सुधीर गाडगीळ sudhirggadgil@gmail.com

१९८४ ते २०२० अशा गेल्या छत्तीस वर्षांत मुद्रित, तसंच दृक्-श्राव्य माध्यमं आणि रंगमंचावरून आशाताईंशी आणि त्यांच्याशी संबंधित कलावंतांशी अनेकदा गप्पा मारताना जाणवत गेल्या त्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या बहुरंगी, बहुढंगी छटा.. त्यांचाच हा कॅलिडोस्कोप.. आशाताईंना नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र भूषणसन्मानाच्या निमित्ताने..

thane, Shivsainik Viral message, Praises BJP MLA Sanjay Kelkar, Rajan Vichare, chaitra Navratri Festival, Sanjay Kelkar attennded Rajan Vichare Navratri, Rajan Vichare s Navratri Festival, thane navratri festival,
कडवट शिवसैनिक म्हणतो…, आनंद दिघेनंतर आमदार संजय केळकर करताहेत निस्वार्थपणे काम
What Eknath Shinde Said?
एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका, “लग्न एकाबरोबर आणि संसार…”
political parties candidates celebrated rang panchami
रंग जल्लोष रामाचा अन् प्रणितीचा..
Crowd of devotees on the occasion of Tukaram Beej sohala in Dehu
पिंपरी : देहूमध्ये तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त भाविकांची अलोट गर्दी

मरगळ झटकणारा, नवी उभारी देणारा, आपल्या दैनंदिनीत श्वासाइतकाच सहजतेनं एकरूप झालेला, सळसळत्या स्वरांचा खळाळता झरा असलेला, शतकातला प्रसन्न, टवटवीत सूर म्हणजे आशा भोसले!

अशा आशाताईंशी मुंबई दूरदर्शनवरून मी १९८४  साली प्रथम प्रकट गप्पा मारल्या. रेकॉर्डिग स्टुडिओत बाबुजी (सुधीर फडके) स्वत: उपस्थित होते. तिथपासून गेल्या ३६ वर्षांत त्यांच्या अनेक मुलाखती घेण्याचा योग येत गेला. आशाताईंशी वेळोवेळी गप्पा मारताना जाणवलं, की गाणं, गायकी परंपरा, ताजेपणा, पार्श्वगायिकांच्या दरबारातील ६५-७० वर्षांपूर्वीची त्यांची एन्ट्री, प्रचंड स्पर्धेला तोंड देत स्वत:चं स्वतंत्र स्थान निर्माण करण्याची त्यांची जिद्द, खाणं, मुलं-नातवंडांसमवेतचं आयुष्य, दागिन्यांची.. साडय़ांची आवड, परदेशात सुरू केलेली ‘आशाज्’ रेस्टॉरंट्सची साखळी, नाशिकच्या भांडय़ांपासून भेट द्यायच्या निवडक वस्तूंपर्यंत खरेदी करण्याचा कमालीचा सोस.. अशा आशाताईंच्या व्यक्तित्वाच्या असंख्य छटा त्यांनी या मुलाखतींच्या प्रवासात सविस्तरपणे नोंदवल्या. आत्मचरित्र लिहिता लिहिता मात्र त्या मधेच थबकल्या. या साऱ्या गप्पा, गाण्यांच्या प्रवासात मी अनुभवलेले, टिपलेले अनोखे असे काही क्षण.. आशाताईंच्याच शब्दांत सांगायचं तर.. ‘रंग माझा वेगळा’ दर्शविणारे!

हिऱ्या-मोत्यांनी चकाकणारं ब्रेसलेट आकाशाच्या दिशेनं भिरकावत आशाताई हातातल्या माईकवरून वयाच्या पंच्याहत्तरीनंतरही ‘ले गई.. ले गई.. मुझको हुईना खबर’ जेव्हा देशोदेशीच्या रंगमंचावरून म्हणू लागतात तेव्हा त्यांची नातवंडं शोभतील अशा वयाची श्रोत्यांमधली जनरेशनही बेभान होते.. त्या गाण्यावर डुलायला लागते.

