|| ज्योत्स्ना कदम

ज्येष्ठ निसर्ग चित्रकार, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे माजी अधिष्ठाता,  माजी कलासंचालक आणि ‘रापण’कार स्व. प्रा. प्रल्हाद अनंत धोंड यांच्या १११ व्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या चित्रकर्तृत्वाचे प्रदर्शन ११ ते १७ जूनदरम्यान मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरीत भरत आहे. यानिमित्ताने धोंड सरांच्या आठवणींना उजाळा देणारा ‘धवलरेषा’ हा गौरवग्रंथही प्रकाशित होणार आहे.

First glimpse of Kiran Gaikwad movie Dev manus released
‘देवमाणूस’ किरण गायकवाडच्या चित्रपटाची पहिली झलक प्रकाशित
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार

काही माणसे इतकी वेगळी आणि खास आपले वैशिष्टय़ घेऊन आलेली असतात, की ती खूप काळापर्यंत लोकांच्या स्मरणात राहतात. सुप्रसिद्ध निसर्गचित्रणकार आणि जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे माजी अधिष्ठाता प्रल्हाद अनंत (प्र. अ.) धोंड ऊर्फ ‘भाई’ यांची स्मृती आजही कलाजगतात टिकून आहे. त्यांची जलरंगातील अप्रतिम चित्रे आणि कलाजगतातल्या हृद्य आठवणी सांगणारे त्यांचे ‘रापण’ हे पुस्तक ही त्यांनी कलाजगताला दिलेली अनमोल देण आहे.

भाईंचा जन्म कोकणातल्या मालवणचा. त्यामुळे बालपणापासून समुद्र पाहतच ते मोठे झाले. हा समुद्र त्यांनी नुसता पाहिला नाही तर तो त्यांनी आपलासा केला. त्यावर जीवापाड प्रेम केले. आणि म्हणूनच तो त्यांच्या चित्रांचा आशय (Content) बनला. सागराची असंख्य चित्रे त्यांनी मनमुराद रंगवली. त्यांची सगळीच सागरचित्रे थोडय़ाफार फरकाने सारखीच वाटत असली तरी त्यातले प्रत्येक चित्र आपले लक्ष वेधून घेते. प्रत्येक चित्रातला समुद्र स्वत:ची वेगळी ओळख घेऊन आलेला असतो. जे. जे.मध्ये शिकत असताना भाईंचे सागरचित्रांचे एक प्रात्यक्षिक मला बघायला मिळाले होते. प्रत्यक्ष समोर काहीही नसताना मनानेच त्यांनी सागरचित्र रंगवले होते. जलरंगावरील त्यांचे प्रभुत्व थक्क करणारे होते. वर अथांग निळे आकाश आणि खाली पहुडलेला निळसर करडा समुद्र. त्यात लक्ष वेधून घेणारी एखादी बोट आणि किनाऱ्यावरची हळुवार पुळण त्यांनी सहजतेने आणि तरलतेने रंगवली होती. खूप काही तपशील न दाखवता नेमकेच, पण सौंदर्यपूर्ण आकारखंड वापरून त्यांनी ते चित्र साकारले होते. असे कशाने तरी झपाटून जाणे, कशाशी तरी इतके एकरूप होऊन जाणे हे मनस्वी कलाकाराचेच लक्षण असते. भाई असे मनस्वी कलाकार होते.

मालवणच्या टोपीवाला हायस्कूलमध्ये शिकत असताना पेडणेकर नावाचे ड्रॉइंग मास्तर त्यांना होते. पेडणेकर जे. जे.मध्ये शिकले होते. त्यावेळी सेसिल बर्न्‍स हे जे. जे. स्कूलचे प्रिन्सिपल होते. त्यांचे जलरंगावर विशेष प्रभुत्व होते. त्यांच्या हाताखालून हळदणकर, केतकर आदी चित्रकार शिकून बाहेर पडले होते. त्यात पेडणेकर मास्तरही होते. सेसिल बर्न्‍स यांची बरोबरी करू शकतील इतके सुंदर काम ते जलरंगात करत असत. त्यांचा प्रभाव भाईंवर होता. त्यांचे जलरंगावरील प्रभुत्व भाईंनी अगदी सहजपणे आत्मसात केले होते.

