lr03आधनिक मुंबईच्या जडणघडणीचे एक शिल्पकार जगन्नाथ शंकरशेट यांच्या १५० व्या स्मृतिवर्षांची सांगता ३१ जुलैला होत आहे. मुंबईच्या विकासासाठी आपली शेकडो एकर जमीन देणाऱ्या नाना शंकरशेट यांच्या स्मारकासाठी मुंबईत अवघी दीड हजार चौ. फूट जागा महापालिकेने मोठय़ा कष्टाने दिली, यापरते दुर्दैव ते कोणते? या तुटपुंज्या जागेवर आज त्यांचे स्मारक उभे राहत आहे. त्यानिमित्ताने या महापुरुषाच्या कार्याचे स्मरण..
बईला आधुनिकतेच्या महामार्गावर नेणाऱ्या महारथाची दोन चाके म्हणजे जमशेटजी जेजीभाई बाटलीवाला (१७८३-१८५९) आणि जगन्नाथ शंकरशेट ऊर्फ नाना मुरकुटे (१८०३-१८६५) या दोघांचा वेगवेगळा विचार करताच येत नाही, इतके त्यांचे कार्य परस्परावलंबी होते. दोघेही मुंबई शहराचे शिल्पकार. दोघेही यशस्वी व्यापारी. मुंबई विद्यापीठाची स्थापना (१८५७) होऊन त्यातून अभ्यासू, विचारक्षम स्नातक बाहेर पडून समाजाचे नेतृत्व करू लागण्यापूर्वी या समाजहितेच्छू शेटिया व्यापारी नेत्यांकडे अखिल समाजाचे नेतृत्व होते. जमशेटजी पारसी समाजाचे नेते होते, तर नाना हिंदूंचे. प्रत्येक लहान-मोठय़ा समाजाचे नेतृत्व करणारे धनिकवणिक होते. या छोटय़ा-मोठय़ा  नेत्यांनी सामाजिक सलोखा राखण्याचे कार्य केले तसेच आपापल्या समाजात सुधारणा व्हावी, अन्याय दूर व्हावा, यासाठीही प्रयत्न केले. जमशेटजी आणि नाना हे या सर्व नेत्यांचे नेते होते. ते स्थान त्यांनी आपल्या आचरणाने आणि सचोटीच्या बळावर कमावलेल्या विश्वासार्हतेने मिळवले होते.
व्यापारात मिळवलेल्या पैशावर केवळ आपला अधिकार नाही, परमेश्वराने या पैशाच्या विनियोगाने जनहितार्थ कामे करण्याची संधी आपल्याला दिली आहे, असे मानणाऱ्या या दोघा स्नेह्यांनी मुंबईतील सार्वजनिक कामांसाठी आपल्या मिळकतीचा किती हिस्सा वापरला, याचे उपलब्ध हिशेब पाहिले की अचंबित व्हायला होते. ‘जोडोनिया धन उत्तम वेव्हारे, उदास विचारे वेच करी’ या तुकोबारायांच्या उक्तीची उदाहरणे म्हणून या दोहोंच्या आयुष्याकडे पाहिले पाहिजे. सार्वजनिक हिताचे काम निघाले रे निघाले, की या दोहोंची रक्कम अग्रक्रमाने मिळत असे. ‘देण्या’त आनंद मिळवणे ही आधुनिक संकल्पना झाली. पण हे दोघेही त्यात अग्रेसर असल्याचे १९ व्या शतकातील कागदपत्रे पाहताना कळून येते. देणग्या देण्यात एकमेकांशी स्पर्धा करणारे हे दोन महापुरुष अन्यथा आपापल्या धर्मबांधवांचे पुढारी होते तसेच ते सामाजिक सुधारणांचे आग्रही होते. अर्थात सुधारकांचेही वेगवेगळे प्रकार असतात. सुधारणांच्या गतीबद्दल आणि मतीबद्दल मतभेद आणि मनभेद असू शकतात. १९ व्या शतकाच्या पूर्वार्धात ब्रिटिश राजसत्तेशी संघर्ष करण्याचे वातावरण नव्हते. उलट डच, पोर्तुगीज वगैरेंचे राज्य न येता ब्रिटिशांचे राज्य यावे, हा दैवी संकेतच असल्याचे मानणारे संख्येने अधिक होते. ब्रिटिशांकडून सामाजिक सुधारणांचे विचार घेऊन ते विचार येथे रुजवावे, ब्रिटिशांच्या ज्ञानपिपासू वृत्तीचे अनुकरण करावे, तसेच आपल्या संस्कृतीत जे जे चांगले आहे तेही टिकवून धरावे, जे वाईट आहे ते मात्र त्याज्य समजावे, असे मानणाऱ्या सुधारकांपैकी हे दोघेही होते. आपल्या नेतेपणाचा अधिकार वापरून त्यांनी ब्रिटिशांशी विनाकारण वितुष्ट घेतले नाही किंवा त्यांच्यापुढे नमतेही घेतले नाही. दोघेही