19 February 2020

News Flash

‘मोगरा फुलला’

माझा आवडता नाटककार नील सायमन याचे एक नाटक आहे- 'Last Of The Red Hot Lovers.' नाटकाचं सूत्र मजेदार आहे. पन्नाशीच्या उंबरठय़ाजवळ येऊन ठेपलेल्या कुणा एकाची

| August 10, 2014 01:11 am

माझा आवडता नाटककार नील सायमन याचे एक नाटक आहे- ‘Last Of The Red Hot Lovers.’ नाटकाचं सूत्र मजेदार आहे. पन्नाशीच्या उंबरठय़ाजवळ येऊन ठेपलेल्या कुणा एकाची व्यथा त्यात सांगितली आहे. या इसमाला- बार्नीला अचानक जाणीव होते की, आपण आतापर्यंत फारच सोवळेपणाने जगलो. काहीच ‘धमाल’ केली नाही. तेव्हा फार उशीर होण्याच्या आत ही चूक सुधारली पाहिजे. तर त्याच्या या खटाटोपाचा आलेख या नाटकात चित्रित केला आहे. बार्नीच्या विधवा आईचा छोटासा फ्लॅट आहे. दर शुक्रवारी ती एका हॉस्पिटल कमिटीच्या कामानिमित्त नेमाने पाचएक तास बाहेर असते. ते शुक्रवार साधून बार्नी आपल्या विलासपर्वाचे आयोजन करतो. मातोश्रींच्या फ्लॅटमध्ये लागोपाठ तीन शुक्रवारी तीन वेगवेगळय़ा ललना हजर होतात. तिघींच्या तीन तऱ्हा असतात. पहिलीच्या अतिशय आक्रमक, कुत्सित आणि हेटाळणीच्या पवित्र्यामुळे बार्नीचा न्यूनगंड उचल खातो. दुसरीचा अमली नशेच्या आधीनतेमुळे मानसिक तोल पार ढासळलेला असतो, तर तिसरी निराशेच्या खोल गर्तेत गटांगळय़ा खात असते. तिच्या वैफल्याची बार्नीला लागण होते. थोडक्यात, बिचाऱ्याचे विलासस्वप्न हे स्वप्नच राहते.
नील सायमनच्या या नाटकात त्याचे नेहमीचे कसब मला जाणवले नाही. सगळय़ा घटना अपेक्षित होत्या, आणि कथानकात चढउतार नव्हता. पात्रंसुद्धा जिवंत वाटली नाहीत. पुठ्ठय़ाची वाटली. पण नाटकाची थीम मात्र जबरदस्त होती. तिचा आधार घेऊन मी स्वतंत्र नाटक लिहिलं- ‘मोगरा फुलला’!
माझ्या नाटकाचा नायक आहे नाकासमोर पाहून सरळ रेषेत जाणारा गजानन गणपुले. वय वर्षे पंचेचाळीस. पण दिसतो पन्नाशीचा. ढिला आणि गबाळा. याउलट, त्याचा कॉलेजपासूनचा जानी दोस्त हर्ष देशमुख. त्याचेही वय वर्षे पंचेचाळीस; पण दिसतो चाळिशीचा. छाकटा. प्रथमदर्शनीच कुणावरही छाप पाडील असा. हुशार, कर्तबगार. आणि कॉपरेरेट जगात मोठय़ा हुद्दय़ावर. हर्षचा डिवोर्स झालेला आहे. एका आलिशान फ्लॅटमध्ये तो एकटा राहतो. त्याची एकूणच राहणी ‘डिझाइनर छाप’ आहे. त्याची अनेक लफडी आहेत.
