‘मी राहुल.’ पाठीवरची सॅक काढत आणि समोरच्या खुर्चीवर बसत तो किडकिडीत तरुण म्हणाला.
‘नमस्कार.’ मी त्याचं स्वागत केलं.
‘मी इंजिनीयरिंगच्या पहिल्या वर्षांला आहे. मला बॉडी बिल्डर व्हायचंय. त्यासाठी मी गेली दोन र्वष प्रयत्न करतोय, पण माझं वजन वाढतच नाही.’
‘काय प्रयत्न केलेस तू?’ मी विचारलं.
‘मी जिमला जातो. कधी कधी दांडी होते, पण जातो. तिथे इन्स्ट्रक्टर सांगतात तसा व्यायाम करतो. तिथल्या आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानं मी एक diet plan केला आहे. तो मी strictly follow  करतो. पण काहीच फायदा होत नाही,’ तो निराशेनं म्हणाला.
‘काही आजार आहे का तुला?,’ मी विचारलं.
‘नाही.’
‘मग तब्येतीची एखादी बारीक तक्रार आहे का? पोटासंबंधी किंवा झोपेसंबंधी?’
‘झोपेसंबंधी नाही. पण पोटासंबंधी म्हणजे.. मी इतका व्यायाम करतो तरी मला कडकडून भूक कधीच लागत नाही. आणि दिवसातून चार-पाच वेळा तरी मला  motion  होते. जुलाब होत नाहीत, पण..’
‘भूक लागत नाही, मग diet plan कसा follow करतोस?
‘म्हणजे बघा, मी सकाळी सहा वाजता उठतो. दात घासल्याबरोबर मोठा मग भरून- म्हणजे ३०० ते ३५० मि. लि. दूध पितो.’
‘का?,’ मी न राहवून आश्चर्यानं विचारलं.
‘रात्रीच्या जेवणानंतर सकाळपर्यंत आपलं पोट पूर्ण रिकामं झालेलं असतं. त्यापेक्षा जास्त वेळ ते रिकामं ठेवू नये असं म्हणतात ना?,’ त्यानं एका वैद्याला बेधडकपणे आहारविषयक चुकीचा सिद्धान्त ऐकवला.
‘बरं. मग पुढे?,’ आता आधी त्याचं सगळं ऐकून घ्यायला हवं होतं.
‘मग आठ वाजता जिमला जातो. त्यापूर्वी दोन केळी आणि दोन उकडलेली अंडी खातो.’ मी गप्प होते. पण माझ्या चेहऱ्यावरचा ‘का’ त्यानं ताडला असावा.
तो म्हणाला, ‘इन्स्ट्रक्टर सांगतात की रिकाम्या पोटी व्यायाम करायचा नसतो.’
‘ठीक आहे.’ मी मान डोलावली.
‘तिथून मी दहा वाजता घरी येतो. मग एक वाटीभर मोड आलेली कडधान्यं खातो. व्यायामानंतर भरपूर प्रथिनं खावीत. आणि मोड आलेल्या कडधान्यांचा वापर भरपूर करावा ना?’ (कुणी, कधी, किती, का??!!!)
‘दुपारी साडेबारा वाजता मी जेवतो. त्यात तीन पोळ्या, भाजी, आमटी, भात, कोशिंबीर, ताक असं घेतो. साडेतीन वाजता मी फळं खातो. फळं भरपूर खावी असं म्हणतात ना? साडेपाच वाजता मी पुन्हा ३०० मि. लि. दूध घेतो. त्याबरोबर एक खजूर, चार बदाम, दोन काजू, एक अंजीर, एक खारीक, दहा काळ्या मनुका आणि चार पिस्ते असा सुकामेवा खातो. संध्याकाळी दूध प्यायलं की कॅल्शियमचं अ‍ॅब्सॉब्र्शन चांगलं होतं ना, म्हणून. मग साडेसात वाजता मी कच्चं सॅलेड खातो. त्यात टोमॅटो, काकडी, बीट, गाजर, मुळा, कोबी असं सगळं असतं. सॅलड भरपूर खावं ना? त्यातून व्हिटॅमिन्स मिळतात. (आता तो त्याच्या सगळ्या कृतींची कारणं तिथल्या तिथे सांगू लागला होता.) आणि रात्री ९ वाजता मी जेवतो. जेवण सकाळसारखंच. तरी वजन वाढत नाही. अजून काय खायला हवं मी? तुम्ही वजन वाढणारं औषध द्याल का मला?’