धर्मप्रवण, राष्ट्राभिमानी आणि एतद्देशीयांच्या भल्यासाठी झटणारे होते. सार्वजनिक शांततेचे पाईक, समरसतेचे पुजारी आणि समाजसुधारणांचे कैवारी होते. आपापल्या समाजाचे नेतृत्व करताना त्यांनी अखिल समाजाचे भले करण्याची मनीषा बाळगली. इतर नेत्यांनाही अलगतावाद जोपासू दिला नाही. ‘बॉम्बे असोसिएशन’ नावाची पश्चिम भारतातील पहिली राजकीय संस्था १८५१ साली स्थापन झाली. एतद्देशीयांच्या अडचणी दूर करण्यासाठी आणि सरकारच्या अहितकारक निर्णयांना विरोध करण्यासाठी तसेच एतद्देशीयांच्या कल्याणवृद्धीसाठी नवे कायदे करण्यासाठी इंडियन सरकारला आणि इंग्लंडच्या सरकारला भरीस पाडणे, हा या असोसिएशनचा हेतू  होता. या संस्थेचे ‘प्रतिष्ठित’ अध्यक्ष म्हणून जमशेटजी जेजीभाई, तर अध्यक्ष म्हणून जगन्नाथ शंकरशेट यांनाच निवडले गेले. या संस्थेत सर्व समाजांच्या प्रतिनिधींना स्थान दिले गेले होते. ब्रिटिश पार्लमेंटला मागण्यांचे दोन अर्ज पाठवले गेले. त्यानुसार काही सुधारणाही झाल्या.
मुरकुटे कुटुंब हे मुळातच सधन. नानांचे एक पूर्वज बाबूलशेट हे कोकणातून १८ व्या शतकात मुंबईत आले. बाबूलशेट यांचे चिरंजीव शंकरशेट हे त्या शतकातील  मुंबईच्या प्रमुख व्यापाऱ्यांमध्ये गणले जात. नानांनी आपला व्यापार इतका पद्धतशीरपणे वाढवला, की त्यांनी अल्पावधीत प्रचंड पैसा मिळवला. तोही सचोटीने आणि आपली विश्वासार्हता कायम राखून. त्यांचे नाव आणि त्यांची विश्वासार्हता एवढी पक्की होती, की अरब, अफगाण आणि अन्य परदेशी व्यापारी बँकांकडे आपली संपत्ती ठेवण्याऐवजी नानांकडे ठेवत असत, असे म्हटले जाई.

नानांच्या  समाजोपयोगी कार्यापैकी सर्वात प्रथम होते ते त्यांचे शैक्षणिक कार्य. एतद्देशीय मुलांना शिक्षण देण्यासाठी काढलेल्या ‘नेटिव्ह स्कूल सोसायटी’ नावाच्या पश्चिम भारतातील पहिल्यावहिल्या शिक्षणसंस्थेच्या संस्थापकांत नाना शंकरशेट होते. या संस्थेने आपली कात अनेकदा टाकली, प्रत्येक वेळी आपले नावही बदलले. या संस्थेच्या ‘स्टुडंट्स लिटररी अ‍ॅण्ड सायंटिफिक सोसायटी’ या अवतारात मुलींनाही शिक्षण देण्याचा विचार झाला. त्याला सनातनी मंडळींकडून खूप विरोध झाला. तरी नानांनी आवश्यक त्या धनराशीची सोय केल्यामुळे या सोसायटीने मुलींसाठी पहिलीवहिली शाळा सुरू केली. पाश्चात्त्य शिक्षण घेतलेले तरुण त्या शाळेत शिकवू लागले. मग नानांनी गिरगावात इंग्रजी शाळा, संस्कृत पाठशाळा आणि संस्कृत लायब्ररी सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले. नानांच्या शिक्षणविषयक कार्यावर सरकारने पसंतीची मोहर उमटविली ती त्यांना बॉम्बे बोर्ड ऑफ एज्युकेशनचे मेंबर करून. गिरगाव ही तर नानांची खास कर्मभूमी होती. किंबहुना नाना आणि गिरगाव यांचे नाते नानांच्या अंतापर्यंत अतूट राहिले. गिरगावचा नानांनी अक्षरश: कायापालट केला. अर्थात त्यासाठी त्यांना जमशेटजींचे सहकार्य होतेच. अग्यारी किंवा देऊळ बांधणीसारखा क्वचितच असा एखादा उपक्रम असेल, की जो दोघांनी अलगपणे अमलात आणला.  गिरगावातला नानांचा वाडा आज अस्तित्वात नाही, त्याजागी आता आधुनिक वास्तू उभी आहे. पण या जुन्या वाडय़ाचा इतिहास, त्या वाडय़ाला  भेट दिलेली महनीय मंडळी, नानांचे देवघर, दिवाणखाना आणि दारावरची घंटा आणि तिचा नाद या सर्वाना कालपरवापर्यंत दंतकथांचे स्वरूप होते.
