मनोहर पारनेरकर – samdhun12@gmail.com

एखादा सुसंस्कृत मराठी माणूस जेव्हा ग्वाल्हेर या ऐतिहासिक शहराबद्दल विचार करतो तेव्हा त्याच्या मनात या चार गोष्टी तरी नक्कीच येत असतील : मराठय़ांच्या इतिहासातील शिंदे (सिंदिया) घराणे, ग्वाल्हेरचा प्रसिद्ध किल्ला, सिंदिया पब्लिक स्कूल आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील ग्वाल्हेर घराणे! या शहराबद्दल माझ्या हृदयात, मनात एक खास स्थान आहे. माझी आई आणि तिच्या माहेरकडील पूर्वज हे ग्वाल्हेरचे. आणि इन्दूरस्थित नऊ वर्षांच्या बालकाने- म्हणजे मी- आपल्या लहानपणातील एक जादुई वर्ष प्रेमळ आजी आणि मामा- मामींच्या सहवासात ग्वाल्हेरमध्ये घालवलं.

46 lakhs in the bungalow and house of the corrupt Tehsildar
नोटांचे ढीग पाहून एसीबी अधिकारीही चक्रावले; लाचखोर तहसीलदाराच्या बंगला व घरात ४६ लाखाचे घबाड, कॅश मोजायला…
Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा
map
भूगोलाचा इतिहास: तो प्रवास अद्भूत होता!
Martand Sun Temple
काश्मीरमधल्या मार्तंड सूर्य मंदिराचा होणार जिर्णोद्धार, अयोध्येतील राम मंदिराशी आहे थेट कनेक्शन

या लेखात ग्वाल्हेरबद्दलच्या वरील चार गोष्टींबद्दल मी लिहिणार आहे. आणि दुसऱ्या भागात या शहराच्या माझ्या बालपणीच्या आठवणी कथन करणार आहे. (माझ्या ग्वाल्हेरमधील या वास्तव्यातच माझा आर. एस. एस.मध्ये प्रवेश झाला. या घटनेच्या बरोबर चार वर्षे आधी याच ग्वाल्हेरमध्ये भारताच्या एका भावी पंतप्रधानांचाही या संघटनेत प्रवेश झाला होता. ही व्यक्ती कोण, हे ओळखण्यासाठी फार हुशारीची गरज नाही.)

सिंदिया घराण्याचा सुमारे २०० वर्षांचा इतिहास दोन-तीन परिच्छेदांत सांगायचा म्हणजे ‘घागर में सागर भरना’ यासारखं आहे. म्हणून इथे फक्त या घराण्याचे संस्थापक राणोजी शिंदे यांचे सुपुत्र महादजी शिंदे (१७३०-९४) यांच्याबद्दल बोलू या. दक्षिणेतील टिपू सुलतानाइतकेच महादजी हे जवळजवळ वीस वर्षे (१७७० ते १७९०) उत्तर भारतातील राजे होते. उपलब्ध जागेच्या मर्यादेमुळे मी त्यांच्या जीवनात आलेल्या फक्त दोनच, पण असामान्य व्यक्तींबद्दल इथे सांगणार आहे. त्यातली पहिली व्यक्ती म्हणजे राणा खान नावाचा एक मुसलमान (जो पेशाने एक पाणक्या- म्हणजे भिश्ती होता.)- ज्याने एकदा महादजींचे प्राण वाचवले होते. दुसरी व्यक्ती फ्रेंच होती. तिचं नाव : कुम्त बेन्वा दे बोएन (Compte Benoit de Boigne)! त्याने महादजींच्या सैन्याला संपूर्ण भारतात एक प्रकारे श्रेष्ठत्व प्राप्त करून दिलं.

पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर महादजी रक्तबंबाळ व जखमी अवस्थेत एका खड्डय़ात विव्हळत पडलेले राणा खान याला दिसले. (या जखमांमुळे आयुष्यभरासाठी ते लंगडे झाले.) राणा खानने त्यांना वाचवले. त्याबद्दलच्या कृतज्ञतेदाखल शिंदे महाराजांनी राणा खानला जहागीर तर बहाल केलीच, शिवाय त्याचा शेवटपर्यंत ‘भाई’ म्हणून आदर केला. पण याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्यांनी त्याला सैनिकी शिक्षण दिलं. अंगभूत गुण आणि शौर्याच्या जोरावर राणा खानला भराभर बढत्या मिळत गेल्या आणि लवकरच तो सिंदिया यांच्या सेनापतींपैकी एक झाला.

