18 November 2019

News Flash

काँग्रेसफुटीच्या पन्नाशीपश्चात..

१९६९ साली पहिल्यांदा कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडली. त्या घटनेस आज ५० वर्षे झाली आहेत.

१९६९ साली पहिल्यांदा कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडली. त्या घटनेस आज ५० वर्षे झाली आहेत. इंदिरा गांधी आणि तत्कालीन ज्येष्ठ कॉंग्रेस नेते यांच्यातील बेबनावातून हा दुभंग झाला होता. नंतर अनेकदा कॉंग्रेस फुटली. आज तर कॉंग्रेस आपला देशव्यापी जनाधारही गमावून बसली आहे. कॉंग्रेसच्या फुटीची आणि पुढे हळूहळू होत गेलेल्या ऱ्हासाची मीमांसा करताहेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार!  पत्रकार प्रताप आसबे यांच्याशी केलेल्या मनमोकळ्या संवादात!

१९६९ साली पहिल्यांदा कॉंग्रेसमध्ये मोठी फूट पडली. त्या घटनेस आज ५० वर्षे लोटली आहेत. त्यानंतरही कॉंग्रेसमध्ये अनेकदा फूट पडत गेली. कधी तात्त्विक मतभेदांमुळे, तर कधी राज्या-राज्यातील बलशाली स्थानीय नेत्यांनी पक्षाच्या केन्द्रीय नेतृत्वाच्या दडपशाहीविरुद्ध बंडाचे निशाण फडकावल्यामुळे! या पक्षफुटीने कॉंग्रेसचा त्या- त्या वेळी काही अंशी शक्तिपात झाला असला तरी त्याचे देशव्यापी अस्तित्व कायम होते. आणीबाणीनंतर तसेच अयोध्याकांडानंतर दिल्लीत विरोधी पक्षांची सरकारे आली असली तरीही पुनश्च २००४ साली कॉंग्रेसचे सरकार दिल्लीत आले. ते दहा वर्षे टिकले. परंतु या कार्यकालातील भ्रष्टाचार आणि धोरणलकव्याच्या आरोपांवरून भाजपाने रान उठवल्याने २०१४ साली मोदी सरकार सिंहासनारूढ झाले. नुकत्याच झालेल्या २०१९ च्या निवडणुकांमध्ये लागोपाठ दुसऱ्यांदा कॉंग्रेसचा दारुण पराभव झाल्याने आज कॉंग्रेस पार गलितगात्र झाली आहे. पक्षाचा देशव्यापी जनाधार आकुंचन पावत अनेक राज्यांतून कॉंग्रेस नामशेष झाल्यागत स्थिती आहे. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचे यशस्वी नेतृत्व करणाऱ्या आणि सव्वाशे वर्षांहून अधिक वैभवशाली इतिहास असलेला हा पक्ष या अवस्थेप्रत का यावा, हा निश्चितच चिंतेचा विषय आहे. डाव्या, उजव्या, मध्यममार्गी अशा सगळ्या वृत्ती-प्रवृत्तींना स्थान असलेला, सहिष्णुतेची भारतीय परंपरा पुढे नेणारा आणि आजवर देशाच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या कॉंग्रेस पक्षाचे असे विझत जाणे संवेदनशील अन् विचारीजनांना क्लेशदायक वाटते आहे. मूळचे कॉंग्रेसी आणि या ऐतिहासिक फुटीचे साक्षीदार असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार कॉंग्रेसमधील या सगळ्या घटना-घडामोडींकडे कशा तऱ्हेने पाहतात, हे जाणून घेणारी ही बातचीत..

पक्षातील सततच्या फुटीमुळे काँग्रेसची ताकद दिवसेंदिवस घटत चाललेली आहे. याउलट, संघपरिवाराची ताकद मात्र १९२५ पासून  आजतागायत सातत्याने वाढताना दिसते आहे.  संघपरिवारात किंवा तेव्हाचा जनसंघ आणि सध्याचा भारतीय जनता पक्ष यांच्यात अशी फाटाफूट होताना मात्र दिसत नाही.

– त्यांच्यात फूट पडली नाही असे नाही. आधी जनसंघ होता. नंतर ते जनता पक्षात गेले. नंतर त्यांचा भाजप झाला. त्यांची एक साचेबंद विचारधारा आहे. लहानपणापासून त्यांच्यावर काहीएक विचारांचे संस्कार केले जातात. हिंदुत्व, राष्ट्रीयत्व, वगैरे. या विचारांचा पगडा त्यांच्या मनावर बिंबविण्याचे काम सातत्याने केले जाते. जातिवाचक मी बोलत नाही, परंतु समाजातील एका विशिष्ट जातीच्या घटकाचा यास मोठा पाठिंबा राहिलेला आहे. त्यांच्यात अशी एक अस्वस्थता आहे, की या जातीचे म्हणून आपल्याला सर्वसामान्य लोक स्वीकारत नाहीत. म्हणून मग आपल्याला हिंदुत्वाच्या आधारावर संघटन उभे केले पाहिजे अशी त्यांची मानसिकता आहे. माझ्याकडे गोळवलकर गुरुजींचे ‘बंच ऑफ थॉट्स’ हे मूळ पुस्तक आहे. त्यात या सगळ्या गोष्टी दिसून येतात. नंतरच्या आवृत्त्यांत जे सोयीचे नाही ते वगळले गेले आहे. असो.

बलराज मधोक किंवा चंद्रमौली मौर्य पक्षातून गेले तरी संघाच्या ताकदीत फारसा फरक पडला नाही. याचे कारण असे की- संघाने आपल्या विचारधारेची कास सोडली नाही. तसा काँग्रेस किंवा इतर राजकीय पक्षांनी आपल्या विचारधारेवर भर दिला नाही..

