आयपीएल सामन्यातील स्पॉट फिक्सिंग उघड झाल्यावर क्रिकेटमधील पैसा, अनैतिकता आणि स्वैराचाराची पुन्हा चर्चा चालू झाली आहे. पण प्रश्न केवळ क्रिकेटचा नसून एकंदरच आपल्या सांस्कृतिक दांभिकपणाचा आहे. नियमांच्या नावाने पळवाटा काढायच्या, आडमार्गाने पुढे जाण्याच्या क्लृप्त्या शोधायच्या आणि बोंबाबोंब झाली की साळसूदपणाचा आव आणायचा. फिक्सिंगमध्ये अडकलेल्या एकेकाची नावे जसजशी पुढे येऊ लागली आहेत, तसतसा त्यांचा खरा चेहरा उघड होतो आहे. या प्रवृत्तीचा समाचार घेणारे विशेष लेख..
स रळ, कायदेशीरपणे करता येणारी गोष्ट आडवाटेने करायची ही देश म्हणून आपली संस्कृती बनून गेली आहे. नियमांच्या रस्त्यात अशी एक चोरवाट ठेवायची, की तिचा वापर करायचा मोह झालाच पाहिजे. अशी व्यवस्था अधिकृतपणेच केली जाते. उदाहरणार्थ पगारदाराला मिळणाऱ्या वेतनात एक उत्पन्न मार्ग असा ठेवायचा, की ते मिळविण्यासाठी त्याला खोटेपणा करावाच लागेल. किंवा निवडणुकांच्या खर्चाची मर्यादा इतकी कमी ठेवायची, की प्रत्येक उमेदवाराला खोटे हिशेब देण्याशिवाय पर्यायच राहणार नाही. किंवा बँकांसाठी कर्ज देण्याचे असे नियम करायचे, की ते पाळण्यासाठी त्यांना असत्याचाच आधार घ्यावा लागेल. किंवा कोणीही पाळणार नाही हे माहिती असताना राज्यभर दारूबंदी जाहीर करून टाकायची.
अशी हवी तितकी उदाहरणं देता येतील.
या कार्यसंस्कृतीमुळे होतं असं, की विचारांची, नियोजनाची झेप छोटीच राहते. माणसं आपली छोटी छोटी पापं लपवण्याच्या प्रयत्नातच आपला वेळ आणि ऊर्जा खर्च करतात. भव्य असं काही करावं असं त्यामुळे सुचतच नाही.
फिक्सरांचा उदय या वातावरणात होतो.
दमट वातावरणात काही प्रकारच्या मुंग्या किंवा ढेकूण कसे घरात वाढतात, तसं हे. हे वातावरण फार काळ राहणं जसं घरातल्यांच्या प्रकृतीसाठी चांगलं नसतं तसंच देशातल्या या वातावरणाविषयीही म्हणता येईल. गेल्या आठवडय़ात o्रीशांत आणि दोन-चार जण क्रिकेटच्या सामन्यांचं फिक्सिंग करताना पकडले गेल्याने हे वातावरण ढवळलं गेलं आणि सगळीकडे एकदम नैतिकतेचा पूरच आला. त्यामुळे वातावरण जरा आणखीनच दमट बनलं. हे सगळे प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला आले. सगळ्यांनी अहमहमिकेनं क्रिकेटचं कसं अध:पतन होतंय वगैरे मुद्दे तावातावानं मांडले. क्रिकेट आणि राजकारणाबाबत आपल्याकडे सर्वानाच सर्व काही कळत असतं. त्यामुळे सगळ्यांनीच हे सगळं बंद करण्यासाठी काय करता येईल यासाठी उपाय सुचवले. पण रामेश्वरात आग लागल्यावर सोमेश्वरात पाण्याचे बंब पाठवण्यासारखाच हा प्रकार. कारण प्रश्न क्रिकेटचा नाहीये. तो आहे आपल्या सामुदायिक सांस्कृतिक समजुतीचा. तेव्हा आपली पारंपरिक नजर बाजूला ठेवून जे काही झालं त्याकडे पाहिलं तर काय दिसेल?
तर जुगार ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. यातला जुगार हा शब्द मनातल्या मनात जरी मोठय़ांदा उच्चारला तरी माणसं आसपास कोणी ऐकलं तर नसेल ना, या भीतीनं आसपास बघतात. वास्तवाकडे डोळे बंद करून पाहण्याची सवय झाल्यामुळे हे असं होतं. खरं म्हणजे अगदी छोटय़ा छोटय़ा गोष्टीतही आपण जुगारी पद्धतीनं बघत असतो. म्हणजे दोन लहान भाऊ संध्याकाळी वडील कामावरून घरी येताना काय खाऊ आणतील यावर ‘बेट’ लावतात. तो जुगार नसतो? आपल्या महाविद्यालयीन काळात जवळपास प्रत्येकानं एकदा तरी (किमान) वर्गातली अमुक एक मुलगी कोणत्या रंगाचा ड्रेस घालून येईल यावर ‘बेट’ लावलेली असते. तो जुगार नसतो? अगदी सात्त्विक घरांतसुद्धा क्रिकेटचा सामना पाहताना नाणेफेक कोण जिंकेल यावर बेट लागते. तो जुगार नसतो?
