13 August 2020

News Flash

वाचकांच्या मुठीत सापडलेली ग्रंथलेखन-वाचन संस्कृती

महाराष्ट्राच्या निर्मितीनंतरची दोन दशके एक प्रकारचे भारलेपण होते. त्यातून लेखन, वाचन व ग्रंथव्यवहार यांत अनेक महत्त्वपूर्ण घटना-घडामोडी घडल्या.

मुद्रणपूर्वकाळात ग्रंथव्यवहार आणि लेखन-वाचन संस्कृती वेगवगळ्या स्वरूपाची होती. ग्रंथव्यवहार हा हस्तलिखित पोथ्यांच्या स्वरूपात होता आणि त्यामुळे एका ग्रंथाच्या अनेक प्रतींची संख्या मर्यादित होती.

प्रदीप कर्णिक – karnikpl@gmail.com

महाराष्ट्राच्या निर्मितीनंतरची दोन दशके एक प्रकारचे भारलेपण होते. त्यातून लेखन, वाचन व ग्रंथव्यवहार यांत अनेक महत्त्वपूर्ण घटना-घडामोडी घडल्या.  पुढे मात्र सत्तासंघर्ष, नेतृत्वात वारंवार झालेले बदल, भ्रमनिरास, स्वप्नभंग अशा अनेक कारणांचे परिणाम सांस्कृतिक-वाङ्मयीन क्षेत्रातही दिसू लागले. आणीबाणीनंतर तर कमालीची एकाधिकारशाही सर्वच क्षेत्रांत जाणवण्याइतपत उघड होऊ लागली. अनेक संस्थांची ‘संस्थाने’ झाली. त्यातून साहित्य संस्था, ग्रंथालये, शिक्षणसंस्थाही सुटल्या नाहीत.

मुद्रणपूर्वकाळात ग्रंथव्यवहार आणि लेखन-वाचन संस्कृती वेगवगळ्या स्वरूपाची होती. ग्रंथव्यवहार हा हस्तलिखित पोथ्यांच्या स्वरूपात होता आणि त्यामुळे एका ग्रंथाच्या अनेक प्रतींची संख्या मर्यादित होती. त्यात लेखनिकाच्या चुका, नजरचुकीच्या चुका, ऐकण्याच्या वा उच्चाराच्या चुका, स्वलेखन घुसवण्याची प्रबळ इच्छा, अनवधानाने गाळलेला मजकूर, दुबार मजकूर अशा असंख्य दोषांनी युक्त असा तो ग्रंथ प्रकाशन व्यवसाय होता. एका विशिष्ट वर्गापुरताही तो बंदिस्त होता. हरवणे, गहाळ होणे, कसर लागणे, हवा, पाणी व दमटपणाचा परिणाम होणे, काही पाने हरवणे, लेखनप्रतीचं कार्य अर्धवट राहणे इत्यादी दोषांनी तो व्यवहार युक्त होता.

वाचन संस्कृती मात्र सामूहिकरीत्या प्राधान्याने पार पाडली जात असे. ग्रंथ लावणे, श्रावणमास, चातुर्मासातील पारायणे, कीर्तन, प्रवचन, निरूपण इत्यादी प्रकारांतून ग्रंथवाचन संस्कृती बहरलेली दिसून येते. गुरुकुल पद्धतीच्या माध्यमातून किंवा त्याकाळी निर्माण झालेल्या आचार्य पद्धतीच्या माध्यमातून ग्रंथलेखन, मुखोद्गत करणे, टीका-चर्चादी संस्कार करणे इत्यादी माध्यमांतून लेखन-वाचन संस्कृती पिढय़ान् पिढय़ांतून पुढे सरकत राहिली होती.