– तसे नाही. काँग्रेसमध्येही विचाराचे लोक आहेत. काँग्रेसमध्ये फूट पडली ती इंदिरा गांधी सत्तेवर आल्यानंतर. तशा तर फाटाफुटी अगदी मवाळ आणि जहाल यांच्यापासून सुरू झाल्या होत्या. मी कॉंग्रेसमध्ये ज्या फुटी पाहत आलो आहे त्या इंदिरा गांधी यांच्या कालखंडापासून. लालबहादूर शास्त्री यांच्यानंतर पक्षाचा नेता निवडण्यासाठी निवडणूक झाली. इंदिरा गांधी आणि मोरारजीभाई देसाई यांच्यात. आम्ही महाराष्ट्रातले बहुतेक फारसे इंदिरा गांधींजवळ नव्हतो. पण बहुमताचा पाठिंबा त्यांना मिळाला. त्यानंतर काँग्रेसमधला एक गट आणि इंदिरा गांधी यांच्यामध्ये थोडेसे अंतर यायला लागले. निजलिंगप्पा पक्षाचे अध्यक्ष होते. त्यात बिहारचे रामसुभगसिंह, प. बंगालचे अतुल्य घोष, शिवाय कामराज असे मोठे नेते इंदिराजींच्या विरोधात होते. पंतप्रधान झाल्यानंतर इंदिरा गांधी आणि त्यांच्या संबंधांत कटुता येऊ लागली आणि पुढे ती वाढतच गेली होती.

याच काळात बंगलोरला काँग्रेसचे अधिवेशन होते. मी नुकताच एआयसीसीचा सदस्य झालो होतो म्हणून मीही तिथे गेलो होते. यशवंतराव चव्हाणसाहेबांबरोबर गेलो असल्याने त्यांच्या शेजारच्याच खोलीत माझी व्यवस्था केली होती. ग्लास हाऊसमध्ये काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होणार होती. मी काही कार्यकारिणीचा सदस्य नव्हतो. महाराष्ट्रात राज्यमंत्री असलो तरी पक्षाच्या उतरंडीत अगदीच लहान होतो. पण चव्हाणसाहेबांच्या शेजारीच वास्तव्याला असल्याने कार्यकारिणीच्या बैठकीत काय चालले होते ते कळत होते. त्या बैठकीत राष्ट्रपतिपदाबाबतच्या उमेदवाराचे नाव नक्की करण्यात येणार होते. त्यामुळे मोठी उत्सुकता होती. साहेबांना विचारले, ‘काय होणार?’ ते म्हणाले, ‘बघायचे- काय आहे ते तिच्या मनामध्ये.’ आम्हा काही तरुणांचा पाठिंबा इंदिरा गांधींना होता. तेव्हा ‘आपण इंदिरा गांधींबरोबर राहणार ना?,’ असे मी म्हणताच उपरोधाने ते म्हणाले, ‘हो. आता तुझा सल्ला घेऊनच राजकारणात काय करायचे हे मी ठरवत जाईन.’ मी काय समजायचे ते समजलो.