पडदा वर जातो तेव्हा हर्ष सामान बांधून शिकागोला जायच्या तयारीत आहे. फ्लाइट दोन तास उशिरा निघणार असा फोन येतो. तेवढय़ात गजा येतो- मित्राला निरोप द्यायला. पाहताक्षणीच दोघांमधला तीव्र फरक जाणवतो. सगळय़ाच गोष्टींत. दोन तास नुसतेच ताटकळत बसण्यापेक्षा स्कॉच घेऊ, असं हर्ष सुचवतो. पण गजा विरोध करतो- ‘माझं जेवण झालंय. आणि तुझी विमानात होईलच की!’ पण शेवटी ‘नको- नको’ म्हणत तो दोस्ताला साथ देतो, आणि आपल्या शबनममधून एक जुनाट, बेंगरूळ पितळी डबा काढतो. पुराणवस्तुसंग्रहालयात शोभेल असा.
गजा : सुलभानं या चकल्या दिल्या आहेत, बरोबर न्यायला.
हर्ष : बापरे! हा डबा अमेरिकेला नेऊ? स्मिथ्सोनियन म्युझियमवाले लंपास करतील.
गजा : (दुखावून) तुझी शान बिघडणार असेल तर राहू दे.
हर्ष : तसं नाही रे. पण पॅकिंग झालंय माझं. चिंचोकासुद्धा ठेवायला जागा नाही. तू परत घेऊन जा चकल्या.
गजा : जाईन बापडा. पण सुलभा भलती हिरमुष्टी होईल.
हर्ष : मग असं कर- डबा इथेच ठेवून देऊ या आपण. (डबा उघडून एक चकली काढतो. खातो.) म् म् म्.. लाजवाब. काय खमंग बायको आहे तुझी.
गजा : चकली म्हण! चकली म्हण!
हर्ष : तेच रे! पण खरंच, लाखात एक आहे सुलू.. काय?
गजा : (निरुत्साहाने) हं!
हर्ष : का रे? भांडणबिंडण झालंय काय तुमचं?
गजा : कशावरून?
हर्ष : तू सुलूच्या ऐवजी सुलभा म्हणतो आहेस- त्याच्यावरून.
मग हर्ष गजाला फ्लॅटच्या किल्ल्यांचा जुडगा देतो आणि सांगतो, ‘अधूनमधून फेरफटका मार. शेजारच्या बाईकडून जरा झाडू मारून घे. फ्लॅटची जबाबदारी तुझी.’ गजा मोठय़ा नाखुशीने किल्ल्या ताब्यात घेतो. तेवढय़ात हर्षच्या एक-दोन मैत्रिणींचे फोन येतात.
गजा : कन्हैया आहेस खरा. अशा किती गोपी आहेत, सांग बघू.
हर्ष : (गातो-) गोपियां आनी जानी है, न कोई दिल की रानी है.. तू मात्र प्रभू रामचंद्रांनंतर पहिला एकपत्नीव्रत असणार. कधी परस्त्रीकडे पहातही नसशील तू.
गजा : (उसळून) कोण म्हणतो? पाहतो तर काय झालं. (हळू आवाजात) एवढंच नाही, तर कधी कधी वाईट नजरेनं पण पाहतो-
हर्ष : वा! पण तुझी धाव कुंपणापर्यंत. चाळिशी उलटली तुझी.. हे ‘आंखों-आंखों में’च्या पलीकडे कधी काही केलंस तू?
गजा : चुकूनसुद्धा नाही.. सुलभाची शपथ.
हर्ष : .. हाय कंबख्त, तूने पी ही नहीं.
गजा : मी आहे हा असा आहे. सरधोपट. तुझ्यासारख्या भानगडी मला जमणार नाहीत.
हर्ष : भानगडी नको करूस. पण मनाला विरंगुळा हवा ना कधीतरी? नाजूक रेशमी धाग्यांची गुंतवणूक ही औरच असते बघ. फक्त निरगाठ बसू द्यायची नाही. सुरगाठ.. सर्रकन् निसटता आलं पाहिजे.
गजा : केव्हातरी धाडस करणार आहे मी.
हर्ष : शक्य नाही. इम्पॉसिबल!
गजा : का? का? का?
हर्ष : साधी गोष्ट. मुंबईच्या एका सुखवस्तू उपनगरात एका सुसज्ज इमारतीमध्ये तुला तीन महिन्यांसाठी एक रिकामा फ्लॅट मिळतो. पण या फ्लॅटचा काही उपयोग सुचत नाही तुला?
