23 September 2020

News Flash

मानवांचे अंती, एक गोत्र

‘ग्रेटाची हाक- तुम्हाला ऐकू येतेय ना?’ या अतुल देऊळगावकर लिखित  मनोविकास प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होत असलेल्या पुस्तकातील काही अंश..

(संग्रहित छायाचित्र)

‘ग्रेटाची हाक- तुम्हाला ऐकू येतेय ना?’ या अतुल देऊळगावकर लिखित  मनोविकास प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होत असलेल्या पुस्तकातील काही अंश..

अलेक्झांड्रिया ओकॅसिओ कोर्टेझ या अमेरिकेतील विधिमंडळावर (युनायटेड स्टेट्स काँग्रेस) निवड झालेल्या सर्वात तरुण महिला आहेत. २०१८ च्या निवडणुकीत दहा वर्षांपासून रिपब्लिकन पक्षाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या, अनुभवी व धनाढय़ ज्यो क्रॉले यांचा या नवख्या व गरीब ओकॅसिओंनी दणदणीत पराभव करून इतिहास घडवला. त्यांचे फेसबुकवर पाच लक्ष, तर ट्विटरवर ४८ लक्ष पाठीराखे आहेत. त्या डेमॉक्रेटिक सोश्ॉलिस्ट्स ऑफ अमेरिका पक्षाच्या सदस्य असून, विचाराने उदारमतवादी आहेत. रंग, लिंग वा धर्म यावरून भेदभाव झाल्यास अथवा तुच्छतेची वागणूक आढळल्यास त्याचा निषेध करण्यात त्या अग्रभागी असतात.

अशा अलेक्झांड्रिया ओकॅसिओ कोर्टेझ या त्यांच्यापेक्षा १३ वर्षांनी लहान असलेल्या ग्रेटाची भेट घेण्यास उत्सुक होत्या. दोघीही पर्यावरण संवेदनशील आहेत. कुठल्याही पावलावर पाणी वा कार्बन उत्सर्जन वाढू नये याबाबत दोघीही विलक्षण काटेकोर आहेत. परंतु संवादाची व भेटीची तर गरज आहे. तेव्हा त्यांनी दृक्श्राव्य भेट (व्हिडीओ कॉन्फरन्स) ठरवली. अतिशय मनमोकळ्या व हृद्य संभाषणातून या दोघी वैयक्तिक ते जागतिक, समाज आणि राजकारण, नेते व जनता अशा अनेक पातळ्यांवर भाष्य करतात.

अलेक्झांड्रिया ओकॅसिओ कोर्टेझ : तुझी भेट हा माझा बहुमान आहे.

ग्रेटा थुनबर्ग : माझीही तशीच भावना आहे.

ओकॅसिओ : अलीकडे लोकांकडून सर्वत्र ऐकायला मिळतं- ‘तरुणांना राजकारणापासून दूर ठेवा. तरुणांनी राजकीय मते बनवू नयेत.’ ही एक निषिद्धता (टॅबू) तयार झाली आहे. कोणीही राजकीय भूमिका घेऊ नये, हा त्यामागील अर्थ असतो. मला हे फार गोंधळाचे वाटते. आपण माहितीच्या युगात आहोत. कोणत्याही घटनेमागील खऱ्या कारणांचा शोध घेऊन स्वत:चे मत बनविणे ही स्वाभाविक गोष्ट आहे. त्यानंतर आपल्या मतांबाबत आग्रही असणे हे ओघाने येतेच. अशा वातावरणात तुझ्यासारख्या लहान वयातील मुलांनासुद्धा याला सामोरे जावे लागत असणार.

