News Flash

  मोकळे आकाश… : कावळे आणि करोना

कावळ्याचे तसे नाही. हा मुळातच एक कौटुंबिक, सामाजिक पक्षी आहे.

||  डॉ. संजय ओक

सुमारे सात वर्षांपूर्वीं माझे वडील मला सोडून गेले. वृद्धत्व आणि कर्करोगाचे निमित्त होते. आई अत्यंत खंबीर आणि कर्तबगार. तिने त्यांची जागा घेतली आणि कुटुंबातली पोकळी एका अर्थी भरून काढली. ते ज्या दिवाणावर बसायचे, झोपायचे तो आता तिचा झाला. तिच्या खोलीच्या खिडकीत ग्रिलवर बरोबर सकाळी दहाच्या सुमारास एक कावळा येऊन बसू लागला. कावकाव करायचा आणि थोड्या वेळाने निघून जायचा. पण पठ्ठ्याचा नेम आणि वाकडी मान करून खोलीत डोकावणे काही थांबायचे नाही. आईचा पुनर्जन्मावर काडीचाही विश्वास नाही. वडील जन्मभर शंभर टक्के नास्तिक आणि निरीश्वरवादी (atheist)  या वर्गवारीत मोडणारे. मी मात्र आईची चेष्टा करायचो आणि म्हणायचो, ‘पपा काळे होते, पण कावळा म्हणून परत आले की काय?’ थोड्या वेळाने अधूनमधून एक हिरव्यागार पोपटांची जोडी यायची. पण पोपटीण बरोबर असल्यामुळे आईला ते काही भावायचे नाहीत. अर्थात मुंबईतल्या चिमण्या प्रामुख्याने आता गोष्टीतच उरल्यामुळे ताटात अन्नब्रह्म म्हणून येणाऱ्या कडकनाथांपलीकडे पक्षीसाम्राज्याचा आमच्याशी चर्चा करणारा प्रवक्ता म्हणजे कावळाच! कबुतर आणि पांढुरके पारवे हे फक्त घुमायला, प्रेम करायला आणि आमच्या गाड्या व कपड्यांवर शिटायलाच जन्माला आले आहेत असे आमचे ठाम मत आहे.

कावळ्याचे तसे नाही. हा मुळातच एक कौटुंबिक, सामाजिक पक्षी आहे. आमची त्याच्याशी रंगसंगती असल्यामुळे शाळा- कॉलेजमध्ये काही गौरांगनांनी आम्हाला त्याच्या नावाने गौरविलेही आहे. कॉर्विड कुलोत्पन्न या पक्षीमित्राचे रॅवेन, रुक्स, जय, जॅकडॉज्, मॅगपाय, ट्रीपाय, नटक्रॅकर, चूघस् अशी चुलत- आते- मामे वंशावळ आहे. एक औंसापासून तीन पौंडापर्यंत वजनदार असलेले हे मामलेदार मेक्सिकोपासून न्यू हेमिस्फिअरपर्यंत सर्वत्र सापडतात. त्यांचा मेंदू तल्लख आणि त्यांच्या शरीराच्या आकारमानाच्या तुलनेत मोठा असल्यामुळे कावळे जात्याच बुद्धिमान असतात. (पक्षी : आमच्या आणि त्याच्यातील हे साधम्र्य का बरे इतरांच्या लक्षात येत नाही?) शास्त्रीयदृष्ट्या या आकार-प्रमाणाला Encephalization Quotient असे म्हटले जाते. कावळ्याचा कावेबाजपणा आणि युक्त्या या मेंदूतून उगवतात. उगाच नाही लहानपणी त्याने आम्हाला गोटे आणि दगड भांड्यात टाकून पाण्याची पातळी वर आणण्याची ट्रिक शिकवली! कावळे गवताच्या काड्या, दर्भ आणि काथ्यांपासून हत्यारे बनवितात आणि वापरतात. आणि आम्ही मात्र दर्भाचे कावळे बनवितो! कावळा कुटुंबाला जपतो. कावळीणबाईशी एकनिष्ठ राहतो. तरुण कावळे कुटुंबात अंडी आणि छोट्या पिल्लांची काळजी घ्यायला घरट्यात थांबतात. विजेच्या तारेचा स्पर्श होऊन एखादा जातभाई गेलाच, तर कावळ्यांच्या थव्याची कावकाव सुरू होते. ते शोकप्रदर्शन असते किंवा काय याबद्दल विवाद आहेत. पण ही कावळे जातीसाठी Potentially hazardous site आहे यावर मात्र काकगण शिक्कामोर्तब करत असतात. कावळे आपापली हद्द पाळतात. नीलमनगरचे कावळे उडूर्न हिंदू कॉलनीत जात नाहीत. स्थलांतरित पक्ष्याची पदवी त्यांना प्रिय नसते. त्यांना त्रास दिला तर ते डुख धरून टोच मारतात. शेतकऱ्यांचे ते कीटक आणि पिकावरच्या अळ्या खाणारे मित्र बनतात आणि पर्यावरणाच्या समतोलात आपला खारीचा वाटा उचलतात.