कार्यकारिणीच्या बैठकीआधी बाबू जगजीवनराम चव्हाणसाहेबांना भेटायला आले होते. आपण इंदिरा गांधींना मदत करायची, अशी चर्चा त्यांच्यात झाली. त्या दोघांचे नेमके काय बोलणे झाले हे माहीत नाही; पण असे काहीतरी झाले असावे. त्यानंतर फकरुद्दीन अली अहमद चव्हाणसाहेबांना भेटायला आले. त्यांनी इंदिरा गांधींचा निरोप दिला. त्यावेळी राष्ट्रपतिपदासाठी नीलम संजीव रेड्डी यांचे नाव घेतले जात होते. फकरुद्दीन अली अहमद यांनी बाबू जगजीवनराम यांचे नाव सुचवले. तेव्हा चव्हाणसाहेबांची प्रतिक्रिया अशी होती म्हणे की.. ‘बाबूजी स्वातंत्र्य चळवळीतील ज्येष्ठ नेते आहेत. ते दलित समाजाचे आहेत. त्यांना राष्ट्रपती केल्यास महात्मा गांधीजींचे स्वप्न पुरे केल्यासारखे होईल. आणि याला काही हरकत नाही.’ त्यानंतर कार्यकारिणीच्या बैठकीत नीलम संजीव रेड्डी यांचे नाव पुढे आले आणि इंदिराजींच्या बाजूने बाबूजींचे नाव आले. या नावांवर एकमत होईना, तेव्हा मतदान झाले. त्यात जगजीवनराम यांना सहा मते, तर रेड्डी यांच्या बाजूनेही सहा मते पडली. तेव्हा चव्हाणसाहेबांनी हळूहळू इकडे तिकडे पाहत रेड्डी यांच्या बाजूने हात वर केला. त्यामुळे संजीव रेड्डी हे राष्ट्रपतिपदाचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार ठरले. कार्यकारिणीतील या घडामोडींमुळे इंदिराजी कमालीच्या संतापल्या होत्या. शब्द देऊनही चव्हाणांनी तो पाळला नाही म्हणून त्या त्यांना काढून टाकायला निघाल्या होत्या. पक्षाच्या निर्णयामुळे इंदिराजींनी रेड्डी यांचा उमेदवारी अर्ज भरला. पण रेड्डी यांच्याविरोधात त्यांनी व्ही. व्ही. गिरी यांना उभे केले. काँग्रेसमधले चंद्रशेखर, मोहन धारिया, कृष्णकांत हे सगळे तरुण तुर्क म्हणून ओळखले जाणारे नेते गिरी यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यांना इंदिरा गांधींचा छुपा पाठिंबा होता. राष्ट्रपतिपदाच्या या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव झाला. त्यातून पक्षात मोठा वाद झाला आणि त्यातूनच काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली. तेव्हा निजलिंगप्पा, अतुल्य घोष, संजीव रेड्डी, कामराज हे मूळ पक्षात राहिले. त्यांच्या पक्षाला ‘संघटना काँग्रेस’ म्हणून ओळखले जायचे. इंदिरा गांधी यांच्या पक्षाला ‘काँग्रेस (आर)’ म्हणत. आम्ही मूळ काँग्रेसमध्ये असलो तरी गिरी यांना निवडून देण्यात काँग्रेसचाच मोठा वाटा असल्याने तीच खरी काँग्रेस- अशी भूमिका चव्हाणसाहेबांनी मांडली. साहजिकच आम्ही इंदिराजींच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेसबरोबर गेलो. राष्ट्रपतिपदी गिरी यांची निवड झाल्यानंतर इंदिराजींच्या हातात जबरदस्त सत्ता आली. त्यानंतर झालेल्या निवडणुकांतही काँग्रेसला मोठे यश मिळाले. याच काळात संजय गांधी यांचा उदय झाला. यशवंतराव अत्यंत अस्वस्थ होते. त्यांची ही अस्वस्थता त्यांनी परराष्ट्रमंत्री असताना वेणुताईंना लिहिलेल्या पत्रातून स्पष्ट होते. तरीही काँग्रेस सोडायची नाही अशीच त्यांची भूमिका होती. याच दरम्यान देशात आणीबाणी लागू करण्यात आली. आम्ही सगळे काँग्रेसमध्ये होतो. इंदिराजींबरोबर असलेले चंद्रशेखर, मोहन धारिया हे तरुण तुर्क पुढे इंदिराजींच्या विरोधात गेले. विठ्ठलराव गाडगीळ यांनी तर दिल्लीत बाईंच्या विरोधात ‘थस्र्डे क्लब’च काढला होता. चंद्रशेखर नंतर जनता पक्षाचे अध्यक्ष झाले. आणीबाणीनंतर १९७७ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांत काँग्रेसचा पराभव झाला. या पराभवानंतर इंदिरा काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा फूट पडली. ब्रह्मानंद रेड्डी, यशवंतराव चव्हाण हे वेगळे झाले. त्यांच्या पक्षाला ‘काँग्रेस आर’ म्हणजे ‘रेड्डी काँग्रेस’ म्हणत.