ग्रेटा : होय अगदी असाच अनुभव येतो. ‘तुम्ही लहान मुले आहात. तुम्हाला अनुभव नाही. तुमचा राजकीय वापर करून घेतला जातोय. तुम्ही शिका. अभ्यास करा. यात पडू नका. राजकारण फार वाईट क्षेत्र आहे..’ असे बरेच काही सतत ऐकवले जात आहे. आणि ते चीड आणणारे आहे. आम्हाला आमची मते असू नयेत का? आम्ही आमचे मत बनवणे, ते व्यक्त करणे हे आमचे कर्तव्य आहे. आम्ही लोकांची मते बदलण्याचा प्रयत्न का करू नये? तुम्हालादेखील असाच अनुभव येत असेल. तुमच्या मतप्रदर्शनामुळे तुमचा तिरस्कार, हेटाळणी होत असेल. याचा सामना करताना तुम्ही एवढय़ा कशा खंबीर राहता, हे मला समजत नाही.

ओकॅसिओ : मला वाटते, बऱ्याच वेळा लोकांच्या हे लक्षात येत नाही, की अमेरिकेत गरीब व श्रीमंत यांच्यामधील दरी खूपच मोठी आहे. दलाल स्ट्रीटमधून (हा एक न्यू यॉर्कमधील रस्ता आहे. त्यावर अमेरिकेतील आर्थिक धोरणे ठरवणाऱ्या कंपन्यांची कार्यालये आहेत.) राजकीय घडामोडींना चालना मिळते. आमच्याकडील कायद्यामुळे राजकीय नेत्यांना प्रचारासाठी खुलेआम देणग्या स्वीकारता येतात. त्या स्वीकारण्याचे इतर कुठल्याही देशात नसेल एवढे प्रचंड प्रमाण आमच्याकडे आहे. याची बहुतेकांना माहिती असते, परंतु त्यांना यामागे इंधन कंपन्यांची टोळी (फॉसिल फ्यूएल लॉबी) जबाबदार असते याची जाणीव नसते. कोच बंधूंनी अमेरिकेतील रिपब्लिकन पक्ष विकत घेतला आहे अशी परिस्थिती आहे. (अमेरिकेतील धनाढय़ांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर चार्ल्स व डेव्हिड कोच बंधू आहेत. अमेरिकेच्या शेअर बाजारातील ८४ टक्के शेअर्स हे त्यांचे आहेत. वीज, रसायन, पेट्रोलियम, खते, पॉलिमर, फायबर, खनिजे, कागद अशा अनेक उद्योगांमध्ये त्यांची अवाढव्य गुंतवणूक आहे. कर्ब उत्सर्जन रोखणाऱ्या सर्व विचारांचा व चळवळींचा विरोध करणाऱ्यांना देणग्या देण्यात कोच उद्योग आघाडीवर असतात. कोच यांच्या भूमिका उचलून धरणाऱ्या रिपब्लिकन पक्षाला त्यांनी अब्जावधी डॉलरचे दान दिले आहे.) लोकांच्या हे लक्षात येत नाही की, कोच यांचा पसा हा कोळसा व तेलातून आला आहे. आम्ही कोळसा व तेलाच्या विरोधात आहोत. हे त्यांच्या सत्तेला दिलेले आव्हान आहे असे त्यांना वाटते. आमचा लढा कोणाशी आहे याची आम्हाला कल्पना आहे. विश्वासार्हता व सच्चेपणा ही आमची शक्ती आहे. बलाढय़ांशी लढताना व चळवळ उभारताना याचाच आम्हाला उपयोग होत आहे.

ग्रेटा : आमच्या स्वीडनमध्येही ‘तेल टोळी’ (ऑइल लॉबी) आहे. ती अमेरिकेतील टोळीएवढी अजस्र नसेल, परंतु त्यांचा प्रभाव आहेच.

ओकॅसिओ : संपूर्ण पर्यावरण चळवळीचे लक्ष वेधून घेताना अतिशय परिणामकारक कृती कोणती असू शकेल? सर्व घटकांना एकाच वेळी एकवटून टाकण्यासाठी तू काय केलेस?

ग्रेटा : मला वाटते, स्वीडनच्या पार्लमेंटबाहेर मी एकटीच निदर्शनाला बसले- या घटनेचा खूप परिणाम झाला असावा. ते पाहिल्यावर लोक हलले व भावनिक झाले. जगातील लक्षावधी मुले सवाल करू लागली, ‘आम्हाला भविष्यच नाही. अशा भविष्यासाठी आम्ही अभ्यास का करावा?’ हा केवळ माझाच नव्हे, तर चळवळीमधील प्रत्येकाचा प्रश्न होता.