मुद्रणाचा शोध व त्यातही ठसे निर्माण करण्याचे कार्य विलकिन्सन प्रथम आणि नंतर विल्यम कॅरी याने यशस्वी केले आणि मराठी मुद्रित ग्रंथव्यवहार १८०५ साली सुरू झाला. १८१८ साली पेशवाई संपून भारताची उरलीसुरली सत्ताही इंग्रजांच्या एकहाती आली. त्यांनी केलेल्या अनेक बदलांपैकी दोन बाबी ग्रंथव्यवहार आणि वाचन संस्कृतीला पोषक ठरल्या. एक शिक्षणव्यवस्था आणि त्यासाठी लागणारी ग्रंथांची निर्मिती आणि दुसरी ग्रंथालयांना चालना. शिक्षित होत चाललेल्या पिढीने पुढे स्वत: अनुवादातून, लेखनातून ग्रंथव्यवहार पुढे नेला. शाळा आणि वर्तमानपत्रे, नियतकालिके काढून बहुजन समाजाला लिहिते-वाचते केले. न्या. रानडे यांनी ग्रंथकार परिषद भरवून ग्रंथव्यवहार आणि वाचन संस्कृतीला संस्थात्मक जीवन दिले. कॅ. फ्रेंच यांच्या प्रेरणेतून अहमदनगर येथे पहिली नेटिव्ह लायब्ररी स्थापन झाली आणि पुढे महाराष्ट्रभर ग्रंथालयांचे जाळे पसरले. त्यात मोलाची भर श्रीमंत सयाजीराव गायकवाड सरकारने घातली आणि मराठी ग्रंथांना आणि मराठी वाचकांना न्याय मिळत नाही म्हणून मराठी सारस्वतकार वि. ल. भावे यांनी ठाण्यात पहिले मराठी ग्रंथसंग्रहालय स्थापन केले. त्यानंतर महाराष्ट्रभर मराठी गं्रथालयांची चळवळ फोफावली. म. फुले व सावित्रीबाई फुले यांनी नाकारलेल्या समाजाला जवळ करून शूद्र आणि स्त्रियांना शिक्षण-वाचनाचे दालन खुले केले आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘शिका’ आणि ‘संघटित व्हा’ या प्रेरणेतून लेखन- वाचन-शिक्षण या त्रयीला महत्त्व देऊन एक मोठा समाजवर्ग जागृत केला.

महाराष्ट्रातल्या शिक्षणसंस्था, साहित्य संस्था, ग्रंथालये, वर्तमानपत्रे, नियतकालिके आणि साहित्यादी कार्यक्रम व उपक्रम, चर्चा, परिसंवाद, वादविवाद स्पर्धा, व्याख्यानमाला (वसंत व्याख्यानमालेसारखे अनेक उपक्रम), रविकिरण मंडळाचे कार्य आणि त्यासारखी जागोजाग निर्माण झालेली काव्यचर्चा मंडळे यांनी प्रचलित केलेल्या ग्रंथ-वाचन संस्कृतीचा इतिहास तर सोडाच; पण आपण त्याची साधी साधनेही गोळा केली नाहीत. १८०५ ते २०२० या २१५ वर्षांच्या काळाचा ग्रंथव्यवहार आणि वाचन-व्यवहार हा केवळ ग्रंथनिर्मितीशी केंद्रित झाला आहे. तो इतर घटकांकडेही वळायला हवा. अगदी आजही गावोगाव होणाऱ्या कीर्तनं, प्रवचनं, निरूपणं, लोककलांपर्यंत तो न्यायला हवा, इतका तो विस्तृत, विखुरलेला आणि सर्वदूर पसरलेला आहे.

१८५७ साली मुंबई विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर महाविद्यालये स्थापन होत गेली. या महाविद्यालयांमध्ये होणारे विविध वाङ्मयांचे रीतसर शिक्षण, तेथील समृद्ध ग्रंथालये, विद्वान अध्यापक वर्गाने केलेले वाचन संस्कार आणि महाविद्यालयांची वार्षिक प्रकाशने आणि त्यातून निर्माण झालेले कोवळ्या वयाचे लेखक यांना वाचन-लेखन संस्कृतीत महत्त्वाचे स्थान आहे. शैक्षणिक संस्थांच्या इतिहासात या कार्याला स्थान मिळालेले नाही, हे वाचन-लेखन संस्कृतीचे दुर्दैवच! पण एक फारच मोठे उदाहरण अचंबित करणारे ठरले. त्याचे नाव आहे ‘अस्मितादर्श’! मिलिंद महाविद्यालयाचे हे वाङ्मयीन रोपटे पुढे विशाल वृक्षात फळास आले. त्यातून नवनवे लेखक घडले, घडवले गेले. वाचन-लेखन संस्कृतीतील ‘अस्मितादर्श’ हे सुवर्णपान म्हणता येईल. असे अन्यही प्रयोग आहेत, पण इतिहासाला त्याची जाणीव नसावी.