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकांत हे दोन काँग्रेस पक्ष वेगवेगळे लढले. जनता पक्षाचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले. रेड्डी-चव्हाण यांच्या काँग्रेसला ७०, तर इंदिरा काँग्रेसला ६० जागा मिळाल्या. एकंदर ही त्रिशंकू विधानसभा होती. अशा परिस्थितीत राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी दोन्ही काँग्रेसने एकत्र यायचा निर्णय घेतला. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री, तर नाशिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री झाले. दोन काँग्रेसने एकत्र येऊन राज्यात सत्ता स्थापन करायला तिरपुडे यांचा टोकाचा विरोध होता. पुन्हा विधानसभा निवडणुका झाल्या तर इंदिरा काँग्रेसला राज्यात स्पष्ट बहुमत मिळेल असे त्यांचे म्हणणे होते. पण केंद्रात जनता पक्षाचे सरकार आले होते. त्यामुळे ही विधानसभा बरखास्त करून पुन्हा निवडणुका घेतल्या जातीलच याची काही खात्री नव्हती. त्यामुळे दोन्ही काँग्रेसने एकत्र येऊन सरकार स्थापन करावे, अशी दोन्ही पक्षश्रेष्ठींची भूमिका होती. त्यानुसार महाराष्ट्रात दोन काँग्रेसच्या आघाडीचे सरकार स्थापन झाले. पण सरकार स्थापन झाल्यापासून तिरपुडे यांनी वसंतदादांना प्रत्येक बैठकीत त्रास द्यायला सुरुवात केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी तिरपुडे, आदिक हे काँग्रेस आयच्या मंत्र्यांची बैठक बोलवायला लागले. आजच्या बैठकीत कुठे विरोध करायचा, हे ठरवू लागले. त्यामुळे मंत्रिमंडळात एकवाक्यता उरली नाही. अवघ्या पाच-सहा महिन्यांतच उभय काँग्रेसमध्ये कमालीची कटुता निर्माण झाली. तिरपुडे, बॅ. अंतुले, रामराव आदिक ही मंडळी दिवसेंदिवस आक्रमक व्हायला लागली तेव्हा वसंतदादाही कंटाळले. तिरपुडे यांच्या वागण्याने चव्हाणही नाराज होते. एकदा असेच काहीतरी झाले होते. दादा चिडले होते. कमालीचे अस्वस्थ होते. तेव्हा आम्ही दादांच्या घरी गेलो. किसन वीर, आबासाहेब कुलकर्णी असे आम्ही सगळे लोक होतो. दादा इतके चिडले होते की, ‘सरकार घालवायचेच असे ते म्हणायला लागले. कशाला असले सरकार चालवायचे? जाऊ दे ते..’’ असे त्यांचे म्हणणे होते. मग किसन वीर, आबासाहेब कुलकर्णी असे आम्ही सगळे दिल्लीला गेलो. गोविंदराव तळवलकरही तेव्हा सोबत होते. ते मुंबईतल्या बैठकीलाही होते. दिल्लीला अण्णासाहेब शिंदे, किसन वीर, आबासाहेब कुलकर्णी असे आम्ही चव्हाणसाहेबांकडे गेलो. चव्हाणसाहेबांनाही तिरपुडे, आदिक यांचे वागणे अजिबात मंजूर नव्हते. तेव्हा बैठकीतील सगळ्यांनी सांगितले की- हे सरकार घालविले पाहिजे. याला यशवंतरावांचे थोडेसे अनुकूल मत होते. त्या बैठकीत यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यावा किंवा मी तो घ्यावा असे सूचित केले गेले. आम्ही मुंबईला परत आलो. रविवारी महाराष्ट्र टाइम्समध्ये ‘हे सरकार जावे, ही श्रींची इच्छा’ हा तळवलकरांचा लेख छापून आला. त्या काळात गोविंदरावांनी काही लिहिले की काँग्रेसमध्ये ‘ही चव्हाणसाहेबांची ‘लाइन’ असावी’ असेच समजले जायचे. तळवलकरांनी चव्हाणसाहेबांच्या संकेतानुसारच लिहिले असावे असे समजून आम्हीही कामाला लागलो. माझ्या घरी एक बैठक झाली. तिच्यात ‘हे सरकार घालवायचे’ असा निर्णय झाला. बैठकीला आबासाहेब कुलकर्णी, गोविंदराव आदिक, प्रतापराव भोसले तसेच तीस-पस्तीस आमदार होते. हे सरकार घालविण्यासाठी आम्ही सरकारचा राजीनामा द्यायचा. सरकार गेल्यानंतर दुसरे सरकार बनवायचे आणि त्याचे नेतृत्व मी करावे असे ठरले. चंद्रशेखर यांच्याशी माझे मैत्रीचे संबंध होते. आबासाहेब कुलकर्णी चंद्रशेखर यांच्याशी बोलले. तेव्हा ‘‘शरद बनता है तो हमारे सब लोग उसे सपोर्ट करेंगे. चिंता मत करो, यह मेरा शब्द है..’’ असे आश्वासन चंद्रशेखर यांनी दिले. हे इंदिराजींना कळले. त्यांनी लगेच यशवंतरावांशी संपर्क साधून ‘‘महाराष्ट्रातील सरकार जातंय. जनता पक्षाच्या मदतीने सरकार बनवले जात आहे. आणि त्यात तुमचा शरदच लक्ष घालतोय,’’ असे त्यांना सांगितले. त्यानंतर चव्हाणांनी आम्हाला दिल्लीला बोलावून घेतले. तिथे ‘‘सरकार घालवू नका. आपण काय तो विचार करू,’’ असे सांगण्यात आले. तेव्हा आम्ही निघालो. बाहेरच आबासाहेबांनी माझी गाडी थांबवली आणि म्हणाले, ‘‘पोराओ.. आता माघार घ्यायची नाही. हे सरकार घालवायचेच.’’ गोविंदरावांचेही तेच मत होते. मुंबईला आल्यावर माझ्याकडे रामटेकला बैठक झाली. राजीनाम्याचे पत्र तयार केले गेले. त्यावर आम्ही सहय़ा केल्या. हे दिल्लीला कळले. तेव्हा यशवंतरावांनी माझ्या घरी फोन करून- ‘‘हे काय चाललेय?’’ असा सवाल मला केला. ‘‘हे करता कामा नये. आणि हे करायचे नाही,’’ असे त्यांनी बजावले. मी म्हणालो, ‘‘तुम्ही सांगत असाल तर माझी हरकत नाही. पण मला हे पटत नाही. तरीही तुमचा शब्द मी मोडणार नाही.’’ तेवढय़ात किसन वीर यांनी माझ्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि ‘‘यशवंतराव, काय सांगताय हे? या पोरांचे आयुष्य खराब करताय? आता दोर कापले आहेत. आता माघार घेतली तर या पोरांचे आयुष्य संपेल. तुम्ही आता यात बोलायचे नाही,’’ असे निक्षून बजावत त्यांनी फोन ठेवून दिला. किसन वीरांचे चव्हाणांशी अत्यंत घनिष्ठ संबंध होते. चव्हाणसाहेबांना त्या काळात अख्खा महाराष्ट्र ‘साहेब’ म्हणायचा. पण एकटे किसन वीर त्यांना ‘यशवंतराव’ म्हणायचे. बैठकीनंतर दुसऱ्या दिवशी गोविंदरावांचा अग्रलेख.. ‘वेडात दौडले वीर मराठे सात’! आम्ही राजीनामा दिला. काँग्रेस पक्षातून बाहेर पडून ‘समाजवादी काँग्रेस’ नावाचा पक्ष स्थापन केला. दादासाहेब रुपवते यांना अध्यक्ष बनवले. चंद्रशेखर तेव्हा जनता पक्षाचे अध्यक्ष होते. उत्तमराव पाटील हे महाराष्ट्रात जनता पक्षाचे अध्यक्ष होते. समाजवादी काँग्रेसने माझी नेतेपदी निवड केली, तेव्हा उत्तमराव पाटील यांनी आम्हाला जनता पक्षाचा पाठिंबा असल्याचे पत्र दिले. साहजिकच राज्यपाल सादिक अली यांनी आम्हाला शपथ दिली.

जनता सरकार कोसळल्यानंतर- म्हणजे अवघ्या दोन वर्षांतच लोकसभेच्या निवडणुकांना सामोरे जावे लागले. समाजवादी काँग्रेसचा एकही खासदार निवडून आला नाही. साताऱ्यात उमेदवार उभा न करता आम्ही यशवंतरावांना पाठिंबा दिला होता. तेवढेच काय ते निवडून आले. देशात इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्या होत्या.