साहित्य क्षेत्रातही कावळ्याने आपल्या अस्तित्वाचे दाखले देऊन इंग्रजी भाषा समृद्ध केली आहे. As the  Crow Flies  (गन्तव्य स्थळाकडे जाणारा थेट रस्ता), Getting up with crows  (भल्या पहाटे उठणे), Eat Crow  (चुकीबद्दल क्षमायाचना), Crowing about something  (ढोल बडविणे) हे सारे वाक्प्रचार तर त्याने रूढ केलेच; वर ही यादी पुढे जाऊन Crows Feet म्हणजे डोळ्याभोवतालच्या वयपरत्वे येणाऱ्या रेषा-सुरकुत्या आणि पोटाच्या अल्सरच्या सर्जरीमध्ये नेमक्या नसा ((Nerves)) ओळखण्याची खूणही वैद्यकशास्त्राला बहाल केली आहे.

हे सारे जरी असले तरी कावळा म्हटला की मृत्यूची सावली आठवते. मृतदेहाचा दर्प  आपल्याला कळायच्या आधी कावळ्यांना कळतो. करोनाच्या काळात चीनमधल्या हुबेई, यी चँग, झिंगचोऊ, वुहान या प्रांतांत २८ जानेवारी २०२० ला आकाशात मोठ्या संख्येने कावळ्यांचे थवे जमले होते. नजीकच्या भविष्यकाळात काहीतरी अशुभ घडणार आहे याची ती पूर्वसूचना होती. करोनाच्या काळात हा कालदूत अधिक बदनामीचा आणि तिटकाऱ्याचा विषय झाला तो त्याच्या या मृत्यूशी असलेल्या मैत्रामुळे!

…पण मला मात्र असे वाटते की, माणसाची अनामिक, अकल्पित, अस्पर्शित अखेर झाली, ‘मास फ्युनरल’चे प्राक्तन नशिबी आले, कुटुंबीयांनी आणि मित्रपरिवाराने साथ सोडली तरी स्मशानात आणि दफनभूमीत एक मित्र मात्र तिष्ठत उभा होता; आणि तो तुमच्या-माझ्या रोजच्या परिचयाचा कावळा होता! तेव्हा त्याला दोष कसा द्यायचा?

…लेख लिहिताना विचाराने डोके भणभणू लागले. इतक्यात दारावरची बेल वाजली आणि आमचे नातू अवतरले. वय वर्षे सव्वादोन. चालत चालत पणजीबाईच्या रूममध्ये गेले. खिडकीकडे तोंड करून उभे राहिले आणि प्रश्न करते झाले…

‘काऊ’?

 sanjayoak1959@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2021 12:04 am

Web Title: crows and corona virus akp 94
Next Stories
1 थांग वर्तनाचा! : शॉर्टकट नको, विवेक हवा!
2 चवीचवीने… : मिठायांचा सम्राट… छेनापोडं
3 भाई… निरंतर योद्धा
Just Now!
X