मुद्रणोत्तर माध्यमे

आकाशवाणीचे माध्यम जन्माला आल्यानंतर या माध्यमाने मुद्रण माध्यमांना पूरक आणि स्वतंत्रपणे ग्रंथप्रसाराचे कार्य केले. वर्तमानपत्रे-नियतकालिके या माध्यमाने गिळंकृत केली नाहीत. ग्रंथसंस्कृती खाऊन टाकली नाही, उलट ग्रंथ, वाचन, लेखन, लेखक, टीका, साहित्य या माध्यमाने घराघरात नेऊन पोहोचवले. नवलेखक व वाचकवर्गाला या नवमाध्यमात आकर्षित केले. स्वातंत्र्योत्तर काळात अगदी दूरदर्शन येईपर्यंत ही मुद्रित आणि अमुद्रित माध्यमे हातात हात घालून वाचन, लेखन आणि ग्रंथसंस्कृतीच्या प्रचार-प्रसाराचे कार्य करीत होती. हे चित्र बदलले ते पुढच्या काळात. संगणक आणि संप्रेषक्षणादी क्षेत्रात आणि तंत्रज्ञानादी विभागांत बदल घडल्यानंतर, तिथे क्रांती निर्माण झाल्यानंतर हे चित्र नुसते बदलले इतकेच नाही, तर ग्रंथव्यवहार, वाचन-लेखन संस्कृतीचा चेहरामोहराच बदलून गेला. परंतु या क्रांतीच्या काळाअगोदर ग्रंथ-वाचन-लेखन संस्कृतीच्या दृष्टीने महाराष्ट्रात असे काही घडले होते की त्याने  ग्रंथ-वाचन-लेखन संस्कृती ढवळून निघाली होती.

महाराष्ट्र राज्यनिर्मिती

१ मे १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. तो मंगल कलश यशवंतराव चव्हाण यांनी आणला. एका सुसंस्कृत, बहुश्रुत आणि उत्तमोत्तम कलाकार, लेखक, विद्वानांचा सहवास लाभलेल्या सुजाण व्यक्तिमत्त्वाकडे राज्याचे नेतृत्व आले. त्यामुळे राज्यात नवनिर्माणाला चालना मिळाली. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, त्यांनी हाती घेतलेला मराठी विश्वकोशाचा प्रकल्प, महत्त्वाच्या पुस्तकांचा सुरू झालेला अनुवाद, शासनाद्वारे हाती घेतलेले परिभाषा व शब्दकोशांचे कार्य, लोकसाहित्य मंडळासारखी इतर साहित्य-सांस्कृतिक मंडळे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यासारख्या विद्वान, व्यासंगी व्यक्तीच्या धोरणांचा दीर्घ परिणाम फक्त शासकीय प्रकल्पांवरच झाला नाही, तर इतर संस्थांनाही प्रेरणा देऊन गेला.

डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी लावलेल्या ज्ञानकोशाच्या वृक्षाच्या पारंब्या इतर भागांतही रुजू लागल्या होत्याच. पं. महादेवशास्त्री जोशी यांचा ‘भारतीय संस्कृतिकोश’, सिद्धेश्वरशास्त्री यांचे ‘प्राचीन, मध्ययुगीन, अर्वाचीन चरित्रकोश’, दाते-कर्वे यांचा ‘महाराष्ट्र शब्दकोश’, शंकर गणेश दाते यांची ‘मराठी ग्रंथसूची’, वडेकरांचा ‘मराठी तत्त्वज्ञान महाकोश’ अशासारख्या महत् बृहत् प्रकल्पांनी मराठी ग्रंथव्यवहार, लेखन-वाचन व्यवहार फार मोठय़ा उंचीवर आणून ठेवला. ज्ञानकोश ते विश्वकोश असा प्रवास जरी बघितला तरी लेखन-वाचन-ग्रंथनिर्मितीचे चलनवलन किती प्रवाही होते याचा अंदाज येईल. तर्कतीर्थ फक्त विश्वकोशातच गुंतून गेले असे झाले नाही, त्यांनी महाराष्ट्रातल्या काही संस्थांना प्रेरितही केले. उदा. मराठी भाषा संशोधन मंडळाने गं. दे. खानोलकरांच्या संपादकत्वाखाली ‘मराठी वाङ्मयकोशा’च्या चार खंडांची योजना हाती घेतली. त्यापैकी पहिला खंड प्रकाशितही केला. अशी अन्य उदाहरणेही सांगता येतील. साहित्य संस्कृती मंडळाचे पुढच्या काळातले एक महत्त्वाचे कार्य म्हणजे नवलेखक अनुदान योजना. या योजनेअंतर्गत किती नवलेखक पुस्तकरूपाने प्रकाशात आले. ग्रंथव्यवहार फुलून येत होता, इतकेच नव्हे तर ‘नवे कवी : नवी कविता’सारखी योजना ‘पॉप्युलर’सारख्या मातब्बर प्रकाशन संस्थेने हाती घेतली नि ती यशस्वीही केली. त्यातून ना. धों. महानोर, शंकर वैद्य, वसंत सावंत यांच्यासारख्या अनेकांचे काव्यसंग्रह निघाले. आणि याला जोड होती कॉन्टिनेंटलच्या निवडक संपादित कवितांच्या संग्रहांच्या मालिकांची. तेव्हा ग्रंथव्यवहार आर्थिकदृष्टय़ा तेजीत होता का हे माहीत नाही, पण संपन्न मात्र जरूर होता.

महाराष्ट्राची निर्मिती जरी एका बाजूला झाली असली तरी १९६० चे हे दशक महाराष्ट्राच्या वाङ्मयीन व सांस्कृतिक जीवनाला श्रीमंत करणारे ठरले. याच काळात महाराष्ट्रात विविध वाङ्मयीन-सांस्कृतिक चळवळींचा उदय झाला. या चळवळींच्या केंद्रस्थानी होत्या दोन चळवळी. मराठी लघु अनियतकालिकांची चळवळ आणि दुसरी दलित साहित्याची चळवळ. या दोन वाङ्मयीन चळवळींनी मराठी ग्रंथ-लेखन-वाचन चळवळीला नेमाडे- चित्रे- कोलटकर- राजा ढाले- नामदेव ढसाळ यांच्यासारखे बिनीचे लेखक-कवी दिले. वाङ्मयीन चर्चेने मराठी साहित्याचे विश्व ढवळून काढले. ‘वासू नाका’वरचा वादंग असो, ‘शामा’ कादंबरीवरचा खटला असो, ‘म्हातारी’ कादंबरीला धारेवर धरणे असो किंवा ‘साहित्यातला बीभत्स गारठा’ असो; या चर्चा-वादळाने मराठी वाचक प्रगल्भ केला यात वाद नाही. ‘सखाराम बाइंडर’, ‘घाशीराम कोतवाल’वरच्या चर्चेने मराठी नाटय़रसिक प्रगल्भ केला.

साहित्य चळवळी आणखी व्यापक झाल्या. जनसाहित्य चळवळ, ग्रामीण साहित्य चळवळ, स्त्रीमुक्ती चळवळ अशा अनेक चळवळींनी मराठी ग्रंथलेखन-वाचन क्षेत्र समृद्ध केले. कधी वैचारिकदृष्टय़ा, तर अनेकदा नवसाहित्याच्या निर्मितीतून.

१९७५ च्या आणीबाणीचाही या वातावरणावर परिणाम झाला. तथापि मुंबईत घडलेली एक घटना आणि त्या चळवळीचे कार्य विसरता येणार नाही. ती चळवळ म्हणजे ‘गं्रथाली वाचक चळवळ’! या चळवळीने १९७५ ते ८५ या दशकात महाराष्ट्रात नवचैतन्य निर्माण केले होते हे कोणीच नाकबूल करणार नाही. शंकरराव खरात, बाबुराव बागूल मराठी साहित्यात विराजमान असतानाही ग्रंथालीच्या ‘बलुतं’ आणि ‘उपरा’ या दोन पुस्तकांनी क्रांती घडवली. मराठी ग्रंथ लेखन-वाचन चळवळीत या दोन पुस्तकांना प्रेरणास्रोताचा मान आहे. ग्रंथालीने एकदाच का होईना, ‘वाचन परिषद’ही घेतली, हेही महत्त्वाचे पाऊल होते.

