सध्या हैदराबाद पुनश्च वादंगाच्या केन्द्रस्थानी आले आहे. आंध्र प्रदेशाचे विभाजन करून तेलंगणा व सीमांध्र अशी दोन राज्ये करण्याचा निर्णय केन्द्र सरकारने नुकताच घेतला आहे. त्यावरून आंध्र प्रदेशात रण पेटले आहे. आणि त्याचा केन्द्रबिंदू आहे हैदराबाद! हैदराबाद हे आंध्र प्रदेशच्या राजधानीचे शहर. मुळात आंध्र प्रदेशच्या विभाजनासच सीमांध्रतील लोकांचा तीव्र विरोध आहे. परंतु तेलंगणवाद्यांनी गेली कित्येक वर्षे स्वतंत्र तेलंगणचा विषय पेटवला होता. त्याचीच परिणती म्हणजे आंध्र प्रदेशच्या विभाजनाचा झालेला हा निर्णय! त्यात आता निवडणुका होत आहेत. त्यामुळे सगळेच पक्ष या विभाजनाचा राजकीय लाभ आपल्यालाच मिळावा म्हणून आगीत तेल ओतत आहेत.
हैदराबादशी महाराष्ट्राचे फार पूर्वीपासून जवळचे नाते आहे. कारण निजामी अधिपत्याखाली आपले मराठवाडा व वऱ्हाड हे प्रांत होते. सव्वादोनशे वर्षांच्या निजामशाही राजवटीत हैदराबाद संस्थानात हिंदू बहुसंख्याक असूनही केवळ १५ टक्के लोकसंख्येच्या मुस्लीम राज्यकर्त्यांनी त्यांच्यावर राज्य केले. आपली भाषा व संस्कृती या ना त्या प्रकारे त्यांच्यावर थोपवण्याचा प्रयत्न केला. परंतु हिंदू जनतेने निजामी राजवट सहन केली तरी त्यांची भाषा, संस्कृती व संस्कार मात्र होता होईतो घराबाहेरच ठेवले. त्यांना आपल्या जगण्याचा भाग बनवण्यास नकार दिला. निजामांनीही आपल्या सत्तेचा अखेरचा कालखंड सोडला तर याबाबतीत फार जुलूम-जबरदस्ती केलेली दिसत नाही. म्हणूनच मुस्लीम राजवट असूनही हैदराबाद संस्थानात हिंदूंची बहुसंख्या टिकून राहू शकली.
तथापि भारतातून ब्रिटिश राज्यकर्ते निघून गेल्यावर इथल्या ज्या संस्थानिकांनी स्वतंत्र भारतात विलीन व्हायला नकार दिला, त्यांत हैदराबादचे निजाम मीर उस्मानअली खान हे अहमहमिकेने होते. पाकिस्तानचे निर्माते बॅ. जीना यांच्या चिथावणीने त्यांनी भारत सरकारला धूप न घालण्याचेच धोरण अवलंबिले होते. याचदरम्यान हैदराबाद संस्थानात कासिम रझवीने इत्तेहाद मुस्लमीन या संघटनेची सूत्रे हाती घेऊन मुस्लिमांना हिंदूंविरुद्ध भडकवण्याचे आणि त्यांची दहशत निर्माण करून लुटालूट, जाळपोळ आणि खूनबाजीचे सत्र आरंभले. हैदराबाद संस्थान भारतात विलीन होऊ नये, ते मुस्लिमांचे स्वतंत्र राष्ट्र राहावे यासाठी रझवी मुस्लिमांना चिथावत होता. निजाम उस्मानअली यांनाही हे हवेच होते. त्यामुळे त्यांनीही रझाकारांच्या या पाशवी कारवायांकडे दुर्लक्ष केले.
एकीकडे भारत सरकारचा हैदराबाद संस्थान विलीन करण्यासाठी दबाव वाढत होता खरा; परंतु निजाम उस्मानअली त्यास राजी नव्हते. काळाची पावले ओळखता न आल्याने म्हणा, किंवा ती जाणून घेण्याची इच्छाच नसल्याने म्हणा, त्यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व राखण्याचा हेका कायम ठेवला. तशीच वेळ आली तर ब्रिटिश आणि पाकिस्तान आपल्या  मदतीला धावून येतील अशी आशा त्यांना वाटत होती. त्या जोरावरच भारताच्या दबावाला बळी पडण्यास ते नकार देत राहिले. परंतु निजामी राजवटीतील हिंदू जनतेवरील रझाकारांचे वाढते अत्याचार फार काळ मुकाटपणे पाहणे भारत सरकारला शक्य नव्हते. अखेरीस सप्टेंबर १९४८ मध्ये भारताने हैदराबाद संस्थानात लष्कर घुसवून निजामाची राजवट संपवली व निजामशाही लयास गेली.
