‘महानिर्वाण’, ‘बेगम बर्वे’सारख्या नाटकांचे लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश आळेकर हे भारतीय रंगभूमीवरील एक महत्त्वाचे नाव! आपल्या कारकीर्दीचे सिंहावलोकन करणारे त्यांचे पाक्षिक सदर..
आमच्या शाळेचं मैदान मोठं होतं. म्हणजे साधारणपणे १०-१५ हजार माणसे सहज मावू शकत. पश्चिमेच्या lok02बाजूला बुचाच्या झाडांची रांग. पूर्वेला शाळेची प्रशस्त तीनमजली इमारत. खाली तळघर. इमारतीच्या पश्चिमेच्या बाजूस मैदानावर उतरत जाणाऱ्या पायऱ्या बघताना मुंबईच्या एशियाटिक सोसायटीच्या इमारतीच्या पायऱ्यांची आठवण यावी. मैदानाच्या उत्तरेला शाळेची व्यायामशाळा. त्याला लागून कबुतरखाना तालीम. त्याला समांतर असलेला रस्ता ओलांडला की आमची छोटी- म्हणजे प्राथमिक शाळा. दक्षिणेच्या बाजूला प्राचार्याचा बंगला. जे पुणे शहराशी आणि सवाई गंधर्व संगीत महोत्सवाशी संबंधित असतील, त्यांच्या एव्हाना लक्षात आलंच असेल की हे मैदान न्यू इंग्लिश स्कूल- रमणबागेचं! करेक्ट! लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली ही १८८० मधली आमची शाळा.. १९४८ च्या आसपास या वास्तूत आली. रमणबाग शाळेचं हे मैदान. दरवर्षी सवाई गंधर्व संगीत महोत्सव इथेच भरतो. बघा! शाळा म्हटलं की आपण नेहमी ‘आमची शाळा’ असं म्हlr07णतो. पण शाळेत निबंधाचा विषय मात्र नेहमी ‘माझी शाळा’ असा असतो. तशी शाळा कधी एकटय़ाची नसते. ती नेहमी वर्गाची असते. समूहाची असते. नाटकाचे पण तसेच आहे. नाटक नेहमीच समूहाचे असते. नट, नाटककार, दिग्दर्शक, निर्माता आणि मुख्य म्हणजे मायबाप प्रेक्षक. कथा, कादंबरी, कविता हा मात्र एकटय़ाचाच ऐवज.
पण मी जे सांगतोय ते मैदान आजचं नाही, तर १९६१ मध्ये पानशेतच्या पुरानंतरचं! सगळं मैदान चिखलाने भरलेलं. अंदाजे दीड-दोन फूट चिखल अख्ख्या मैदानात असेल. कारण फुटलेलं धरण मातीचं होतं. अजूनही मातीचंच आहे. १२ जुलै १९६१ या दिवशी हे धरण फुटलं आणि नदीजवळचं सगळं पुणं चिखलात बुडालं. उद्ध्वस्त झालं. १२ जुलैपासून जवळजवळ तीन-चार महिने दीड-दोन फूट उंचीचा चिखल मैदानात क्रमश: वाळत, खरपुडी धरत खाली बसत होता. शाळेचे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. शाळेच्या खालच्या वर्गातली बाके भिजून कुजली होती.. सर्वत्र कुबट वास.. असा सीन. शाळा बंदच होती. आमचे मैदान चिखलात. तरी रोज आमची मैदानाच्या आसपास चक्कर असायचीच.