‘रापण’ पुस्तकामध्ये भाईंनी पेडणेकर मास्तरांचे शब्दचित्र अतिशय सुंदर आणि नेमके रेखाटले आहे. त्यांच्या चित्रांचे वेगळेपण आणि वैशिष्टय़ विशद करताना ते लिहितात : ‘सर्वसाधारणपणे जलरंगातील चित्र त्याकाळी फोटोच्या नकलेसारखे केले जाई. झाडाची पाने न् पाने काढणे, हँगिंग गार्डनवरून केलेल्या चौपाटीच्या देखाव्यात दूरच्या राजाबाई टॉवरच्या घडय़ाळात किती वाजले आहेत तेही दाखवणे, विक्षिप्त जांभळ्या रंगाची भडक रेलचेल करणे, घासून घासून झाडे रंगवणे.. हा त्यावेळच्या वॉटर कलरचा जमाना होता. पण पेडणेकर मास्तर याच्या पुढे गेले होते. ते आज हयात असते तर त्यांचे स्थान इतरांच्या स्पर्धेमध्येही टिकून राहिले असते. मोठा ब्रश घेऊन ते आकाश, जमीन, पाणी सर्व एकाच दमात भरायचे. कागद अगदी ओथंबून जायचा पाण्याने आणि रंगाने. त्या वाळत चाललेल्या रंगात वाळण्यापूर्वीच ते मधूनमधून घरे, झोपडय़ा यांचे तपशील सहज सोडून देत असत. संपूर्ण चित्र वाळल्यानंतर आवश्यक ते थोडे फेरफार केले की चित्र पुरे होई.’

भाईंनी पेडणेकर मास्तरांकडून जलरंगाच्या या सगळ्या खासियती आत्मसात केल्या आणि त्या बघताक्षणीच आपल्याला ओळखता येतात. भाई अगदी शेवटपर्यंत काम करत होते. मला आठवतेय, काही वर्षांपूर्वी ते केरळ बघायला गेले होते. तिथे त्यांनी बॅकवॉटरचीही बरीच निसर्गचित्रे रंगवली होती. त्या चित्रांचे एक प्रदर्शनही त्यांच्या कुटुंबीयांनी मुंबईत भरवले होते.

भाईंना मी प्रत्यक्षात दोन-तीनदाच भेटले. एकदा त्यांनी मला व (संभाजी) कदमांना आमच्या लग्नानंतर खास चहासाठी आमंत्रित केले होते. त्यावेळी ते खूप भरभरून बोलले होते. त्यानंतर आमच्या दोघांच्या चित्रांचे प्रदर्शन जहांगीरला भरले होते तेव्हा ते आवर्जून आले होते. माझे काम त्यांना आवडले होते. पुढील वाटचालीसाठी त्यांनी भरभरून शुभेच्छाही दिल्या होत्या. याहीपेक्षा भाईंची खरी ओळख मला कदमांकडून झाली. त्यांच्या बोलण्यातून भाईंचे व्यक्तिमत्त्व अधिक परिचित झाले.

१९५७ साली कदम जे. जे.मध्ये पेंटिंग विभागात शिक्षक म्हणून रुजू झाले. तेव्हा भाई सुरुवातीला टीचर्स ट्रेनिंगचे प्रमुख होते आणि नंतर ते अधिष्ठाता झाले. सुरुवातीला कदमांची आणि भाईंची विशेष ओळख नव्हती. पण स्टाफरूममध्ये रंगणाऱ्या गप्पांमुळे ती अधिक वाढत गेली. पेंटिंग विभागातले सगळे शिक्षक दुपारच्या जेवणासाठी स्टाफरूममध्ये जमत. त्यांच्यामध्ये नंतर भाईसुद्धा येऊ लागले. ते अधिष्ठाता होते. पण त्यांना आपण कुणीतरी विशेष आहोत अशी घमेंड कधीच नव्हती. माणसांमध्ये रमणे त्यांना आवडायचे. ते कधी कुणाला कमी लेखायचे नाहीत. स्टाफरूममध्ये नंतर नंतर विशेष गप्पा रंगायला लागल्या. आपण अधिष्ठाता आहोत हे काही काळ विसरून भाई दिलखुलास गप्पा करू लागले. जे. जे.मधले पूर्वीचे शिक्षक, विद्यार्थी, चित्रप्रदर्शने, तत्कालीन कलावंत आणि कलाविश्वातील वातावरण हे सगळे ते आपल्या बोलण्यातून मूर्तिमंत उभे करत. भाईंचे गाव मालवण आणि तिथला परिसर, तिथली नमुनेदार माणसे, विलक्षण घटना आणि सुंदर निसर्ग यांचे साक्षात दर्शन त्यांच्या बोलण्यातून सगळ्यांना होत असे. त्यांच्या या गप्पांच्या मैफिलीची कीर्ती साहित्यिक जगतातही पसरली आणि कधी कधी श्री. ना. पेंडसे, चिं. त्र्यं. खानोलकर, वसंत सावंत यांसारखी मंडळी स्टाफरूममध्ये येऊन बसू लागली. भाई आपल्या या गप्पांना ‘धुरांडे’ म्हणत. असे असले तरी भाईंच्या या बैठकी म्हणजे निव्वळ विनोदी गप्पा नव्हत्या. एका वेगळ्या अर्थाने त्या अतिशय गंभीर होत्या. अंतर्यामीचा कोंडलेपणा विसरून जाण्याचे ते एक साधन होते. जीवनातल्या विसंगतीबरोबरच त्यात दडलेल्या कारुण्याची तीव्र धार अंतर्यामी उमळून टाकण्याचे सामथ्र्य भाईंच्यात होते. या सामर्थ्यांचा प्रत्यय त्यांच्या या आठवणींत जागोजागी येतो.