‘देख कसम से’सारख्या गाण्यातून आशाजींच्या खटय़ाळ स्वरांतून फेकलेलं आव्हान अमिताच्या चेहऱ्यावर वाचण्यासाठी एका पिढीनं ‘तुमसा नहीं देखा’च्या वाऱ्या केल्यात. ‘पॉप’ गात त्यांनी तिसऱ्या पिढीलाही आपलंसं केलंय. ‘अच्छाजी मैं हारी’ म्हणत मनवणारी मधुबाला, ‘ओ साथी चल’ म्हणणारी हेमा, ‘बचके कहाँ जाओगे..’ विचारणारी हेलन, ‘मुझे रंग दे’ म्हणत प्रेमात रंगणारी तब्बू.. अशा कुठल्याही पिढीतली नायिका आशाजींच्या सुरांबरोबर आपल्या डोळ्यासमोर येते. त्या- त्या अभिनेत्रींचा ढंग स्वरातल्या अभिनयाने आशाजींनी गाण्यात उतरवलाय.

‘‘जसा जमाना आला, तसतशी मी बदलत गेले. त्या- त्या जमान्याच्या स्टाईलमध्ये अडकले असते तर संपले असते..’’ असं आपल्या सुरांच्या वैविध्यावर आशाताई भाष्य करतात.  गीता रॉय, शमशादजी, अमीरबाईंसारख्या पार्श्वगायिकांचा दरबार भरलेला असताना आशाताईंनी तब्बल ६५ वर्षांपूर्वी पार्श्वगायनाच्या प्रांतात एन्ट्री घेतली आणि स्वत:चा स्वतंत्र ढंग निर्माण करून आपली ‘मुद्रा’ उमटविली. अनेक संगीतकारांच्या सुरांच्या साथीनं सुमारे बारा हजार गाण्यांतून इंग्रजीसह अकरा भाषांतून गात आशाताईंचा सळसळता सूर तीन पिढय़ांतल्या रसिकांचा उत्साह वाढवत राहिला. गीतांचे टप्पे बदलले, स्वररचनांचे आकार बदलले, रुची बदलली; पण आशाताईंचा आवाज बदलत्या प्रत्येक वळणावर अनोखं रूप घेऊन आपल्यासमोर येत राहिला.. नवनवी आव्हानं स्वीकारत, वादळांना तोंड देत त्या- त्या पिढीचे ढंग समजून घेत आजही त्याच तरुणाईच्या तडफेनं त्या गात आहेत.

आशाताईंनी ‘उठी श्रीरामा’सारख्या भूपाळीतून आपली पहाट प्रसन्न केलीय. ‘पंढीरनाथा झडकरी आता’सारख्या लालित्यपूर्ण भक्तीगीतांनी दुपारच्या शांत वातावरणात रेडिओच्या जमान्यात सोबत केलीय. ‘नाच रे मोरा’नं शाळकरी सवंगडी भेटल्याचा आनंद दिलाय. ‘जीवलगा कधी रे येशील तू’ या बाबूजींनी स्वरबद्ध केलेल्या गाण्यात आशाबाईंनी ‘दिवसामागून’ हा शब्द असा वर चढवत नेलाय की बाप्या माणसाच्या पोटातही खड्डा पडावा. ‘बघ तुला, पुसतोस आहे, पश्चिमेचा गाऽऽऽर वारा’ ही हृदयनाथजींच्या ‘जिवलगा’तली अत्यंत अशक्य तान सहजतेनं घेऊन त्यांनी अक्षरश: अंगावर काटा आणालाय.

शब्दांना झोक देत म्हटलेलं ‘सपनों में मिला है मुंडा तेरा’, नेमका नकळत पॉज देत ऐकवलेलं ‘कुछ ना कहो’, ‘मुहब्बत क्या कहीये’ म्हणत पकडलेला ‘गझल’चा ट्रेंड, अंतर्मुख करणारं ‘अब के बरस’, उडत्या शैलीचं ‘अरे यार ओ मेरी’, ‘आ आ आजा’ म्हणतानाची श्वासावरची हुकमत ‘ये है रेशमी झुल्फों का’ म्हणता म्हणता त्यांचा हसण्याचा खळाळ, ‘मेरा नाम है शब्बो’  म्हणत गाता गाता संवादफेकीचं कसब.. गाण्याच्या सादरीकरणात इतके वैविध्यपूर्ण ढंग आणणाऱ्या आशाताईंना ऐकणारा प्रत्येक जण मनातून सलामच करतो. खुद्द नामवंत संगीतकारांनीही त्यांना वेळोवेळी दाद दिलीय.  ‘कवीला आपल्या काव्यातून काय व्यक्त करायचं आहे, हे गाणाऱ्याला समजलं तरच ते गाणं गायकाकडून नेमकं उतरतं. आशाला ही जाण उत्तम आहे. त्यामुळे तिचं गाणं कानातून जाऊन हृदयाला भिडतं..’ अशी  खुली दाद ज्येष्ठ संगीतकार-गायक सुधीर फडक्यांनी दिलीय. ‘सुवासिनी’मधलं त्यांचं ‘कधी रे येशील तू’ चार रागांमध्ये आहे. सहजतेनं आशाताई त्यात चेंज ओव्हर करतात.