गजा : सुचला आहे. सुचला आहे केव्हाच. (मिश्कील हसून) एखाद्या वीकएंडला इथे राह्यला येईन म्हणतो.. सुलभाला घेऊन.. आमचा अबोला संपल्यावर.
हर्ष : मूर्खा! लग्नाच्या बायकोला घेऊन इथे राहण्यात काय हशील आहे?
गजा : का? बदल तेवढाच. चेंज!
हर्ष : एक्झ्ॉक्टली. चेंज हवा. तेच तुझ्या मद्दड डोक्यात भरवायचा प्रयत्न करतो आहे. पण पालथ्या घडय़ावर पाणी.
गजा : (विषय बदलीत) बरं, तुझं उड्डाण कधी आहे?
हर्ष : उडत गेलं माझं उड्डाण. कशाची वाट पाहतो आहेस तू? पन्नाशीची?
(एका घोटात स्कॉच रिचवून गजा ताडकन् उभा राहतो. छाती ताणतो.)
गजा : मी तयार आहे मित्रा. संधी येऊ दे. मी तयार आहे.
हर्ष यथावकाश शिकागोला कूच करतो. गजाच्या प्रणयप्रवासाची रेलगाडी- नव्हे, मालगाडी सुरू होते.
पहिल्या स्टेशनवर भेटते मधुरिमा कश्यप. तिशीतली ही आकर्षक तरुणी कुठल्याशा कंपनीत रिसेप्शनिस्ट आहे. दर बुधवारी दोन तास बरोबर घालवायचे असा हर्षचा आणि तिचा रिवाज आहे. उभयपक्षी शारीरिक आणि आर्थिक गरजा पुरवण्यासाठी ही कोरडी तडजोड आहे. त्यात कुठेही भावना गुंतलेल्या नाहीत. शिकागोप्रयाणाचे तिला सांगायचे राहून गेले असल्यामुळे ‘येत्या बुधवारी चालून येणाऱ्या संधीचा तूच लाभ उठव,’ असं हर्ष गजाला सांगतो. तिच्या आवडीच्या चार गोष्टींबद्दल तो त्याला माहिती पण पुरवतो.
बुधवारी पिवळय़ा गुलाबांचा गुच्छ, वाळय़ाच्या सरबताची बाटली आणि सरोदवादनाची टेप घेऊन गजा उगवतो. त्याचा नूर पालटलेला आहे. अंगात छान फुलाफुलांचा बुशशर्ट आहे, आणि केस भुरभुरीत आहेत. घंटा वाजते. दारात मधुरिमा आहे. गजाला पाहून ती- ‘सॉरी, चुकीच्या फ्लॅटमध्ये आले’ म्हणून जाऊ लागते. पण ‘फ्लॅट नाही, माणूस चुकीचा आहे,’ असं गजा तिला सांगतो आणि ‘आल्यासारखं उभ्या उभ्या बसा तरी!’ असा आग्रह करतो. थकून आलेली मधुरिमा आढेवेढे न घेता विसावते.
वाळय़ाचं सरबत आणि अमजद अली खांच्या सरोदवरच्या दुर्गा रागाचा आस्वाद घेता घेता मनमोकळय़ा गप्पा होतात. दोघांचा संकोच मावळतो. अचानक काही आठवण होऊन मधुरिमा पर्समधून एक पुडकं काढते.
मधु : अरे हो- हर्षसाठी त्याच्या आवडीचा खाऊ आणला होता.. परत कुठे नेऊ? तुम्हीच संपवा.
गजा : नाही, नाही- असं कसं?
मधु : किती संकोच? हर्षच्या जागी तुम्ही आहात, तेव्हा आता तुमचा हक्क बनतो..
गजा : (आवंढा गिळून) म्हणजे हाजिर सो वजीर?
मधु : बरोबर! घ्या. चकल्या आहेत.
गजा : आं? कमाल आहे! एक मिनिट. (झटकन् पितळी डबा आणतो. तिला देतो.) हं, उघडा. खुल जा सिमसिम.