महाराष्ट्र विधिमंडळाचे नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू होते. तेव्हा गृहमंत्री ग्यानी झैलसिंग यांचा फोन आला. मराठवाडय़ात नामांतराच्या प्रश्नावरून बऱ्याच गडबडी झाल्या होत्या. त्यांना त्याची माहिती हवी होती. अधिवेशन संपल्यावर मी लगेच दिल्लीला गेलो. तेथे झैलसिंग यांना मराठवाडय़ातील दंगलींची माहिती देऊ लागलो. थोडय़ा वेळाने ते म्हणाले, ‘‘हे सगळं ठीक आहे. ते जाऊ द्या. आता आपल्याला मॅडमना भेटायला जायचे आहे.’’ मी चाटच पडलो. म्हटले, ‘‘त्यांची अपॉइन्टमेंट घेतलेली नाही. फुलांचा गुच्छही घेतलेला नाही. असे कसे जायचे?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘त्याची काही गरज नाही. मी बघतो. माझ्याबरोबर चला.’’ तेव्हा इंदिराजी ३४ विलिंग्डन क्रिसेंट येथे राहत होत्या. त्यांनी मला इंदिराजींकडे नेले आणि लगेच ते निघून गेले. मला आश्चर्यच वाटले. इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्यावर इंदिराजी म्हणाल्या, ‘‘तू सरकार चांगले चालवतो आहेस. इतक्या अवघड स्थितीत पंधरा पक्षांच्या आघाडीचे सरकार चालविणे ही सोपी गोष्ट नाही. त्याबद्दल अभिनंदन.’’ मला बरे वाटले. पुढे त्या म्हणाल्या, ‘‘पण तुझ्यात एक दोष आहे. तू म्हाताऱ्या लोकांना सोडत नाहीस.’’ त्यांना काय म्हणायचे आहे, ते मला कळले. त्यावेळी संजय गांधी हेसुद्धा लोकसभेवर निवडून आले होते. काँग्रेसमध्ये पंतप्रधानांनंतर त्यांचे स्थान निर्माण झाले होते. पुढे त्या म्हणाल्या की, ‘‘आता नवे लोक निवडून आले आहेत.’’ मी मध्येच म्हणालो, ‘‘होय. संजयजींसारखे लोक निवडून आले आहेत.’’ तेव्हा त्या म्हणाल्या- ‘‘आप सब लोगों ने इकठ्ठा आना चाहिए. हमलोग कब तक चलाऐंगे? नयी जनरेशन तैय्यार करनी चाहिए. अब नई जनरेशन सामने आ गयी है. आप सब लोगों ने उसे सहयोग देना चाहिए.’’ मी म्हटले, ‘‘आमचा निवडणुकीत पराभव झाला आहे. तुम्हाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. आमच्या पाठिंब्याने काय होणार? तुमचे तर राज्यच आले आहे.’’ त्यावर त्या म्हणाल्या, ‘‘हार-जीत होती है. पराभव झाला म्हणून नाउमेद व्हायचे नसते. तुम्ही लोक आल्याशिवाय नवे नेतृत्व तयार होणार नाही. तुमच्यासारख्यांनी त्या नेतृत्वाला साथ दिली पाहिजे, तरच उद्या देशाला पुढे नेणारे नेतृत्व तयार होईल.’’ मी म्हटले, ‘‘आमचा एकमेव खासदार निवडून आला आहे. तेही यशवंतराव! आमची काय ताकद आहे?’’ त्यावर- ‘‘असे समजू नकोस. माझाही पराभव झाला होता. पण मी पुन्हा आले. आणि तुम्हीही लोक येऊ शकता,’’ असे त्या म्हणाल्या. त्यावर मी म्हणालो, ‘‘आम्ही जर येऊ शकत असू तर मी विचार करेन- की मीच का येऊ नये?’’ इथेच आमची बैठक संपली.

म्हणजे त्या अप्रत्यक्षपणे तुम्हाला सूचित करत होत्या..

– हो. त्या चिरंजीवांचे नाव न घेताच ‘नवे नेतृत्व.. नवे नेतृत्व’ असा उल्लेख करत होत्या. मी म्हटले, ‘मी पण तरुण आहे. व्हॉट अबाऊट मी?’ त्यावर ‘हो, बरोबर आहे..’’ असे त्या म्हणाल्या आणि आमची बैठक संपली. शुक्रवारी संध्याकाळी मी मुंबईला परतलो. त्या काळात शनिवार-रविवारी आम्ही बाहेर जायचो. शनिवारी आरे कॉलनीतील न्यूझीलंड हॉस्टेलला जायचे ठरले होते. आमचा एक ग्रुप होता. माधवराव आपटे, बृहन्महाराष्ट्रचे डहाणूकर, नस्ली वाडिया असे.. दिवसभर गप्पाटप्पा करून रात्री आम्ही परतलो. तेव्हा

रात्री उशिरा १२ च्या सुमारास मुख्य सचिव लुल्ला रामटेकवर आले. म्हणाले, ‘‘वाईट बातमी आहे.  आपले सरकार बरखास्त करण्यात आले आहे.’’ तेव्हा रातोरात रामटेकमधले आमचे सामान बाहेर काढून पहाटे चार वाजता रामटेकच्या किल्ल्या प्रशासनाच्या हवाली केल्या. पहाटेच आम्ही माहेश्वरी भवन येथील माझ्या फ्लॅटमध्ये आलो. दुसऱ्या दिवशी भारत-न्यूझीलंड यांच्यात मॅच होती. माझी एक जुनी फियाट होती. ती काढून बायकोसह मॅच पाहायला गेलो. तेव्हा सरकार बरखास्त झाल्यावरही मुख्यमंत्री सामना पाहायला येतात, हा प्रेक्षकांना मोठाच धक्का होता. त्यामुळे अख्ख्या स्टेडियमने उभे राहून माझा सन्मान केला.