राहुलचा diet-plan नुसता ऐकूनही मला माझंच पोट तडस लागेपर्यंत भरल्यासारखं वाटायला लागलं. दोन मिनिटे तर मला काही सुचेचना! एक दीर्घ श्वास घेऊन मी त्याला म्हटलं, ‘अरे, वजन वाढत नाही, ही तुझी समस्या नाहीए. तुझी समस्या आहे तुझं अजीर्ण. तू मघाशी म्हणालास की, तुला भूक लागत नाही, पण तरी तू खातोस. भूक लागायला तू सवडच देत नाहीस. आधीचा आहार पचण्याच्या आधीच तू दुसरा आहार घेतोस. ते पचणार कसं आणि अंगी तरी कसं लागणार?’
राहुलचा चेहरा कावराबावरा झाला. त्याच्या diet-plan मागे त्याचे कष्ट आणि विचार होते ना!
‘पण मॅडम, कडधान्यं, दूध, अंडी, सुकामेवा असं सगळं खाल्ल्याशिवाय माझं वजन कसं वाढणार?’
‘सगळं काही भरपूर खा!’ हा सिद्धान्त आपल्याकडे कसा आणि कधी रुजला माहीत नाही. ‘पोट म्हणजे पोतं- आपण भरू तितकं मावतं’ असं समजून लोक खात असतात. आपल्या अति खाण्यामुळे आपल्याला विविध आजार होतात, हे त्यांच्या गावीही नसतं. उलट, आजारी असलो, भूक नसली, तरी अशक्तपणा येऊ नये म्हणून खाल्लं पाहिजेच, असा चुकीचा विचार केला जातो.
आयुर्वेदशास्त्र मात्र स्पष्टपणे सांगतं की, निरोगी कोण? जो कमी खातो तो.. म्हणजे मिताहारी. केवळ आयुर्वेद- शास्त्रातच नाही, तर पूर्वीच्या समकालीन अन्य साहित्यातही मिताहाराची प्रशस्ती सर्वत्र आढळते.
‘कोऽरूक्? मित भुक् ?’(निरोगी कोण? मिताहारी.)
‘मितभोजनं स्वास्थ्यम्!’ (चाणक्य)- योग्य प्रमाणात जेवण म्हणजेच स्वास्थ्य.
‘मित अशनं तप:।’ (श्रीभाष्य)- मिताहार हे तप आहे.
‘बुद्धिमान्-मिताशी स्यात्!’ (चरक)- बुद्धिमान मनुष्याने मिताहार करावा.
‘मात्रावत् भुञ्जीत’ (चरक)- पचन होईल इतक्या प्रमाणातच आहार घ्यावा.
ही खरी सुभाषितं! आजच्या भाषेत सांगायचं तर ही ‘by heart” करायला हवी आणि ‘ follow’ करायला हवी.
ही सुभाषितं म्हणजे पुराणातली वानगी नाहीत. आपल्या आजूबाजूला थोडी नजर टाकली तर असे ‘मिताहारी निरोगी’ आपल्याला खूप सापडतील.
मी एकदा एका स्त्री-संघटनेच्या वक्तृत्व स्पर्धेला परीक्षक म्हणून गेले होते. स्पर्धा शाळेच्या तिसऱ्या मजल्यावर होती. जमलेल्या परीक्षकांपैकी चाळिशीपार केलेले कुणीच परीक्षक तिसऱ्या मजल्यावर यायला तयार होईनात. कुणाला सांधेदुखी, कुणाला ब्लडप्रेशर! शेवटी चितळे आजी तयार झाल्या. त्यांचं वय सत्तर वषर्ं. मी आयोजकांना म्हटलं, ‘ठीक आहे. तुम्ही काळजी करू नका. मी त्यांना थांबत थांबत धरून घेऊन जाईन.’
आयोजक आजींना ओळखणारे होते. ते नुसतेच हसले. आम्ही दोघी तिसऱ्या मजल्यावर जायला निघालो, तर आजी कुठल्या थांबायला? त्या माझ्याबरोबर सरसर जिने चढल्या. कसलीही कुरकुर नाही, वयाचं रडगाणं नाही. आमची स्पर्धा संपल्यावर मी न राहवून त्यांना विचारलं, ‘तुमच्या आरोग्याचं रहस्य काय हो?’
त्या म्हणाल्या, ‘मी कमी जेवते.’