निजामशाहीच्या या अस्तपर्वाचे साक्षीदार, तसेच या मुस्लीम राजवटीलाही मानवी चेहरा देणाऱ्या, संस्थानाच्या नजीकच्या इतिहासात काहीएक भूमिका निभावणाऱ्या काही व्यक्तींची शब्दचित्रे नरेंद्र चपळगावकर यांनी ‘संस्थानी माणसं’ या मौजेने प्रकाशित केलेल्या पुस्तकात अत्यंत सहृदयतेनं रेखाटली आहेत. अर्थात ही व्यक्तिचित्रे याआधी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाली होती. त्यांचेच एकत्रित संकलन म्हणजे ‘संस्थानी माणसं’ हे पुस्तक.
दस्तुरखुद्द शेवटचा निजाम मीर उस्मानअली खान, महाराजा किशनप्रशाद, शामराज बहादूर- रायरायान, न्या. केशवराव कोरटकर, नवाब मेहदी नवाज जंग, नवाब अली यावर जंग, कासिम रझवी, मीर लायकअली, फरीद मिर्झा आणि सर मॉंक्टन अशी निजामशाहीच्या अस्तपर्वातील शासनाशी संबंधित व्यक्तींची ही रेखाटने आहेत. त्यांच्या आगळ्या व्यक्तित्वाची ओळख करून देत असतानाच निजामशाहीच्या ऱ्हासाची कारणे, त्यावेळची परिस्थिती, या काळाशी संबंधित शासनपदस्थांचे वर्तन तसेच त्यांच्या व्यक्तिगत मर्यादा असा सगळाच पट वाचकांच्या डोळ्यांसमोर उभा राहतो.
स्वत: लेखक नरेंद्र चपळगावकर यांनी निजामशाही राजवटीविरुद्धचे लोकआंदोलन वडिलांच्या त्यातील सहभागामुळे बालपणी काही अंशी अनुभवले आहे. त्यामुळे इतिहासातील साधने शोधून त्याआधारे व्यक्तिचित्र रेखाटताना प्रत्यक्ष संस्थानी जीवनाचा त्यांना असलेला स्वानुभवही कामी आला आहे. तशात कुठलीही व्यक्ती ही पूर्णपणे चांगली वा वाईट असत नाही, हा विवेक त्यांच्यापाशी असल्याने त्यांनी काहीशा अलिप्त तटस्थतेने या व्यक्तींची चित्रे रंगवली आहेत.
आपल्या राजवटीचा शेवट जवळ आला आहे हे न समजण्याइतके मूढ असलेले निजाम उस्मानअली यांचे गबाळे, शासकाला न शोभणारे व्यक्तिमत्त्व, त्यांची अक्षमता आणि ‘जैसे थे’वादी जीवन यांचे प्रत्ययकारी दर्शन निजामावरील लेखात घडते. भारताने केलेल्या लष्करी कारवाईपूर्वी हैदराबाद संस्थानात कोणती परिस्थिती होती, निजाम आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवण्यासाठी काय डावपेच खेळले, त्यात त्यांना कसे अपयश आले, याचे ‘ऑंखो देखा’ तपशीलवार चित्रण ‘सत्तेचा सूर्यास्त’ या लेखात अनुभवायला मिळते.
महाराजा किशनप्रशाद हे उत्तरेतून आलेल्या कायस्थ समाजातील पेशकार म्हणून निजामाच्या सेवेत असलेल्या घराण्यातले. आपल्या हुन्नराच्या बळावर ते मुस्लीम राजवटीत झालेले आणि तीवर दीर्घकाळ प्रभाव टाकणारे पहिलेच हिंदू पंतप्रधान. मुस्लीम आणि हिंदू जीवनपद्धती एकाच वेळी जगणारे हे गृहस्थ. दोन धर्मीयांच्या ऐक्याचे जणू प्रतीक. प्रशासक म्हणून संस्थानच्या कारभारामधील काही सुधारणांचे श्रेय त्यांना जाते.