नानांची शरीरयष्टी धिप्पाड होती, पण बोलणे मृदु आणि लाघवी होते. कोणाही गरजूने नानांच्या वाडय़ावरची घंटा वाजवावी, नानांची भेट घ्यावी, आपली तक्रार वा गाऱ्हाणे सांगावे, आपल्या संस्थेसाठी मदत मागावी आणि भरघोस मदतीचे आश्वासन मिळवावे. नानांचा असा वडिलकीचा अधिकार होता. त्यांना हिंदू धर्मबांधवांनी आपण होऊन नेतृत्व दिले होते आणि नानांनी ती जबाबदारी शेवटपर्यंत निभावली, यातच त्यांचे मोठेपण सिद्ध होते. नानांच्या सहकार्याच्या भावनेने ते एतद्देशीयांना जसे जवळचे वाटत, तसेच ते ब्रिटिश अधिकाऱ्यांनाही विश्वासपात्र  वाटत.  समाजावर असलेल्या नानांच्या प्रभावाचा सरकारने पुरेपूर लाभ करून घेतला. एतद्देशीयांच्या भल्यासाठीचा निर्णय असेल तर नानांनीसुद्धा राज्यकर्त्यांशी सहकार्य केले. माऊंटस्टय़ुअर्ट एल्फिन्स्टनच्या नंतर मुंबईच्या  गव्हर्नरपदी आलेल्या सर जॉन माल्कम यांनी कायदा करून मोठय़ा मुश्किलीने येथील सतीची अमानुष चाल बंद केली. त्यासाठी त्यांनी नानांच्या साह्याची अपेक्षा बाळगली. नानांनी ते दिले, पण बदल्यात हिंदूंच्या स्मशानभूमीसाठी सोनापूरची म्हणजे चंदनवाडीची  जागा मिळवली. नानांनी गिरगावात नाटय़प्रयोगासाठी एक थिएटर बांधायला आपल्या मालकीची जागा दिली. लोकवर्गणीतून उभे राहिले ते ‘प्ले हाऊस’ (त्यातही मोठी रक्कम जमशेटजींचीच!). कालौघात ‘प्ले हाऊस’चे ‘पिला हाऊस’ झाले. ते हल्ली-हल्लीपर्यंत उभे होते. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या दगडी हत्तींमुळे या वास्तूचा वेगळेपणा ध्यानी येऊन इतिहासाची साक्ष पटत असे.
मुंबई शहराच्या सर्वागीण विकासाच्या कित्येक योजना सर जमशेटजी  जेजीभाई आणि जगन्नाथ शंकरशेट यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांबरोबर आखल्या आणि अमलात आणल्या. प्रशस्त रस्ते, खेळती हवा, सोयीस्कर घरे यासाठी मुंबई प्रसिद्ध झाली होती, त्याचे बरेचसे श्रेय या दोन महापुरुषांकडे जाते.
