‘लोकरंग’ पुरवणीतील (१९ मार्च) ‘सांगतो ऐका’ या स्तंभातील ‘स्टालिनची शापित कन्या’ हा लेख म्हणजे रंजकतेच्या आहारी गेल्यानं ऐतिहासिकतेचंच नव्हे, तर वास्तवाचंही भान सुटल्याचा उत्तम नमुना आहे. ‘इतिहासात भयंकर नरसंहार घडवणाऱ्या दोन राक्षसांपैकी स्टालिन एक आणि दुसरा अ‍ॅडॉल्फ हिटलर. या दोघांपैकी जास्त भयंकर कोण होता, हे टॉस करूनच ठरवावं लागेल’ असं सांगून लेखक पुढं म्हणतो की, ‘स्टालिन हे नाव कोठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय अशा वाचकांसाठीदेखील हा लेख रोचक ठरेल.’

उघडच आहे की, केवळ ‘रोचकता’ याच एकमेव निकषाच्या आधारे हा मजकूर लिहिण्याचा लेखकाचा मानस स्पष्ट आहे. त्याला ऐतिहासिकतेशी व वास्तवाशी काही देणंघेणं नाही. इतिहासातील काही घटना घ्यायच्या, त्यासंबंधी इकडं तिकडं जे काही प्रसिद्ध झालं असेल, त्यातील सोयीस्कर ते निवडायचं व रंजकरीत्या मांडायचं असा लेखकाचा एकूण शिरस्ता दिसतो.

मग अशा थिल्लर लेखनाचा प्रतिवाद करण्याची गरजच काय, असा प्रश्न साहजिकच निर्माण होतो. मात्र, अलीकडच्या काळात वृत्तपत्रांत जे लिहिलं जातं किंवा समाजमाध्यमांत किं वा वृत्तवाहिन्यांवर जे दाखवलं जातं, तेच खरं मानण्याकडं समाजाचा- विशेषत: तरुण पिढीचा- कल वाढला आहे. त्यातूनच ‘फेक न्यूज’चं पर्व सुरू झालं आहे. म्हणूनच अशा रंजक गोष्टीमागचं ऐतिहासिक वास्तव मांडलं जायला हवं. त्यासाठीच हा पत्रप्रपंच.

पहिला मुद्दा हिटलर व स्टालिन या दोन ‘राक्षसां’च्या वैचारिक भूमिकांचा. हिटलरचा नाझी पक्ष हा फॅसिझमचा पुरस्कर्ता होता. फॅसिझम ही एक वर्णद्वेषी, स्त्रीविरोधी, सैन्यदृष्टय़ा आक्रमक विचारसरणी आहे. स्टालिन हा कम्युनिस्ट होता. कम्युनिझम हा वर्णवादविरोधी आणि लैंगिक समतावादी आहे. कम्युनिझम हा प्रामुख्याने लष्करीदृष्टय़ा बचावात्मक आणि समाजवादी शासनसंस्थेचं समर्थन करणारा आहे. मात्र, तो कॉर्पोरेट भांडवलशाहीवादी कधीही नसतो. तो एकचालकानुवर्ती किंवा दडपशाहीकडे झुकणारा असला, तरी फॅसिस्ट नक्कीच नाही.

फॅसिझम हा मूलतत्त्ववादी, तसेच जहाल राष्ट्रवादाचे एक रूप म्हणून परिभाषित केला गेला आहे. स्टालिनचा सोविएत युनियन नक्कीच कट्टरपंथी आणि एकचालकानुवर्ती होता, परंतु कोणत्याही प्रकारे राष्ट्रवादी नव्हता. स्टालिन स्वत: जॉर्जियन होता व तो रशिया व इतर प्रांतांवर राज्य करीत होता. स्टालिननं कायम आंतरराष्ट्रीयतेला राष्ट्रवादापेक्षा महत्त्व दिलं. जनतेची एकजूट ही राष्ट्रवादाच्या नावावर नव्हे, तर कम्युनिस्ट विचारांनी करण्यावर त्याचा दृढ विश्वास होता. उलट,  फॅसिझम अतिरेकी राष्ट्रवादाच्या आधारे जनतेची एकजूट करण्यावर भर देत असतो.

