माणसाचे जीवनमान बदलण्याची ताकद तंत्रज्ञानात असते. आजचे विज्ञान हे उद्याचे तंत्रज्ञान असते. विज्ञानात संशोधन मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. त्याचे तंत्रज्ञानातही रूपांतर होते आहे. पण त्याचे प्रमाण यंत्रांच्या म्हणजे गॅझेट्सच्या क्षेत्रात जास्त आहे. वैद्यकीय क्षेत्रातही तेवढीच प्रगती अपेक्षित आहे, हे इबोला या विषाणूने पश्चिम आशियात घातलेल्या थैमानाने दिसून आले आहे. पण वर्ष संपता संपता अनेक कंपन्या या रोगावरील लशींच्या चाचण्या करण्यासाठी रांगेत उभ्या आहेत. पण जीवशास्त्रात वेळ आली की संशोधन करून चालत नाही, तर ती अव्याहत प्रक्रिया असली पाहिजे.   
२०१५ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय प्रकाश वर्ष’ म्हणून संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केले आहे. त्याचा मुख्य कार्यक्रम पॅरिस येथे १९-२० जानेवारी रोजी होणार आहे. जवळपास हजार वर्षांपूर्वी प्रकाशाच्या माध्यमातून आपण जगाचा वेध घेण्यास सुरुवात केली. इंटरनेटसुद्धा ऑप्टिकल फायबर म्हणजे  आरशांवरील प्रकाशाच्या खेळामुळे चालते. दुर्बीण, चष्मे, बल्ब, टय़ूब, सीएफएल, एलइडी, ओएलइडी असे दिव्यांचे अनेक आधुनिक प्रकार आपल्याला माहिती आहेत. पण आता नवीन प्रकाश तंत्रज्ञान पुढे येत आहे.
अवकाश क्षेत्रात भारताने गतवर्षी नेत्रदीपक यश मिळवले असून मंगळयानाच्या मदतीने घेतलेल्या छायाचित्रांतून काही ठोस माहिती हाती येण्याची शक्यता आहे. माणसाला अवकाशात पाठवण्यासाठी अवकाशकुपीचे आणखीन प्रयोग केले जातील. नासामध्ये स्पेसशटलची जागा घेणारी ओरायन वाहने प्राथमिक चाचणीत यशस्वी झाली आहेत; ती प्रत्यक्ष उपयोगात येण्याच्या टप्प्यात पोहोचतील. नासाचे ‘डॉन’ हे २००७ मध्ये सोडलेले यान टेक्सासएवढय़ा बटू ग्रहावर २०१५ मध्ये पोहोचणार आहे. शिवाय अवकाशस्थानकातील प्रयोगांमधून बरीच वैज्ञानिक माहिती हाती येईल.
विज्ञानातील संशोधन निधीवर राजकीय वातावरणाचा परिणाम होणार आहे. अमेरिका व ब्रिटनमध्ये निधी कमी केला जात आहे. यंदा जागतिक हवामानबदलाची पुढची परिषद होत असून त्यात नेमके काय घडते यावर पृथ्वीचे भवितव्य अवलंबून आहे. आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेले महासागरांचे संशोधन अनेक देश सुरू करत आहेत. आपल्याला अवकाशाइतकीच कमी माहिती सागरांबाबत आहे. शेतीक्षेत्रात जनुकीय पिकांचा वाद भारतात चालूच राहणार आहे. पण इतर तंत्रज्ञानाप्रमाणेच त्याचा विवेकाने वापर केल्यास त्यात अडचणी येणार नाहीत. किंबहुना, बदलते हवामान बघता पिकांच्या अधिक चांगल्या प्रजाती केवळ गरजेतून शोधल्या जातील. याकामी आता भारतीय कृषी-संशोधकांनी पुढे येण्याची गरज आहे.