‘झालं गेलं विसरून जा’ या चित्रपटासाठी यशवंत देवांकडे त्या गायल्या. देव म्हणतात, ‘गाण्यात कितीही बारकावे, खटके, ताना, स्वरावली काहीही असो; जिद्दीनं आशाताई ते सारं आत्मसात करतात. रियाज कसून करतात आणि कुठल्याही प्रकारचं गाणं त्या कवेत घेतात. आणि गाण्यातून सप्तरंग दाखवत रसिकांना प्रफुल्लित करतात.’

आवाजाला कंपन कसं द्यावं हे एस. डी. बर्मनसाहेबांनी त्यांना शिकवलं. ‘छोड दो ऑंचल’च्या वेळी सुरुवातीचं ‘ओहऽऽऽ..’ हे त्यांना म्हणता येईना. बर्मनदा म्हणाले, ‘‘तुम्हारे वो दिन याद करो, और उसने कैसा पल्लू पकडा था, ये याद करो.’’ आशाताई लाजून हसल्या, पण त्यातलं मर्म समजून गेल्या. असं अनेक संगीतकारांकडून त्या भरभरून शिकल्या.

लावण्यांच्या तऱ्हा तर आशाताईंचा हातखंडा! ‘कुठं कुठं जायाचं हनिमूनला’वाल्या बाळ पळसुलेंपासून ‘बुगडी’ फेम राम कदम, वसंत पवार, ‘आनंदघन’ यांच्या ‘रेशमाच्या रेघांनी’ ते अलीकडच्या आनंद मोडकांनी बांधलेली ‘लाल पैठणी रंग माझ्या चोळीला’पर्यंत! मोडक सांगतात, ‘‘विदूषक’ चित्रपटात दृश्य आहे.. लावणी गाता गाता आईचा आवाज बसतो. तिचा लहान मुलगा लावणी पुढे कंटिन्यू करतो. लहान मूल आणि आई यांच्या आवाज व उच्चाराचं भान ठेवून हे मॉडय़ूलेशन एका टेकमध्ये ‘लाल पैठणी’ गाताना आशाताईंनी सांभाळलंय.

आर. डीं.चा ‘सोना रे सोना’चा पीरियड सुपरहिट् होता. आशाताई आर.डीं.बद्दल सांगतात की, ‘ते नवनवे रिदम् घेऊन यायचे. एकच आवाज वेगवेगळ्या स्टाईलने कसा आणायचा, त्यात आपण विविधता कशी आणू शकतो, हा आत्मविश्वास त्यांनी दिला. चालू रिदम्मध्ये ‘डायलॉग’ म्हणत पुन्हा रिदम् पकडणं, हा प्रकार प्रथम त्यांनी करून घेतला.’ रवीजींकडेही खूप रंग गाण्यात डोकावलेत. ‘दिल की कहानी रंग लायी है’, ‘तुझको रख्खे राम तुझको अल्ला रखे’, ‘आगे भी जाने ना तू’, ‘ये रास्ते है प्यार के’, इ. कल्याणजींच्या मते, ‘वयात फरक पडला तरी आशाजींच्या आवाजात फरक नाही. अजोड, अवीट आवाज!’ प्यारेलालजींना वाटतं की, ‘आशाजींइतका मधाळ, धुंद,  मस्तीभरा आवाज दुसरा नाही. आवाजाचीसुद्धा नशा असते, हे आशाजींना ऐकल्यावर जाणवतं.’

आशाताईंचे संगीतकारांच्या सुरावटींशीच सूर जुळले असं नाही, तर मधुबाला, आशा पारेख, नूतन, वैजयंतीमाला, रेखा, हेलन, तनुजा यांच्याशीही त्या गाणं गाण्यापूर्वी गप्पा करत. रेखाला तर राज कपूरच्या पार्टीत त्यांनी सुचवलं होतं की, ‘‘तू उमराव जान’ केलास तर मीनाकुमारी होशील.’