पुढे इंदिराजींची हत्या झाली. या हत्येनंतर राजीव गांधींच्या हाती देशाची सूत्रे आली. मग राजकारण वेगळे झाले. आम्ही एकत्र आलो. त्यासाठी औरंगाबादला मेळावा झाला होता. पुढे राजीव यांच्या मंत्रिमंडळातील अर्थमंत्री व्ही. पी. सिंग यांनी बंड केले. मी त्यावेळी गोव्याला होतो. पहाटे चार वाजता राजीव गांधी यांचा फोन आला. त्यांनी तातडीने मला दिल्लीला बोलावले. गोव्याहून मुंबईमार्गे मी दिल्लीला गेलो. व्ही. पी. सिंग यांच्या राजीनाम्यामुळे त्यांना शंकरराव चव्हाण यांच्याकडे अर्थखाते सोपवायचे होते. चव्हाण त्यावेळी मुख्यमंत्री होते. त्यामुळे राजीव यांनी माझा विचार केला असावा. राजीव गांधी अभूतपूर्व अशा ४००जागा जिंकून देशात सत्तेवर आले होते. पण इतक्या अभूतपूर्व विजयानंतरही पुढच्या निवडणुकीत आमचा पराभव झाला. पराभवानंतर आम्ही खंबीरपणे राजीव यांच्या पाठीशी उभे राहिलो. राजीवही मोठय़ा प्रमाणात देशभर फिरायला लागले. केंद्रात अस्थिरता होती. व्ही. पी. सिंग यांचे सरकार कोसळल्यानंतर चंद्रशेखर काँग्रेसच्या पाठिंब्यावर पंतप्रधान झाले होते. याच दरम्यान बारामतीला सुप्रियाचे लग्न झाले. त्या लग्नाला अनेक राष्ट्रीय नेत्यांसह काँग्रेस अध्यक्ष राजीव गांधी आणि पंतप्रधान चंद्रशेखरही आले होते. लग्नसमारंभ आटोपल्यानंतर चंद्रशेखर यांनी राजीव यांना विचारले, ‘‘कैसे जाएंगे?’’ राजीव म्हणाले, ‘‘जाएंगे. दिल्ली जाना है.’’ तेव्हा चंद्रशेखर म्हणाले, ‘‘चला माझ्याबरोबर.’’ राजीव यांनी होकार दिला. पण नंतर ते मला म्हणाले, ‘‘मला त्यांच्याबरोबर जायचे नाही. तसे तुम्ही त्यांना सांगा.’’ माझी अवघडल्यासारखी स्थिती झाली. चंद्रशेखर यांना मी सांगितले की त्यांना इथेच काही लोकांना भेटायचे आहे, त्यामुळे तुम्ही पुढे निघा. ते पुण्याला येतील. चंद्रशेखर पुण्याला गेले तरी हे जाईनात. तेव्हा मी चंद्रशेखर यांना सांगितले, ‘‘तुम्ही जा. ते तुमच्याबरोबर येणार नाहीत.’’ चंद्रशेखर गेल्यावर राजीवही छोटे विमान घेऊन दिल्लीला गेले.

त्यानंतर काही दिवसांनीच दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू होते. कामकाज सुरू असताना काँग्रेसच्या खासदारांनी त्यांच्या पाठिंब्यावर असलेल्या पंतप्रधान चंद्रशेखर यांच्यावर हल्ला चढवून लोकसभा सभागृहात दंगा सुरू केला. मी त्यावेळी काही कामानिमित्त दिल्लीतच होतो. ‘‘आमच्या अध्यक्षांच्या निवासस्थानावर हरयाणाचे पोलीस ठेवून त्यांच्यावर पाळत ठेवली जात आहे..’’ असा काँग्रेसचा आरोप होता. चंद्रशेखर सणकूच होते. त्यांनी भाषण केले आणि ‘‘नको मला हे राज्य. मी चाललो राजीनामा द्यायला..’’ असं म्हणत ते तडकाफडकी निघाले. त्यामुळे मोठाच पेचप्रसंग निर्माण झाला. राजीव यांनी मला घाईघाईने बोलावून घेतले. म्हणाले, ‘‘त्यांना थांबव. नाही तर ते राजीनामा देतील.’’ मी तातडीने चंद्रशेखर यांच्याकडे गेलो. विचारले, ‘‘कहाँ जा रहे हो?’’ ते म्हणाले, ‘‘राष्ट्रपती भवन.’’ मी विचारले, ‘‘काहे की लिए?’’ ते म्हणाले, ‘‘इस्तिफा दे ने.’’ मी त्यांना म्हणालो, ‘‘मेरी राजीव गांधी के साथ बात हो गई है, आप..’’ त्यावर ते चिडून म्हणाले, ‘‘वो चिरकूट क्या समझता है? मुझे कोई इज्जत नहीं? पद के लिए सेल्फ रिस्पेक्ट से चंद्रशेखर कॉम्प्रमाइज करेगा? उसको बोलो, ये चंद्रशेखर है. एक बार चंद्रशेखर डिसिजन लेता है, वह वापिस नहीं लेता. जाओ, जा के उनको बताओ.’’