अर्थातच या सर्व बेट्स तशा निधरेक असतात, हे उघड आहे. त्यात गुंतलेल्यांना काही कोणी बेटर्स वा बेटिंग करणारे असं म्हणणार नाही. पण म्हणून काही त्या जुगार नसतात, असं म्हणता येणार नाही. तेव्हा मुद्दा इतकाच की, जुगार ही मानवी प्रवृत्ती आहे हे आपण मान्य करायला हवं. मग ते महाभारत असो की वर्तमान. जुगाराची भूक अनेकांना आवरता येत नाही.
तेव्हा प्रश्न हा की ती नियंत्रित कशी करता येईल? पण आपण मुळात लोक जुगार खेळणारच नाहीत असंच गृहीत धरतो आणि समोर घाण दिसली की गालिच्याखाली लपवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे होतं हे की जुगार नियंत्रितही होत नाही आणि बंद होण्याचाही प्रश्न येत नाही. त्यापेक्षा लोक जुगार खेळणार.. तेव्हा तो उत्तम, गोळीबंद नियमांनी नियंत्रित करू या.. त्यामुळे ज्यांना इच्छा आहे त्यांना तो खेळता येईल आणि जाता जाता चार पैसे सरकारलाही मिळतील.. हे चार पैसे मग भल्या कामासाठी वापरता येतील.. इतका प्रामाणिक विचार आपण सांस्कृतिकदृष्टय़ा करूच शकत नाही. आपली संस्कृती किती थोर थोर आहे, असं सांगत आपण नैतिकतेचे डोस घाऊकपणे पाजायला जातो. हाती काहीच लागत नाही. या उलट संस्कृतीचे गोडवे वगैरे न गाणाऱ्या पाश्चात्त्य देशांनी खेळांवरचा आणि अन्यही जुगार नियमित केले आणि ते खेळणाऱ्यांना त्याचा आनंद देता देता स्वत:च्या कनवटीला चार पैसेही जोडले.
त्यामुळेच वर्तमानाकडे डोळसपणे पाहिलं तर आणखी एक जाणवेल. फिक्सर्सचा सुळसुळाट तिसऱ्या म्हणता येईल अशा जगात जास्त आहे, कारण याच जगात दांभिकता ठासून भरलेली आहे. पाश्चात्त्य देशांत उघडपणे लॉबिस्ट असतात. म्हणजे अगदी आपण ज्यांना मुत्सद्दी म्हणतो, त्यांच्यासमोर कंबरेत वाकून बोलतो ते हेन्री किसिंजर देखील स्वत:च्या परिचय पत्रावर उघडपणे अमुक कंपन्यांचे लॉबिस्ट असं प्रामाणिकपणे छापतात. सरकारदरबारी कामं करून घेण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न करावे लागतात. कारण सरकारला सर्व काही माहीत असतं असं नाही आणि कंपन्यांना सरकार कसं चालतं हे माहीत असतं असं नाही. तेव्हा अशा वेळी हे लॉबिस्ट मदतीला येतात. आपण ही व्यावसायिक गरज आहे हे मान्यच करत नाही. मग संरक्षणसामग्रीत दलाली देताघेताना कोणी पकडलं गेलं की तेव्हढय़ापुरते हादरतो.
आपल्याला हे कळत नाही की या सांस्कृतिक खोटेपणामुळे लॉबिस्टचे मग फिक्सर होतात. लॉबिस्ट फक्त ठरावीक टप्प्यापर्यंतच प्रयत्न करतो. फिक्सर थेट निर्णय आपल्याच पदरात पाडून घेतो.
