|| समीर गायकवाड

मालनचा हात मखमली होता. गावात अशी एकही स्त्री नव्हती की जिला तिचा हात लागला नव्हता. मालनचं काम कासारणीचं. मालनच्या माहेरीही हाच व्यवसाय होता. सासरी आल्यापासून ती घाण्याच्या बलासारखी कामाला जुंपलेली. नवरा वासुदेव नाकापुढं बघून चालणारा साधासुधा माणूस. त्याला दोन भाऊ, दोन बहिणी. सगळ्यांची लग्ने झालेली. वासुदेवाची आई पारूबाई जुनाट वळणाची बाई. सगळं घर तिनं आपल्या धाकात ठेवलेलं. थोरल्या पोराच्या लग्नानंतर तिचा भ्रतार आजारपणात गेलेला. तेव्हा पारूबाईनेच कासारणीचा धंदा करावा, पण बांगडय़ा भरायला तिनं येऊ नये, तिच्याऐवजी ज्येष्ठतेनुसार थोरल्या सुनेनं यावं अशी अट गावानं घातली. थोरल्या सुनेची इच्छा नव्हती तरीही मालननं होकार दिला. नंतर पोरींची लग्नं केली. पोरांना सुना आणल्या. त्यात सगळ्यात धाकटी मालन होती.

Ram Navmi 2024 Ram Raksha Stotra Reading Benefits in Marathi
Ram Navami 2024 : जाणून घ्या ‘रामरक्षा’ अन् भगवान शंकराचा ‘हा’ संबंध; पाहा, दररोज रामरक्षा स्तोत्र म्हटल्याचे फायदे
Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा
Kitchen jugad video wash clothes with green chilli apply on cloth
Kitchen Jugaad Video: साबणाऐवजी हिरव्या मिरचीने धुवा कपडे; विचित्र उपायाचा चमत्कारिक परिणाम
loksatta editorial income tax issue notice to congress
अग्रलेख: धनराशी जाता मूढापाशी..

घरात सगळेच कष्ट करणारे असल्याने कुठं तक्रारीला जागा नव्हती. सणासुदीला माहेरी जाणं व्हायचं तेव्हा डोळ्यांत आभाळ दाटून यायचं. लग्न झालेल्या भावांच्या वागण्यात काळागणिक फरक जाणवत गेला तसं तिचं माहेर धुसर होत गेलं. तोवर इकडं तिची परवड होत राहिली. तिची कूसही उशिरा उजवली. त्यासाठी तिने टोमणे सोसले. चाळिशी पार होताना तिच्या पदरात तीन अपत्यं होती. शेतात विहिरीचं पाणी आटलं तसं घरात भांडय़ाला भांडं लागायला सुरुवात झालेली. शेवटी पारूबाईनं वाटण्या केल्या. थोरल्या, मधल्या मुलाला शेत दिलं. धाकटय़ाला धंदा दिला. वासुदेवानं याला आडकाठी घेतली नाही.

श्रमलेल्या पारूबाईला मालनच्या हाती धंदा देताना धाकधूक वाटत होती, पण मालनने संधीचं सोनं केलं. खरं तर नवऱ्याला दीरांनी फसवलं आहे हे तिला उमगलं होतं. पण वासुदेव आपल्या आईच्या, भावंडांच्या विरोधात काहीच ऐकून घेत नसे. बोलघेवडय़ा मालनने बांगडय़ांची दुरडी नेटकी सांभाळली. बांगडय़ांचे मोलभाव पारूबाईने शिकवले. माहेरच्या व्यवसायातील अनुभवामुळे धंद्याची नस तिला तत्काळ सापडली. पुढय़ातल्या बाईचा हात हाती घेताच तिला तिच्या मनगटाचा नेमका अंदाज येई. त्या आकाराच्या बांगडय़ा ती हातात अलगद सरकवी. पाचही बोटं दुमडून अंगठय़ाजवळ बांगडी नेली की ती लडिवाळ स्वरात गप्पा सुरू करे. अंगठय़ाच्या वरचा मांसल चढ किंचित दाबून सर्रकन् बांगडी पुढं नेई. तिचा हात फार हलका आहे असं गावातल्या बाया-पोरी म्हणत.