चंद्रशेखर यांच्या राजीनाम्याने सरकार गेले. त्यामुळे पुन्हा निवडणुकांना सामोरे जाण्याची वेळ आली. निवडणुकांचा प्रचार चालू असतानाच श्रीपेरुंबुदूर इथे राजीव गांधी यांची हत्या झाली.

पुढे मायावती यांच्या एका मताने वाजपेयी यांचेही सरकार पडले..

– हो. सरकार पडल्यानंतर सोनिया गांधी यांना पंतप्रधान करण्याचा विषय आला. त्या सर्वानी मिळून तसे पत्र राष्ट्रपतींना दिले. सोनिया यांनीही टीव्हीवर सांगितले की, मला २७३ सदस्यांचा पाठिंबा आहे. तेव्हा मी काँग्रेस पक्षाचा लोकसभेतील नेता होतो आणि डॉ. मनमोहन सिंग राज्यसभेतील काँग्रेसचे नेते होते. हा निर्णय घेताना आम्हाला विचारलेही नव्हते. आम्ही अस्वस्थ होतो. राष्ट्रपतींकडे दावा करायला हरकत नाही, पण पक्षात सर्वाना विश्वासात घेऊन तसा रीतसर ठराव करायला पाहिजे होता. पण तशी काहीही चर्चा न करता आणि उभय सभागृहातील नेत्यांनाही अंधारात ठेवून हा प्रकार झाला होता.

पुढे १९९९ ला काँग्रेस पक्ष पुन्हा फुटला.

– खरे म्हणजे त्या वेळेला पक्ष फुटायचे काही कारण नव्हते. लोकसभेच्या निवडणुकांना सामोरे जायचे होते. वर्किंग कमिटीची बैठक होती. सोनिया अध्यक्ष होत्या. तेव्हा कुणाच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढायच्या, असा विषय चर्चेला आला. अर्जुनसिंग यांनी सांगितले, तुमच्याच (सोनिया ) नेतृत्वाखाली निवडणुकांना सामोरे जायचे. अंबिका सोनींनीदेखील तेच सांगितले. असे एकेक जण वर्किंग कमिटीत आपली मते मांडत होते. नंतर संगमा यांची पाळी आली. संगमा हे तसे सोनिया यांच्या बाजूचे. ते म्हणाले की, ‘‘तुम्ही पंतप्रधान झालात तर मला आनंदच आहे. पण जन्माने परदेशी असलेल्यांना लोक ‘डायजेस्ट’ करणार नाहीत. यात पक्षाचे नुकसान होईल.’’ त्यांच्यानंतर तारिक अन्वर यांनी संगमांच्या मताला दुजोरा दिला. आता माझी पाळी होती. मी म्हणालो, ‘सगळ्या पक्षाचे मत असेल तर तुम्हाला नेते करायला आमचा विरोध नाही. पण ही गोष्ट खरी आहे, की लोकांना हे मान्य नाही. मी एका कार्यक्रमाला गेलो असताना एका तरुणाने मला विचारले की, तुमच्या पक्षाच्या नेतेपदी तुम्ही सोनिया गांधी यांना नेमले. या देशात इतके कोटी लोक आहेत, पण जन्माने भारतीय असलेला एकही नेता तुम्हाला मिळाला नाही का? याचा अर्थ असा की, हा विषय निवडणुकीत होऊ शकतो. ठीक आहे. आपण त्याला तोंड देऊ. पण हा विषय होऊ शकतो हे नजरेआड करता येणार नाही,’ असे मी स्पष्ट केले. त्यानंतर बैठक संपली. मी चारच्या विमानाने पुण्याला आलो. रात्री निरोप आला की सोनिया गांधी यांनी राजीनामा दिला. त्यानंतर दिल्लीत रडारडी सुरू झाल्या.

अर्जुनसिंग वगैरे..

– हो. ते सगळे सुरू झाले. पण पुण्याला जाण्याआधी संगमा, मी आणि तारिक अन्वर यांनी एक पत्र तयार केले. काँग्रेसच्या निर्णयानुसार आमची तुम्हाला साथच राहील. पण आमचे प्रामाणिक मत असे आहे की, पंतप्रधानपदाची जबाबदारी आपण घेऊ नये. तसे आपणास प्रोजेक्ट करू नये. कारण या देशातील लोकांना ते आवडणार नाही. या पत्रानंतर सोनिया यांनी राजीनामा दिला. सगळे काँग्रेस नेते तिथे जमले. त्यांनी आमचा निषेध केला. दोन दिवसांनी पुन्हा वर्किंग कमिटीची बैठक घेऊन आम्हा तिघांना सहा वर्र्षांसाठी पक्षातून काढून टाकले गेले. त्यानंतर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.

म्हणजे तुम्ही फुटला नाहीत?

– त्यांनी आम्हाला काढूनच टाकले.

हा झाला सगळा इतिहास. या फाटाफुटींमध्ये काय सूत्र आहे?

– यातील मुख्य बाब म्हणजे सबंध संघटनेची आणि देशाची सूत्रे विकेंद्रित असता कामा नयेत. ती केंद्रित स्वरूपातच असली पाहिजेत, हे ते सूत्र.

याचा अर्थ केंद्रीकरणाची ही मानसिकता कधीच बदलली नाही. राज्याराज्यांत रुजलेल्या नेतृत्वाला दाबण्याची कॉंग्रेसमध्ये परंपरा आहे. मग आता राहुल गांधी यांनी जे सुरू केले आहे, त्याचा अर्थ काय? त्यांचे राजीनामा देणे वगैरे..