आता मुद्दा o्रीशांत आणि अन्य मंडळींचा. त्यानं जे काही केलं ते फिक्सिंग होतं. ते खरं पाप. पण इतर इतकी पापं ज्या वातावरणात घडतात आणि सहजपणे पचवून घेतली जातात त्या वातावरणात त्यालाही पाप करायचा मोह झाला. तो व्हायला नको होता, हे तर खरंच. पण त्यामुळे त्याला दोष देता देता वातावरणालाही दोष द्यायलाच हवा. ज्या वातावरणात काहीही फिक्स होतं त्या वातावरणात एखाद्या सामन्यात एखादं षटक फिक्स केलं तर काय बिघडलं असं त्याला वाटलं असेल तर त्याचा काय दोष? क्रिकेट नियामक मंडळाचा प्रमुखच स्वत:च्या मालकीचा संघ आयपीएल स्पर्धेत उतरवू शकतो, हे फिक्सिंग नाही का? त्याच्या मालकीच्या संघाचा कप्तानच देशाच्या संघाचा कप्तान असतो, हे नाही फिक्सिंग? तामिळनाडूत o्रीलंकेच्या विरोधात निदर्शनं झाल्यावर त्या राज्यातल्या खेळल्या जाणाऱ्या आयपीएल सामन्यापुरतीच o्रीलंकेच्या खेळाडूंवर बंदी घातली जाते, त्याचा फायदा बरोबर क्रिकेट नियामक मंडळाच्या प्रमुखांच्या मालकीच्या संघालाच मिळतो, हे नाही फिक्सिंग? मुळात क्रिकेट नियामक मंडळ देशासाठी खेळणारा क्रिकेट संघ निवडतो हीच बाब खोटेपणाची परिसीमा आहे. एखादी खासगी कंपनी असावी तसेच क्रिकेट नियामक मंडळ हे आस्थापन आहे. त्यांच्यासाठी खेळणारा देशासाठी खेळतो हा समज हेच देशातलं आतापर्यंतचं सर्वात मोठं भावनिक फिक्सिंग नाही का? याच समजाच्या पोटातून आलेली.. क्रिकेटपटू देशासाठी खेळतात.. ही भावनादेखील सांस्कृतिक फिक्सिंगच आहे हे आपण मान्य करणार का? मुदलात अमुकतमुक करून देशाची सेवा केली या विधानासारखा भंपकपणा दुसरा कोणता नसेल. कोणीही जे काही करतो ते स्वत:साठीच करतो. तेव्हा नाटय़प्रयोगानंतर दारू ढोसून पडणारे अभिनेते आर्थिक विपन्नावस्था आल्यावर सरकारी मदतीच्या याचना करताना.. इतके दिवस आम्ही रंगभूमीची सेवा केली.. वगैरे शब्दप्रयोग करतात तेव्हा आपल्या सांस्कृतिक लबाडीचं जाहीर प्रदर्शन करत असतात. आपण विश्वास ठेवतो असल्या शब्दांवर आणि खोटय़ा भावनांवर!
..आणि मग फिक्सरांचा जन्म होतो, कारण ते या भावनांना व्यावहारिक यश मिळवून देतात. अभिनेत्यांना, कलाकारांना, खेळाडूंना  पुरस्कार मिळवून देतात, जागा देतात. ज्याला हवंय त्याला ते मिळवून देतात. त्यापेक्षा अभिनेत्याला, कलाकाराला, खेळाडूला उत्तम पैसा मिळायला हवा आणि त्यातून त्याचा चरितार्थ चालायला हवा.. अशी व्यवस्था आपण करत नाही. तसं करायचं तर भाबडेपणा सोडावा लागेल. ते आपल्याला करायचं नसतं. खोटय़ा भावना जपताना खरे आर्थिक लाभ पदरात पाडून घ्यायची सवय लागते आपल्याला. मग सचिनच्या गाडीवरचा कर माफ करायचा निर्लज्जपणा आपण दाखवतो. तेव्हा आपल्याला हे माहीत नसतं की स्टेफी ग्राफ कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर असतानादेखील तिच्या कर भरण्यात चूक झाली म्हणून तिच्या वडिलांना जर्मन सरकारनं तुरुंगात डांबलं होतं. स्टेफी भारतीय असती तर मुळात तिला कर लावलाच गेला नसता आणि त्यातूनही लावला गेला असता तर अमरसिंग किंवा ललित मोदी किंवा राजीव शुक्ला किंवा गेलाबाजार अविनाश भोसले किंवा आणखी कोणी तरी तिचं प्रकरण मिटवून दिलं असतं.  
तेव्हा फिक्सर ही आपली गरज बनून गेली आहे. अगदी दुनिया मुठ्ठी में घेऊ पाहणाऱ्या उद्योगांना सुरुवातीच्या काळात अशा फिक्सरांनीच मोठं केलं आणि मग असे उद्योग हेच मोठे फिक्सर बनले. त्यातले जे प्रचंड मोठे झाले ते सरकारचं धोरण किंवा कररचना फिक्स करतात. औद्योगिक धोरण फिक्स करतात. विरोध करणाऱ्या राजकारणी, कार्यकर्त्यांनाही फिक्स करतात. वर्तमानपत्रं, वाहिन्यांशी गुप्त करार करून मजकूर फिक्स करतात. इतकंच काय जनतेच्या मनात आपल्याविषयीची प्रतिमादेखील फिक्स करतात.
तेव्हा या फिक्सरांच्या देशात o्रीशांत आणि मंडळींनी काही सामने फिक्स करायचा प्रयत्न केला आणि तसं करताना ते पकडले गेले म्हणून काय तो गहजब! आपला आक्षेप आहे तो पकडलं जाण्याला.. कारण पकडले जात नाहीत त्यांनी केलेलं फिक्सिंग आपण मुकाट मान्य करतोच की!   

Confusion on Virat's wicket in , KKR vs RCB match
KKR vs RCB : आऊट की नॉट आउट? अंपायरच्या निर्णयावर विराट कोहली दिसला नाराज, जाणून घ्या काय आहे नियम?
A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
police case marathi news, prithvi shaw marathi news
‘पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश द्या’, पृथ्वी शॉविरोधात गुन्हा न नोंदवल्याचे प्रकरण
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”