एकदाच काय तो ब्रिटिश अधिकाऱ्यांनी नानांवर संशय घेतला. १८५७ च्या उठावात क्रांतिकारकांना मदत केल्याचा, त्यांना आश्रय दिल्याचा वहिम सरकारने बाळगला होता. त्यानुसार नानांची चौकशीही झाली; पण पुरावा काहीच मिळाला नाही. त्यावेळची हकिकत अनेक चरित्रकारांनी लिहून ठेवली आहे. पोलीस कमिशनर ब्रुईन वेषांतर करून नानांच्या पाळतीवर आला होता म्हणे. पण वेषांतर केलेल्या ब्रुईनला नानांच्या धूर्त नजरेने ओळखले आणि त्याचीच पंचाईत झाली, असे लिहिले गेले आहे.
त्या प्रसंगानंतर मात्र नाना हे ब्रिटिश सरकार आणि एतद्देशीय यांना सांधणारे दुवा ठरले होते. साहजिकच १८६१ साली जेव्हा त्यांना लेजिस्लेटीव कौन्सिलचे पहिले एतद्देशीय मेंबर होण्याचा मान दिला गेला, त्याचे कोणालाच आश्चर्य वाटले नाही. उलट, योग्य व्यक्तीला योग्य मान दिला गेल्याचीच भावना सर्वत्र आढळून आली.
जमशेटजींचे  १५० वे स्मृतिवर्ष २००९ साली साजरे झाले. जगन्नाथ शंकरशेट यांचे  १५० वे स्मृतिवर्ष यंदा- म्हणजे २०१५ साली साजरे होत आहे. ३१ जुलैला या स्मृतिवर्षांची सांगता वडाळा येथे जगन्नाथ शंकरशेट यांचे एक छोटे स्मारक उभे करून होत आहे. हा दैवदुर्विलासच म्हणावा लागेल. ज्या नाना शंकरशेटांनी मुंबईच्या कल्याणासाठी स्वत:च्या मालकीची शेकडो एकर जमीन दिली (मरिन लाइन्सपासून मलबार हिलपर्यंतचा सारा समुद्रकिनारा त्यांच्या मालकीचा होता.), त्यांच्या स्मारकाला मात्र गिरगाव वा दक्षिण मुंबईत जमीन मिळत नाही. यात दोष कोणाला द्यायचा? राज्य सरकारला, बृहन्मुंबई महानगरपालिकेला की नागरिकांना? एका रस्त्याला, एका चौकाला, एका उड्डाणपुलाला नाव देऊन मुंबईच्या या शिल्पकाराची बोळवण झाली होती. याउलट त्यांचे स्नेही जमशेटजी जेजीभाई यांचे नाव कितीतरी संस्थांशी जोडले गेले आहे. जे. जे. हॉस्पिटल, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, जे. जे. उड्डाणपूल.. कितीतरी! नाही म्हणायला एशियाटिक सोसायटीच्या प्रवेशद्वारी जगन्नाथ शंकरशेट यांचा भव्य पुतळा आहे. तो पाहून मन भरून येते. जमशेटजी जेजीभाईंचाही सुरेख पुतळा सोसायटीत आहे. म्हणजे तेथेही या दोन स्नेह्यांना विलग करता आलेले नाही. पारसी समाज आणि मराठी समाज यांच्यातील हा फरक म्हणता येईल का? मराठी समाजाने आपल्या थोर नेत्यांना ज्ञातीच्या बंधनात अडकविले, तसे पारशांचे झाले नाही. अर्थात वडाळा येथे नानांच्या छोटेखानी स्मारकाला जागा दिली गेली, हेही नसे थोडके.
जी मंडळी असामान्य कर्तबगारी दाखवलेल्या आपल्या पूर्वसुरींच्या कार्यकर्तृत्वाचे योग्य प्रकारे  स्मरण ठेवत नाहीत, त्यांचा भविष्यकाळ फारसा उज्ज्वल असत नाही, असेच इतिहास सांगतो.
अरुण टिकेकर – aroontikekar@gmail.com

Assured support for Arun Gawli daughter for mayor Controversy over Rahul Narvekar statement
अरुण गवळीच्या कन्येला महापौरपदासाठी पाठिंब्याचे आश्वासन; राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्याने वाद
dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
kolhapur, cracks on ambabai mahalaxmi idol
अंबाबाई – महालक्ष्मी मूर्तीवर तडे, तातडीने संवर्धन गरजेचे; पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या पाहणी अहवालात निष्कर्ष
jalgaon lok sabha latest news in marathi
जळगाव : उन्मेष पाटील यांच्या फलकातून कमळ गायब