सिद्धार्थ खांडेकर – siddharth.khandekar@expressindia.com

येत्या १९ सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातीत आयपीएल सुरू होत आहे. करोनाचा जगभर कहर सुरू असताना ही स्पर्धा अट्टहासाने खेळवली जात आहे. याचे कारण त्यात होणारी पैशाची प्रचंड उलाढाल. आणि त्यावर पाणी सोडायची कुणाचीच तयारी नाही.

candidates chess gukesh beat abasov
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : गुकेश पुन्हा संयुक्त आघाडीवर; प्रज्ञानंदने नेपोम्नियाशीला बरोबरीत रोखले; कारुआनाकडून विदितचा पराभव
candidates chess 2024 vidit gujrathi beats nakamura
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : विदितचा नाकामुरावर पुन्हा विजय, गुकेशची प्रज्ञानंदशी बरोबरी; नेपोम्नियाशीसह संयुक्त आघाडीवर
LSG Pacer Mayank Yadav
IPL 2024 : मयंक यादवने दिल्लीसाठी नाकारली होती सर्विसेजची ऑफर, ऋषभ पंतच्या कोचच्या मदतीने बनला ‘राजधानी एक्सप्रेस’
Champions League T20 to resume
Champions League T20 : १० वर्षांनंतर चॅम्पियन्स टी-२० लीग खेळवली जाणार? भारतासह ‘या’ तीन देशांनी दाखवले स्वारस्य

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल येत्या आठवडय़ाअखेर सुरू होत आहे आणि ती टाळणे शक्यच नव्हते. २००९ मध्ये भारतात लोकसभा निवडणुकांसाठी सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे व्यग्र राहील, तेव्हा आयपीएलसाठी सुरक्षा पुरवणे शक्य होणार नाही, असे तत्कालीन सरकारने स्पष्ट केले होते तेव्हाही ती रद्द झाली नव्हती. आयपीएलचे संस्थापक आणि त्यावेळचे सर्वेसर्वा ललित मोदी यांनी ही सर्कस मग दक्षिण आफ्रिकेत नेली आणि योग्य दामही पदरात पाडून घेतले. आयपीएल रद्द करणे शक्य नसते, कारण त्यामुळे सगळ्यांचेच नाही, तरी एका मोठय़ा प्रभावशाली वर्गाचे कल्पनातीत नुकसान होते हे त्या वर्षी ललित मोदी यांनी व्यवस्थित दाखवून दिले होते. आयपीएलच्या धनलाभाचा चस्का इतका तगडा आहे, की येथून पुढे ती कोणत्याही कारणास्तव- अगदी युद्धे/महायुद्धे झाली तरीही- रद्द होणार नाही. फार तर विस्थापित होईल, हे जवळपास त्या वर्षी पुरेसे स्पष्ट झाले. भारतातील या फ्रँचायझी क्रिकेटचे लाभार्थी सर्वदूर पसरले आहेत. त्यामुळे कोणत्याही कारणास्तव भारतात ही स्पर्धा झाली नाही तरी दक्षिण आफ्रिका, अरबी आखात, श्रीलंका, बांगलादेश किंवा अगदी इंग्लंड-ऑस्ट्रेलियातही ती भरवली जाईलच. तेही जमले नाही तर अमेरिका किंवा कॅनडाचा पर्यायही चाचपला जाईल. आयपीएल हे चांगले किंवा वाईट किती याचा हिशेब नेहमी मांडला जात असतो. पण आयपीएल हे भारतीय क्रिकेटचे वर्तमान आहे आणि ते नाकारता येत नाही. आता या वर्तमानात देशभान किती, याचे उत्तर वर्षांनुवर्षे आयपीएल समर्थकांना देता आलेले नाही, हे वास्तव आहे. काही घटनांचा यानिमित्ताने वेध घ्यावासा वाटतो.