‘उमराव’वरून आठवलं.. शहरयार नावाचे शायर लिहितात की, ‘खय्यामसाहेबांच्या सुरावटीवर आशाताई गझल गाऊ लागल्या की सारी रेकॉर्डिग रूम म्हणजे सरंजामी काळातील ‘महाल’च बनून जाते. लखनवी उमरावांच्या महालातील अदब आपल्या दैवी सुरांतून त्या उतरवू लागल्या की आशा भोसलेच ‘उमराव जान’ वाटू लागतात.’

‘‘दिल चीज क्या है’’ किंवा ‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है’ या गाण्यांच्या फर्माईशीखेरीज आशाजींचा कुठलाच लाइव्ह प्रोग्रॅम पुरा होऊच शकत नाही,’ असं गुलझारसाहेबांचं म्हणणं. ते म्हणतात, ‘गाणं गाण्यापूर्वी आशाजी फिल्म के कॅरेक्टर के बारे में पुछती है. एक्ट्रेस कौन है, ये पता करती है. नतीजा ये के पर्दे पर उनकी आवाज फिल्म का हिस्सा बन जाती है.’ हे सोडाच.. कॅरेक्टरचं वयही त्या विचारतात; जे हीरॉइन्ससुद्धा आपली भूमिका वठवण्यापूर्वी विचारत नाहीत.

गुलजारजी आठवण सांगतात की, ‘म्युझिक डायरेक्टरची रिहर्सल चालू झाली की त्या चहा मागवतील. गाणं स्वत:च्या हातानं मोठ्ठी मोठ्ठी अक्षरं काढून लिहितील. त्यावर तऱ्हेतऱ्हेच्या खुणा करतील. गाणं पूर्ण होईतोवर ते गाण्याच्या कागदाचं पान म्हणजे ‘अ‍ॅब्स्ट्रॅक्ट पेंटिंग’ बनलेलं असतं.’

ग. दि. माडगूळकरांची गाणी म्हणताना आशाताईंना त्यांचा कोल्हापुरातला मंगळवार पेठेतला ‘शेजार’ आठवतो. ना. धों. महानोरांचे शब्द ‘आजोळच्या आठवणी’ जाग्या करतात. त्यांचे छान सूर जुळले ते शांताबाई शेळके आणि सुरेश भटांशी!

सुरेश भट लिहितात..

‘तारुण्य तुझ्या हृदयाचे, हे असेच बहरत राहो

वार्धक्य तुझ्या जगण्याला, हे असेच विसरत जावो

तलवार तुझ्या गीतांची, बिजलीसम तळपत राहो..’

आशाताईंच्या व्यक्तित्वाचे गाण्यापलीकडचे ‘वेगळे रंग’ही आहेत.

त्यात सर्वात महत्त्वाचं वेगळेपण म्हणजे त्या जितक्या सहजतेनं गात गात असंख्य रसिकांच्या भावनांनाच जणू स्वरांतून मोकळं करतात, तितक्याच त्या परदेशात ‘आशाज्’ नावाची रेस्तराँची चेन यशस्वीपणे चालवत ‘बिझनेस वुमन’ म्हणूनही यशस्वी झालेल्या आहेत.

