News Flash

आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास

गांधीजींची चळवळ तिथून पुढे नेणारी होती.

|| वासंती दामले

डॉ. के. के. चौधरी यांनी लिहिलेला १०९४ पानांचा ‘आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- खंड २’ वाचायला घेण्याची सुरुवातीस धास्ती वाटली तरीही उत्सुकतेपोटी तो वाचायला घेतला. वाचताना या ग्रंथाच्या खुबी लक्षात येऊ लागल्या. जाड कागद व मोठा टाईप ग्रंथाचा आकार वाढण्यास कारण ठरले आहेत. कागदी बांधणी, किंचित लहान टाईप व थोड्या संपादनासह तो सहज ५००-६०० पानांचा होऊ शकेल. हा ग्रंथ महत्त्वाचा आहे याचे कारण विसाव्या शतकात भारतात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचे- म्हणजे असहकाराचा लढा, काँग्रेसची वाटचाल ते बेचाळीसचा लढा व स्वातंत्र्य या अवधीत घडलेल्या सर्व घटनांचे विवेचन त्यात आहे. पुस्तकाचे शीर्षक ‘महाराष्ट्राचा इतिहास’ असे आहे, कारण येथील सामाजिक इतिहास, समाजसुधारणांची वाटचाल व त्यासंबंधात घातले गेलेले वाद, शैक्षणिक विकास व सांस्कृतिक चळवळी हे अधिक सविस्तर आलेले आहे. गांधीजींची चळवळ ही मूलत: आर्थिक भान असलेली राजकीय चळवळ होती, हा लेखकाचा दृष्टिकोन यातून साधार पुढे येतो. न्यायमूर्ती रानडे व दादाभाई नौरोजी यांनी- ब्रिटिशराज भारताचे शोषण करते आहे, हे मांडले होते; पण त्याच्याशी कसे लढावे हे गांधीजींनी दाखवून दिले, हे लेखक मांडतो. खादी, चरखा व स्वदेशी ही मांडणी आर्थिकच होती.  अच्युतराव कोल्हटकरांचे म्हणणे- ‘अर्ज-विनंत्या व डेप्युटेशन यापाशी टिळकांची यत्नरेषा खलास झाली. गांधीजींची चळवळ तिथून पुढे नेणारी होती.’ या दृष्टिकोनाशी सर्वच जण सहमत होतील असे नव्हे. कारण टिळक जगले असते तर पुढे काय झाले असते याचे फक्त अनुमान करणेच शक्य आहे. परंतु लेखक या मांडणीशी सहमत आहे, कारण टिळकांच्या अनुयायांनी गांधीजींच्या चळवळीशी सतत केलेला असहकार! अ‍ॅनी बेझंट व प्रार्थना समाजाचे चंदावरकर यांनीही गांधींच्या असहकाराला स्वार्थीपणाने विरोध केल्याचेही ते दाखवतात. ‘गांधीजींची चळवळ ही धर्मद्रोही आणि धर्माचरणाविरुद्ध’ असल्याचे चंदावरकर म्हणाल्याचे उद्धृत करून लेखक म्हणतात की, ‘चंदावरकरांनी आपले धर्मज्ञान वृथा खर्च केले.’ चौधरींचे कुठलेही प्रतिपादन पुरावे दिल्याशिवाय केलेले नाही.

गांधीजींनी आपली चळवळ निळीचा सत्याग्रह, असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, वैयक्तिक सत्याग्रह आणि पुढे ४२ चे ‘चले जाओ’ व ‘करेंगे या मरेंगे’आंदोलन अशी एक एक पावले पुढे नेली. या आस्ते कदम चळवळीने ते एकाच वेळी अनेक गोष्टी साध्य करीत होते. ब्रिटिश शासनाला अजमावणे, कार्यकत्र्यांना अहिंसेच्या लढाईसाठी तयार करणे आणि जनतेसमोर ब्रिटिश शासनाचा खोटेपणा व कायद्याच्या राज्याचा पोकळपणा उघडा पाडणे… या सर्व प्रवासाचे एक सूत्र होते, ते लेखक स्पष्ट करतात. याचा अर्थ हे सर्व गांधीजींनी पहिल्यापासून आखले होते असे नाही, कारण तेही स्वत:च्या चुकांमधून पुढे जाणारे होते. त्यांना ‘त्यांचे कुठले विधान बरोबर समजावे?’ असे विचारल्यास त्यांचे उत्तर असे की, ‘शेवटचे’! कारण kconsistency is a virtue of mules’ डिसेंबर १९२९ च्या काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी त्यांनी जाहीर केले की, आता यापुढचा लढा तरुणांनी लढायचा आहे. तरुणांचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी नेहरूंना अध्यक्ष म्हणून निवडले. लेखकाचे म्हणणे, मोतीलाल नेहरूंनी आग्रह केला, वगैरे फक्त अपप्रचार आहे. सर्वात सविस्तर भाग ४२ च्या चळवळीवर आहे. याविषयी लिहिताना चौधरींनी अनेक कागदपत्रे तपासली आहेत. Quit Indial व kdo or diel या दोन्ही घोषणा कशा आल्या? त्यांना व इतर पुढाऱ्यांना अटक झाल्यास स्वयंसेवकांनी कसे वागावे? ‘करा वा मरा’ अशा तºहेच्या चळवळीत कुणी घातपात केल्यास आपली भूमिका काय राहील? ही चर्चा काँग्रेस कार्यकारिणीत झाल्याचे लेखकाने उतारे देऊन स्पष्ट केले आहे. गांधीजी यासंदर्भात तरुण कार्यकत्र्यांना म्हणतात की, यापुढचा मार्ग प्रत्येकाने आपला आपण निवडायचा आहे. शक्यतो हिंसा नको. नाइलाज झाल्यास कमीत कमी जीवितहानी व्हावी. चौधरी अनेक घटनांमधून दाखवून देतात की, हे तरुण तसे वागले व कमीत कमी जीवितहानी होईल याची त्यांनी काळजी घेतली. त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनतेपर्यंत हे उद्दिष्ट पोहोचले होते व ते त्यांना कशी मदत करत होते तेही त्यांनी साधार दाखवले आहे. पोलीस व सरकारी नोकरीत असणारे सामान्यजन या तरुणांना पैशाने, माहिती देऊन वा त्यांच्याजवळील कागदपत्रे नष्ट करून त्यांना मदत करत होते, तर ब्रिटिश सूडबुद्धीने नवनवीन कायदे आणून ही चळवळ दडपण्याचा प्रयत्न करत होते. चौधरी असेही म्हणतात की, ब्रिटिश युद्धप्रयत्नांना खीळ घालावी म्हणून घातपात केल्यास व त्यात जीव गेल्यास त्याविषयी गांधीजींनी काहीही टीका केलेली नाही.