खरं तर मालनच्या हाती हात येताच तिच्या नसेतून समोरचीच्या अंत:करणाचा तिला ठाव लागे. माहेरवाशीण पोरीला घेऊन येणारी आई नक्षीदार टिकाऊ बांगडय़ांसाठी सांगे. त्या पोरीबाळीही तिला बहीण मानून मनातलं आभाळ तिच्यापाशी रितं करत. घरात सासुरवास असलेली सून मालनपाशी खूप लवकर बोलती होई. मग बांगडय़ा बाजूला राहत. मालनचं समुपदेशन सुरू होई. तिनं किती सोसलं, तिच्या नवऱ्याला किती फसवलं याची उजळणी होई. पण आपला नवरा आपल्याला जीव लावतो ना, तो आपल्या बाजूने आहे ना, मग कशाला दु:खाला कवटाळून बसायचं, असा तिचा सल्ला ऐकून रडवेल्या झालेल्या जाईजुईंच्या ओढाळ वेलींवर नाजूक हास्यसुमने फुलत. त्या तिला गळामिठी मारत. बघता बघता पारूबाईची जागा मालनने चपखलपणे घेतली. गावात जिच्या तिच्या तोंडी तिचं नाव झालं.

सततच्या तणावातून मुक्त झालेल्या गात्रशिथिल पारूबाईनं एका रखरखीत उन्हाळ्यात देवाघरी प्रस्थान केलं. सासूची सवय झालेल्या मालनला घर खायला उठलं. काही दिवसांच्या अवकाशानंतर पंचक्रोशीतील लग्नकार्याची कामं तिला मिळू लागली. लग्नाच्या सुपारीत तिचा दिवस मोडायचा. ती लग्नघरात दाखल होताच उत्साहाला उधाण येई. उखाणे सुरू होत. तिच्या पुढय़ात बसण्यासाठी चढाओढ लागे. जमलेल्या बायकांच्या लयबद्ध ओव्या सुरू होत. पहिली गायची..

‘दागिन्यामंदी दागिना वजरटेकीचा गं कोवळा

हिरव्या चोळीवरी गोंडा लोळतो पिवळा’

मग दुसरी गायची..

‘पुतळ्याची माळ माझ्या पडली पाठी पोटी

सांगते बाई तुला चंद्रहारानं केली दाटी’

कुठं शब्द अडताच मालन नेमका शब्द सांगे. मग त्या लाजून चूर होत. ओवीतला दागिन्यांचा विषय लांबत जातानाच कुण्या कष्टकरणीचा हात हाती आला की गोड गळ्याची मालन तिच्या वतीने गाई..

‘काळी गळसुरी माझ्या आहेवपणाची

मग येईल संपदा मग घडवीन सोन्याची!’

मग ती स्त्री मालनच्या गळ्यात पडे. सगळ्याजणी कावऱ्याबावऱ्या होत. त्या कष्टलेल्या बाईच्या डोळ्याला आपला पदर लावीत. मुळात सगळ्यांचेच पदर तेव्हा फाटके होते, पण त्यांची मने मोठी होती. एकमेकींची दु:खं जाणून घ्यायची, आपलेपणाची ओढ त्यात होती. त्यांच्या विटून गेलेल्या जीर्ण पदरानं श्रीकृष्णाच्या तर्जनीस गुंडाळलं नसलं तरी तितकं पावित्र्य आणि सच्चेपणा त्यास होता. मग त्या ओव्यांची अखेरही मालनच करे.