कुम्त बेन्वा दे बोएन (Compte Benoit de Boigne) या व्यक्तीने सिंदिया यांच्या सैन्यात आमूलाग्र बदल करून त्याचा सर्वस्वी कायापालट केला. एक म्हणजे त्याने त्यांच्या सैनिकांना त्याकाळच्या अत्याधुनिक फ्रेंच लष्करी तंत्रांचं प्रशिक्षण दिलं. दुसरं म्हणजे अचूक वेध घेणाऱ्या तोफा आणि तत्सम फ्रेंच तंत्रज्ञान असलेल्या शस्त्रास्त्रांचा त्याने त्यांच्या सैन्यात समावेश केला. याचा परिणाम म्हणजे भारतातील सर्वोत्कृष्ट अशा कोणत्याही लष्कराला ते हरवू शकेल असं त्याने बनवलं.

‘भारतातील किल्ल्यांमधील सर्वात मौल्यवान रत्न’ म्हणून ग्वाल्हेरच्या किल्ल्याची ख्याती आहे आणि ती यथार्थच आहे. या किल्ल्यात अतिशय मोहक, भव्य अशी स्मारकं, देवळं आणि स्थापत्यं आहेत. उदाहरणार्थ, राजा मानसिंग तोमर यांचा राजवाडा, सास-बहू देऊळ आणि पुरातत्त्व संग्रहालय. मात्र १९७६ साली मी जेव्हा हा किल्ला पाहायला गेलो तेव्हा या सगळ्यापेक्षा दुसऱ्याच एका गोष्टीने माझं लक्ष वेधून घेतलं होतं. ही चित्तवेधक गोष्ट म्हणजे शासकीय पर्यटन विभागाच्या एका माहिती-पत्रिकेत मी वाचलेला आणि अत्यंत अचंबित करणारा एक उल्लेख! हा उल्लेख होता- किल्ल्यातील एका देवळाच्या भिंतीवर जो कोरीव लेख आहे, त्यात केलेल्या शून्याच्या समावेशाचा! लहानपणापासून आपण ऐकत आलो आहोत की, शून्याचा शोध ही भारतीयांनी जगाला दिलेली एक अमूल्य देणगी आहे. अर्थात या संशोधनाचं श्रेय सुमेरियन, बॅबिलोनियन आणि अगदी मायन संस्कृतींनादेखील देण्याचे प्रयत्न वेळोवेळी झाले आहेत. पण काही वर्षांपूर्वी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने भारतीयांचा दावा मान्य केल्यामुळे या वादावर पडदा पडलेला आहे असं वाटतं. वस्तुत: कार्बन डेटिंगच्या साहाय्याने हे सिद्ध झालेलं आहे की, या भिंतीवरील लेखन हे तिसऱ्या किंवा चौथ्या शतकातलं आहे. त्यामुळे भारतातील शून्याचा वापर आणखी कमीत कमी ४०० वर्षे मागे ढकलला जातो.

(टीप : भारतीयांच्या दाव्यावर अजूनही चर्चा घडत आहे. काही विद्वान शून्याचे मूळ कंबोडियामधील जंगलातल्या एका देवळात आहे असे प्रतिपादन करत, तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे काही विद्वान ते बकशाई हस्तलिखित आहे असे प्रतिपादन करतात. ही हस्तलिखिते मर्दान (पाकिस्तान) इथे सापडली. फाळणीपूर्वी मर्दान अर्थात अखंड भारताचाच हिस्सा होता.)

आजच्या डिजिटल युगाचा हा अजस्र डोलारा केवळ ‘शून्य’ आणि ‘एक’वरच उभा आहे याची जाणीव जेव्हा आपल्याला होते, तेव्हा भारतीयांनी लावलेल्या या क्रांतिकारी शोधाचा आपल्याला वाटणारा अभिमान रास्तच आहे असं वाटतं. पण आता जरा वस्तुस्थितीची जाणीव करून देण्यासाठी म्हणून सांगतो, की हा शोध लावल्यानंतर आपण रिप व्हॅन विंकलसारखे गाढ झोपी गेलो आहोत. तो उठला तरी आपण मात्र अजूनही निद्रिस्तच आहोत. (अर्थात् श्रीनिवास रामानुजम यांच्या २० व्या शतकातल्या नेत्रदीपक कामगिरीचा सन्मानीय अपवाद सोडून!)