– राहुल गांधींचा तो सूर नाही. त्यांच्या आधी तो होता. जवाहरलाल नेहरूंचा तो नव्हता. नेहरूंना राज्यातील शक्तिशाली नेते हवे असायचे. त्यामुळे त्या काळात मुख्यमंत्री कोण होते? उत्तर प्रदेशात गोविंद वल्लभ पंत, महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण, कर्नाटकात निजलिंगप्पा, तामिळनाडूत के. कामराज, तर बंगालमध्ये बी. सी. रॉय हे मुख्यमंत्री होते. हे सारेच राज्याराज्यातले शक्तिशाली नेते होते. त्यांना सत्ता दिली होती. हा नेहरूंचा गुण होता.

म्हणजे नेहरूंची काँग्रेस आणि नंतरची काँग्रेस यात फरक झाला?

–  नाही. शास्त्री असेपर्यंत सगळे ठीक होते. अगदी इंदिरा गांधींच्या काळातही ठीक होते. पण ज्या वेळी इंदिरा गांधींवर काँग्रेसमध्ये फूट करण्याची परिस्थिती आली त्या वेळी त्यांच्या डोक्यात हे भरविले गेले, की राज्याराज्यातील हे जे शक्तिशाली नेते आहेत, ते तुम्हाला राज्य करू देणार नाहीत. त्यानंतर त्यांनी सगळे धोरण बदलले. महाराष्ट्रात त्यांनी अंतुले यांना आणले. ते काही ‘मास बेस’ असलेले नेते नव्हते. मध्य प्रदेशात पी. सी. सेठी आले. तिकडे कर्नाटकात गुंडू राव यांना आणले.

आता प्रश्न असा आहे की सध्या काँग्रेसचे नेतृत्वच दुबळे झाले आहे. काँग्रेस फुटत फुटत गेली. शिवाय ज्या ज्या राज्यातून काँग्रेस गेली, त्या राज्यांत ती पुनरुज्जीवित झाली नाही. अर्थात याला काही अपवाद आहेत. महाराष्ट्र तसेच इतर काही राज्ये आहेत. जे फुटले ते काँग्रेसवालेच होते.

–  हो. ते सगळे मूळचे काँग्रेसचेच आहेत. अगदी संघटना काँग्रेसपासून. त्यातून काही प्रादेशिक पक्ष उभे राहिले. बाहेर पडलेले काही लोक टिकले नाहीत. पण काही लोक जनता पक्षाच्या माध्यमातून पुन्हा आले.

आता अशा स्थितीत काँग्रेस पुनरुज्जीवित कशी होणार? याचे काय उत्तर आहे?

– माझे व्यक्तिगत मत असे आहे.. आता मी एकदम असे सांगू शकत नाही. पण मोदींनी ‘काँग्रेसमुक्त भारता’ची जी कल्पना मांडली आहे ती या देशाला घातक आहे. काँग्रेसचे पुनरुज्जीवन होणे ही देशाची गरज आहे. फक्त काँग्रेस पुनरुज्जीवित करताना काँग्रेसची जी मूळ परंपरा आहे, त्या परंपरेत काँग्रेस चालविण्याची नीतिमत्ता नेतृत्वाने आणि सहकाऱ्यांनी घेतली पाहिजे. अशा परिस्थितीत काँग्रेस पुनरुज्जीवित करणे आणि ती शक्तिशाली बनविणे ही राष्ट्रीय गरज आहे.

पण ती कशी होणार?

–  ते आता आम्ही राहुल यांच्याशी बोलतो आहोत. त्यांची ती इच्छा आहे.

म्हणजे पुन्हा सगळे काँग्रेसवाले एकत्र यावेत असे..

– नाही. अशी काही कुठे चर्चा झालेली नाही. असे लोक सांगतात. पण तसा काही ठोस प्रस्ताव नाही.

पण अशी चर्चा केल्याशिवाय थोडेच होईल ते?

–  असे आहे की, एकत्र यायचे असेल तर त्या रस्त्यानेच जावे लागेल तुम्हाला. पण असा रस्ता सध्या तरी मला अजिबात दिसत नाहीए.

आता नाही, पण एकत्र आले पाहिजे असे आपण गृहीत धरले तर त्याला सगळ्या राज्यांतील लोक तयार आहेत? तसे ते एकत्र येऊ शकतील?

– नाही.. नाही. अशी चर्चाच कुठे झालेली नाही. असे आहे की निवडणूक कालच झाली. या निवडणुकीत मोदी यांचे एक वेगळे चित्र दिसल्यानंतर साधारणत: देशातील काँग्रेसजनांमध्ये एक चर्चा आहे. आम्ही जेव्हा दिल्लीत एकत्र बसतो तेव्हा गुलाम नबी आझाद आणि असे काही लोक आहेत, त्या सगळ्यांमध्ये ‘इकठ्ठा आना होगा..’ अशा चर्चा होत असतात. म्हणजे लगेच काही झाले असे नाही. काय झालंय. काहीही असलं, तरी आज जी काँग्रेस आहे.. लहान-मोठी- काहीही.. पण या काँग्रेसचा ‘सिमेंटिंग फोर्स’ गांधी फॅमिली आहे. गांधी परिवार हा या सगळ्यांना एकत्र ठेवतो. त्यामुळे हा परिवार वगळून काँग्रेस टिकणार नाही. आणि गांधी परिवारानेही ‘आम्ही म्हणजेच काँग्रेस’ ही भूमिका घेऊनही काँग्रेस टिकणार नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी अजून दूरच्या आहेत.

asbepratap@gmail.com

First Published on June 30, 2019 12:16 am

Web Title: congress party indira gandhi sharad pawar
Just Now!
X