त्यांचं मुळातच गाण्याइतकंच खाण्यावर प्रेम आहे. त्यामुळे चवीनं खाणं नि स्वत: चवदार पदार्थ बनवून निकटच्यांना खिलवणं ही त्यांना मनापासून आवडणारी गोष्ट. कुठेही गेल्यावर हॉटेलातला एखादा पदार्थ आवडला तर थेट तिथल्या स्वयंपाकघरात शिरून त्या ‘शेफ’शी त्याची भाषा येवो- न येवो, खाणाखुणांनीसुद्धा संवाद करत पदार्थाची रेसिपी समजून घेण्याचा त्यांना प्रचंड उत्साह! ती रेसिपी स्वत: करून पोरांना कधी एकदा खिलवतेय, याचीही ओढ! पोरं म्हणाली, ‘आई, तू एवढा चांगला स्वयंपाक बनवतेस, तर आपण त्याचं पुस्तक काढू.’ आशाताईंनी ‘पुस्तक नको’ म्हटल्यावर मुलं त्यांना म्हणाली- खासकरून नंदू- की, ‘आई, तुझ्या नावाने रेस्टॉरंट काढू.’ आणि यातूनच दुबईत पहिलं रेस्टॉरंट काढलं.. ‘आशाज्’! नंतर एक- एक करत संपूर्ण आखाती देशांत, अ‍ॅमस्टरडॅमलाही रेस्तॉरां काढली. कुवैतला तीन रेस्टॉरंट्स आहेत. मँचेस्टरला ‘आशाज्’ सुरू होतंय. ‘कूक’ना घरी बोलावून आशाताईंनी स्वत: त्यांच्या पद्धतीचं भारतीय वळणाचं जेवण शिकवलं. डाळ, भरीत, खास ‘आशा टच्’चं ‘कढई गोश्त’- ज्याचं नाव ‘मस्कत गोश्त’ ठेवलंय- ते परदेशस्थ मंडळी ‘आशाज्’मध्ये आवडीनं खातात. चिकन खिमा असतो. तिथली बिर्याणी पॉप्युलर आहे. जैन मंडळींसह कांदा-लसूण नसलेलं शुद्ध शाकाहारी जेवणही खिलवण्याची ‘आशाज्’ची खासियत आहे.

आशाताई वयाची ऐंशी ओलांडल्यानंतरही तीन- तीन तासांचे शोज् करू शकतात. शोच्या तीन टप्प्यांत तीन साडय़ा दागिन्यांच्या मॅचिंगसकट बदलण्याचा उत्साह दाखवू शकतात. तसंच जगभरच्या भटकंतीत ‘आशाज्’मध्ये डोकावून, रेसिपी चेक करून, कूकना पुन:पुन्हा ‘अ‍ॅलर्ट’ करत सतत नावीन्य आणण्याचा प्रयत्न करतात. इतक्या त्या पक्क्या ‘प्रोफेशनल बिझनेस वुमन’ आहेत.

सुरेश भट सांगत की, ‘आशा ही अन्नपूर्णा आहे. मासळी ही तिच्या हातचीच खावी.’ शांता शेळक्यांना आशाताईंच्या हातचे भोपळ्याचे घारगे खूप आवडत. नाशिकचे मधुकर झेंडे सांगतात की, ‘सप्तशृंगी गडावर माळरानावर उत्तर रात्री टेंभ्यांच्या प्रकाशात दगडांवरच्या चुलीत चट्दिशी खमंग पिठलं-भात आणि अंडा बुर्जी बनवण्यातही आशाताई वाकबगार! मी नॉन-व्हेज खात नाही म्हटल्यावर मला पाच मिनिटात तुरीच्या डाळीची आमटी, गरमागरम भात, लोणकढं तूप- लिंबू पिळून.. खाण्याचा आनंद त्यांनी दिलेला आहे.’

त्या नुसत्या गायिका नाहीत, तर नायिकाही आहेत. स्टेजवर कपडय़ांच्या निवडीपासून, रंगमंचावरच्या वावरापासून प्रेझेंटेशनच्या बाबतीत त्या कमालीच्या जागरुक आहेत. गाता गाता संवाद करणं, गाण्यात सुरेल बोलणं करत गाणं आणि हसता हसता गाणं नि पुन्हा हसणं अशा प्रेझेंटेशनच्या साऱ्या छटा त्या नायिकेच्या अभिनयापेक्षा उत्तम रीतीने सादर करू शकतात. वेगवेगळ्या गायिकांच्या नेमक्या नकला करण्याची अदाकारीही त्यांच्याकडे आहे.

आशाताईंचा आध्यात्मिक रंग आणखीन वेगळा आहे.  त्यांना घरात मंत्रोच्चार आवडतात. रीतसर ब्राह्मण बोलावून घरात ‘मंत्रघोष’  करवण्यात नि ते मनापासून ऐकण्यात त्यांना रस आहे. विष्णुयज्ञ, शिवयज्ञ त्या करतात.  गणेशयाग करतात. महारूद्र तर आशाताईंना सर्वात आवडणारी गोष्ट!

