तंत्रज्ञानामुळे आज सगळ्याच क्षेत्रांचा चेहरामोहरा बदलतोय. संगीत क्षेत्रही याला अपवाद नाही. मात्र, बदलत्या काळात, अद्ययावत तंत्रज्ञानाच्या जमान्यात लता मंगेशकर नामक स्वर्गीय सुराचं अव्वल स्थान अबाधित आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज ८५ वा वाढदिवस. यानिमित्ताने आभासी विश्वातही
लता मंगेशकर यांचं गाणं आजही कसं तळपतंय, आणि आजच्या पिढीवरही त्यांच्या अक्षय गाण्यांची मोहिनी का आहे, हे जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न-
जोवर भारतीयांच्या मनात धर्मप्रेम व देशप्रेम जागं आहे तोवर प्रत्येक गणेशोत्सवात, शिवजयंतीला, स्वातंत्र्य व प्रजासत्ताकदिनी लतादीदींची गाणी वाजणारच. कबीर, मीरा व सूरदासांच्या भजनांतून, ग़ालिबच्या गज़्‍ालांतून, ‘शिवकल्याण राजा’तल्या गाण्यांतून, ज्ञानदेवांच्या पसायदानातून आणि तुकोबांच्या अभंगांतून त्यांचा आवाज मनामनांत कायमचा साठवून ठेवला जाणार आहे.
२८ सप्टेंबर २०१४ रोजी गानसम्राज्ञी लता मंगेशकर ८५ वष्रे पूर्ण करत आहेत. पैकी ७० वष्रे त्या पाश्र्वगायनाच्या क्षेत्रात आहेत. त्यांनी गायलेला प्रत्येक सूर व शब्द पुढच्याच क्षणी हवेत विरून जात असला तरी रसिकांच्या कानात व मनात कायमचा साठवलेला आहे. आवाज व प्रतिमा साठवून ठेवण्याची मोठीच सोय असल्याने त्याचा पुन्हा पुन्हा आनंद घेता येतो.
१९८९ साली साठाव्या वाढदिवसाच्या सुमारास त्यांच्या िहदी चित्रपट गीतांचा अभ्यासपूर्ण गीतकोश तयार झाला. काही अभ्यासक व संग्राहकांनी त्यांच्या इतर भाषांतल्या गाण्यांचे कोश तयार करायचे संकल्प सोडले. त्यापैकी बंगाली व गुजराथी गीतांचा कोश प्रसिद्ध झाला असून अगदी अलीकडे कलकत्ता येथल्या स्नेहासिश चतर्जी यांनी १९६६ ते ७० या पाच वर्षांतल्या िहदी गाण्यांचा कोश प्रसिद्ध केला आहे. त्यात अन्य तपशिलांबरोबरच सर्व गाण्यांचे बोल देवनागरीत दिलेले आहेत. २६ सप्टेंबर २०१४ रोजी ‘लता-समग्र’ हा नवा ग्रंथ मुंबईत प्रकाशित झाला. या जुन्या पारंपरिक पद्धतींबरोबरच ‘आभासी विश्वात’ म्हणजेच सायबर अवकाशात (श््र१३४ं’ १ीं’्र३८) त्यांच्या गायन व कारकिर्दीवर पुष्कळ माहिती व गाणी जगभराच्या रसिकांना उपलब्ध झालेली आहेत. त्याचा धावता आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न.
गुगलमातेची आळवणी करून ‘लता मंगेशकर’ हे शब्द टाइप केले, की क्षणार्धात २२ लाख १० हजार पाने साठवून ठेवलेली आहेत अशी माहिती मिळते. शेकडो फोटो आहेत. त्यांचं नाव समाविष्ट असलेल्या पुस्तकांची संख्या १३ हजार १०० इतकी आहे. आता ही सगळी उघडून वाचायची म्हटलं तर कितीतरी वेळ लागेल. पण नेमका संदर्भ पाहावयाची मोठीच सोय या आभासी जगतात आहे. त्यांची एकूण गाणी साडेसहा हजारांच्या आसपास आहेत. पण २,८८,००० पानांमधून यातली बरीचशी गाणी ऐकायला व पाहायला मिळतात. कारण जगभरच्या त्यांच्या चाहत्यांनी केवळ प्रेमापोटी हे केलेलं आहे. शिवाय जवळजवळ सगळीच गाणी संग्राहकांनी जमवलेली आहेत. ‘यू टय़ूब’सारख्या माध्यमातून ती आपल्या लॅपटॉप वा कॉम्प्युटर मशीनवर उतरवूनही घेता येतात. गाण्यांवरच्या प्रतिक्रिया वाचनीय असतात. विविध भाषांमधल्या व चॅनलवरच्या त्यांच्या मुलाखतीही बघता येतात. दूरदर्शनच्या अगदी सुरुवातीच्या काळातल्या काही दुर्मीळ मुलाखती काही उत्साही संग्राहक अपलोड करतात व काही काळानं काढूनपण घेतात. त्यात खूप वर्षांपूर्वी माधवराव गडकरी यांनी घेतलेली एक मराठी मुलाखत दोन भागांत आहे. याचबरोबर लतादीदी टी. व्ही.वरच्या गाण्यांच्या स्पर्धामध्ये परीक्षक म्हणूनही पाहायला मिळतात.
