हर्षवर्धन दातार – datarhr@bajajelectricals.com

पाकिस्तानमध्ये गेलो आणि एक सुखद आश्चर्याचा धक्का बसला. तिथले पाकिस्तानी सुरक्षा अधिकारी आम्हाला म्हणाले, ‘‘आप परेशान न हो, इतमिनान रखें. यहां आपका कोई सिक्युरिटी चेक नहीं होगा. आप आगे  जाये. दरबार साहिब जानेवाली बस आपका इंतजार कर रही है. आपकी यात्रा खुशगवार हो।’’ कदाचित भारत आणि पाकिस्तानमध्ये या कर्तारपूर यात्रेच्या प्रक्रियेबद्दलच्या वाटाघाटी होत असताना भारतीय यात्रेकरूंना कमीपणाचे वाटू नये म्हणून भारताने याबाबतीत विशेष आग्रह धरला असावा.  ही गोष्ट आम्हाला खूप समाधान देऊन गेली.

कर्तारपूर नारोवाल, पाकिस्तान या ठिकाणी शीख धर्माचे संस्थापक श्री गुरू नानकदेव यांचे त्यांच्या शेवटच्या काळातले वास्तव्य होते आणि नंतर त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या ऐतिहासिक ठिकाणी दरबारसाहिब गुरुद्वारा बांधण्यात आला. हा  जगातील सर्वात मोठय़ा गुरुद्वारांपैकी एक आहे, तसेच शीख संप्रदायाकरिता सुवर्णमंदिर (अमृतसर) व गुरुद्वारा नानकांनासाहिब, पाकिस्तान इतकेच दरबारसाहिब, कर्तारपूरला महत्त्व आहे.

गेल्या नोव्हेंबरमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या संयुक्त सहभागाने ‘कर्तारपूर कॉरिडॉर’चे उद्घाटन झाले. त्यामुळे भारतीय पारपत्रकधारकांना, विशेषकरून शीख यात्रेकरूंना तेथील दरबार साहिब या गुरुद्वाराला भेट देण्याची संधी मिळाली. हे पवित्र स्थान पाकिस्तानमधील नारोवाल या प्रांतात भारत-पाकिस्तान सीमेपासून ४.५ किमी अंतरावर आहे. आम्हीही हा अनुभव घ्यायचे ठरवले.

कर्तारपूर तीर्थयात्रा (kartarpur pilgrimage) या संकेतस्थळावर आम्ही आगाऊ ऑनलाइन नोंदणी केली होती. ठरवलेल्या तारखेच्या बरोबर चार दिवस आधी आम्हाला ETA अर्थात (इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल ऑथरायझेशन) मंजूर झाल्याचा संदेश आला. ही भेट फक्त एक दिवसापुरती व कर्तारपूर गुरुद्वारापर्यंतच सीमित असते. म्हणजे सकाळी जायचे आणि संध्याकाळी परत यायचे.  नोंदणी केल्याबरोबर लगेच आपल्या येथील स्थानिक पोलीस अधिकारी या भेटीच्या प्रयोजनाबाबत खात्री करून घेण्यासाठी चौकशी करतात. दोन्ही देशांमधील संबंधांतील संवेदनशीलता पाहता ते योग्यच आहे.

पाकिस्तान सरकार या भेटीकरिता २० अमेरिकी डॉलर असे अतिशय नाममात्र शुल्क आकारते. सीमेपलीकडे पाकिस्तानने जी व्यवस्था केली आहे त्यासंदर्भात हे शुल्क योग्यच वाटले. २० डॉलर शुल्क भरण्यासाठी तसेच पाकिस्तानी चलन घेण्याची सोय तेथील राष्ट्रीय बँकेने केली आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे आपल्या पारपत्रावर कोणतीही नोंदणी होत नाही किंवा पाकिस्तानला जाऊन आल्याचा शिक्काही लागत नाही. असे केले असते तर आपल्या पारपत्रधारकांना काही निवडक देशांमध्ये प्रवेशासंबंधात अडचणी आल्या असत्या. तेव्हा हे योग्यच झाले. प्रवासाच्या प्रारंभापासून ते मायदेशी परत येईपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ही फक्त ETA च्या आधारेच केली जाते. हा ETA मात्र शेवटपर्यंत काळजीपूर्वक जपून ठेवणे अतिशय गरजेचे आणि अनिवार्य आहे. कारण सीमेच्या दोन्ही बाजूला अतिशय कडक सुरक्षा व्यवस्था आहे.