(दोघे एकाच वेळी आपली चकली बाहेर काढतात.)
मधु : चकली! चक्क चकली.. काय बाई योगायोग.
गजा : योगायोग नव्हे- योग.
गजाननच्या निरागस स्वभावामुळे प्रभावित झालेली मधुरिमा हळूहळू त्याला आपली जीवनकहाणी ऐकवते. घरच्यांच्या विरोधामुळे पळून जाऊन केलेलं लग्न, काही गंभीर शारीरिक  दोष असलेल्या अपत्याचा जन्म, पसार झालेला नवरा, मुलाची अवघड शस्त्रक्रिया, तिच्या असहायतेचा फायदा घेऊ पाहणाऱ्या श्वापदांशी सामना, अखेर करावी लागलेली तडजोड.. मधुची दर्दभरी दास्तान ऐकून गजा गलबलून जातो. त्याचे पार पानिपत होते. अंतर्यामी बाळगलेला दुष्ट इरादा विरघळून जातो.
गजा : धन्य आहे तुमची. दुसरी कुणी खचून, पिचून गेली असती. कुठून आणलंत एवढं बळ?
मधु : स्वत:च्या पायांवर उभं रहावं लागलं म्हणजे आपोआप येतं बळ. अबूसाठी मला उभं राह्यलंच पाहिजे. आहे कोण दुसरं? ना नवरा, ना बाप, ना भाऊ..
गजा : (ताडकन् उठून) आहे! भाऊ आहे तुम्हाला. मी! मिसेस कश्यप. मलाही बहीण नाही.. माझी बहीण व्हाल तुम्ही?
(मधुरिमा स्तंभित. बराच वेळ नि:शब्द. मग उचंबळून-)
मधु : गजनदादा!
आणि मग बहीण-भावाच्या या अपूर्व भेट सोहळ्याच्या साक्षीने पहिल्या अंकाचा पडदा पडतो.
या अंकाबद्दल जास्तच विस्ताराने लिहिण्याचे कारण- आपल्याकडे मानलेल्या भाऊ-बहीण नात्याचा, किंवा एकूणच मानलेल्या नातेसंबंधांचा खूप सोस आहे. कित्येकदा रक्ताच्या नात्यापेक्षा या जुळवलेल्या नात्यांची तीव्रता आणि आकर्षण अधिक वाटते. गजाच्या पहिल्या प्रयत्नांची सांगता भावी प्रेयसीला बहीण मानण्यात होते. हा मामला आपल्याकडे रूढ असलेल्या संकल्पनेत फिट्ट बसतो. नात्याच्या या बळावर या अंकामध्ये मी चक्क नील सायमनवर मात केली आहे. (असं आपलं मला वाटतं.)
दुसऱ्या अंकात गजाची गाठ एका चंट आणि बिनधास अशा कॉलेजकन्यकेशी पडते. ती कुठल्याशा फिल्मी संगीत धमाक्याची तिकिटं विकायला आली आहे. तिच्या डोक्यात बॉलीवूड ठासून भरले असले, तरी त्याव्यतिरिक्त ते पार रिकामे आहे. तिचं नाव- लावण्या लुकतुके. (प्यार से सब मुझे लोला कहते है!)
गजा : एक तिकीट केवढय़ाला?
लोला : सात-
गजा : ठीक. हे घे-
लोला : ई ऽऽ सात म्हणजे सात नाही अंकल, सातशे! एका तिकिटात दहा-बारा स्टार्स. जिवंत!!
गजा : जिवंत?
लोला : लाइव्ह शो आहे ना? शिवाय इंटरव्हलमध्ये समोसा आणि सॉफ्ट ड्रिंक फुकट.
गजा हे महाग तिकीट घेत नाही. लोला नि:संकोचपणे हॉलभर फिरते. ‘किती छान फ्लॅट आहे. सिनेमातला सेटच जसा. है नं? फक्त वर जाणारा जिना नाही हॉलमध्ये.’
