कोकणातल्या अभेद्य किल्ल्यांपैकी एक ‘गोपाळगड’ फारसा ज्ञात नसलेला. कारण अनेक शतके उद्ध्वस्त अवस्थेत उभा असलेला.
२५ वर्षांपूर्वी जलमार्गाने कोकणात जाताना दाभोळ खाडीत संथपणे बोट शिरता-शिरता उजव्या बाजूला उंचावर एक बुरुज दिसायचा तेव्हा येथे हा किल्ला कसा? असे कुतूहल वाटले. तेव्हापासून गोपाळगड खुणावत होता.अखेर अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अलीकडेच गोपाळगडावर जाण्याचा योग आला. अरबी समुद्र आणि दाभोळची खाडी यांच्या कोपऱ्यावर असलेल्या ‘अंजनवेल’ या काव्यात्मक नाव असलेल्या एका निसर्गरम्य गावात उतरलो होतो. कारण शिवशाहीत समाविष्ट होण्यापूर्वी या किल्ल्याला ‘अंजनवेलचा किल्ला’ असे नाव रूढ होते.
दाभोळची खाडी म्हणजे अरबी समुद्राचा कोकण भूमीकडे पसरलेला हात. कोकण किनाऱ्यावर मैला-मैलावर समुद्र जमिनीकडे घुसल्याचे प्रतीक. पार चिपळूणच्या वासिष्ठी नदीला भिडणारी खाडी. खोली आणि विशाल रुंदी. त्यामुळे मोठमोठय़ा नौकांच्या जलप्रवासासाठी सुकर. जंजिऱ्याचा सिद्धी हा मुंबईपासून आंजल्र्यापर्यंतच्या पश्चिम किनाऱ्यावर जरब राखून होता. दुसऱ्या बाजूला दक्षिणेकडे पोर्तुगीजांचे आरमारही बलवान होत होते. त्यांच्यावर नजर ठेवून कोकण किनाऱ्याचा हा पट्टा सुरक्षित राहावा यासाठी छत्रपतींनी जी ठाणी वसविली त्यापैकी एक हा गोपाळगड. मुळात शिवशाहीपूर्वीही तो उभा होताच. कोरीव शिल्पावरून तो सोळाव्या शतकाच्या प्रारंभी बांधला होता, अशी अंधुक माहिती मिळते. मराठेशाहीअगोदर सिद्धी राजवटीचाही तेथे वावर होता. शिवछत्रपतींच्या राजवटीत मराठी आरमार प्रबळ झाल्यानंतर गोपाळगड मराठेशाहीत समाविष्ट झाला १६५९ मध्ये. अगदी प्राथमिक अवस्थेत असलेला गोपाळगड भक्कम करण्यात आला आणि त्याचे नवीन बांधकामही झाले तेव्हा त्याला अंजनवेलचा किल्ला म्हटले जात असे.
गोपाळगड हा खाडीपातळीपासून सुमारे ३०० फूट उंचीच्या डोंगरावर उभा आहे. तिन्ही बाजूंनी समुद्राच्या लाटांनी वेढलेला. गडाच्या दक्षिण दिशेला मोठ्ठी दरी. किल्ल्याच्या बाहेरची खालच्या बाजूला झुकलेली तटबंदी सिद्धी राजवटीत, तर नंतरच्या काळात आत पसरलेल्या बालेकिल्ल्याची मजबूत तटबंदी मराठेशाहीत उभारली आहे. असा दोन पातळीतला किल्ला. नावीन्य असे की, एक दणकट भिंत या दोन्ही पातळ्यांना एकत्र गुंफण्यासाठी बांधली आहे. गोपाळगडाला दोन प्रवेशद्वारे आहेत. एक दाभोळ बंदराच्या दिशेला तर दुसरे नेमके त्याच्या विरुद्ध दिशेला. या आगळेपणात विशिष्ट डावपेचकौशल्य दिसते. समुद्राकडून शत्रूचा हल्ला आला तर भूमीतील प्रवेशद्वारातून रसद मिळावी, उलटय़ा परिस्थितीत बंदराकडून रसद आणता यावी, हे. गडाच्या आतील बांधकाम आता कालपरत्वे उद्ध्वस्त झाले आहे. गड भक्कम होता हे दर्शविणारी तटबंदी मात्र शाबूत आहे. ४०० वर्षांपूर्वी उभारलेला हा तट पावसाच्या माऱ्याला आणि सागरी तुफानाला तोंड देत कसा अभेद्य उभा राहिला ते आश्चर्यजनक आहे. गडामध्ये आता एकच बांधकाम शाबूत आहे. तालकेश्वराचे मंदिर आणि १८८० मध्ये उभारलेला उंच दीपस्तंभ.
