नही वाटतं गडय़ा खिशात.’’
‘‘कितीची नोट हाये आण्णा? द्या ती. आज गच्ची सुट्टे हायेती मह्याजवळ..’’ पुंजाबा थुक तोडून बोल्ला.
पुंजाबाचं बोलनं ऐकून आण्णा चपापले. मंग खिशात सुट्टे पैसे आसूनबी मुद्दाम शंभरची नोट काढून आण्णानं पुंजाबाच्या हाती देल्ही. पुंजाबानं मागच्या समदा हिशेब करून पालिसचे त्र्याण्णऊ रुपये काढून उरेल सात रुपये आण्णाच्या हातावर ठेवले. एकदा सात रुपयाकडे, तं एकदा पुंजाबाकडे डोळे लाल- पिवळे करून पहात विसराळे आण्णा पुंजाबाला रागानं म्हनले, ‘‘पुंजाबा, सातच रुपये! शंभरची नोट देल्ही मीन्हं, दहाची नही.’’
तसा पुंजाबा थंडय़ा सुरात म्हनला, ‘‘मव्हं ध्यान हाये आण्णा, शंभरचीच नोट देल्ही तुम्हीनं. पन लय तीन मह्यन्यापसूनची बाकी हाये तुमच्याकडे. आज मागची समदी बाकी घेतली काढून मीन्हं. आनी उरले ते सात रुपये देल्हे तुम्हाले परत.’’
पुंजाबाचं बोलनं ऐकून आण्णाच्या रागाचा पारा आनखी वर चढला. मंग धमकावणीच्या सुरात आण्णा पुंजाबाला म्हनले, ‘‘म्हन्जे? तुल्हे सुशौचं आनुदान मंजूर करून घ्याचं नही वाटतं?’’
‘‘तुम्ही काय मंजूर करसाल हो आण्णा मव्हं आनुदान? हा पाही मव्हा आर्ज मह्याजवळ. तो कसा आला म्हून..’’ आपल्या आर्जाचे कागदं आण्णाच्या पुढे फडकवत पुंजाबा म्हनला. पुंजाबाचा र्आज पुंजाबाजवळ पाहून आण्णा ठगाचेच झाले. पाठ फिरावून मुकाटय़ानं चालते झाले. पाठमोऱ्या आण्णाकडे पहात आजूबाजूचे लोकं खीऽखीऽ करून हस्याले लागले. लोकांचं ते हासनं ऐकून र्तुेवाल्या कोंबडय़ाच्या डौलानं चालणाऱ्या आण्णाचे खांदे आपसुकच खाली पडले.
तव्हा घाणेगावच्या ‘निर्मल ग्राम’ संकल्पाचं पुढे काय झालं आसील, हे वाचकांहिले येगळं सांग्यालेच पाह्यजे का?