‘‘र ती, अगं केवढी पानं तोडलीत! आता मात्र पुरे हं. तिन्हीसांज झालीय. काळोख पडायला लागलाय. झाडांना झोपायचंय. या बघू घरात सगळ्यांनी.’’ पडत्या फळाची आज्ञा घेत रतीचं मित्रमंडळ घरात दाखल झालं.
‘‘आजी, अगं ही सगळी पानं आम्हाला वहीत चिकटवायची आहेत. बाईंनी तो प्रोजेक्ट करायला सांगितला आहे. पण आम्हाला नावंच माहिती नाहीत. तू सांगशील का गं, प्लीज.’’ रतीने लाडीगोडी लावायला सुरुवात केली.
‘‘हो, पण त्याआधी आपण एक हिरवा खेळ खेळूया. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी’ हा अभंग सकाळी रेडिओवर लागतो. तुम्ही ऐकला असेल. ही वृक्षवल्ली, झाडं आपल्याला अगदी जवळच्या नातेवाईकांसारखी आहेत. नातेवाईक कसे आपल्या घरी राहायला येतात, तशीच ही झाडेही आपल्या घरात डोकावतात. झाड म्हटलं की, त्याचा कुठला भाग एकदम डोळ्यात भरतो, सांगा बघू.’’
‘‘झाडांना हिरवी पानं असतात,’’ विराजनं हळूच झाडाचं चित्र रेखाटलं.
‘‘मग कुठली हिरवी पानं घरात आढळतात. या हिरव्या सोयऱ्याविषयी एकेकानं सांगा बघू.’’
‘‘आजी, आंब्याचं पान. तू शिकवल्यामुळे प्रत्येक सणाला त्याचे तोरण करते,’’ गौरांगीने पटकन् सांगून टाकलं.
‘‘..आणि सत्यनारायण पूजेच्या वेळी तांब्यातही आंब्याची पानंच ठेवतात ना गं,’’ काहीतरी वेगळं सांगितल्याच्या आविर्भावात रती म्हणाली.
‘‘पूजेसाठी विडय़ाची पानंपण आणतो की’’ पूजेपेक्षाही विडा खायच्या कल्पनेनं सगळ्यांचे चेहरे खुलले.
‘‘केळीच्या पानावर जेवायला मला खूप आवडतं. मॉलमध्ये एका हॉटेलात केळीच्या पानांचे हिरवे चौकोनी तुकडे कापून प्लेटमध्ये ठेवतात, इतकं सुपर्ब वाटतं म्हणून सांगू,’’ गौरांगी कल्पनेनं मॉलमध्ये जाऊन आली.
‘‘गुढीपाडव्याला गुढी उभारताना कडुलिंबाची डहाळी बांधतो ना आपण. शिवाय आजोबा आम्हाला सक्तीनं काही पानं खायला लावतात.’’ त्या कडू आठवणीने ध्रुवीचा चेहरा कसनुसा झाला होता.
‘‘आणि दसऱ्याला आपण सोनं वाटतो ते,’’ विराजने टुणकन् कॉटवरून खाली उडी मारत सांगितलं.
‘‘ए, ते आपटय़ाचं पान,’’ गंधारनं ‘दादा’गिरी केली.
‘‘पूजेच्या तबकात शंकराला बेल, विष्णूला तुळस, गणपतीला दूर्वा आणि मारुतीला रुईच्या पानांचा हार असतो ना! नैवेद्य दाखवताना तुळशीचं पान लागतंच. मंगळागौरीची पूजा असली की मधुमालती, जास्वंद, तगर, गोकर्ण, मोगरा, जाईजुई, शेवंती, गुलबत्ती, तेरडा अशा कितीतरी घराभोवतालच्या झुडपांची पानं आपण गोळा करतो. आज तुम्ही तेच केलं आहे. काटे असलेला सुगंधी केवडा हे पानच आहे बरं का. आई गुलाबाचं फूल डोक्यात माळताना त्याला पान आहे की नाही हे आवर्जून बघते, खरं ना! शिवाय मोदकपात्रात मोदक उकडायला ठेवताना कर्दळीची किंवा हळदीची पानं तोडून आणायला तुम्ही एका पायावर तयार असता. स्नेहसंमेलनात आदिवासी नृत्य असलं की कमरेला आसुपालवाची पानं गुंडाळली की वेशभूषा झटपट होते. फुलपुडीची मोठी पानं बहुतेक पळसाची किंवा सागाची असतात. पळसाच्या पानांना काडय़ा टोचून केलेली जेवणाची पत्रावळ तुम्ही पाहिलीत का कधी?’’
‘‘आणि आजी, बाजारात गेले की रोज आजोबा आणतात त्या पालेभाज्या. मेथी, अंबाडी, चाकवत, आळू.. बापरे! मी पाण्याच्या घोटाबरोबर खाते.’’ नाठाळ मनाली कुरकुरली.
‘‘मला पालेभाज्यांचे पराठे खूप आवडतात, आई करते माझी,’’ रतीने स्वत:ची बाजू मांडली.
‘‘गवतीचहा घातलेला चहा माझ्या आजोबांना दररोज लागतोच. सर्दी-खोकला झाला की गवतीचहाचा काढा घरात केला जातो. गरम गरम पिताना घशाला इतकं छान वाटतं,’’ गौरांगीचे अनुभवाचे बोल बाहेर पडले.
‘‘आजी, तुझ्या लहानपणी अंगणात ब्राह्मीचं आणि माक्याचं रान होतं ना. केसाला लावण्याचं तेल घरी केलं जायचं, असं तू नेहमी सांगतेस. तुझ्या लांब केसांचं रहस्य कळलं हं मला. काय ग्रेट होती ना पणजी. गौरांगी, आजीच्या लग्नात सगळ्यांनी मिळून पाटय़ावर मेंदी वाटली होती. वाटतानाच त्यांचे हात रंगले. कोनबिन काही केलाच नाही. त्यामुळे नाजूक नक्षी नाही, नुसती फासून टाकली हातांना. गंमतच आहे नाही अगदी?’’ रती हसतहसत सांगत होती.