मुंबईतील समांतर साहित्य संमेलनामुळे पुढे अनेक छोटी-मोठी साहित्य संमेलने समांतरपणे आयोजित केली गेली. विद्रोही, आदिवासी, मुस्लीम.. पुढे तर अनेक संमेलने गावोगाव निघाली. याचा कमी-अधिक परिणाम झालाच आहे. हा विषय खूपच मोठा आहे. ग्रंथ लेखन-वाचन व्यवहाराचा विचार करताना विविध मराठी प्रकाशकांचा विचार महत्त्वाचा ठरतो. एकेका प्रकाशन संस्थेचा इतिहास आणि सर्व प्रकाशनविश्वाचे सामूहिक कार्य हा स्वतंत्र अभ्यासविषय आहे. त्यांचे योगदान कितीतरी मोठे आहे. मुद्रक, चित्रकार, मांडणीकार, संपादक, मुद्रितशोधक, बाइंडर आणि विक्रेते यांच्या कार्यासह हा इतिहास लिहायला हवा. लिमये, गोगटे यांचे यासंदर्भातील इतिहास प्रसिद्ध असले तरीही. मराठी दिवाळी अंकांची वाचनसंस्कृती हासुद्धा असाच एक स्वतंत्र, पण दुर्लक्षित इतिहास-विषय आहे.

नवतंत्रज्ञान

प्रतिलिपी यंत्रे (झेरॉक्स) आली तेव्हा अभ्यासकांची मोठीच सोय झाली. त्यांचा वेळ वाचला म्हणून या तंत्रज्ञानाचे अमाप कौतुकही झाले. पुढे ध्वनिफीत-चित्रफीतरूपात ग्रंथ-माध्यमांतर झाले नि काही काळातच सीडी, पेनड्राइव्ह, भ्रमणध्वनीवर सेकंदात मिळणाऱ्या साहित्याने असे काही तंत्रज्ञान होते हेसुद्धा विसरायला लावले आहे. आता ‘रोज नवे’ अशी आजची अवस्था आहे.

संगणकावरील मुद्रणाने मराठी प्रकाशनविश्वाने कात टाकली आणि आता ई-बुक, ई-नियतकालिके, प्रिंट ऑन ऑर्डर या नव्या आव्हानांसमोर मान टाकायची वेळ त्यांच्यावर आली आहे. नव्वदनंतर साप्ताहिके-नियतकालिकांचे विश्व वर्तमानपत्रांनी व्यापून टाकले आणि मराठी नियतकालिकांना दम्याचा विकार जडला, आज  महामारीने घरी बसलेल्या वाचन-लेखन संस्कृतीतील घटकांनी मुद्रितांच्या ऐवजी पीडीएफ, लिंकची वाट धरली आहे. मुद्रितविश्व हळूहळू बंद पाडलेल्या वाचकांनी आणि व्हॉट्सअ‍ॅप, सोशल मीडियावर जगणाऱ्या वाचकांनी हा अंदाज काही दिवसातच खोटा पाडला आहे. पुस्तके, नाटके, चित्रपट, ग्रंथालयांतील ग्रंथसाठा आज जो-तो एकमेकांकडे पाठवतोय. वाचकांना साहित्य उपलब्ध होतंय. स्वामित्व हक्क वगैरेची तमा न बाळगता. अमुक एका पुस्तकाची पीडीएफ आहे का, म्हणून विचारणा होते, नेटवर तपासले जाते, असेल तर क्षणात ते पुस्तक वाचन संस्कृतीला उपलब्ध होते.

एकेकाळी हाताच्या बोटावर मोजता येईल इतकी असणारी ग्रंथलेखन-वाचन संस्कृती आता हातोहात पसरली आहेच; आणि खऱ्या अर्थाने ती वाचकांच्या मुठीत सापडली आहे. जगलो तर याचे फायदे-तोटे मांडले जातील, नाही तर हा एक नवा ‘वाचू आनंदे’चा प्रयोग म्हणायचा नि काळाला सामोरे जायचे.

ग्रंथव्यवहार : टीका नव्हे, वास्तव!