विशिष्ट रंगाची, काठाची पैठणी शोधणं आणि प्रचंड किमतीची पैठणी विशेष शोमध्ये नेसणं ही त्यांची खूप आवडीची गोष्ट आहे. आशाताईंनी मला एकदा सांगितलं होतं की, ‘‘मी लाख लाख रुपयांची पैठणी पाहिलेली आहे. कारागिराच्या कौशल्यावर पैठणीची किंमत चढते.  माझ्या मनात पैठणीचं स्थान वेगळ्या कारणामुळे आहे. ते म्हणजे कलकत्त्याला मी आणि दीदीनं एकत्र शो केला होता. त्यावेळी आम्ही दोघींनी शुभ्र पांढऱ्या रंगाची, लाल-हिरव्या काठाची पैठणी नेसलो होतो.  आम्हा दोघींचा पैठणीतला तो गंगा-जमुना फोटो गौतम राजाध्यक्षांनी काढला होता. तो फोटो खूप चर्चिला गेला आणि माझ्या पैठणीप्रेमाचीही चर्चा झाली. ’’

पांढऱ्या रंगाच्या, जरीशिवायच्या पैठण्या आशाताई खास बनवून घेऊन शोमध्ये नेसतात. पांढऱ्या रंगावर काळे काठ उठून दिसतात.  पैठणीला एक पारंपरिकपणा आहे. सणाचं वातावरण आहे. टिपिकल ब्राह्मणी वास आहे. लग्नसमारंभाचा रंग आहे.. हे सारं आशाताईंना आवडतं.  म्हणूनच त्या पैठणी निवडण्यात खूप रस घेतात.

पुण्यात तुळशी बागेत खरेदी करणं आणि जुन्या नाशकात तांब्याची जुनी भांडी खरेदी करण्याचा त्यांना सोस आहे. ‘केवळ भांडय़ांसाठी मला वेगळी जागा घ्यावी लागेल एवढा भांडय़ांचा साठा मी जमवलाय,’ असं त्या एकदा म्हणाल्या होत्या. पुण्याच्या मंडईत पहाटे पहाटे जाऊन ताजी भाजी खरेदी करणं आणि मंबईत माहीमच्या मासळी बाजारात कोळणींशी गप्पा करत नेमके मासे निवडून खरीदणं, यातही आशाताई रमतात. ‘शेतकरी’ धाब्यावर थेट स्वयंपाकघराचा ताबा घेण्यातही त्यांना उत्साह असतो. फुलं आणि दागिन्यांचं वैविध्य पाह्य़लं की त्या खुलतात. ‘भाषा’ आत्मसात करण्याचं त्यांना वेड आहे. त्या- त्या प्रदेशाची बोली उच्चाराच्या पॅटर्नसह आत्मसात करत, त्या- त्या भाषेतली गाणी गाण्याचा त्यांना उत्साह आहे. त्या सर्व भाषांमध्ये गातातच; पण युरोपियन इंग्रजी स्टाईलीत, श्रीलंकन भाषेतही त्या गाऊ शकतात. एका दिवसात सात-सात गाणीही त्यांनी रेकॉर्ड केली आहेत.

प्रवास करणं आजही त्यांना खूप आवडतं.  एखाद्या शोच्या रिहर्सलकरता तासभरासाठीसुद्धा त्या मुंबईतून गाडी काढून पुण्यात येऊन पुन्हा परत घरी जाऊ शकतात. त्यांचा स्टॅमिना आणि जिद्द कमाल आहे. पुण्यात एकदा फेब्रुवारीत (पावसाळा नसलेला महिना) त्यांचा शो चालू होता. दुसऱ्याच गाण्याला अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला.  मी आणि नाना पाटेकरने बाजूच्या घरातून छत्री आणून त्यांच्या डोक्यावर धरली, तशा त्या म्हणाल्या, ‘‘ एवढे पाच हजार रसिक भिजत माझी गाणी ऐकतात आणि माझ्या डोक्यावर छत्री..? फेकून द्या ती.’’ आणि वयाच्या ऐंशीव्या वर्षी पुढची तेरा गाणी मुसळधार पावसात भिजत त्यांनी  गायली.  या जिद्दीला तुम्ही सलाम नाही करणार?

लग्न्नानंतरच्या सांसारिक अडचणींपासून मुलीच्या अकाली निधनापर्यंत संकटांचा पाऊसच त्यांच्या व्यक्तिगत जीवनात पडलाय. पण मी त्यांच्यासमवेत इतकी वर्षे कार्यक्रम करताना त्यांना एकदाही दुर्मुखलेलं पाहिलेलं नाही. अडचणींचं रडगाणं गाताना अनुभवलेलं नाही. कायम त्या प्रसन्न व आशादायी!