अमृतसरपासून अंदाजे ५५ कि.मी. अंतरावर डेरा बाबा नानक हे आपले सीमेवरील गाव आहे. तेथे आधी आपले व नंतर सीमेपलीकडे पाकिस्तानचे इमिग्रेशन केंद्र आहे. ETA, पारपत्र व सुरक्षा तपासणी ही सर्व प्रक्रिया अतिशय सुलभ आणि विनाव्यत्यय झाली आणि त्यांच्या बसने आम्ही गुरुद्वाराकडे रवाना झालो. आपली वाहने ही फक्त आपल्या इमिग्रेशन सेंटपर्यंतच जाऊ शकतात. दरम्यान, रावी या सुप्रसिद्ध नदीचे विस्तीर्ण पात्र ओलांडून आम्ही दरबारसाहिब येथे दाखल झालो. वाटेत  ठरावीक अंतरावर दोन्ही बाजूला पाकिस्तानच्या सुरक्षा चौक्या आहेत. पाकिस्तानचे सुरक्षा तसेच शासकीय अधिकाऱ्यांचा व्यवहार अतिशय सौहार्दपूर्ण, मनमोकळा व मदतीसाठी तत्पर दिसला.

या यात्रेमध्ये आणखी एक गोष्ट प्रकर्षांने अनुभवली, ती सुरक्षा तपासणीसंबंधी. भारतात आमची व आमच्याबरोबरच्या किरकोळ सामानाची संपूर्ण सुरक्षा तपासणी झाली. (अगदी विमानतळावर होते तशी शारीरिक म्हणजे frisking सकट!) मात्र पाकिस्तानमध्ये गेलो आणि एक सुखद आश्चर्याचा धक्का बसला. तिथले पाकिस्तानी सुरक्षा अधिकारी आम्हाला म्हणाले, ‘‘आप परेशान न हो, इतमिनान रखें. यहां आपका कोई सिक्युरिटी चेक नहीं होगा. आप आगे जाये. दरबार साहिब जानेवाली बस आपका इंतजार कर रही है.आपकी यात्रा खुशगवार हो।’’ कदाचित भारत आणि पाकिस्तानमध्ये या कर्तारपूर यात्रेच्या प्रक्रियेबद्दलच्या वाटाघाटी होत असताना भारतीय यात्रेकरूंना कमीपणाचे वाटू नये म्हणून भारताने याबाबतीत विशेष आग्रह धरला असावा. ही गोष्ट आम्हाला खूप समाधान देऊन गेली.

दरबार साहिब गुरुद्वारामध्ये सर्व व्यवस्था अतिशय चोख आणि शिस्तबद्ध आहे. वातावरण खुले व तणावरहित आहे. सर्वप्रथम तेथील मुख्य अधिकारी सर्व यात्रेकरूंना भेटीबाबत सूचना व माहिती देतात. मुख्य गाभ्यामध्ये शब्द कीर्तन, अरदास हे नियमितपणे सुरू असते. भारतातून आलेले शीख भाविकसुद्धा शब्द कीर्तन, अरदास यात आवर्जून भाग घेतात. मुख्य म्हणजे संपूर्ण परिसराची स्वच्छता काटेकोरपणे सांभाळली जाते.

कर्तारपूरच्या दरबार साहिबचा परिसर हा अमृतसरच्या सुवर्णमंदिराइतकाच, किंबहुना थोडा अधिक विस्तारलेला आहे. मात्र सुवर्णमंदिराच्या तुलनेत इथे परिसर अधिक मोकळा आहे, तसेच इमारती व बांधकाम कमी आहे. आम्ही गेलो होतो त्या दिवशी वातावरण ढगाळ, कुंद व धुकट होते. त्यामुळे संपूर्ण वास्तू व परिसरही त्या अंधुक वातावरणात झाकोळलेले वाटत होते. मात्र एरवी पांढऱ्याशुभ्र संगमरवरातून बांधलेली ही वास्तू निळ्याभोर आकाशाच्या आणि स्वच्छ  सूर्यप्रकाशाच्या पाश्र्वभूमीवर अतिशय सुंदर दिसते.  मधोमध गुरुद्वाराची मुख्य वास्तू आहे. शीख धर्माच्या प्रथेप्रमाणे हात-पाय प्रक्षालन तसेच स्नान करण्याकरिता एक छोटे सरोवर आहे. पाकिस्तान व इतर देशांतून येणाऱ्या (भारत वगळून) भाविकांच्या राहण्यासाठी ‘सराय’ही आहे. एका दालनात छायाचित्रांचे तसेच पेंटिंग्जचे प्रदर्शन आहे. एक छोटा स्थानिक बाजार आहे- जेथे भाविकांसाठी स्मृतिचिन्हे, स्थानिक लोकांनी बनविलेल्या वस्तू, खजूर इत्यादी विकत घेता येतात.

परिसर सुरक्षा यंत्रणेमधील व इतर शासकीय अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी आमची आपुलकीने चौकशी केली. भेटीची सर्व प्रक्रिया, तेथील व्यवस्था आणि या भेटीबाबत आमचा अनुभव कसा होता याबद्दल अनेकदा विचारणा केली. एकूण आम्हा सर्व भारतीयांचे मनापासून स्वागत केले गेले तसेच आमची भेट ही सुखद व्हावी याकरिता सर्व मनापासून प्रयत्नशील दिसले.