सोफ्यावर ऐसपैस बसून लोला अखंड टकळी सुरू करते. गजाने तिला वाळ्याचे सरबत दिल्यावर ‘याहून काही स्ट्राँग नाही का?’ असं ती विचारते, आणि तो आत गेल्यावर आपल्या ग्लासमध्ये जिन ओतून घेते. गप्पांच्या ओघात कामाच्या निमित्ताने आपली एका फिल्म प्रोडय़ुसरशी ओळख असल्याचे गजा बोलून जातो. मग तर लोला त्याच्या गळ्यातच पडते. ‘एका स्क्रीन टेस्टसाठी मी काय वाट्टेल ते करीन..’ ती सांगते. गजा चमकतो. त्याला हर्षचे शब्द आठवतात- ‘शेर बनायचं आहे तुला. पुरुषसिंह! हीच ती वेळ.’ पण मामला पुढे सरकण्याआधीच लोला जेमतेम सतरा वर्षांची असल्याचे सिद्ध होते. त्यातून तिचे वडील पुलीस इन्स्पेक्टर असल्याचे कळते. क्राइम ब्रँच. गजाची घाबरगुंडी उडते. वाघाची बकरी होते. मोठय़ा मुष्किलीने तो तिला घराबाहेर काढतो. पण त्याआधी त्याला दोन तिकिटे घ्यावी लागतात. त्याचा गालगुच्चा घेऊन ‘बाय अंकल’ म्हणून लोला उडय़ा मारीत निघून जाते.
गजाच्या ‘प्रगती’वर हर्ष शिकागोहून रिमोट कंट्रोलने लक्ष ठेवून आहे. एक बहीण आणि एक भाची मिळवल्याबद्दल तो मित्राचे अभिनंदन करतो. पण अद्याप हर्षने आशा सोडलेली नाही. गजासाठी त्याने ‘मैत्रीण हवी’ म्हणून इंटरनेटवर जाहिरात दिली आहे. तपशील आणि अपेक्षेसकट. बरीच उत्तरं येतात; पण हर्षला एकच योग्य वाटते (गजासाठी). ती ‘अनामिका’ या नावाने ‘गुमनाम’ला भेटायला आजच येणार असते. ई-मेलचा परस्पर कारभार केल्याबद्दल गजा हर्षवर तणतणतो. पण मग ‘आलिया भोगासी’ अशी स्वत:ची समजूत घालून नव्या अनुभवासाठी ‘सादर’ होतो.
घंटा वाजते. गजा दार उघडतो. दारात त्याची बायको- सुलभा उभी आहे. ‘मी अनामिका..’ ती सांगते. ‘गुमनाम तू आहेस, हे ठाऊक असतं तर इतक्या दूरवर येण्याचे कष्ट घेतले नसते.’ गजाला प्रचंड धक्का बसतो. आरोप-प्रत्यारोप होतात.
गजा : भारतीय नारीचं हे रूप? अगं, सीता, सावित्री, दमयंतीचा देश हा.
सुलभा : याच देशात प्रभु रामचंद्रसुद्धा होऊन गेले. एकपत्नीव्रती.
खरं तर इंटरनेटवरच्या तपशिलावरून ‘गुमनाम’ कोण, हे सुलभानं केव्हाच ताडलं होतं. त्यामुळे तिच्यावर आरोप करायला गजाला बळ उरत नाही. ‘यापुढे आपले मार्ग वेगळे आहेत,’ असं सांगून ती घटस्फोटाचा प्रस्ताव मांडते. गजा पार कोलमडून जातो. आपण प्रत्यक्ष लक्ष्मणरेषा ओलांडली नसल्याचं तो कळवळून सांगतो. पश्चात्तापाच्या भरात तो हेही कबूल करतो, की हर्षकडे सरंजाम जमवण्यामागचा त्याचा हेतू तितकासा निकोप नव्हता.