या गप्पांना काहीएक साहित्यिक मूल्य आहे याची जाणीव कदमांबरोबर सोलापूरकर, भागवत अशा काही शिक्षकांना हळूहळू होत गेली. तेव्हा त्यांनी भाईंना विचारून पाहिले, की ते हे सारे लिहू शकतील का? पण भाईंना लेखनाचा तेवढा आत्मविश्वास नव्हता. सुरुवातीला त्यांना अजिबात खात्री नव्हती, की आपण यातून चांगले काहीतरी लिहू शकू. पण कदमांनी आणि सोलापूरकरांनी खूप प्रयत्न करून त्यांना लिहिण्यास उद्युक्त केले. कॅ. सॉलोमन यांच्या निधनाचे निमित्त झाले आणि त्यांच्यावरच्या लिखाणाने या लेखनास सुरुवात झाली. भाईंनी आठवणी सांगायच्या आणि कदमांनी त्या लिहून घ्यायच्या, हे पक्के झाले. त्याबाबतीत कदमांच्या चिकाटीला आणि निखळ वृत्तीला खरेच मानावे लागेल. कारण त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि तळमळीने हे पुस्तक प्रत्यक्षात येऊ शकले. कदमांनी स्वत:चे व्यक्तिमत्त्व अलिप्त ठेवून भाईंचे कथन जसेच्या तसे शब्दांकित केले. हे करवून घेणे तितकेसे सोप्पे नव्हते. पण कदमांनी ते अत्यंत कुशलतेने करून घेतले याची पुरेपूर जाणीव भाईंना होती.

व्यक्तिचित्रण हा भाईंच्या गप्पांचा विशेष भाग होता. त्यामुळे सबंध पुस्तकाच्या मांडणीमध्ये शक्यतो व्यक्तिचित्रणालाच प्राधान्य दिले गेले आहे. हे लेखन भाईंकडून कसे करवून घेतले, हे कदमांनी मनोगतात (‘या आठवणींची आठवण’) फार छान लिहिले आहे. भाईंमध्ये एक दृश्यकलावंत होता, तसाच एक साहित्यिकही दडलेला होता. विशेषत: माणसांना, विशिष्ट प्रसंगांना ते विलक्षण रीतीने समजून घेत. त्यातले नाटय़, वेगळेपण, माणूसपण ते नेमके हेरत असत आणि त्यातून ते त्या व्यक्तीचे वा प्रसंगाचे जिवंतपण शब्दांत उभे करत. स्वातंत्र्यपूर्व काळातील जे. जे.चे वातावरण, तसेच कॅ. सॉलोमन, जेरार्ड, सेसिल बर्न्‍स अशा ब्रिटिश चित्रकारांची व्यक्तिमत्त्वे त्यांनी सुंदरतेने उभी केलेली आहेत. विशेषत: कॅ. ग्लॅडस्टन सॉलोमन यांच्यावर त्यांनी खूप आत्मीयतेने आणि उत्कटतेने लिहिले आहे. त्याच काळातले भारतीय चित्रकार अमृता शेरगील, त्रिंदाद भोसले, चिमूलकर, चुडेकर, तासकर अशा चित्रकारांवर लिहिताना त्यांच्या चित्रांची नेमकी वैशिष्टय़े ते विशद करतात. तसेच त्यांच्यातला विक्षिप्तपणा, माणूसपण, कलंदरपणा ते नेमक्या शब्दांत मांडतात आणि एक-एक कलावंत आपल्यासमोर उलगडत जातो. बॉम्बे स्कूलमधून बाहेर पडलेले आणि नावारूपाला आलेले चित्रकार हळदणकर, देऊसकर, पणशीकर, तसेच गायतोंडे, मोहन सामंत अशा अनेक चित्रकारांची शब्दचित्रे ते मिश्किलपणे आणि तरीही यथार्थपणे मांडतात. ती मांडत असताना कुणाची फाजील स्तुती ते करत नाहीत, की कुणावर उगीचच आकस धरत नाहीत. जी व्यक्तिमत्त्वे त्यांच्या विशेष जवळ आली, त्यांच्याबद्दल मात्र ते विशेष आत्मीयतेने आणि प्रेमाने लिहितात. त्यात त्यांच्या पत्नी, चित्रकार चिमूलकर, पेडणेकर मास्तर, रतन वडकेबाई आणि संभाजी कदम यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. या सगळ्याच लेखनाला मिश्किलतेचा एक गोडवा आहे, सहजता आहे आणि एक सौंदर्यपूर्ण लयही आहे. त्यामुळे हे पुस्तक आपल्याला निखळ आनंद देते आणि एका सुंदर कलात्मक विश्वात घेऊन जाते.