कर्करोगावरील संशोधन आता नव्या दिशेने जात आहे. यापुढे संपूर्ण गाठीची बायोप्सी करावी लागणार नाही, तर रक्तातील कर्करोगपेशी घेऊन त्याद्वारे तो प्राथमिक अवस्थेत ओळखला जाईल. शिवाय त्यांची वाढही दिसणार आहे. औषधांना दिला जाणारा प्रतिसाद पेट्रीडिशमध्ये दिसणार आहे. त्यामुळे नवीन औषधे तयार करता येतील. एकाच वेळी रक्तातील सहा रोगजंतू शोधणारे उपकरणही येत आहे. स्कंदपेशी संशोधनात पक्षाघात व कंपवात या दोन्हीवरील उपचारांत प्रगती होणार आहे.
सामाजिक माध्यमांतील संशोधनात फेसबुक, ट्विटरसारखी माध्यमे कशा पद्धतीने नवीन वळणे घेत जातात हे आता दिसेल. त्यात नवनवीन अ‍ॅप्स येत आहेत. न्यूज ट्रेंड्ससारखेच आता फॅशन व इतर ट्रेंड्सही कळतील. या माध्यमांचा जनमानसावरील प्रभाव वर्तमानपत्रांना मागे टाकत आहे, हे खरे की खोटे, यावरही संशोधन अपेक्षित आहे. वैद्यकीय दृष्टिकोनातून गेम्स व या संकेतस्थळांचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम यावरील संशोधन आणखी पुढे जाईल. ऑनलाइन रिटेलिंगही वयात येईल.
गुगलच्या कृत्रिम मेंदू प्रकल्पात प्रगती होते आहे. त्यात मेंदूसारखीच न्यूरॉन्सची रचना करून नक्कल करण्याचा प्रयत्न केला आहे. गुगल ग्लासची चर्चा तर बरीच झाली, पण ते कुणी पाहिले नाही. ते आता अर्धा अब्ज लोकांकडे दिसतील. यापुढे मोटारी एकमेकांशी बोलू लागणार आहेत; जे केवळ चर्चेच्या स्वरूपात होते ते काही प्रमाणात पुढे जाईल. अ‍ॅपल व गुगल या कंपन्यांमध्ये त्यासाठी स्पर्धा आहे. लासवेगास शोच्या काही आठवडे आधी अशा गाडय़ा तयार असतील. त्याचबरोबर विजेवरील मोटारी पुढे येतील. या वर्षांत दोन विमान अपघात झाले. तेव्हा विमान तंत्रज्ञानाचा काहीसा फेरआढावा घ्यावा लागणार आहे. दोष माणसाचे आहेत की तंत्रज्ञानाचे, हे समजून घ्यावे लागेल व या तंत्रज्ञानात आणखी काही भर टाकता येते का, हे बघावे लागेल. सौरशक्ती हे उद्याचे आशास्थान असले तरी त्याची पूर्ण कार्यक्षमता  मिळवून देणारे पदार्थ तयार करावे लागतील. आपण एक जाहिरात पाहिली असेल : त्यात तो मुलगा पाव ड्रोनमधून आणतो व हा आयआयएनचा परिणाम आहे, असे सांगतो. तसे पिझ्झे व इतर पदार्थ उडत्या ड्रोनमधून तुमच्या टेबलावर येतील.
थोडक्यात, वैज्ञानिक प्रगतीमुळे झगमगती दुनिया वाढतच जाणार आहे. आपल्यापुढील प्रलोभने वाढणार आहेत. आयुर्मर्यादा वाढणार आहे. त्यात माणसाचे स्थान हे गुलामासारखे होऊ नये अशी अपेक्षा आहे. आपण या प्रगतीचे गुलाम न बनता त्या प्रगतीवर विवेकाने स्वार होऊन आर्थिक प्रगती करून घेतली पाहिजे. तंत्रज्ञान कसे वापरायचे हे आपल्या हातात आहे, तरच आपले जीवन समृद्ध होईल. अन्यथा विश्वरचना वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांनी भीती व्यक्त केल्याप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या यंत्रमानवापुढे शरणागती पत्करण्याची वेळ येईल.