01 October 2020

News Flash

इंटरनेट ऑफ थिंग्स

घरातच आपली एखादी वस्तू हरवते आणि खूप शोधूनही सापडत नाही.

घरातच आपली एखादी वस्तू हरवते आणि खूप शोधूनही सापडत नाही. आपण ती वस्तू कुठेतरी व्यवस्थित ठेवली आहे, एवढंच आपल्याला आठवत असतं. पण कुठे, हे काही केल्या आठवत नाही. अशा वेळी गुगल सर्चसारखं घरातल्या हरवलेल्या वस्तूही शोधता यायला हव्यात असं तुम्हाला कधी वाटलं आहे का? त्यासाठी काय लागेल?

तर.. सगळ्या वस्तू एका नेटवर्कद्वारे जोडल्या गेल्या आणि काही माहिती (जसं की, त्यांची जागा) जर त्या नेटवर्कवर कळवू शकल्या तर हे शक्य होईल. मागील काही वर्षांत ज्या पद्धतीनं नवीन तंत्रज्ञान येत आहे, ते पाहून आपल्यालाही मनात कुठेतरी माहिती आहे की, पुढे जाऊन असं काहीतरी तंत्रज्ञान निर्माण होणं नक्कीच शक्य आहे. पण पुढे जाऊन कशाला? आताच.. गेल्या काही वर्षांत आपण त्या दिशेनं बरेच पुढे आलो आहोत.

आज आपण ज्यास ‘इंटरनेट’ म्हणतो, ते म्हणजे संगणकांचं एक जाळं आहे. संगणक, स्मार्ट फोन, टॅबलेट यांसारख्या साधनांनी आपण इंटरनेटशी जोडले जातो. पण आपल्या रोजच्या आयुष्यात आपण या गोष्टी सोडून इतर अनेक वस्तूही वापरतो. उदाहरणार्थ- अलार्म, पाणी तापवण्याचे गिझर, फ्रिज, विजेचे दिवे, मोटारसायकल, कार आणि इतर अनेक हजारो गोष्टी. माणसांप्रमाणेच उद्या या वस्तूही इंटरनेटद्वारे एकमेकांशी संवाद साधू लागल्या आणि त्यानुसार काम करू लागल्या तर? वस्तूंच्या इंटरनेटच्या या संकल्पनेला ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’ (Internet Of Things – IoT) असे म्हणतात.

‘इंटरनेट ऑफ थिंग्स’मध्ये अर्थातच वस्तू सध्या आहेत तशाच वापरता येणार नाहीत. त्या वस्तूंना ‘स्मार्ट’ बनवावं लागेल. या स्मार्ट वस्तूंमध्ये सेन्सर्स असतात, जे आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीची माहिती गोळा करू शकतात. उदाहरणार्थ, आपण वापरत असलेल्या स्मार्ट फोनमध्ये कितीतरी सेन्सर्स आहेत, ज्याद्वारे आपण कुठे आहोत हे समजते GPS); आपला फोन सरळ आहे, आडवा आहे की उलटा, हे कळते (Accelerometer); फोनचा वेग किती आहे, हे समजते (Pedometer); याशिवाय दिशादर्शक, बारकोड वाचणारे, हृदयाचे ठोके मोजणारे असे अनेक सेन्सर्स आपल्या फोनमध्ये आहेत. या सर्वामुळे आज आपण अनेक गोष्टींसाठी आपला स्मार्ट फोन वापरू शकतो.

‘इंटरनेट ऑफ थिंग्स’मधल्या वस्तूदेखील अशाच प्रकारे माहिती गोळा करू शकतील. स्मार्ट बनण्यासाठी लागणारी पुढची गोष्ट म्हणजे- इंटरनेटवर इतर गोष्टींशी संवाद करण्याची क्षमता! संवाद हा दुहेरी असतो; म्हणजेच या वस्तूंना जमा केलेली माहिती इंटरनेटद्वारे दुसऱ्यांना- माणसांपर्यंत वा इतर वस्तूंपर्यंत- पोहोचवता आली पाहिजे. तसेच इतरांकडून आलेल्या माहितीनुसार त्यावर कृती करणंही जमलं पाहिजे.