अनेक पाकिस्तानी नागरिकसुद्धा शीखांच्या या पवित्र स्थानाला भेट देतात. आम्हा भारतीयांबद्दल, आमची जीवनपद्धती, भाषा, राहणीमान याविषयी त्यांना अतिशय कुतूहल आहे. विशेषकरून हिंदी चित्रपट व क्रिकेट हे त्यांचे आवडते विषय. त्यांनी आमच्याबरोबर अतिशय मनमोकळेपणाने आणि आवर्जून संवाद साधला. एकत्र फोटो व व्हिडीओ काढले.  भारत-पाकिस्तानमधील संबंध मैत्रीपूर्ण, शांतीपूर्ण असावेत असे त्यांनाही वाटते. मात्र उभय देशांतील संबंध न सुधारण्यास मुख्यत्वेकरून राजकारणी आणि प्रसार माध्यमे जबाबदार आहेत, याबद्दल सीमेच्या दोन्ही बाजूला एकमत दिसले. दोन्ही शेजारी देशांतील लोकांमध्ये सर्वसाधारणपणे शंका, कुशंका व काही प्रमाणात अविश्वास असूनसुद्धा आमच्या या भेटीमध्ये मात्र लोकसंपर्काचा सुखद अनुभव आला.

दिवसभर गुरुद्वारा फिरून, दुपारी तेथील ‘लंगर’मध्ये साध्या, पण रुचकर भोजनाचा आस्वाद घेतला, तसेच तेथे गुरुचरणी सेवाही रुजू केली. लंगरमधील स्थानिक सेवेकऱ्यांसोबत आम्ही संवाद साधला. आम्हीसुद्धा सेवेमध्ये सहभागी झालो. हे बघून त्यांना खूप समाधान वाटले. संध्याकाळी भेटीची उलटी प्रक्रिया पार पाडून सीमेअलीकडे म्हणजे मायदेशी परतलो. एक अविस्मरणीय अनुभव जो अनेक सुखद व सकारात्मक कारणांसाठी नेहमीच लक्षात राहील. भूतकाळातून प्रवास करून वर्तमानकाळात आल्यासारखे वाटले.

शून्य रेखा (zero line) म्हणजे प्रत्यक्ष सीमा ओलांडताना दोन्ही देशांदरम्यान गेल्या ७३ वर्षांतील अनेक घटना, युद्ध या सर्व गोष्टी (सर्व कडूच!) चित्रपटाप्रमाणे डोळ्यांसमोर तरळल्या आणि आम्ही काहीसे भावूक झालो. मनात विचार आला की, आज आपण सीमेपलीकडील पाकिस्तानमध्ये त्या प्रदेशात पाय ठेवला; जो एकेकाळी एकसंध भारताचा भाग होता. दोन्ही बाजूला हवा, पाणी व मातीचा सुगंध एकसारखाच आहे. आज भौगोलिक नकाशावर तसेच प्रत्यक्ष सीमारेखा आहे. फाळणीमुळे एकसंध भारताचे दोन स्वतंत्र देश झाले. एक धर्मनिरपेक्ष, तर एक धर्माधिष्ठित कट्टर इस्लामिक. नजीकच्या काळात किमान दुभंगलेली व दुखावलेली मने एक होतील, हीच सदिच्छा. या भेटीची कायमची आठवण म्हणून तेथील थोडीशी माती सोबत आणली. आपल्या मातीसारखीच ती आहे. पाकिस्तानी दहा रुपयाची एक नोट आठवण म्हणून आणली.

आम्ही तेथील गुरुद्वारामध्ये प्रवेश करताना अचानक एक विलक्षण प्रश्न पडला. माझी पत्नी धर्माने कॅथलिक आहे. तेव्हा एक हिंदू-ख्रिस्ती दाम्पत्य शीख धर्माच्या सर्वोच्च पवित्र स्थानाला भेट देत आहेत व तेही एका धर्माधिष्ठित कट्टर इस्लामिक राष्ट्रामध्ये! मानवी संबंध, चार धर्म आणि परस्परविरोधी शत्रुवत जगणारे दोन शेजारी देश या सगळ्या गोष्टी जोडणाऱ्या या प्रसंगाला, विरोधाभासाला काय म्हणावे? सर्वधर्मसमभाव की धार्मिक ध्रुवीकरण झालेल्या या काळात दोन्ही देशांमध्ये व समाजात अजून सहिष्णुता आहे, हा आशावाद?

सध्या कर्तारपूर यात्रा कोविड-१९ प्रसार रोखण्याकरिता अनिश्चित काळाकरिता स्थगित करण्यात आली आहे. मात्र, जेव्हा कधी पुन्हा सुरू होईल तेव्हा इच्छुक भारतीय यात्रेकरूंनी शीखांच्या या पवित्र स्थानाला एकदा तरी अवश्य भेट देऊन एक आगळावेगळा अनुभव घ्यावा.  kartarpur piligrimage या संकेतस्थळावर  नोंदणी व इतर सर्व माहिती, प्रक्रिया उपलब्ध आहे.