थोरल्या पोरीच्या लग्नात मालनची उरलीसुरली कमाई संपली. सततच्या कामाने वासुदेव आजारी पडला आणि मालनने हाय खाल्ली. वासुदेवाच्या जिवाचं बरंवाईट झाल्यास आपल्या हाताने कुणी बांगडय़ा भरणार नाही, ही भीतीही तिला सतावीत होती. उपचारांसाठी तिने दागिने मोडले. गावाला बांगडय़ा भरणाऱ्या मालनचा हात बोडका झाला. नवऱ्याचा दवाखाना सुरू केला. धाकटय़ा पोरीच्या लग्नापर्यंत तरी धंदा टिकला पाहिजे यासाठी कंबर कसली. तिच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं दिसू लागली. पाठपोट एक झालं. फावल्या वेळात तिनं शिलाईकामही सुरू केलं. पोरीसाठी स्थळ येताच ती हरखून गेली. ऐपतीपेक्षा चांगलं लग्न लावून दिलं. गावानं मालनचं कौतुक केलं. आता तिनं पुन्हा सगळा माल भरला. लोकांचं देणं सारण्याकडं कल ठेवला. दरम्यान, बांगडय़ांचं आकर्षण कमी होऊ लागलं होतं. फॅशन, व्हरायटी हे शब्द वेशीपाशी येऊन पोहोचलेले. धंदा घटू लागल्यावर वाण वाढवणं मालनला अपरिहार्य झालं होतं. ते आव्हानही तिनं स्वीकारलं.

काचपाणी खेळणाऱ्या पोरी दारात येताच ती त्यांना ओंजळ भरून बांगडय़ांचे तुकडे देई! मालनने सगळ्यांची मने जपली आणि जिंकलीही. पोरगा हाताशी येईपर्यंत ती काम करत राहिली. पोराला ती बजावायची, ‘बायकोला कासारीण करू नकोस. शिकलेली बायको कर. तूसुद्धा खूप शिक. मोठा हो. चांगली चाकरी कर. बापाचं नाव कर. माझ्यानंतर हा व्यवसाय बंद पडलेला बरा..’ असं ती म्हणे. ती घरादारासाठी जगली, पण स्वत:साठी एक दिवसही जगली नाही. पण याची कधी खंत वाटली नाही तिला. पोराला नोकरी मिळाली तेव्हा तिला स्वर्ग दोन बोटं उरला.

तिच्या पोराची बठक जमली. सुपारी फुटली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी तिनं झोपेत अखेरचा श्वास घेतला. तिचे अथक परिश्रम संपले. एकदाची विश्रांती तिला लाभली. गावातल्या स्त्रियांच्या हाती बांगडय़ा भरणाऱ्या मालनला आहेव मरण आलं होतं. वासुदेवाआधी आपली जीवनयात्रा तिनं अकस्मात संपवली. तिच्या मृत्यूने गाव तळमळलं. गावातल्या जुन्याजाणत्या आयाबायांनी त्या दिवशी तिचा उंबरठा सोडला नाही. तिच्या मुलानं शोकाकुल अवस्थेत तिला अग्नी दिला. तिनं आयुष्यभर त्याच्यासाठी खाल्लेल्या खस्ता ज्वालेच्या धगीसरशी त्याला तीव्रतेने जाणवत राहिल्या.

तिसऱ्या दिवशी माती सावडायला पंचक्रोशीतल्या बायका तिथं आलेल्या. सगळे विधी, सोपस्कार होताच सवाष्णीचं आहेव वाण म्हणून प्रत्येक स्त्रीला कुंकू लावलेले चुडे देण्याचं काम मालनची मुलगी करू लागली. तिच्या नावाचे सौभाग्याचे चुडे घेऊन घरी परतताना त्यांना हुंदके आवरत नव्हते. सगळे विधी पुरे होऊन दहाव्यानंतर घरी आल्यावर मालनच्या मुलाने घरातले उरलेसुरले चुडे, बांगडय़ा गावातल्या विधवा बायकांना वाटल्या. काहींनी चुडे- बांगडय़ा घेतल्या, काहींनी दुसऱ्यांना दिल्या. गावानं आश्चर्ययुक्त नाराजी व्यक्त केली. मालननं जितेपणीच मुलापाशी आपल्या वेदना बोलून दाखवत हे विचार मांडले होते. स्त्रियांत भेद करणारा, सौभाग्याचं लक्षण समजलं गेलेला चुडा अशा तऱ्हेने मालनने अखेरचा चुडा ठरवला. ती गावची अखेरची कासारीण ठरली. वैधव्याच्या भीतीनं जिवाचं रान करणाऱ्या मालनने गावावर उगवलेला तो एक विलक्षण सूड होता!

sameerbapu@gmail.com