किल्ल्यातील भग्नावस्थेकडे आम्ही खिन्नपणे पाहत असल्याचे रखवालदाराच्या नजरेतून सुटले नाही. तो पुढे आला. आमच्या अनुमतीने त्याने किल्ल्यासंबंधी एक आख्यायिका सांगण्यास सुरुवात केली-
‘सिद्धीनायक’ नावाचा एक दलित दिवसभराच्या अंगमेहनतीनंतर दमल्या-भागल्या अवस्थेत बालेकिल्ल्यातील विहिरीवर पिण्याच्या पाण्याची याचना करण्यास आला. पोलादी कांबीसारखा धष्टपुष्ट होता तो. विहिरीपाशी पहाऱ्यावर असलेल्या मराठी आणि ब्राह्मण कारभाऱ्यांनी त्याला विहिरीला स्पर्श करण्यास मनाई केली. त्याच वेळी किल्ल्याबाहेरून एक संदेश आला. एक अरब व्यापारी एका धष्टपुष्ट घोडय़ाला घेऊन आला आहे. त्याने आवाहन केले आहे की, ‘या नाठाळ घोडय़ावर स्वार होऊन त्याला पळवून वठणीवर आणेल त्याला रूपेरी कडे इनाम म्हणून मिळेल.’ तो घोडा कोणालाही खोगीरावर स्वार होऊ देईना. अपमानित सिद्धीनायक पुढे आला. अश्वारूढ होऊन त्याने नाठाळ घोडय़ाला दौड करून आणले. अरब खूश झाला. स्वकीयांच्या जातीभेदाने संतप्त झालेला तो स्वार अरबाबरोबर मुंबईला गेला. ईस्ट इंडिया कंपनीच्या सुरक्षा तुकडीत सामील झाला आणि मोठय़ा हुद्दय़ावरही चढला. काळ बदलला. १८१८ मध्ये ब्रिटिश कर्नल केनेडी दाभोळ खाडीत शिरला आणि गोपाळगड काबीज करण्याचा त्याने विडा उचलला. किल्ल्यात त्याला सहजासहजी शिरता येत नव्हते. आत-बाहेरील सर्व चोरवाटा माहीत असलेला सिद्धीनायक त्याच्या साहाय्याला धावला. केनेडीने आधुनिक शस्त्रास्त्रानेयुक्त आपली फलटन गडामध्ये घुसविली. प्रखर संघर्ष झाल्याविनाच किल्ला पडला. जरीपटक्याच्या जागी युनियन जॅक फडकला. फलटनीचा मार्गदर्शक असलेल्या सिद्धीनायकाने किल्ल्यातील उच्चवर्णियांना कैद केले आणि ज्या विहिरीचे पाणी पिण्यास त्याला अटकाव झाला होता त्यातच त्यांना ढकलून दिले. जातीपातीतील विद्वेष स्वातंत्र्याला सुरुंग लावणारा ठरला. कहाणी ऐकून आम्ही सुन्न झालो. त्याहीपेक्षा गोपाळगडाच्या आतील भग्नावस्था पाहून अतिशय खिन्न झालो. नाही म्हणायला गडामध्ये हिरवाई मात्र बहरली होती. तेथील एक मोठ्ठा तुकडा एका कंत्राटदाराला आमराई फुलविण्यासाठी दिला आहे. गड उतरताना पश्चिमेकडे दिसणाऱ्या विहंगम दृष्याने आमच्या खिन्न मनावर शिडकावा केला. दूरवर समुद्रात क्षितिजावर मावळतीच्या सूर्याने आकाशात रंगपंचमी केली होती. तुटके-फुटके बुरूज खोलवरच्या खाडीच्या संथ लाटांमध्ये आपले रूप पाहून अश्रू ढाळत होते.
परतीच्या वाटेवर ४० कि. मी.वर असलेल्या चिपळूण येथे तासाभरात पोहोचलो. आडोशाचा रस्ता संपला आणि गोवा-मुंबई या महामार्गावरील गाडय़ा सुसाट धावताना आडव्या आल्या. अंजनवेल वा वेलदूर येथून पायवाटेने अध्र्या तासात तर मोटारीने दहा मिनिटांत गोपाळगड गाठता येतो. मुक्काम करावा लागला तर मात्र दहा कि. मी.वरील गुहागरला जाण्याशिवाय पर्याय नाही.

vasai fort leopard
वसई किल्ला परिसरात बिबट्याची दहशत कायम, संध्याकाळ नंतर रोरो सेवा बंद करण्याची सुचना
vasai fort, compound fencing on vasai fort
वसई किल्ल्याभोवती संरक्षक जाळ्यांचे कुंपण, गैरप्रकार रोखण्यासाठी पुरातत्व विभागाच्या उपाययोजना
Leopard in Vasai Fort area fear among citizens
वसई किल्ला परिसरात बिबट्याचा वावर… नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाकडून शोध सुरू
village maps
गाव नकाशे नसल्याने मच्छीमारांचे अस्तित्व धोक्यात, पंचवीस वर्षांपासून प्रतीक्षा