गजा : दोष माझा नाही. निसर्गाचा आहे. नर हा जात्याच बहुपत्नीक असतो. कोणताही प्राणी घे. सुंदर हरिणींचा ताफा घेऊन राजबिंडा सरदार कसा मिजाशीत वावरतो रानावनात. वाघ-सिंहाची तीच तऱ्हा. माकडं पहा ना- पूर्वज आपले. हुप्या फक्त एक असतो, पण त्याचा जनाना हाऽऽ एवढा.
सुलभा : तू चुकून माणसाच्या जन्माला आलास गजानन. हुप्या छान शोभला असतास.
गजा : सुलू, मी आता पूर्णपणे वठणीवर आलो आहे. पहिलाच गुन्हा म्हणून सोडून दे.
सुलभा : पहिलाच? आणखी किती गुन्हे करण्याचा इरादा आहे?
गजा : शब्दांत नको ग पकडूस. शिक्षा कर हवी ती. चल, १०० वेळा लिहून देतो- ‘परस्त्री मातेसमान.’
दोघांचा अखेर समेट होतो. आणि हर्षच्या फ्लॅटला योग्य न्याय देण्याच्या दृष्टीने दोघे वीकएंडला तिथेच राहतात.
सुधीर भट यांच्याकडून ‘सुयोग’साठी नाटक करण्याबद्दल मला विचारण्यात आले. मी तेव्हा ‘बालचित्र समिती’ची अध्यक्ष होते. त्यामुळे असंख्य व्याप मागे होते. पण नाटक करण्याची संधी खूप दिवसांनंतर चालून आली होती. मी माझी नवी संहिता ‘सुयोग’कडे धाडून दिली. नाटक त्यांना आवडलं. आमची बोलणी झाली, करार ठरला आणि लगेच जुळवाजुळव सुरू झाली.
गजाच्या प्रमुख भूमिकेसाठी सुधीरने विक्रम गोखलेचं नाव सुचवलं. विक्रमने विनोदी भूमिका केल्याचं पाहण्यात किंवा ऐकण्यात आलं नव्हतं. पण गुणी नटाला लेबलांचं बंधन लागू नसतं. हर्ष- राजन पाटील, मधुरिमा- रेखा बढे, लोला- सई देवधर, आणि सुलभा- अर्चना पाटणकर अशी पात्रयोजना ठरली. पैकी सईने माझ्या ‘चूडियां’ या लघुपटात एका छोटय़ा खेडवळ मुलीची भूमिका केली होती. आता तिला चंट आणि मॉड अशी कॉलेजयुवती पेश करायची होती. हा कायापालट तिला सहज जमला. बाकीचे सगळे कलाकार मला नवीन होते.
हे नाटक खूप खर्चिक होते. विशेषत: त्याचे नेपथ्य. संवादांत वारंवार हर्षच्या राजेशाही, आधुनिक फ्लॅटचा उल्लेख येतो, तेव्हा सेट तसाच जोरदार हवा होता. दिवाणखान्यात दगडांच्या सजावटीवरून कोसळणारा एक छोटेखानी वाहता धबधबा हवा, असं मी सांगितलं. सुयोगनं माझ्या सर्व मागण्या पूर्ण केल्या, हे मान्य केलं पाहिजे. बाबा पार्सेकरांनी देखणा सेट उभा केला. दुर्दैवाने हा धबधबा नाटकाला घातक ठरला. तो अधूनमधून बंद पडे. हुकमी सुरू होईलच याचा नेम नसे. मग फ्लॅटची शान वाढण्याऐवजी तो केविलवाणा वाटू लागे. शिवाय या धबधब्याचा आवाजही मोठा होई. त्यामुळे नटांना मोठय़ाने ओरडून बोलावे लागे. शेवटी आम्ही तो धबधबा बंद करून टाकला. नुसत्याच अफलातून कल्पनेच्या जोरावर नाटक उभे राहत नाही, ती कल्पना अमलात आणता आली पाहिजे, हा धडा मी या नाटकात शिकले. अर्थात माझा हा धडा सुयोगला महागात पडला.