१९४८ मध्ये त्यांची पहिली गैरफिल्मी गाणी मुद्रित झाली ती एका नृत्यनाटय़ासाठी(बॅले). त्याचं नाव होतं ‘भगवान गौतम बुद्ध’. प्रा. शांतीकुमार चित्रे याचे निर्माते होते व संगीतकार होते एच. एन. नंदी. त्यात लता मंगेशकरांची सहा गाणी असून ती िवगेतल्या ग्रामोफोनवर वाजवीत असत. त्यावर मंचावरची पात्रं मूकअभिनय करत. नायकाची म्हणजे ‘गौतम बुद्धा’ची भूमिका नलिन शहांनी केली होती. ते पुढे सिनेपत्रकार म्हणून गाजले. नृत्यनाटय़ाचे थोडेच प्रयोग झाले. मात्र कलाकारांना ध्वनिमुद्रिकांचे संच भेट देण्यात आले. काळाच्या ओघात त्यातले काही चोरबाजारातून संग्राहकांच्या खजिन्यांत येऊन विसावले. ही सगळीच गाणी फार गोड आहेत. विशेष म्हणजे त्यातली काही गाणी आता यू टय़ूबवर ऐकायला मिळतात.
१९५७ मध्ये सूरदासांचं ‘निसदिन बरसत नैन’ व मीराबाईंचं ‘बरसे बुंदिया सावनकी’ अशी दोन भजनं वितरित झाली. त्याचं संगीत हृदयनाथ मंगेशकरांचं होतं. विसाव्या वर्षी त्यांनी या गाण्यांनी संगीतरचना करायला सुरुवात केली. त्या पहिल्या संगीतात वसंत प्रभूंचा प्रभाव जाणवतो. पुढे त्यांनी आपली स्वतंत्र शैली निर्माण करून उत्तमोत्तम िहदी व मराठी गाणी दिली. त्यात मीराबाईंची भजनं, ग़ालिबच्या रचना आहेत. आरती प्रभू, शांता शेळके, सुरेश भट, राजा बढे, भा. रा. तांबे, वि. दा. सावरकर, बालकवी, ना. धों. महानोर व ग्रेस यांच्या मराठी कवितांना सुंदर चाली लावून त्यांनी लतादीदींकडून गाऊन घेतल्या. ‘गणपतीची आरती’, ‘ज्ञानेश्वरी’, ‘भगवद्गीता’, ‘शिवकल्याण राजा’, ‘राम रतन धन पायो’ (गांधीप्रिय भजने), ‘स्वर-सुमनांजली’ व ‘माझ्या आजोळची गाणी’ अशा सुरेख ध्वनिमुद्रिका त्यांनी दिल्या आहेत. एकेकाळी ही सगळी गाणी संग्रह करून हवी तेव्हा ऐकता येत. आता ती मोबाइलवर साठवून व हेडफोन लावून ऐकायचा रिवाज रुळला आहे.
ही गैरफिल्मी गाणी गाण्याची प्रेरणा लतादीदींना कुठून मिळाली असावी? त्यांनीच एके ठिकाणी याचं उत्तर दिलं आहे. त्यांचे वडील मा. दीनानाथ मंगेशकर रोज झोपण्यापूर्वी ज्ञानेश्वरी, दासबोध किंवा भगवद्गीतेतलं काहीना काही मोठय़ानं वाचत असत. उमलत्या वयातले संस्कार आयुष्यभर पुरतात, ते असे. वीर वामनराव जोशी यांचं ‘रणदुंदुभि’ व वि. दा. सावरकारांचं ‘संन्यस्त खड्ग’ ही संगीत नाटकं त्यांनी मराठी रंगभूमीवर दिमाखात आणली. त्यातली गाणी खूप गाजली. धर्म व देशप्रेमाचे हे संस्कारच सुप्तपणे लतादीदींच्या मनावर असावेत.
िहदी, मराठी, बंगाली, गुजराथी व इतर भारतीय व परकीय भाषांमधली मिळून लताजींनी तीनशेच्या आसपास गाणी गायली असावीत असा अंदाज आहे. या गाण्यांमध्ये मात्र एकही नाटय़गीत आढळत नाही. ते राहून गेलं असावं. त्यांची सुबक व शास्त्रशुद्ध सूची ‘लता समग्र’ या नवीन पुस्तकात असण्याची शक्यता आहे. पाच हजारांहून अधिक िहदी चित्रपट गीतांच्या तुलनेत तीनशे ही संख्या खूप कमी वाटणारी आहे. पण यातल्या गाण्यांतूनच लतादीदींचा आवाज पुढच्या पिढय़ान् पिढय़ा ऐकणार आहेत.
‘माझी गाणी भावी पिढय़ा ऐकतील का?’ असा प्रश्न त्यांनी एका मुलाखतीत विचारला आहे. कदाचित सिनेमातली गाणी हळूहळू कमी ऐकली जातील, पण जोवर भारतीयांच्या मनात धर्मप्रेम व देशप्रेम जागं आहे तोवर प्रत्येक गणेशोत्सवात, शिवजयंतीला, स्वातंत्र्य व प्रजासत्ताकदिनी त्यांची गाणी वाजवली जाणारच. कबीर, मीरा व सूरदासांच्या भजनांतून, ग़ालिबच्या गज़्‍ालांतून, ‘शिवकल्याण राजा’तल्या गाण्यांतून, ज्ञानदेवांच्या पसायदानातून आणि तुकोबांच्या अभंगांतून त्यांचा आवाज मनामनांमध्ये कायमचा साठवून ठेवला जाणार आहे. आधुनिक उपकरणांतून तो सदैव उपलब्ध असणार आहे. मनामनाला उभारी व प्रेरणा देणार आहे.