मध्ययुगीन काळाच्या आधीपासून अस्तित्वात असलेल्या ग्वाल्हेरच्या किल्ल्यात ‘द सिंदिया पब्लिक स्कूल’ची स्थापना १८९७ साली माधवराव सिंदिया (१८९६- १९२५) यांनी केली. ते माधवराव सिंदिया- ज्युनिअर (१९४५- २००१) यांचे आजोबा. माधवराव सिंदिया (ज्यांचा बऱ्याचदा ‘The best Prime Minister India never had’ असा उल्लेख केला जातो.) यांनी याच शाळेत शिक्षण घेतलं, किंवा घराण्याच्या अभिमानापोटी त्यांना ते घ्यावं लागलं असं म्हणू या. तथापि आपला मुलगा ज्योतिरादित्य सिंदिया (जन्म १९७१) याच्या शिक्षणासाठी मात्र माधवराव महाराजांनी खूपच सरस अशा दून स्कूलची निवड केली.

सिंदिया स्कूलव्यतिरिक्त अर्धा डझन तरी नामांकित अशा पब्लिक स्कूल्सची स्थापना एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात झाली. ‘द दून स्कूल’ (देहरादून) आणि ‘द लॉरेन्स स्कूल’ (सनावर- हे हिमाचल प्रदेशातील कसौली हिल्समध्ये वसलं आहे.) या त्यापैकी दोन प्रमुख शाळा आहेत. या उच्चभ्रू शाळांच्या बाबतीत श्रेष्ठतेची बढाई मारण्याचा जर एखादा snobbery index असेल तर त्यात दून स्कूलचा नंबर पहिला लागेल आणि लॉरेन्स स्कूलचा दुसरा वा तिसरा आणि सिंदिया स्कूल मात्र तळाच्या जवळ असेल. मी खाली दोन याद्या देत आहे. पहिल्या यादीत दून स्कूलमधून शिक्षण घेतलेल्या प्रसिद्ध व्यक्तींची नावे आहेत आणि दुसऱ्या यादीत सिंदिया स्कूलमधून शिक्षण घेतलेल्यांची. या दोन्ही याद्यांकडे नजर टाकली तर माधवराव महाराजांनी आपल्या चिरंजीवांसाठी केलेल्या शाळेची निवड अचूक होती असंच म्हणावं लागेल. (पहिल्या यादीत हिंदी फिल्म जगतातील एकही व्यक्ती नाही, हे बरंच काही सांगून जातं.)

दून स्कूलचे प्रसिद्ध माजी विद्यार्थी : करण सिंग, पिलू मोदी, राजीव गांधी, नवीन पटनायक, अमरिंदर सिंग, ज्योतिरादित्य सिंदिया, मणिशंकर अय्यर, मोंटेकसिंग अहलुवालिया, एअर चीफ मार्शल लक्ष्मण कात्रे, अजित हक्सर (आय. टी. सी.), बी. जी. व्हर्गिस, अरुण पुरी (‘इंडिया टुडे’), करण थापर, प्रणॉय रॉय, अमिताव घोष, विक्रम सेठ, रामचंद्र गुहा, रवि मथाई (आय. आय. एम.- ए.चे संस्थापक), वसंत राजाध्यक्ष.

सिंदिया स्कूलचे प्रसिद्ध माजी विद्यार्थी : नटवर सिंग, माधवराव सिंदिया, पवन वर्मा, अमीन सयानी, जलाल आगा, सलमान खान, अनुराग कश्यप, सुरज बडजात्या आणि नितीन मुकेश.

हिंदुस्थानी संगीतातील ग्वाल्हेर घराणे

ख्याल गायकीतील सर्वात प्राचीन असं हे ग्वाल्हेर घराणं आहे. म्हणूनच त्याला सर्व घराण्यांची जननी असं संबोधलं जातं. सम्राट अकबराच्या काळात (१५५६- १६०५) जरी या घराण्याचा उदय झाला असला आणि मियॉं तानसेन या त्याच्या राजगायकाने ते अमर केलं असलं तरी या घराण्याचे अगदी सुरुवातीचे उस्ताद नाथन खान आणि पीर बक्ष (नंतर त्यांचे नातू हद्दू हस्सू खां) ग्वाल्हेरमध्ये स्थायिक झाले तेव्हापासून हे घराणं ‘ग्वाल्हेर घराणं’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. हे घराणं जरी दौलतराव सिंदिया (१७७९- १८२७) यांच्या काळात फुललं तरी त्याची खरी भरभराट होऊन ते उत्कर्षबिंदूप्रत पोहोचलं ते महाराष्ट्रात. ग्वाल्हेर गायकी महाराष्ट्रात आणण्याचं श्रेय पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर (१८४९- १९२७) यांना जातं. या घराण्यातील काही प्रसिद्ध व प्रमुख गवई पुढीलप्रमाणे (ही यादी वानगीदाखल आहे, परिपूर्ण नाही.) : बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, विष्णु दिगंबर पलुस्कर, कृष्णराव पंडित, ओमकारनाथ ठाकूर, विनायकबुवा पटवर्धन, राजाभैया पुछवाले, नारायणराव व्यास, गजाननराव जोशी, मल्लिकार्जुन मन्सूर, बी. आर. देवधर, कुमार गंधर्व, सी. आर. व्यास, मालिनी राजूरकर आणि वीणा सहस्रबुद्धे! ज्यांना ग्वाल्हेर घराण्याबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल अशा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या अभ्यासकांनी २०१४ साली दूरदर्शन भारतीने तयार केलेली दोन भागांतली दृक्श्राव्य फिल्म अवश्य बघावी.