‘‘अतिप्राचीन काळी आदिमानव झाडाच्या झावळ्या, पानं लज्जारक्षणासाठी वापरायचा. कागदाचा शोध लागण्यापूर्वी शकुंतलेने कमलपत्रावर प्रेमपत्र लिहिले होते. कोणताही त्रास न होता आरोग्य सुस्थितीत ठेवणारा आपला आयुर्वेद म्हणजे वनस्पतींचे समृद्ध दालनच. तेव्हा हळूहळू वृक्षांशी ओळख वाढवत नाती घट्ट करू या. आता प्रोजेक्ट करताना जास्त मजा वाटेल, मग लागा कामाला.’’
‘‘हो, हो’’ करत माना हलवत सगळे वहीत पानं चिकटवण्यात गढून गेले.
SCI फन
फुग्याचे अंतराळयान
नंदिनी थत्ते nandinithattey@gmail.com
अंतराळयान खालच्या बाजूने ज्वाळा आणि धुराचे लोट सोडत अवकाशात झेपावताना आपण अनेकदा पाहतो. अंतराळयानाच्या झेपावण्यामागचे तत्त्व आपण आज या प्रयोगातून समजून घेणार आहोत.
साहित्य : एक फुगा, एक स्ट्रॉ, लांब दोरा, चिकटपट्टी.
कृती :  प्रथम दोऱ्याचे एक टोक एखाद्या खिळ्याला किंवा खिडकीच्या गजाला बांधा. नंतर दोऱ्याचे दुसरे टोक स्ट्रॉमधून ओवून समोरच्या िभतीवरच्या दुसऱ्या खिळ्याला किंवा गजाला बांधा. फुगा फुगवून त्याचे तोंड न बांधता एका चिमटीत घट्ट पकडून ठेवा. फुग्यातली हवा बाहेर निसटू न देता फुगा (चित्रात दाखवल्याप्रमाणे) चिकटपट्टीने स्ट्रॉला चिकटवा. हे आहे तुमचे अंतराळयान.
आता चिमटीत धरलेले फुग्याचे तोंड सोडताच तो दोरीच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे झेपावेल. फुगा किती वेगाने आणि किती अंतर जातो, ते पहा.
वेगवेगळ्या आकाराचे फुगे, वेगवेगळ्या लांबीच्या स्ट्रॉ आणि वेगवेगळ्या प्रकारचे दोरे वापरून फुग्याचा वेग आणि जाण्याचे अंतर कसे बदलते, त्याची नोंद घ्या. दोरी सरळ बांधण्याऐवजी तिरपी बांधून दोरीचा चढ-उतार कमी-जास्त झाल्याने काय फरक पडतो, तेही पहा.
वैज्ञानिक तत्त्व : हवा भरून फुगा फुगवल्याने आतल्या हवेचा दाब वाढून फुग्यात ऊर्जा साठते. फुग्याचे तोंड मोकळे करताच फुग्यातली हवा या ऊर्जेमुळे त्याच्या तोंडातून मागच्या दिशेने बाहेर पडते. न्यूटनच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे या क्रियेची प्रतिक्रिया म्हणून फुगा पुढच्या दिशेने ढकलला जातो. अंतराळयानामध्ये त्याच्या इंधनाचे ज्वलन होऊन बाहेर पडणारे वायूही अशाच रीतीने यानाला वरच्या दिशेने ढकलतात.  
आर्ट कॉर्नर: ड्राय डेकोरेशन
अर्चना जोशी
साहित्य : हँडमेड पेपर, मिठाईचा डबा, वाळलेल्या पाकळ्या, पाने, अ‍ॅक्रॅलिक रंग, कात्री, गम, ब्रश इ.
कृती : मिठाईच्या डब्याला हँडमेड पेपरने गुंडाळून नवा साज द्या. आतील बाजूस विरुद्ध रंगाच्या कागदाची जाड आयताकृती फ्रेम बनवा. गुलाब, गुलमोहर व कमळाच्या फुलांच्या पाकळ्या वहीत वाळवून (२ ते ३ दिवस) घ्या.  शेवंती किंवा अन्य फुलांच्या पाकळ्या, रेडिमेड फुलांच्या गुच्छातील जाड पानेही चालतील. सर्व वाळलेल्या पाना-फुलांची छान रचना करून मिठाईच्या डब्यातील फ्रेममध्ये चिकटवून घ्या. व्यवस्थित
वाळल्यावर अ‍ॅक्रॅलिक रंगात रंगवा. झाले आपले ड्राय डेकोरेशन तयार. ही कलाकृती तुम्ही भिंतीवर लावू शकता वा शोकेसमध्ये ठेवू शकता किंवा गिफ्टही देऊ शकता.


Pet Passport
पाळीव प्राण्यांना परदेशात फिरायला नेताय? मग ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात!
Shukra Gochar in Mesh
२४ तासांनी ‘या’ ६ राशींच्या नशिबाला मिळेल श्रीमंतीची कलाटणी? शुक्रदेवाच्या कृपेमुळे व्यापारात होऊ शकतो मोठा फायदा
nilesh sambre, kapil patil
“कपिल पाटील डोळ्यांची शस्त्रक्रिया करा”, नीलेश सांबरे यांचे खासदार कपिल पाटील यांना प्रत्युत्तर
farmer suicide, documentry farmer suicide
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: अचंबित करणाऱ्या गोष्टी…