आपली मुलं, नवरा यांच्याविषयी महिलांची प्रेमळ तक्रार असते- ‘अहो, यांच्या वयाच्या मानानं यांचं जेवण कमी नाही का?’ या सगळ्या प्रेमळ मातांना मी सांगू इच्छिते, की आहाराचं मान (प्रमाण) हे वयाच्या मानानं नसतं ठरवायचं. ते शारीरिक कष्टांच्या मानानं- म्हणजेच पर्यायानं भुकेच्या मानानं ठरवायचं असतं. ज्याची जशी भूक, तसं त्यानं जेवावं.
इतकं सांगून भागत नाही. लोकांना प्रमाण हवं असतं. दोन पोळ्या की तीन पोळ्या? त्यासाठीही चरकाचार्यानी ‘एक-तृतीयांश कुक्षी पुरण’ असा नियम सांगितला आहे. आपल्या जठराचे तीन भाग आहेत अशी कल्पना करावी. एक भाग घन अन्नपदार्थानी भरावा. दुसरा भाग पाणी, ताक, आमटी अशा द्रव पदार्थानी व तिसरा भाग अन्नाच्या हालचालीसाठी आणि पचनासाठी रिकामा ठेवावा. आपल्याला ‘सावकाश जेवा-’ असा जो सल्ला दिला जातो त्याचा अर्थ पोटात थोडा अवकाश म्हणजे जागा ठेवून जेवा, असा आहे. ती जागा रिकामी ठेवणं तर दूरच; उलट फुकटचं मिळालं किंवा पैसे वसूल करायचे म्हणून आपण अन्ननलिकासुद्धा भरून घेतो.
असे पोटाचे तीन भाग जर कल्पिता येत नसतील तर त्यांच्यासाठी आहाराचं प्रमाण ठरवायचा आणखी सोपा उपाय हवा. जेवण झाल्यानंतर हसणं, बोलणं, उठणं, बसणं, शिंकणं, श्वास घेणं, शरीराच्या हालचाली करणं हे सहज शक्य होत असेल तर ती आहाराची योग्य मात्रा होय. तोच मिताहार! या क्रिया करणं अवघड होतं तेव्हा जेवण अंमळ जास्त झालं आहे हे ओळखावं. (सध्या आंब्याचा मोसम आहे. आमरस-पोळी असली की बघा आपण किती जेवतो ते! जेवल्यानंतर कळतंच. तरी दुसऱ्या दिवशी पुन्हा येरे माझ्या मागल्या.) जास्त प्रमाणात घेतला जाणारा आहार हे आपल्या सगळ्या आजारांचं मुख्य कारण असतं. हृदयरोगही यातूनच उद्भवतो. माणूस सोडून सगळे प्राणी ‘मिताहारी’ असतात. माणूस मात्र ‘या एकाच जन्मात सगळ्या जन्माचं खायला हवं,’ या समजुतीनं खातो.
गुजराती भाषेत एक म्हण आहे- ‘माणसनी परीक्षा खाटले नि पाटले.’ म्हणजे माणसाची परीक्षा दोन ठिकाणी असते. एक तर खाटल्यावर म्हणजे माणूस आजारी असताना. आजारपणात माणसाच्या सहनशक्तीची परीक्षा असते. दुसरी परीक्षा असते पाटावर बसल्यावर- म्हणजे जेवताना. इथे त्याच्या संयमाची परीक्षा असते. मोह टाळायचा असतो. आपल्याला जर ‘खाटले’ परीक्षा द्यायची नसेल (म्हणजे आजारी पडायचं नसेल), तर ‘पाटले’ म्हणजे पाटावरची परीक्षा आपल्याला उत्तम प्रकारे द्यायला हवी. त्यात उत्तीर्ण व्हायला हवं. थोडक्यात, ‘मिताहारी’ असायला हवं. नाही का? आजपासून आपण आपल्या मेंदूतून ‘भरपूर’, ‘पोटभर’ हे शब्दी delete  करूया आणि नवीन शब्द save  करू या- ‘मिताहार’..

salman khan firing accused Sagar pal father reaction
सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप…”
jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
Salman Khan was the bartender at Riddhima Kapoor wedding
रणबीर कपूरच्या बहिणीच्या लग्नात बारटेंडर होता सलमान खान; ऋषी कपूर त्याला म्हणाले होते, “तू निघ तिथून…”
a man cracking coconut with his head shocking video goes viral
धक्कादायक! डोक्यावर नारळ फोडले अन् पुढच्या क्षणी खाली पडला, VIDEO पाहून येईल अंगावर काटा