‘नामयाचे नेटवर्किंग’ (लोकरंग, २९ मार्च ) या लेखात  रवि आमले यांनी संत नामदेव आणि बाबा नामदेवजी अशी एकाच व्यक्तीची दोन रूपे वाचकांपुढे ठेवली आहेत आणि अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या वेळी ते केल्याने प्रसंगोचित झाले आहे. एरवी लेखकाने म्हटल्याप्रमाणे नामदेवाचे सामाजिक चरित्र आपल्याला lok03फारसे माहीत नसून, आधीचे पंढरपुरातले  नामदेव आणि नंतरचे महाराष्ट्राबाहेरचे नामदेव यांमधील फरक समजल्यावर तो विलक्षण वाटतो. नामदेवाच्या पूर्वायुष्याची २६ वर्षे पाहिली तर वयाच्या २१ व्या वर्षी- म्हणजे सुमारे सन १२९१ मध्ये त्यांची आणि संत ज्ञानेश्वरांची भेट झाली असावी, अशी नोंद मराठी विश्वकोशात आहे ( खंड ८). या भेटीनंतर नामदेवांनी विसोबा खेचरांकडून उपदेश घेतला आणि त्यांचा अहंकार नष्ट होऊन त्यांना विशुद्ध भक्तीचे अधिष्ठान मिळाले. पुढे स्वत: संत ज्ञानेश्वरांनी पंढरपुरी जाऊन त्यांना तीर्थाटनाला चलण्यासाठी आग्रह केला.’  ‘मी पंढरपुरातच बरा’ अशी नामदेवाची भावना असूनही ते शेवटी तयार झाले आणि भक्तिसंप्रदायाची ती प्रचारमोहीम उत्तरेकडील तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आली.
नामदेव आणि संत ज्ञानेश्वर यांचा संबंध जेमतेम पाच वर्षे आलेला दिसतो. कारण परत आल्यावर लवकरच ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली (२५ ऑक्टोबर १२९६). त्यामागोमाग अवघ्या आठ महिन्यांत सोपान, मुक्ताई आणि शेवटी निवृत्तीनाथ समाधिस्थ (१७ जून १२९७) झाले. नामदेव या प्रसंगांचे फक्त साक्षीदारच नव्हते तर त्यांनी आपल्या अभंगातून तो मनाला भिडणारा अनुभव अजरामर करून ठेवला आहे. नामदेव समाधी / निवृत्तीचा विचार मागे सारून प्रवृत्तीकडे वळले आणि त्यांनी इतिहास घडवला. पुढील तब्बल ५४ वर्षे त्यांनी धर्माच्या प्रसारासाठी वेचली आणि तीही महाराष्ट्राबाहेर! यासाठी त्यांनी विविध भाषा आत्मसात केल्या आणि हिंदी – पंजाबीत पदे रचली. नामदेवांनी बाहेर नवी शिष्यपरंपरा निर्माण केली. तिकडेच त्यांनी आपली थोरवी सिद्ध केली म्हणून महाराष्ट्रात त्यांच्या नावे सांगावे असे क्षेत्र किंवा देऊळ नसले तरी त्यांची मंदिरे लोकांनी पंजाब, राजस्थान आणि मध्य प्रदेशात उभारली.
महाराष्ट्राबाहेर जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला त्यामागे येथील पुरोहितशाहीचे नुसते वर्चस्वच नव्हे तर राज्यकर्त्यांना हाताशी धरून माजवलेली दहशत हे कारण असेल काय, ही एक शंका आहे. कारण ब्राह्मणशाहीवर प्रतिक्रिया म्हणून नवीन धर्म सांगणाऱ्या महानुभाव पंथाच्या चक्रधर स्वामींचा शिरच्छेद प्रस्थापित पुरोहितांनी हेमाद्रीच्या साहाय्याने देवगिरीच्या रामदेवराव राजाकडून सन १२७४ मध्ये करविला होता. पुरोहितशाहीच्या वर्चस्वाखाली घडलेली ही समकालीन घटना विद्रोही जनांस संदेश देणारी होती. तसेच इथे झालेला संतांचा पराकोटीचा छळ नामदेवांनी पाहिला होता. यातून दिसत होते की वेगळा विचार मांडणाऱ्याची इथे खैर नाही, उलट त्याचे जगणे हिरावून घेणे किंवा नकोसे करणे (वाळीत टाकणे) यालाच सत्ताधारी वर्ग न्याय देणे समजत होता. त्यामुळे अशा वातावरणात शक्ती खर्चण्यापेक्षा नामदेवांनी देशत्याग करून उत्तरेकडे जाऊन सामाजिक प्रबोधनाचे तेच कार्य केले आणि आपले जीवन सार्थकी लावले, असे म्हणता येईल काय? लेखक म्हणतात त्याप्रमाणे सर्वत्र आव्हाने होती. पण त्यातही कार्य करताच येणार नाही अशी नाकेबंदी नसेल म्हणूनच ते पन्नास वर्षे आपले कार्य करू शकले.
– मुकुंद नवरे, गोरेगाव, मुंबई.