चेन्नई सुपरकिंग्जच्या १३ सदस्यांना आणि हैदराबाद सनरायझर्सच्या प्रशिक्षकाला संयुक्त अरब अमिरातींत गेल्यावर करोना संसर्ग झाला हे सर्वश्रुत आहे. त्यातही महत्त्वाची आणि फार चर्चा न झालेली बाब म्हणजे चेन्नईच्या काही क्रिकेटपटूंची जी छायाचित्रे प्रसृत झाली, त्यांत ही मंडळी मास्कशिवाय बिनदिक्कत विमानप्रवास करताना दिसली. ती बेफिकिरी होती की अज्ञान, असा प्रश्न उपस्थित करण्याचे काही प्रयोजनच उरत नाही. कारण खेळाडूंना काय वाटते यापेक्षाही त्यांना फ्रँचायझी मालकांकडून आणि आयपीएल चालकांकडून असे का वागू दिले जाते, हा प्रश्न उपस्थित होतो. आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला जगभरातील इतर सर्व क्रीडास्पर्धाप्रमाणे प्रतिबंधित परिघामध्येच (बायो-बबल) वावरणे अनिवार्य आहे. हे वावरणे अतिशय मर्यादित, संकुचित आणि त्यामुळे कटकटीचे असते. विमानप्रवासानंतर अर्थातच सक्तीचे विलगीकरण. यादरम्यान आणि नंतरच्या काळातही सातत्याने करोना चाचण्या. एकत्र येण्याच्या संधी अत्यंत मर्यादित. हॉटेलबाहेर कुणी जाणार नाही, हॉटेलमध्ये कुणी बाहेरून येणार नाही. तीच बाब मैदानांबाबतही. आयपीएलसाठी आखातात उतरलेल्या प्रत्येकासाठी स्वतंत्र खोली, डझनभर चाचण्या, शिवाय कपडे व क्रीडासाहित्याचे वारंवार र्निजतुकीकरण. ‘बायो-बबल’मध्ये वावरण्याचे निकष अतिशय कडक असतात. ठरलेल्या ठिकाणाहून ठरलेल्या ठिकाणीच जायचे. त्यात जरा बदल झाला तर पुन्हा सक्तीचे विलगीकरण निश्चित. मध्यंतरी इंग्लंड-वेस्ट इंडिज क्रिकेट मालिका सुरू असताना ‘बायो-बबल’चा प्रोटोकॉल मोडून इंग्लंडचा गोलंदाज जोफ्रा आर्चर त्याच्या घरी जाऊन आला. त्याला पुन्हा सक्तीने विलगीकरणात पाठवले गेले. त्यामुळे नंतर लगेचच होणारा कसोटी सामना त्याला खेळता आला नव्हता. या पाश्र्वभूमीवर आयपीएलमध्ये काय दिसते? फ्रँचायझी-खेळाडू, आयपीएल गव्हर्निग कौन्सिल-फ्रँचायझी हा संवाद पाहिजे तितक्या निकडीने होत नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) चेन्नई संघाच्या सदस्यांना करोना लागण झाल्याचे वृत्त प्रसृत केले, त्यात तिसऱ्या परिच्छेदात प्रत्यक्ष घटनेचा उल्लेख. पहिले दोन परिच्छेद काय काय काळजी घेतली जात आहे त्याविषयीचे दावे! इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंना चार्टर विमानाने मँचेस्टरहून दुबईत आणायचे ठरले. कारण ही मंडळी सध्या इंग्लंडमध्ये खेळत आहेत. आयपीएलच्या काही फ्रँचायझी अबुधाबीत आहेत, जिथे विलगीकरण नियम कडक आहेत. काही फ्रँचायझी दुबईत आहेत, जिथे हे नियम थोडेफार शिथिल आहेत. परंतु इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंना किती दिवस विलगीकरणात राहावे लागेल, याविषयी शुक्रवापर्यंत तरी बीसीसीआय किंवा गव्हर्निग कौन्सिलकडून काही कळवण्यात आले नव्हते. विलगीकरणाची मुदत कमी करावी, क्रिकेटपटूंच्या सातत्याने चाचण्या करण्याची जबाबदारी आमची, असे आता फ्रँचायझींकडून अमिरातींना विनवले जात आहे. कारण तसे झाल्यासच पहिल्या सामन्यापासून साऱ्यांना खेळवता येऊ शकेल. परंतु यात मोठी जोखीम आहे. आणि एखाद् दुसरा बाधित झाल्यास अनवस्था प्रसंग ओढवेल. या सगळ्या शक्याशक्यता गृहीत धरून स्पर्धेचे नियोजन केले असते तर ती सप्टेंबर महिन्यात सुरूच झाली नसती. त्यामुळे वेळ आणि आरोग्य या दोहोंमध्ये वेळेला प्राधान्य दिले गेले, हे उघड आहे. आयपीएलविषयी वर्षांनुवर्षे जे आक्षेप घेतले जातात, त्यांतील प्रमुख आक्षेप हाच आहे. कोणत्याही परिस्थितीत आणि कितीही किंमत मोजून ही स्पर्धा झालीच पाहिजे याविषयीची फ्रँचायझी मालकांची आणि बीसीसीआयची भूक अमानवी आणि अवाजवी आहे.

यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक होणार होता. तो रद्द झाला आहे. कारण अनेक संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर त्यांना बराच काळ ‘बायो-बबल’मध्ये ठेवणे खर्चीक आणि जोखमीचे ठरणार होते. खर्च करण्यास आयसीसी आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळ) समर्थ होते. कारण या स्पर्धेच्या प्रक्षेपणातून आणि जाहिरातींमधून मोठय़ा प्रमाणात उत्पन्न मिळालेच असते. पण जोखीम घेण्याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियन सरकार साशंक होते. ही संदिग्धता बीसीसीआयने हेरली आणि आयपीएलचे नियोजन पुढे रेटले. यातून झाले असे, की ऑस्ट्रेलियातील नियोजित टी-२० विश्वचषक स्पर्धा आता थेट २०२२ मध्ये होईल. कारण पुढील वर्षी भारतात ती स्पर्धा होतेय. या स्पर्धेकडे जे क्रिकेटपटू डोळे लावून बसले होते, त्यांचे एक वर्ष वाया जाणार. कारण वेस्ट इंडिजप्रमाणे सगळ्याच संघांचे क्रिकेटपटू काही जगभर, वर्षभर फ्रँचायझी क्रिकेट खेळत नाहीत. या क्रिकेटपटूंचे एक वेळ सोडा. कारण इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियात तेथील देशांतर्गत क्रिकेट सुरू आहे किंवा नियोजित आहे. पण आपल्याकडील स्थानिक क्रिकेटपटूंचे काय? यंदाचा आपला स्थानिक क्रिकेट हंगाम जवळजवळ गुंडाळावा लागेल, असे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनेच म्हटले आहे. अभिनव मुकुंद हा एकेकाळी फ्रँचायझी क्रिकेटमध्ये चमकलेला फलंदाज. यंदा त्याला कोणत्याच फ्रँचायझीने खरीदले नाही. त्यामुळे अधिकृत प्रक्षेपक कंपनीसाठी तो समालोचन करणार आहे. पण त्याला स्थानिक क्रिकेट खेळायचे आहे. बाकीचे तेवढेही नशीबवान नाहीत. असे असंख्य क्रिकेटपटू आहेत, ज्यांना फ्रँचायझींनी घेतलेले नाही, पण ते गुणवंत आणि होतकरू आहेत. ‘बायो-बबल’मध्ये त्यांना खेळवण्याची बीसीसीआयची क्षमता नाही की इच्छा नाही? डोमेस्टिक संघ हे फ्रँचायझींसाठी ‘कॅचमेंट एरिया’ असतात. कारण येथूनही अनेक गुणवान क्रिकेटपटू त्यांना मिळाले आहेत. पण कॅचमेंटमधील खेळाडूंना आयपीएल वर्तुळाच्या पलीकडे खेळायचे असेल तर त्याविषयी विचारही करण्याची फ्रँचायझींची इच्छा नाही? खरे तर सप्टेंबरच्या अखेरीस आणि ऑक्टोबरमध्ये डोमेस्टिक हंगाम सुरू होतो. तो होणारच नाही, हे आतापासूनच जाहीर केले जात आहे. तथापि जरा आजूबाजूला पाहिल्यास परिस्थिती वेगळी दिसते. युरोपमध्ये व्यावसायिक क्लब फुटबॉलचा एक हंगाम संपला आणि आता नेशन्स लीग म्हणजे राष्ट्रीय संघांची स्पर्धा सुरू झालीये. लवकरच विविध देशांमध्ये नवीन क्लब हंगाम सुरू होईल. याबाबत कसलाही गोंधळ नाही. आणि केवळ एका स्पर्धेसाठी हंगाम गुंडाळून टाकण्याचा अविवेकी निष्ठूरपणाही दिसत नाही. यंदाच्या आयपीएलचे प्रमुख प्रायोजक म्हणून एका फँटसी गेमिंग कंपनीची निवड झालेली आहे. यात सहभागी झाल्यास आर्थिक लाभ किंवा नुकसान झाले तरी ही सट्टेबाजी नाही बरे! कारण भारतात नोंदणी झालेल्या आस्थापनांना तशी परवानगी नाही. पण फँटसीच्या मागे धावणाऱ्या फ्रँचायझींनी विद्यमान आरोग्य वास्तवाकडे डोळेझाक केली आहे आणि त्याची किंमत कोणाला तरी मोजावी लागेल ही जाणीव अस्वस्थ करणारी आहे.