तालमी सुरू झाल्या. आतापर्यंत मी बसवलेल्या सर्व नाटकांचा अनुभव असा की, पाहता पाहता कलाकारांचा आणि माझा सूर छान जुळून येत असे. ‘नांदा’, ‘शेजारी’ (दोन्ही), ‘सोयरीक’, ‘तुझी माझी जोडी’, ‘बिकट वाट’, ‘जास्वंदी’, दिल्लीची तमाम नाटकं- या सर्व प्रयोगांमधल्या कलाकारांबरोबर खूप छान जवळीक साधली होती. ‘मोगरा फुलला’च्या तालमींमध्ये मात्र एक औपचारिक कोरडेपणा कायम राहिला.
२००२ सालच्या मेच्या मध्यास नाटकाचे उद्घाटन झाले. नेमकी तारीख आठवत नाही. शुभेच्छा म्हणून पुष्पगुच्छ देण्याचा रिवाज असतो. मला कुणीतरी एक मोठी टोपली भरून मोगऱ्याची प्रसन्न फुले भेट केली. सगळय़ा कलाकारांनी छान कामं केली. मिनिटा-मिनिटाला हशा होत होता. पण गंमत म्हणजे प्रयोग झाल्यावर अभिनंदन करायला नेहमीप्रमाणे बॅकस्टेजला उल्हसित प्रेक्षकांचा महापूर लोटला नाही. लोक नजर चुकवून जात असल्याचं जाणवू लागलं. मेकअप रूममध्ये कमलाकर नाडकर्णी बसले होते. नेहमीप्रमाणे ते उचंबळून भेटले नाहीत. कसनुसं हसून ‘बोलू या, बोलू या’ म्हणाले. अद्याप आम्ही ‘मोगऱ्या’बद्दल बोललेलो नाही. सगळीकडे हा अशाच प्रकारचा अनुभव आला.
आणि मग हळूहळू या गूढ प्रतिक्रियेचा खुलासा झाला. कॅनडाच्या एका फॅनने मामला स्पष्ट केला. पुण्याच्या चव्हाण नाटय़गृहातल्या खेळाला तो आला होता. त्यानं मला फैलावरच घेतलं. ‘अहो, मी कालच टोरांटोहून आलो. जेट लॅगला न जुमानता मुद्दाम तुमचं नाटक पाह्यला आलो. पण हा काय विषय निवडलात तुम्ही? तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. विवाहबाह्य संबंधांवर नाटक- आणि तीसुद्धा कॉमेडी?’
मी माझ्या प्रेक्षकांशी प्रतारणा केल्याचा आरोप हा एकटा या कॅनेडियन चाहत्याचा नव्हता; चहूकडून हाच सूर उमटत होता. ‘सईला ही काय बुद्धी (अवदसा) सुचली?’ थोडक्यात, विषय निवडण्याची मला मुभा नव्हती. मी कायम शेजाऱ्यांचीच उणीदुणी काढीत बसावं, ही अपेक्षा. ‘Seven Year Itch’सारखा सिनेमा मिटक्या मारत पाहिला जातो, पण तोच विषय आपल्या माजघरात उतरला तर हाहाकार उडतो. असं का? मनुष्यस्वभाव सगळीकडे एकच नसतो का? की आपण मंगळावरून उतरलोय?
या नाटकामुळे प्रेक्षकांची माझ्याबद्दल निराशा झाली असली, तर माझाही उलटून या प्रेक्षकांमुळे हिरमोड झाला, असं मी म्हणते. अडीच तास दिलखुलास हसून, मग ‘छे छे! हे आपल्या संस्कृतीत बसत नाही..’ असा सूर काढायचा, हा भंपकपणा नाही का? असो. अखेर मायबाप प्रेक्षकांनी कौल दिला आणि नाटक चाललं नाही. मोगरा फुलायच्या आतच सुकून गेला. (भाग १)

First Published on August 10, 2014 1:11 am

Web Title: last of the red hot lovers a comedy by neil simon
Next Stories
1 शनाया ट्वेनचा स्त्रीवाद
2 नारली पुनव
3 आरोग्याची पुढची पाच वर्षे..
Just Now!
X