ओकॅसिओ : स्वीडन व इतर नॉर्दकि राष्ट्रांतून (उत्तर युरोप व उत्तर अटलांटिक भागातील डेन्मार्क, आइसलँड, नॉर्वे, ग्रीनलँड या राष्ट्रांना ‘नॉर्दकि’ असे संबोधले जाते.) प्रेरणा मिळाली. अनेक जण म्हणतात, ‘बहुवंशीय लोकशाही आणि स्थलांतरितांच्या जटिल समस्या असलेल्या अमेरिकेतून हे शक्य होणार नाही. स्वीडन व इतर देशातील समाज हा एकसंध (होमोजिनियस) आहे. त्यांना एकत्र आणता येणे शक्य आहे. तुझे काय मत आहे?

ग्रेटा : स्वीडनमध्ये ऐकायला मिळते- ‘२१ कोटी लोकसंख्या असलेला चिमुकला देश हा काही इतर देशांचा प्रतिनिधी होऊ शकत नाही. आपण इतरांना मदत करण्याची भूमिका पार पाडावी.’ अमेरिका व इतर देशांतील लोक स्वीडन, डेन्मार्क व नॉर्वे यांना स्वच्छ ऊर्जेचे आदर्श मानतात. परंतु वास्तवात कार्बन पदचिन्हाबाबत जगातील आघाडीच्या दहा राष्ट्रांत आम्ही आहोत. ‘आधी कोण?’ ही चर्चाच निराशाजनक आहे. प्रत्येक देशाने पुढे आले पाहिजे.

ओकॅसिओ : अमेरिकेतही असेच ऐकायला मिळते- ‘स्वच्छ ऊर्जेबाबत चीनने आधी पुढे यावे.’ एरवी सर्रास ‘आधी अमेरिका!’ व  ‘जगातील सर्वोत्तम राष्ट्र- अमेरिका’ हा धोशा लावणारे ‘चीन तसे काही करत नसेल तर आपण का?’ असा युक्तिवाद करीत राहतात. आपण कोणत्या गोष्टीत पुढे असावे, हा खरा प्रश्न आहे. प्लॅस्टिक व तेलाचा वापर करण्यात तसेच फ्रॅकिंगमध्ये (खडकांमध्ये खोलवर जाऊन अतीव दाबाच्या पाण्याचा मारा करून नैसर्गिक वायू मिळवणे) आपण आघाडीवर आहोत, याचा आनंद घ्यायचा? मुलांच्या भवितव्याकरिता पर्यावरण जपणुकीत आघाडी घेण्याचा अभिमान बाळगायची आम्हाला इच्छा नाही असाच याचा अर्थ निघतो.

ग्रेटा : खरेच आहे. अमेरिका व स्वीडन या श्रीमंत देशांनी पुढाकार घेतला पाहिजे. गरीब देशांतील जनतेला त्यांचे जीवनमान वाढवता आले पाहिजे. आपल्या सर्व गरजा भागल्या असताना आपण पुढे होणे, हे आपले कर्तव्यच आहे.

ओकॅसिओ : होय. नेतृत्व हे लकाकणारे, दिपवून टाकणारे व अतिशय शक्तिमान असते असे लोकांना वाटते. वास्तविक नेतेपण ही कमालीची कठीण बाब आहे. नेतेपण म्हणजे मौजमजा नाही. ती एक मोठी जबाबदारी आहे. इतर कोणीही पुढे येण्याआधी आपण पुढे सरसावणे, नव्या कल्पना व मूल्यांकरिता जोखीम पत्करणे म्हणजे नेतृत्व! पुढे काय होईल व कसे फलित असेल याचा १०० टक्के अंदाज नसताना पुढे जाणे हा नेतेपणाचा गुण आहे. मागे जाणे हे सर्वात सोपे काम आहे. त्यात वेळ वाया जातो. उशीर करण्याने काळावरील नियंत्रण जाते. पर्यावरणाबाबत भविष्याचा विचार केला तर निराशा दाटून येते. खूप म्हणजे अतिउशीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर मला तुझे फार आश्चर्य वाटते. तुला निराशा येत नाही का? दिवस, महिने व वर्षे निघून जातात, तरीही काही हाताला लागत नाही, यामुळे तुला निराशा कशी शिवत नाही? (हसते.)

