|| अर्चना जगदीश

निरंजन घाटे यांच्या‘हटके भटके’ या पुस्तकात अज्ञाताचा शोध घेण्याचा ध्यास लागलेल्या अवलियांच्या कहाण्या सांगितल्या आहेत. आज माहिती महाजालामुळे जग जवळ आलं आहे. हवी ती माहिती हाताच्या बोटांवर उपलब्ध असते. परंतु त्यात उत्सुकता व नवीन शोधामागची साहसी भावना अभावानंच आढळते. कुठे जायचं असेल तर त्या जागेची थोडी माहिती जरूर असावी; पण सगळंच माहीत असेल तर ते पाहण्यातलं नावीन्य निघून जातं. कारण फार माहिती न घेता गेलं तर खुले आणि वेगळे अनुभव येण्याची शक्यता वाढते.

जेव्हा नव्या प्रदेशांची माहिती नव्हती, फारसे नकाशे उपलब्ध नव्हते तेव्हा व्यापारी आणि फिरस्ते यांच्याकडूनच जग समजायचं. म्हणूनच सिंदबादच्या सफरी आणि कॅप्टन कूकच्या प्रवासाची हकीगत मोहात पाडत असे. तेव्हा प्रत्यक्ष प्रवास करून लिहिणारे लोक आणि त्यांची वर्णनं हाच नव्यानं त्या प्रदेशात जाणाऱ्यांचा आधार असायचा. भटके लोकही नवनव्या आव्हानांना तोंड द्यायला सज्ज असायचे. असे अनेक भटके, साहसी प्रवासी व त्यांच्या डोळ्यांतून दिसणारं जग, संस्कृती हे आजही वाचकाला खिळवून ठेवतं. अशाच थोडय़ा वेगळ्या भटक्यांच्या गोष्टी घाटे यांनी या नव्या पुस्तकात सांगितल्या आहेत. अर्थात, माणसाची प्रवासाची ओढ ही माहितीप्रसार, प्रवाससाधनांच्या सहज उपलब्धतेमुळे संपलेली नाही. डोळसपणे प्रवास केला तर काहीतरी नवं गवसतंच यावर विश्वास असणारे लोक आजही आहेतच. आजच्या काळातल्या अशा भटक्यांच्या हकिगतीही यात आहेत.

आपण रिचर्ड बर्टनचं नाव आणि त्यानं केलेल्या मदिना मक्केच्या प्रवासाविषयी ऐकलेलं असतं. पण दीडशे वर्षांपूर्वी बर्टन हा मध्य-पूर्व आशिया तसेच सिंध प्रांत-कराचीत भरपूर भटकला होता व त्या काळातील लोकांच्या कामजीवनाबद्दल त्यानं भरपूर लिहून ठेवलं होतं, हे आपल्याला खचितच माहीत असतं. पुढे त्यातला काही भाग बर्टनच्या सुप्रसिद्ध ‘अरेबियन नाइट्स’मध्ये समाविष्ट केला आहे. घाटेंनी बर्टनच्या जीवनाबद्दलही बऱ्याच रोचक हकिगती सांगितल्या आहेत. बर्टनच्या दोन-तीन पुस्तकांचे संदर्भ घाटे जाता जाता देतात आणि वाचकाला ती पुस्तकं मुळातून वाचवीशी वाटतात.

इ. स. १५१५ मध्ये अपघातानं एक दर्यावर्दी अटलांटिक बेटावरच्या सेंट हेलेना बेटावर दाखल झाला. पुढची तीस र्वष तो एकटाच त्या बेटावर राहिला. त्यानंतर तब्बल तीनशे वर्षांनी- म्हणजे १८१५ साली- नेपोलियनला त्याच्या अखेरच्या काळात तिथं ठेवलं होतं म्हणून त्या बेटाकडे पुन्हा जगाचं लक्ष गेलं. ज्युलिया ब्लॅकबर्न ही ब्रिटिश लेखिका नेपोलियनची युद्धनिपुणता आणि मुत्सद्दीपणाचा अभ्यास करत होती. तिच्या लक्षात आलं की, नेपोलियनच्या अखेरच्या दिवसांबद्दल खरी माहिती उपलब्ध नाही. नेपोलियननं त्याच्या अखेरच्या सहा वर्षांच्या वास्तव्यात या बेटाशी कसं जुळवून घेतलं, त्याची जिज्ञासू वृत्ती कशी टिकून होती, बेटावरच्या लोकांशी त्याचे संबंध कसे होते.. या सगळ्याचा अभ्यास या बेटावर जाऊन ज्युलियानं केला. ‘Emperor’s Last Island’ या पुस्तकात तिनं त्याविषयी लिहिलं आहे आणि घाटेंनी त्याचा सहज परिचय करून दिला आहे.

फार्ली मोवॅट या कॅनेडीयन निसर्ग- अभ्यासकाबद्दल घाटे यांना खास प्रेम आहे. जेव्हा आक्र्टिक- म्हणजे उत्तरध्रुवीय प्रदेशाबद्दल फारच कमी माहिती होती आणि कुणीही तिथं जात नव्हतं, त्या काळात फार्ली मोवॅट तिथं प्रत्यक्ष गेला. तिथं अनेक र्वष राहून, भरपूर अभ्यास करून कॅरिबू व ध्रुवीय लांडगे आणि त्यांच्याबरोबर जगणारे इन्युईट आदिवासी यांची माहिती त्यानं सर्वप्रथम जगासमोर आणली. पुढे त्यानं पर्यावरणरक्षणाच्या चळवळीतही काम केलं. ५३ पुस्तकं लिहिली. ९३ वर्षांचं संपन्न आयुष्य जगून २०१४ मध्ये त्यानं या जगाचा निरोप घेतला. आपली दोनशे एकर जमीन त्यानं ‘नोव्हा स्कॉशिया नेचर ट्रस्ट’ला निसर्गसंवर्धनाच्या कामासाठी देऊन टाकली. त्याच्या या आगळ्या साहसाची, त्यामागच्या विचारांची गोष्ट घाटे यांनी फार आत्मीयतेनं सांगितली आहे.

या पुस्तकात गेल्या काही दशकांत अनेक भटक्या स्त्रियांनी स्थानिक लोकांना तोंड देत केलेल्या प्रवासाच्या हकिगती आहेत. त्यांत अज्ञात कुर्दी स्त्रीजीवनाचा शोध घेणारी हेन्नी हॅन्सन, रामायणातल्या आख्यायिकांची भुरळ पडून भारतात आलेली आणि हनुमानाच्या लंका ते द्रोणागिरी पर्वताच्या प्रवासाचा वेध घेणारी अ‍ॅन मुस्टो, कांगोच्या दलदलीत सरीसृपांवर काम करणारी केट जॅक्सन अशांच्या प्रवासाबद्दल वाचायला मिळते. तसेच आद्य पक्षीचित्रकार जॉन जेम्स ऑद्युबाँ, ‘जावा माणूस’- म्हणजे कपी आणि आधीचे मानव यांतला दुवा असणाऱ्या प्रजातीच्या शोधात आयुष्य खर्ची घातलेला युजीन द्युबुऑ हेही या पुस्तकात आपल्याला भेटतात.

  • ‘हटके भटके’- निरंजन घाटे,
  • समकालीन प्रकाशन,
  • पृष्ठे- १८३, मूल्य- २५० रुपये

godboleaj@gmail.com