महाराष्ट्राच्या निर्मितीनंतरची दोन दशके एक प्रकारचे भारलेपण होते. पुढे पुढे मात्र सत्तासंघर्ष, नेतृत्वात वारंवार झालेले बदल, भ्रमनिरास, स्वप्नभंग अशा अनेक कारणांचे परिणाम सांस्कृतिक-वाङ्मयीन क्षेत्रातही दिसू लागले. आणीबाणीनंतर तर कमालीची एकाधिकारशाही सर्वच क्षेत्रांत जाणवण्याइतपत उघड होऊ लागली. अनेक संस्थांची ‘संस्थाने’ झाली. त्यातून साहित्य संस्था, ग्रंथालये, शिक्षणसंस्थाही सुटल्या नाहीत. मराठी ग्रंथ लेखन-वाचन संस्कृतीवर याचा परिणाम झाला. तो नेमका कसा झाला, हे मांडल्यास ते अस्थानी ठरणार नाही.

खरं तर संख्यात्मकरीत्या प्रकाशन संस्थांची संख्या वाढत गेली. ग्रंथालये, महाविद्यालये, विद्यापीठे नवनव्या भागांत स्थापन होऊन त्यांची संख्याही वाढत होती. ग्रंथालीच्या प्रयोगाने प्रकाशन संस्था वितरणाच्या अंगाने गंभीर झाल्या होत्या. शासकीय ग्रंथखरेदी, शासनाचे ग्रंथ पुरस्कार, इतर पुरस्कार यांचे पेवच फुटले होते. आणि तरीही ग्रंथव्यवहार १९८५-१९९० नंतर अधोगतीस लागलेला दिसून येत होता.

भ्रष्टाचार चारी बाजूंनी वेढला होता. गं्रथखरेदीत सर्वच पातळ्यांवर ‘हात ओले’ केल्याशिवाय खरेदी केली जात नव्हती, हे उघड गुपित होते. ४०% च्या बिनभांडवली नफ्यावर वितरक नामक दुकानदार प्रकाशकांची अडवणूक करीत होता. नुसती अडवणूकच नव्हती, तर ‘वसुली’ नावाच्या डोकेदुखीने प्रकाशक पार हैराण झाला होता. नवीन ग्रंथ जन्माला येताच २०० ते ३०० प्रती ७० ते ८० टक्क्यांनी खरेदी करण्याची यंत्रणा वाढीस लागली होती. लेखकांकडूनच पैसे घेऊन हवशे, नवशे, गवशे लेखक आणि प्रकाशक जन्मास आले होते, त्यामुळे ती पुस्तके विकली गेली काय अन् न गेली काय, प्रकाशक नामक घटकाला त्याचे सोयरसुतक नव्हते. लेखकाने घातलेल्या पैशाच्या किमतीची पुस्तके लेखकाच्या गळ्यात मारली की प्रकाशक सहीसलामत व्यवहारातून बाहेर येत होता. वितरण व्यवस्था पूर्वी ज्या साखळी तत्त्वावर उभी होती- घाऊक, दुकानदार, छोटा विक्रेता आणि फिरता विक्रेता- तिलाच या एकगठ्ठा खरेदी बाजाराने गोत्यात आणले. प्रकाशक ग्रंथवितरण साखळीच्या तत्त्वाला विचारेनात. आणि एकगठ्ठा खरेदीच्या बातम्यांचा ‘वास’ काढत ते हिंडताना दिसू लागले. त्यामुळे पुस्तकांच्या दुकानांसह वितरण व्यवस्थाच कोलमडून गेली. सार्वजनिक ग्रंथालये अनुदानाच्या अत्यंत अपुऱ्या पाठिंब्यावर कशीतरी चालू होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातल्या सार्वजनिक ग्रंथालयांना अवकळा प्राप्त होत गेली. त्याचा परिणाम खरेदीवर तर झालाच; परंतु वाचकवर्गावरही झाला. वाचक कमी होत गेले. नि ते वाढावेत म्हणून कोणीच उपाय काढीनासे झाले.