ग्रेटा : शाळांचे आंदोलन चालू होण्याआधी माझी अवस्था अशीच होती. मी इतकी निराश, हताश होते, की मला काहीही करावेसे वाटत नव्हते. शाळा बंद आंदोलनात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढत चालला आणि माझा आशावाददेखील वाढू लागला. लोकांना हवामानाच्या संकटाची जाणीव व माहिती नाही, हे माझ्या लक्षात आले. त्यांच्याकडून अजाणतेपणातून पृथ्वीचा विनाश होत आहे. जेव्हा त्यांना जाणीव होईल तेव्हा त्यांच्यात बदल घडेल व ते प्रत्यक्षात कृती करण्यास सरसावतील याची मला खात्री वाटते. निराशेने ग्रासलेले खूप लोक ‘आम्ही काय करावे?’ असे मला  विचारतात. मी म्हणते, ‘काहीतरी कृती (अ‍ॅक्शन) करा.’ कृती करणे हेच निराशा व दु:ख यावरील रामबाण औषध आहे. स्वीडिश पार्लमेंटबाहेर मी एकटीच बसले होते. कित्येक जण बाजूने जात होते. कोणीही ढुंकून पाहत नव्हते. त्यावेळी मला अतिशय एकाकी वाटत होते. तरीही कोणीतरी दखल घेईल ही आशा होतीच.

ओकॅसिओ : खरे आहे. छोटी कृतीसुद्धा महत्त्वाची असते. परंतु आपण त्याच्या मोजमापात (मेजरमेंट) अडकून राहतो. कधी तात्काळ यशाची अपेक्षा करतो. त्यातून नकारात्मकता व उपहास वृत्ती (सिनिसिझम) वाढत जाते. याउलट, कृती केल्याने आत्मविश्वास येतो आणि तो वाढत जातो. निराशेतून कृती न करता स्वस्थ बसणे म्हणजे चालत आले आहे ते तसेच चालू ठेवणे. हवामानबदलाचे संकट हे विश्वव्यापी असले तरी त्यामुळे येणाऱ्या स्थानिक आपत्तीतून होणारी हानी आपल्याला नक्कीच कमी करता येते. चक्रीवादळ, पूर यांपासून होणाऱ्या हानीचे प्रमाण कमी करणे हे सहज शक्य आहे. त्यासाठी तरी आपण एकत्र येऊन कामाला लागले पाहिजे.

ग्रेटा : अमेरिकेत प्रचंड प्रमाणात हवामानबदलास नाकारण्यात येते. प्रसार माध्यमांतून या संकटाला नगण्य स्थान दिले जाते असे आम्हाला ऐकायला मिळते. स्वीडनमध्येही काहीसे तसेच वातावरण आहे. पण अमेरिकेतील स्थिती फारच वाईट आहे का? तुम्हाला काय वाटते?