मी एकदा त्यांना विचारलं की, ‘‘तुम्ही कायम हसतमुख असता. ताण येत नाही?’’ त्या म्हणाल्या, ‘‘आपल्या अडचणी आपणच सोडवायच्या असतात. आपल्या संकटांना आपणच धीरानं सामोरं जायचं असतं. समोरची माणसं आपले प्रश्न सोडवू शकत नाहीत. मग अशावेळी आपुलकीनं आसमंतात जमणाऱ्यांना

आपल्या गाण्या-बोलण्यानं

आनंदच द्यावा ना!’’

ही पॉझिटिव्ह वृत्तीच त्यांच्या गाण्यात उतरते. आणि म्हणून प्रत्येक पिढीतील तरुण मंडळीही आशाताईंच्या सुरांनी वेडावून जातात.

 

नव्या पिढीचं गाणं..

एकदा आशाताईंशी बोलत असताना राज ठाकरे म्हणाले की, ‘अलीकडच्या गायिका ऐकल्यानंतर तुम्ही किती ‘ग्रेट’ आहात हे कळतं.. अधिक लक्षात येत जातं. त्यामुळे त्या अनुषंगाने विचारतो, तुमचीच गाणी गात संपूर्ण एक पिढी मोठी होत गेली आहे. तर आपलीच गाणी गात मोठी झालेली ही पिढी ऐकताना, तुमच्या कानावर ते गाणं आल्यावर काय वाटतं? या पिढीच्या गायकीबद्दल काय वाटतं?

– गाण्याच्या क्षेत्रात येणाऱ्या सगळ्या मुली ज्या आहेत, त्या अतिशय तयार आहेत. मनापासून प्रयत्न करतात. त्यांना स्टेजची अजिबात भीती नसते. आम्हाला अजून भीती वाटते स्टेजची. स्टेजवर गेलं की गाताना भीती वाटते. तर मला असं वाटतं की, ही जी गाणारी मंडळी आहेत, एखाद् वेळेस स्टेजवर गाण्यामुळे असेल; पण भावनांची त्यात कमी असते. अ‍ॅक्टिंग करून गातात; पण भावना गळ्यातून येत नाहीये. आजकाल तुम्ही ते ‘आयडॉल’ वगैरे पाहता.. त्यात एवढय़ा छोटय़ा मुलीसुद्धा अ‍ॅक्टिंग करत गातात, नाचून गातात. पण मला हे मनाला पटत नाही. कारण गाणं हे तुमच्या हृदयापासून, गळ्यातून आलं पाहिजे. येताना त्यातला तो सूर, ताल, शब्द यांची तुमच्या मनातून तयारी पाहिजे. मूळातूनच यायला पाहिजे ते. सध्या जे केलं जातं ते गाणं नव्हे, मग तो डान्सच झाला.

हे जसं गायक-गायिकांच्या बाबतीत आहे, तसंच अलीकडे मुळात रेकॉर्डिग हा प्रकार खूप मेकॅनिकल होत चाललाय असं नाही वाटत?

– मी पहिलं गाणं गायले होते पुण्यामध्ये. त्यावेळी एक ट्रॅक होता. एक माईक होता. एक माईक उलटा टांगलेला होता. आणि त्या गाण्यामध्ये मी ‘फ्ल्यूट’ आल्यानंतर खाली वाकायचे. मग व्हायोलीन वगैरे.. असं जे असायचं, ते गोल रचना असायची. आणि मी मध्ये उभी राहून गात होते. ते गाणं होतं- ‘बाळा जो जो रे..’ त्याच्यानंतर दोन ट्रॅक झाले, चार झाले, सहा झाले. व्ही. शांताराम, अण्णांच्याकडे ते आले, त्या दिवशी आम्ही फार उडय़ा मारल्या होत्या, की आता काय- सहा ट्रॅक आले. आता शंभर ,दोनशे, तीनशे ट्रॅक झालेले आहेत. पण गाण्याला काही अर्थ राहिलेला नाही. तुम्ही एक शब्द म्हणा, लाइन म्हणा, घरी बसून गा, कुठेही गा तुम्ही.. त्याला काही अर्थच राहिलेला नाही. ते उभं राहून तीन मिनिटांचं, चार मिनिटांचं गाणं एका दमात गाण्याची जी वेळ होती, जी ताकद होती, जी पद्धत होती, ती मजा नाही आता.