मैदानाच्या वरील वर्णनामधून एक गोष्ट राहिली, ती म्हणजे शाळेच्या व्यायामशाळेशेजारी तेव्हा असलेलं ‘गाडगीळांचे कँटीन.’ हे कँटीन अर्थातच अत्यंत कळकट आणि जागा खूपच लहान. गाडगीळांचा पोशाख वातावरणास साजेसा. कळकट धोतर, रंग न कळून येणारा शर्ट आणि काळी टोपी. पदार्थ जो असेल तो. नेहमी असणारे दोनच पदार्थ- एक चहा आणि दुसरा पदार्थ त्यांनी स्वत: शोधलेला. त्याचं नाव- ‘पाव आणि पातळ भाजी.’ समजा, मुलांनी शाळा सुटल्यावर घरी येऊन ‘आऽऽई, आज पाव आणि पातळ भाजी दे ना!’ असं जर म्हटलं असतं तर समस्त आयांनी आपापल्या मुलांचं काय केलं असतं..? कारण पाव कोणत्या द्रवात बुडवायचा याला काही संकेत आहेत. तर गाडगीळांचे दोन स्टोव्ह. पैकी एकावर चहा आणि दुसऱ्यावर सतत उकळत असणारी पातळ भाजी. या दोन पदार्थाशिवाय तिसरा पदार्थ कुणी मागितला की गाडगीळ अशा नजरेने त्या मुलाकडे पाहत, की त्याला पुढे काहीही खाताना आपण गंभीर गुन्हा करतोय अशी भावना त्याच्या मनात आजन्म निर्माण होऊन त्याचा आहार मंदावल्यास नवल नाही. समजा, जर मुलाने ‘कॉफी द्या..’ असं म्हटलं की गाडगीळ त्या मुलाला सरळ निर्विकार चेहऱ्यानं अनुल्लेखानं डावलत. कॉफी मागितलीत ना? बस्स! नो कम्युनिकेशन. काय त्यांचं कॉफीनं घोडं मारलं होतं कोण जाणे! सगळ्यात गंमत म्हणजे गाडगीळांनी भिंतीवर पाटी लिहिली होती- ‘सौजन्यविरहित पातळ भाजी.. २० नवे पैसे.’ या पाटीचं डिकोडिंग पुढीलप्रमाणे : पातळ भाजी पावाबरोबर जर सौजन्याने- म्हणजे फुकट हवी असेल तर गाडगीळ उकळत्या पातळ भाजीतला डाव भाजी न ढवळता वरचे वर भरून पावावर घालीत. त्यात फक्त निर्भेळ फोडणीचं पाणीच असायचं. जर पैसे मोजले तर मग रीतसर डाव पातळ भाजीत खालपासून ढवळला जायचा आणि भाजीचे काही अत्यंत मोजके असे घन पदार्थ डावातल्या फोडणीच्या पाण्यावर मधूनच विहरताना दिसायचे आणि ते घन पदार्थ डावातून पावावर हलकेच घरंगळायचे. पण पातळ भाजीचे मूळ पदार्थ नेमके कोणते होते? पातळ भाजी नेमकी कशाची केली होती? कोणती असे ती मूळ हिरवी भाजी? हे प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहेत. पण काही का असेना, ‘मुलांनो, आता दात आलेत ना? मग घेतलेला घास चावून चावून खाणे हे महत्त्वाचे. चव वगैरे फार नंतरचे मुद्दे आहेत..’ असे खाण्याचे तत्त्व तेव्हा प्रचलित असताना  पावाबरोबर पातळ भाजीही खाता येते, हा आत्मविश्वास तेव्हा आम्हाला गाडगीळांनी दिला.
असाच एक दिवस संध्याकाळी शाळेत चक्कर मारली. म्हटलं, बघू या चिखल किती कमी झालाय ते. मैदानात बुचाच्या झाडांच्या सावल्या लांबवर पसरलेल्या होत्या. आमचे तीन शिक्षक मैदानात उतरणाऱ्या पायऱ्यांवर बसून गंभीर चर्चा करत होते. विषय होता- चिखल वाळला की पानशेत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मैदानात नाटय़महोत्सव करण्याचा. हे तीन शिक्षक म्हणजे आमच्या शाळेचं जणू सांस्कृतिक नेतृत्वच होतं. तिघंही अत्यंत विद्यार्थिप्रिय शिक्षक होते. त्यातले दोन तर पक्के नाटकवाले. ते दरवर्षी शाळेच्या गॅदरिंगला शिक्षकांचे नाटक बसवायचे. त्यामध्ये गरजेनुसार काही थोराड दिसणारे विद्यार्थीदेखील दुय्यम भूमिकांमधून असायचे. आम्ही शाळेजवळ राहणारे काही विद्यार्थी पडद्यामागे राबायला. स्वयंसेवक. साधारणपणे त्यावेळची गाजलेली विनोदी नाटकं म्हणजे आचार्य अत्र्यांची ‘साष्टांग नमस्कार’, ‘मी उभा आहे’, ‘मी मंत्री