भाई टीचर्स ट्रेनिंगचे प्रमुख असताना त्यांनी एक फार महत्त्वाची गोष्ट केली. ती म्हणजे शालेय शिक्षणातील बालकलेचे महत्त्व समजून घेऊन तिची योग्य ती अंमलबजावणी त्यांनी केली. पाश्चात्त्य देशांत बालकलेचा विचार ऑस्ट्रियन चित्रकार फ्रांत्झ सिझेक आणि मारियन रिचर्डसनबाईंनी रुजवला. आपल्याकडे ‘शांती निकेतन’मध्ये रवींद्रनाथ टागोरांनी तो आपलासा केला. त्याआधी आपल्याकडे तो कुणाला माहितीसुद्धा नव्हता.

बालकांची चित्रकला ही मोठय़ांपेक्षा वेगळी असते. सगळीच बालके कलावंत असतात. त्यांना मुक्ताविष्कारातून व्यक्त होऊ द्यायचे असते. या मुक्ताविष्कारातून बालांची मानसिकता, त्यांची कुवत, त्यांच्या मर्यादा आपल्याला कळतात आणि त्याप्रमाणे त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे शक्य होते. भाईंनी हा बालकलेचा अभिनव विचार आपल्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवला. त्यातून पुढे परुळेकर, बोडस यांसारख्या त्यांच्या शिष्यांनी बालकलेमध्ये खूप महत्त्वाचे काम केले आहे.

चित्रकार व शिल्पकार त्यांची कला त्यांच्या कलाकृतींतून सादर करतात. त्या कलाकृती हीच त्याची ओळख रसिकांना माहीत असते. पण हे कलावंत कसे जगतात, कसे वावरतात, त्यांचे आयुष्य कसे असते, स्वभाव कसे असतात, हे कधीच कुणाला माहीत नसते. या सगळ्यात जगण्याचे विविध विभ्रम दडलेले असतात. ‘रापण’मध्ये भाईंनी हे जगण्याचे विविध विभ्रम अगदी सहजतेने आणि तितक्याच जिवंतपणे शब्दांकित केलेले आहेत. ते वाचताना वाचक त्यात समरसून जातो. दृश्यकलाजगतात अशा प्रकारचे लेखन यापूर्वी झालेले नाही. तसे पाहिले तर हे भाईंचे आत्मचरित्र नाही किंवा तो कलाजगताचा इतिहासही नाही. पण जीवन समरसून जगताना जे रसरशीत अनुभव त्यांना आले ते वाचकांनाही हृद्य वाटतील. जगताना आपल्याला मिळालेल्या आल्हादाचा वाचकांनाही प्रत्यय येईल, हा निखळ हेतू या लेखनामागे होता. या सगळ्या लेखनात कुठेही भाईंचा मीपणा किंवा बढाई दिसत नाही. उलट, एक मर्यादित ऋजुता दिसते. व्यक्त होण्यातला निखळपणा जाणवतो.

माणसे येतात तशी ती निघूनही जातात, पण काही माणसे आपले चांगले काम मागे ठेवून जातात. तीच खरी त्यांची ओळख असते. ती त्यांना जिवंत ठेवत असते. प्र. अ. धोंड यांचे ‘रापण’ हे पुस्तक पुढच्या अनेक पिढय़ांपर्यंत त्यांची ओळख जागी ठेवील यात शंका नाही. तसेच त्यांची सागरचित्रेही रसिकांच्या मनाला आनंद देत राहतील.