कम्युनिझमनं सामाजिक व आर्थिक व्यवस्था मोठय़ा प्रमाणावर बदलली. तशी ती फॅसिझममध्ये बदलली जात नाही आणि हिटलरच्या काळातही ती बदलली गेली नाही. कम्युनिझम आणि फॅसिझम या दोन्ही एकचालकानुवर्ती व्यवस्था आहेत, तरीही त्यांची ध्येयं ही १८० अंश कोनात विरुद्ध दिशेला असतात. समाजात उध्र्व दिशेनं जाण्यासाठी आवश्यक ते सामाजिक, आर्थिक बदल घडविणं हे कम्युनिस्ट राजवटीचं पहिलं पाऊल असतं, तर फॅसिझममध्ये नेमकं याच्या उलट होतं. फॅसिझम हा भांडवलशाहीबरोबर आनंदानं नांदतो. कम्युनिझममध्ये उत्पादनांच्या साधनांचा मालकी हक्क  हा सगळ्या देशाकडं असतो. स्टालिनचे वडील हे चर्मकार होते. त्यांच्या कारखान्यातील अनेक कामगारांकडून ते काम करवून घेत. आपले वडील हे शोषक होते, असं स्टालिननं स्पष्ट म्हटलेलं आहे.

लांडगा आणि कुत्रा हे दोन्ही प्राणी एकाच प्रजातीतील आहेत. दोघांनाही सुळे असतात. त्यांची घ्राणेंद्रिये अत्यंत सक्षम असतात. शरीररचनाही सारखीच असते. मात्र, कुत्रा धनगरांच्या मेंढय़ांचे रक्षण करतो, तर लांडगा धनगरांच्या शेळ्यांना मारतो. फॅसिझम व कम्युनिझमची तुलना करायची झाल्यास हे उदाहरण पुरेसं आहे.

राहिला मुद्दा हिटलर व स्टालिन या ‘राक्षसां’नी माणसं मारण्याचा! हिटलरनं ज्यूंचा वंशविच्छेद का व कसा केला, याचे सज्जड पुरावे जगभर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर जिप्सी आणि इतरही अनेक सामाजिक गटांचे शिरकाण करून त्यांना पूर्णपणे संपविण्याच्या हिटलरच्या प्रयत्नांचे कागदोपत्री दस्तावेज उपलब्ध आहेत.

स्टालिननंही माणसं मारली. रॉबर्ट कॉन्क्वेस्ट यांच्या ‘द ग्रेट टेरर’ या १९६८ सालातील गाजलेल्या ग्रंथात स्टालिननं केलेल्या संहाराचं सविस्तर वर्णन वाचायला मिळतं. मात्र, या ‘ग्रेट टेरर’मागील कारणं ही पूर्णत: राजकीय होती. राजकीय कारणास्तव लोकांना लक्ष्य बनवलं गेलं, विरोधक आणि असंतुष्टांना ठारही मारलं गेलं. ही गोष्ट अमानुष व निंदनीय होतीच. मात्र, तो वांशिक नरसंहार वा वंशविच्छेद नव्हता. ‘हिटलर व स्टालिन यांच्यापैकी कोण भयंकर, हे टॉस करून ठरवावं लागेल..’ असं रॉबर्ट कॉन्क्वेस्ट अथवा त्या काळासंबंधी लिहिणारे इतिहासकारही म्हणत नाहीत.

शेवटी कोणी किती माणसं मारली, स्टालिनच्या राजकीय भूमिकांमुळे सोव्हिएत युनियन व विशेषत: युक्रेनमध्ये किती लोक भुकेनं मेले, याचाही हिशेब करायला काहीच हरकत नाही. मात्र, तसा तो करायचा झाल्यास अमेरिकेनं लॅटिन अमेरिकेपासून ते व्हिएतनाम, इराक आदी देशांवर लादलेल्या युद्धांमुळे किती लोक प्रत्यक्ष व किती लोक भुकेनं मेले, याचाही हिशेब करावा लागेल.

– प्रकाश बाळ