ओकॅसिओ : काही वर्षांपूर्वी ती फारच वाईट होती. आताशा ती सुधारत आहे. १९७० साली एक्सनमोबिल या तेल कंपनीच्या संशोधन व विकास (रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट) विभागाने हवामानबदल हे वास्तव असल्याचा निष्कर्ष काढला होता. हवामानबदलाचे परिणाम किती वाईट असू शकतात याचे अनुमान व भाकिते अचूक असल्याचे पुढे चालून अनुभवास आले. हवामानबदलास कारणीभूत असणारे कर्ब उत्सर्जन कमी करायचे असेल तर तेलाचा वापर कमी होणे आवश्यक आहे. परंतु हे निष्कर्ष त्यांचा नफा व व्यावसायिक गणिते यांच्या आड येत होते. त्यामुळे एक्सनमोबिल कंपनीने १९८९ पासून हवामानबदल नाकारणाऱ्या मोहिमांना जोरदार निधीची रसद पुरवण्यास सुरुवात केली. ‘हवामानबदल होतच नाही’, ‘कर्ब उत्सर्जन कमी करणे ही विकासावरील कुऱ्हाड’ असे म्हणणारी टोळी फारच ताकदीची होती. या टोळीच्या विचारांचा प्रभाव रिपब्लिकन पक्षाच्या बहुतांश मतदारांवर पडला होता. त्यामुळे काहीही कृती होऊ शकली नाही. मागील काही वर्षांत हवामानबदलाचे वास्तव समजून काळजी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. डेमॉक्रॅटिक पक्षाच्या ७० टक्के मतदारांना नवा हरित करार हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा वाटत असल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे. हवामानबदलाच्या बातम्या व विश्लेषण दाखवण्यास नफाकेंद्री प्रसार माध्यमे कायमच टाळत आली आहेत. त्यांचा हा नकारच हवामानबदलास नाकारणारा आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही. क्रमवारीच्या (रेटिंग) स्पर्धेत लोकांचे खरे मुद्दे समोर येत नाहीत. याबाबतीत आम्हाला काही निवडही करता येत नाही. पण मला तुला असे विचारायचे आहे- या विषयावर तरुण मुले ही अधिक प्रबळ व प्रेरक आहेत असे तुला का वाटते?

ग्रेटा : हवामानबदलामुळे आमचे भविष्यच धोक्यात आहे, आमच्या आयुष्यावर परिणाम होणार आहे. आणि याला फार काळ लागणार नाही. हे संकट आमच्यासमोर येऊन उभे ठाकले आहे. ते वरचेवर आणखी भीषण होत जाणार आहे. याची तीव्र जाणीव झाल्यामुळे आमची पिढी अस्वस्थ झाली आहे. आम्हा तरुणांना व्यवस्था व यंत्रणा (सिस्टिम) फारशी माहीत नाही. परंतु त्यातदेखील बदल व्हावा अशी आमची आकांक्षा आहे.

ओकॅसिओ : खरे आहे. तरुण  ही एक मानसिकता आहे. ते ताज्या व रसरशीत दृष्टीने जगाकडे पाहत असतात. त्यांना असंवेदनशीलतेचा त्रास होतो. त्यामुळे ते प्रत्येक बाबीवर प्रश्न विचारतात, टोकतात. कित्येकांना या प्रश्नांनी चीड येते. कारण त्यांच्याकडे उत्तर नसते. त्यामुळे तरुण हेच नीतिमत्तेचे होकायंत्र होऊन दिशादर्शन करू शकतात. अशा सामाजिक चळवळींमुळेच जगाचे शुद्धीकरण होत असते.

ग्रेटा : मला नेहमीच वस्त्रे नसलेल्या सम्राटाची कथा आठवते. तो नग्न आहे, हे म्हणण्याचे धर्य फक्त लहान मुलाकडेच असू शकते. त्यातूनच त्याच्याकडे प्रश्न विचारण्याची शक्ती येते.

ग्रेटा : धन्यवाद. मी आपली आभारी आहे.

ओकॅसिओ : धन्यवाद. तू न्यू यॉर्कमध्ये पोहोचण्याची तारीख कळव. जागतिक पातळीवर जनतेच्या मनावर राज्य करणाऱ्या छोटय़ा राणीचे भव्य स्वागत करण्यासाठी आम्ही तुझी वाट पाहत आहोत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2019 4:16 am

Web Title: excerpt from the book greta chi hak tumhala aiku yete na atul dalegaonkar abn 97
Next Stories
1 माग.. वेगळ्या प्रयोगस्थळांचा!
2 पुस्तकांशी गट्टी करताना..
3 नाटकवाला : ‘राम’
Just Now!
X