‘इंटरनेट ऑफ थिंग्स’चे आपल्या दैनंदिन आयुष्यात तसेच औद्योगिक विश्वात खूप सारे उपयोग आहेत. फिटनेस बँड, स्मार्ट वॉच ही याचीच काही उदाहरणे. स्मार्ट होम्सअंतर्गत येणाऱ्या घरातल्या खूप साऱ्या सोयीसुविधा- जसे की- तुम्ही उठण्यापूर्वीच सुरू झालेला गिझर, संध्याकाळ होताच स्वत:हून लागणारे दिवे, दूध संपलं आहे हे बघून ते स्वत:च ऑर्डर करणारे फ्रिज आदी ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’मुळे शक्य आहेत. अगदी पुलंनी वर्णन केलेलं घर- ज्यात नको असलेले पाहुणे आले की दाराशीच त्यांना एक कुत्रा चावतो, हेही ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’मुळे होऊ  शकतं! गमतीचा भाग सोडला, तर याचा वापर करण्याच्या अमर्याद शक्यता आहेत- ज्या पूर्णपणे माणसाच्या कल्पकतेवर अवलंबून आहेत. त्यामुळेच येणाऱ्या काळात ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’ आपलं पूर्ण जीवनच बदलून टाकेल असं म्हणता येईल.

औद्योगिक विश्वात तर याचे खूपच फायदे आहेत. चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये (Fourth Industrial Revolution किंवा इंडस्ट्री ४.0) ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’ हा एक महत्त्वाचा घटक आहे. औद्योगिक प्रक्रियेमध्ये कार्यक्षमता वाढवून किंमत कमी करणे आणि ग्राहकांना उत्तम सेवा पुरवणे यासाठी ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’चा उपयोग होतो आहे. याचे एक उदाहरण म्हणजे तुमच्या गाडीमध्ये बसवलेला सेन्सर तुमच्या गाडीची माहिती गोळा करून इंटरनेटद्वारे त्या गाडीच्या कंपनीला पाठवत राहील. त्या माहितीचे विश्लेषण करून कंपनी गाडीत काही समस्या आहे का, किंवा येणाऱ्या काळात निर्माण होण्याची शक्यता आहे का, हे बघू शकेल आणि त्यानुसार ग्राहकांना कळवू शकेल. तसेच जर एखादी समस्या खूप साऱ्या गाडय़ांमध्ये येत असेल तर त्यावरूनही ते त्यांच्या प्रक्रियेमध्ये बदल करून सगळ्यांसाठीच उपाययोजना करू शकतात.

‘इंटरनेट ऑफ थिंग्स’मध्ये बऱ्याच माहितीची देवाणघेवाण इंटरनेटच्या माध्यमातून होत राहते आणि अशा बऱ्याच वस्तू या येणाऱ्या माहितीच्या आधारे काम करतात. यामुळे इंटरनेटवरचे जे धोके असतात, ते इथेही लागू पडतात. सुरक्षितता आणि गोपनीयता हा निश्चितच कळीचा मुद्दा आहे आणि येणाऱ्या काळात ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’ किती वेगाने वाढेल, हे सर्वस्वी त्यावर अवलंबून आहे. नवीन तंत्रज्ञान, त्यामुळे निर्माण होणाऱ्या नवीन शक्यता आणि समस्या, त्याची तंत्रज्ञानानंच शोधलेली नवीन उत्तरं हा नावीन्याचा आणि नवनिर्मितीचा खेळ तर चालूच राहणार. तंत्रज्ञानामुळे होणारे बदल समजावून घेणे आणि योग्य वेळी ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करणे हे मात्र आपल्याला करता आलं पाहिजे!

parag2211@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2019 12:09 am

Web Title: internet of things
Next Stories
1 काळ्या मुंग्यांची रांग
2 म्यानमारचा जलोत्सव
3 बँकिंग व्यवस्थेला राजकीय वाळवी!
Just Now!
X