पुस्तकाचे शीर्षक ‘महाराष्ट्राचा इतिहास’ असे असले तरी लेखकाची दृष्टी आंतरराष्ट्रीय आहे हे प्रत्येक घटनेच्या विवेचनात दिसून येते. विसाव्या शतकातील स्वातंत्र्यपूर्व महाराष्ट्रात घडणाऱ्या घटनांचे धागेदोरे भारतात घडणाऱ्या घटनांत घट्ट गुंफले गेले होते आणि भारतातील घटनांचा संबंध जगात इतरत्र घडणाऱ्या घटनांशी होताच. पुस्तकात हे सर्व धागे इतक्या सखोलपणे उकलून दाखविले आहेत, की या काळाचे अभ्यासक, माध्यमकर्मी आणि इतिहासाचे विद्यार्थी यांना संदर्भग्रंथ म्हणून हा ग्रंथ अत्यंत उपयुक्त ठरावा. शिवाय या काळाच्या इतिहासात काहीएक भूमिका बजावणाऱ्या व्यक्तींची संपूर्ण माहिती यात आहे. उदा. प्रबोधनकार ठाकरे यांचे वडील खानदेशातून भिवंडीला आले, वगैरे. विसाव्या शतकात घडलेल्या घटनांची पार्श्वभूमी, त्यासंदर्भातील माहिती आणखी तपशिलांत अभ्यासायची असल्यास कुठल्या पुस्तकांत ती सापडेल याचे संदर्भ व संबंधित घटनांचे परिणाम हेही त्यात नमूद केलेले आहे. इतिहास लेखनास आवश्यक ती तटस्थता लेखकाने बाळगली आहे. चौधरींनी यात अभ्यासलेला काळ आहे तो मुख्यत: गांधीजींचा! लेखक गांधीजींचे प्रशंसक आहेत व ते का आहेत, हेही या लेखनातून स्पष्ट होते. पण याच काळात ज्या इतर चळवळी झाल्या त्यांचे मूल्यांकन करताना त्यांचा तटस्थपणा ध्यानी येतो. उदा. कम्युनिस्ट चळवळ. त्यांचे जे काम कामगार वर्गात होते त्याबद्दल त्यांचा गौरव व ज्या चुका झाल्या त्याचे परखडपणे विश्लेषण त्यांनी केले आहे. सुभाषबाबूंचे तसेच ब्राह्मणेतर चळवळीचे विवेचन त्यांनी त्यांच्या मर्यादांसकट सविस्तरपणे केले आहे. याच संदर्भात शाहू महाराज व सयाजीरावांच्या दृष्टिकोनातील साम्य व फरक याविषयी लिहितानाही हा तटस्थपणा जाणवतो. डॉ. आंबेडकरांविषयी लिहितानाही योग्य ते संदर्भ त्यांनी दिले आहेत. या तटस्थतेचे कारण- त्यांचा अभ्यास व विषयाप्रति असणारा सच्चेपणा! ‘महाराष्ट्र गॅझेटीअर’चे संपादक म्हणून १५ वर्षे त्यांनी काम केले. त्यामुळे काही कागदपत्रे त्यांना सहज मिळाली. तसेच बैठकांसाठी दिल्ली वा जिथे जिथे म्हणून ते गेले तिथल्या अभिलेखागारांत जाऊन त्यांनी कागदपत्रे गोळा केली. त्यांना पोलिसांची कागदपत्रेही मिळाली. काही वैयक्तिक कागदपत्रेही त्यांनी मिळवली. या सगळ्या कागदपत्रांचे वाचन करणे हे काम कष्टाचे तर होतेच; शिवाय त्यांचा योग्य तो अर्थ लावणे व निष्कर्ष काढणे हे ध्यासाचेच काम होते. त्यांच्या पीएच. डी.साठी त्यांनी अनेक नेत्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्याचे संदर्भही या ग्रंथात आहेत. त्यामुळे हा ग्रंथ संदर्भश्रीमंत झाला आहे. फक्त यात पुनरुक्ती बरीच आहे. त्यामुळे साक्षेपी संपादन करताना यातील वैशिष्ट्ये जपून पुनरुक्ती टाळल्यास या पुस्तकाची उपयुक्तता वाढेल.

‘महाराष्ट्राचा आधुनिक इतिहास- खंड २’

– डॉ. के. के. चौधरी, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, पृष्ठे- १०९४, मूल्य- १५०९.

vasdamle@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2021 12:04 am

Web Title: history of modern maharashtra akp 94
Next Stories
1 थांग वर्तनाचा! : मेंदूतलं जुगाड
2 दखल : मनोज्ञ विश्लेषण
3 चवीचवीने… : सुगरण आत्या
Just Now!
X