हैदराबाद संस्थानच्या मोजक्या हिंदू जहागीरदारांपैकी एक असलेले राजा शामराज बहादूर. देवपूजा आणि ग्रंथांची आवड असलेल्या शामराज बहादुरांनी आपल्या देवडीत दुर्मीळ ग्रंथांचा संग्रह असलेले ग्रंथालय निर्माण केले होते. त्यात ऐतिहासिक महत्त्वाचे ग्रंथ जसे होते तसेच पुरातत्त्वशास्त्रासारख्या विषयांवरचे ग्रंथही त्यांनी गोळा केले होते. निजामाने त्यांची काही काळ आपल्या मंत्रिमंडळात वर्णी लावली होती. निजामी राजवटीच्या अस्तानंतर मात्र जहागिरी गेल्यावर त्यांना प्राप्त परिस्थिती स्वीकारता आली नाही आणि ते एकाकी पडले.
हैदराबाद संस्थानात न्यायाधीश होण्यासाठी विशेष शिक्षणाची अट नव्हती. याचाच लाभ घेऊन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वर आलेल्या न्या. केशवराव कोरटकर यांनी अत्यंत कष्टाने प्रथम वकील आणि नंतर न्यायाधीशपदही भूषविले. संस्थानातील मुस्लीम राजवटीच्या प्रतिकूल वातावरणातही त्यांची सामाजिक-राजकीय दृष्टी जागरूक होती. त्यातूनच त्यांनी संस्थानी राजवटीचा रोष ओढवणार नाही असे पाहत जमेल तितके सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम तिथे राबविले.
हैदराबादच्या वास्तुसौंदर्यात मोलाची भर घालणारा बंजारा हिल हा भाग विकसित करण्यात ज्यांनी दूरदृष्टी दाखवली ते मेहदी नवाब जंग. एक कलासक्त व रसिक नवाब अशी त्यांची ख्याती होती. निजामाला प्रशासनात योग्य सल्ला देणाऱ्या उदारमतवादी मुस्लीम अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश करता येईल. निजामी राजवटीत संपुष्टात आल्यावर आंध्र प्रदेशाच्या नवनिर्माणातही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली.
नवाब अली यावर जंग हे आयुष्याच्या मावळतीला महाराष्ट्राचे राज्यपाल राहिलेले एक उत्तम प्रशासक. भारताच्या भविष्यासंबंधी इंग्लंडमध्ये झालेल्या गोलमेज परिषदेत संस्थानिकांची बाजू मांडण्यासाठी हैदराबादेतून गेलेल्या शासकीय शिष्टमंडळात अली यावर जंग गेले होते. निजामाचे हितरक्षण करण्याचे काम त्यांनी त्यांच्या सेवेत असताना नेकीने केले. मात्र, पं. नेहरू आदी भारतीय नेत्यांशीही त्यांचे निकटचे संबंध होते. त्यामुळेच निजामशाही लयाला गेल्यावर नव्या व्यवस्थेत त्यांना भारतीय नेत्यांनी सामावून घेतले.  
कासिम रझवी हा रझाकार संघटनेचा नेता. हैदराबाद संस्थानच्या अस्ताची अखेरची पाने याच्याच दुष्कृत्यांनी लिहिली गेली आहेत. त्याचे चित्रही तटस्थतेने लेखकाने उतरवले आहे. निजामशाहीच्या अस्तपर्वातील अन्य कर्त्यांधर्त्यांची व्यक्तिचित्रेही या पुस्तकात आहेत. तीही विलोभनीय आहेत. बाळ ठाकूर यांचे मुखपृष्ठही अतिशय अन्वर्थक आहे.
‘संस्थानी माणसं’- नरेंद्र चपळगावकर, मौज प्रकाशन,

mayawati west up statehood
उत्तर प्रदेशचा तुकडा पडणार? मायावतींचे पश्चिम उत्तर प्रदेशाचे आश्वासन
cotton and soybean msp issue in lok sabha election
कापूस, सोयाबीनच्या दराचा मुद्दा निवडणुकीत केंद्रस्थानीच पश्चिम विदर्भातील चित्र
BJP Politics in Tamil Nadu blending caste and faith
तमिळनाडूमध्ये जात व धर्माची मोट बांधण्याचा भाजपाचा प्रयत्न! काय आहे परिस्थिती?
Sudhir Singh murder case
सुधीर सिंग हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधाराला अटक, उत्तर प्रदेशच्या जंगलात पेल्हार पोलिसांचा थरारक पाठलाग