झालो’ किंवा बाबूराव गोखल्यांचा ‘करायला गेलो एक’ हा फार्स’; तर एका गणेशोत्सवात पु. ल. देशपांडे यांचा ‘पुढारी पाहिजे’ हा वग.. अशी नाटकं होत असत. नाटकाची मुख्य अडचण असायची ती म्हणजे स्त्री- पात्रांची. आमची शाळा फक्त मुलांची. मुलींची शाळा कोपऱ्यावरची अहिल्यादेवी हायस्कूल. आमचे शिक्षकही झाडून सगळे पुरुष. शिक्षिका सगळ्या अहिल्यादेवीमध्ये, किंवा समोरच्या ‘नवीन मराठी शाळा’ या प्राथमिक शाळेत. मुलांच्या शाळेत शिक्षिका ही बात तेव्हा नसे. मुलं-मुली एकत्र फक्त बालवर्ग ते इयत्ता चौथीपर्यंतच. त्यांचा पुढचा ११ वीपर्यंतचा प्रवास अंतर राखूनच. उगा विस्तवाशी खेळ नाही. हां! चौथीतून पाचवीत जाण्याचा सोहळा मोठा हृद्य असायचा. पहिली ते चौथी एकत्र बाकावर बसलेल्या मुला-मुलींच्या ताटातुटीचा तो क्षण! दर जून महिन्यात प्रथेप्रमाणे पाचवीत जाणारी मुलं-मुली दोन वेगवेगळ्या रांगेत नवीन मराठी शाळेत उभी असायची. शिक्षक मुलांची रांग समोर रस्ता ओलांडून रमणबाग शाळेत न्यायचे, तर शिक्षिका मुलींची रांग घेऊन डावीकडून शेजारीच चौकात असलेल्या अहिल्यादेवी हायस्कूलमध्ये चालू पडायच्या. बस्स! को-एज्युकेशनचा मुद्दा संपला. तरी पण पाचवी ते अकरावी मुला-मुलींच्या एकत्र येण्याचे प्रसंग म्हणजे अहिल्यादेवी हायस्कूलमधल्या वर्षांतून एकदा होणाऱ्या मुलींच्या फोक डान्सच्या स्पर्धा किंवा नवीन मराठी शाळेच्या मैदानात संध्याकाळी भरणारे स्काऊटचे श्री शिवाजी कुलाचे पथक.. ‘दुसरे पुणे श्री शिवाजी.’ रमणबागेत भरणारे स्काऊटचे पथक ते वेगळे. ते ‘टिळक कुल.’ त्यात मुलींना प्रवेश नसे. त्यामुळे ‘दुसरे पुणे श्री शिवाजी’ला विशेष महत्त्व होते. आणि ते स्वाभाविकही होते. देवाच्या काठीला आवाज असतो तो असा. मी ‘दुसरे पुणे’च्या ‘संघ कुला’मध्ये यथावकाश समाविष्ट झालो आणि शाळेत जरी नाही, तरी संध्याकाळी स्काऊटमध्ये का होईना, पण को-एज्युकेशनचा धागा अखंड राहिला. असो. शाळेच्या शिक्षकांच्या नाटकात स्त्री-पात्रे मिळण्याच्या अडचणीमधून हे जरा मुला-मुलींच्या एकत्र शिक्षणाचे विषयांतर निघाले.
..तर संध्याकाळची वेळ. मैदानातला पानशेत पुराचा चिखल वाळत चाललेला. आणि आमच्या तीन विद्यार्थिप्रिय शिक्षकांची चर्चा चालली होती- मैदानावर नाटय़महोत्सव भरवायची! पैकी नाटकवाले दोन शिक्षक होते- रवींद्र पाटणकर आणि केशव अभ्यंकर. तिसरे- सगळं ठरवणारे, घडवून आणणारे, जे घडवायचे ते का, याचा विचार देणारे, तासन् तास विद्याथ्र्र्याशी बोलत बसणारे.. सगळ्या शाळेचा जणू थिंक-टँक असणारे आमचे राजाभाऊ  लवळेकर सर. लवळेकर सरांनी वर्गात रंगवून सांगितलेली सत्यजित रे यांच्या ‘पथेर पांचाली’ सिनेमाची गोष्ट आजही अगदी स्पष्ट आठवते. अपूने चोरलेल्या माळेचा प्रसंग.. त्याची अपराधीपणाची भावना.. ती माळ अपू शेवाळाने भरलेल्या तळ्यात टाकतो.. माळ पाण्यात बुडते.. शेवाळे हलकेच पूर्ववत होते.. पण माळ पडलेल्या ठिकाणी मात्र शेवाळाला भोक पडल्यासारखे पाणी दिसते.. जणू ती अपूच्या मनातली माळ चोरल्याची अपराधी भावनाच आहे.
ते दोन्ही नाटकवाले सर आज हयात नाहीत. पण विद्यार्थ्यांच्या अनेक पिढय़ा घडवणारे लवळेकर सर आज नव्वदीच्या जवळ आहेत. आमचा वर्ग मॅट्रिक झाल्याला यंदा पन्नास वर्षे पुरी होत आहेत. म्हणून शाळेच्या मैदानातला चिखल वाळण्याची वाट बघत बसणाऱ्या आमच्या या तीन गुरुजींची आठवण. (पूर्वार्ध)