जाता जाता सोपानने मला जे दोन प्रश्न विचारले त्यातला पहिला प्रश्न असा : ‘महादजी शिंदे यांच्या निधनानंतर केवळ दोन-अडीच दशकातच ईस्ट इंडिया कंपनीने मराठय़ांचा अखेरचा व संपूर्ण पराभव करून १८१८ साली आपलं राज्य कसं काय स्थापन केलं?’

सोपानच्या या प्रश्नाला मी दिलेलं उत्तर असं : ‘१८०० साली मराठय़ांचे चाणक्य नाना फडणवीस यांचा झालेला मृत्यू हा मराठेशाहीला बसलेला फार मोठा धक्का होता. ईस्ट इंडिया कंपनीकडून असलेल्या धोक्याची जाणीव त्यांच्याइतकी दुसऱ्या कोणत्याच भारतीय मुत्सद्दय़ाला नव्हती. ईस्ट इंडिया कंपनीला थोपवून धरण्यात ते बरेच यशस्वीही झाले होते. दुसरा बाजीराव (जन्म १७७५), यशवंतराव होळकर (जन्म १७७६) आणि दौलतराव सिंदिया (जन्म १७७९) हे तेव्हाच्या मराठेशाहीचे तरुण नेते होते. पण हे तिघेही अननुभवी होते. एकी करून इंग्रजांविरुद्ध आघाडी उभी करण्यापेक्षा आपापसातील शत्रुत्वात कटकारस्थाने करून एकमेकांवर कुरघोडी करण्यातच त्यांना जास्त रस होता. आणि तसंही हे म्हणजे आजचं मरण उद्यावर ढकलण्यासारखंच होतं. कारण आज ना उद्या इंग्रजांना भारतावर ताबा मिळालाच असता.’

सोपानचा दुसरा प्रश्न : ‘माझ्या माहितीप्रमाणे, पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांचं घराणं जयपूर अत्रौली हे होतं, ग्वाल्हेर नाही.’

माझं उत्तर : ‘सोपान, तुझी माहिती बरोबर आहे. पण हे बऱ्याच लोकांना माहीत नसेल, की सुरुवातीला जवळजवळ सहा वर्षे त्यांनी ग्वाल्हेर घराण्याच्या नीलकंठबुवा जंगम यांच्याकडून तालीम घेतली होती. आणि नीलकंठबुवा हे बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांचे शिष्य होते.’

आणि आता मराठय़ांचा इतिहास आणि ग्वाल्हेर गायकीकडून आपण ‘इंग्लिश अ‍ॅक्सेंट (उच्चार)’मुळे एकदा भारतीय संसदेत घडलेल्या एका विनोदाकडे वळू या. प्रख्यात पब्लिक स्कूलमध्ये शिकलेल्या मंडळींना त्यांच्या उंची ‘इंग्लिश अ‍ॅक्सेंट’ची बढाई मारायला फार आवडतं. याबद्दलचाच हा किस्सा : १९६० च्या दशकात सत्यनारायण सिन्हा हे आपले संसदीय कामकाज मंत्री होते. ते एक शौकिन म्हणून प्रसिद्ध असून, त्यांना विशेषकरून उंची सेंटची खूप आवड होती. ऑक्सफर्ड विद्यापीठात उच्च शिक्षण घेतलेले प्रो. हिरेन मुखर्जी हे त्यावेळी कम्युनिस्ट पक्षाचे एक खासदार व नावाजलेले संसदपटू होते. या दोघांमध्ये संसदेत एकदा पुढील संवाद झडला.

जेव्हा सत्यनारायण सिन्हा संसदेत प्रवेश करते झाले तेव्हा हिरेन मुखर्जी त्यांना आपल्या खास Oxonian Accent मध्ये म्हणाले, ‘‘And here comes kHis Fragrance.’’ त्यावर मंत्रिमहोदयांनी उत्तर दिलं, ‘‘Professor Saheb, I can never match your English accent, at least permit me some simple Scent.’’

शब्दांकन : आनंद थत्ते