वाचकही कमी होण्याची कारणे होती, आहेत. पण त्याचा कोणीच गंभीरपणे विचार केला नाही. रंगीत दूरदर्शन, विविध वाहिन्या, मनोरंजनाची वाढती साधने, बदललेला वाचकवर्ग, नव्या शिक्षित तरुणवर्गाच्या अपेक्षा आणि उपलब्ध साहित्याचा न बसणारा मेळ अशा अनेक कारणांनी वाचकवर्गाने आधीच ग्रंथालयांकडे पाठ फिरवली होती; त्यात तंत्रज्ञानाने तर वाचकवर्गच पळवून नेला. संगणक, संगणकीय जाळे, विविध उपकरणे अशा गतिमान काळाने हळूहळू वाचक नावाच्या घटकाचा घास घ्यायला सुरुवात केली. हे आजही वाढत्या वेगाने होत आहे.

जागेला सोन्याचा भाव आल्याने पुस्तकाचे दुकान की अन्य व्यवसाय, हा प्रश्न पुढच्या पिढीला सतावणारा नव्हताच. त्यामुळे साखळीतला एक महत्त्वाचा दुवाच निखळून गेलाय.. पुढे तर नक्कीच जाणार आहे. फिरते विक्रेते ही संकल्पना बघता बघता संपून गेली. इंग्रजी गं्रथव्यवहारात जसे ‘मार्केटिंग’ला महत्त्व असते ते मराठी ग्रंथव्यवहारात कधीच लाभले नाही. (अपवाद ‘राजहंस’ वा काही मोजक्या प्रकाशन संस्थांचाच.) इंग्रजी ग्रंथव्यवहारात जसे ग्रंथ संपादक व संशोधन विभाग असतो तशी व्यवस्था मराठीला कधीच म्हणे परवडली नाही. घरच्या संपादकांवर काही प्रकाशन संस्थांनी दीर्घकाळ तग धरला. पण पुढे त्यांनीही हात टेकले. लेखक शोधायचा असतो, घडवायचा असतो, लेखन संपादित-संस्कारित करायचे असते, याचा नवनव्या प्रकाशन संस्थांना पत्ताच नसतो.

पूर्वी एका छत्राखाली मुद्रणाची कामे होत असत. आता मुद्रण म्हणजे संकलन करणारी एक प्रकाशक नावाची व्यक्ती. अक्षरजुळणीकारांकडे शिक्षित माणसांची कमतरता, मुद्रितशोधकांचीकमतरता, अपुरे भांडवल, गुंतवणुकीतून परतावा मिळण्याची हमी नाही.. असा हा आतबट्टय़ाचा व्यवसाय तरीही का केला जातोय याचेच आश्चर्य वाटावे. लेखक नावाच्या घटकाला खुणावणारी इतर माध्यमे आणि त्यात गुंतून पडलेली त्यांची मने सकस लेखनाला मारक ठरली नसतीलच असे नाही.

या सर्व कारणांसह आणखी अनेक कारणे आहेत; त्यापैकी परंतु दोन अत्यंत महत्त्वाची आहेत. एक म्हणजे प्रकाशकांकडून नवीन पुस्तकांची न केली जाणारी जाहिरात. काही प्रकाशक जाहिरातीचा उत्तम वापर करताना दिसतात. पण काहींची मदार फक्त परीक्षणांवरच राहते. पुस्तक वाचकांपर्यंत गेलेच नाही तर ते वाचले कसे जाणार? त्यातही दुसरे कारण म्हणजे मराठी वाचकांना पुस्तक विकत घ्यायची न लागलेली सवय. त्यामुळे सारा खरेदी व्यवहारच संस्थाकेंद्रित झाला आहे. मग दुसरे काय होणार? अर्थात या अडचणींवरही काही प्रकाशकांनी मात केली असली, तरी एकूण चित्र मात्र आशादायक नक्कीच नाही. नवनव्या तंत्रज्ञानाने तर सर्व ग्रंथव्यवहारच अडचणीत आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2020 1:24 am

Web Title: litreture and reading culture of maharashtra is in readers hand 60 years of maharashtra dd70
Next Stories
1 विश्वाचे अंगण : मायाबाजार आणि बाजारमाया
2 सांगतो ऐका : हिंदी सिनेगीतांचे गॅरी सोबर्स
3 हास्य आणि भाष्य : कुत्रा, विदूषक, ऑफिसर वगैरे..
Just Now!
X