ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांची प्रदीर्घ मुलाखत पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी टाळेबंदीच्या काळात घेतली. या मुलाखतीचं ‘बोलिले जे.. संवाद एलकुंचवारांशी’ हे पुस्तक मनोविकास प्रकाशनातर्फे येत आहे. १६ ऑक्टोबरला समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन होणार आहे. त्यानिमित्ताने या पुस्तकातील अंश..

‘‘..तर वर जो अवकाश आहे, आपल्या या सगळ्या आकाशगंगा पोटात घेणारा, सर्व चराचर, सर्व ज्ञात-अज्ञात पोटात घेणारा अवकाश- त्या अवकाशात काय आहे, हे बघण्याची वैज्ञानिकांना आतून तीव्र ओढ असते, तशीच सर्व कलावंतांना पण असते. परंतु तो जो पैस आहे (हा दुर्गाबाईंनी वापरलेला शब्द आहे.), तो पैस माझ्या बुद्धीच्या तर पलीकडचा आहेच, पण माझ्या सगळ्याच आवाक्याच्या पलीकडचाही आहे. पण बुद्धीची पोच आहे तेवढीच त्या भाषेची पोच असते हे तर आपण पाहिलंच, तितकेच त्या भाषेतले शब्द असतात. दुसरी काही साधनं असतील तरी तिथं पोचताच येत नाही. त्याच्यामुळे भाषा मर्यादित राहते. दुसरं म्हणजे आपण सगळे त्रिमितीमध्ये जगतो. आणि एकूण दहा मिती- डायमेंशन्स आहेत असं वैज्ञानिक सांगतात. या दहा डायमेंशन्सच्या पलीकडचा तो प्रदेश आहे. नेमाडेंचा एक लेख मी वाचला होता. त्यात संतकाव्याबद्दल बोलत असताना ते चौथ्या डायमेंशनबद्दल बोलत होते. जोपर्यंत आपल्याला या थ्री-डायमेंशन्सच्या बाहेर जाता येत नाही तोपर्यंत आपल्याला संतांसारखं लिहिता येत नाही. मला स्वत:ला असंच वाटलं की, आपण थ्री- डायमेंशनल आहोत. आपण योगी नाही. आपण साधक नाही. आपण साधना करीत नाही. आपण फक्त लेखक आहोत या तीन मितींमध्ये कैदी झालेले. तर या तीन मितींची मर्यादा धरून त्यामध्ये मला काही करता येईल का? आणि खरं तर या तीन मितीही नाहीत, अवकाशही नाही, काळही नाही. जर तुम्ही सगळ्या मिती ओलांडून वरच्या त्या पैसात गेला तर तिथं काळ आणि अवकाश नाहीतच. तिथं काहीच नाहीये. तिथं काहीच नसणं म्हणजेच सगळं असणं आहे. मी एकदा कल्पना करून पाहिली (म्हणजे प्रयत्न केला- जो फसला. कारण प्रयत्नही बुद्धीच करते.), की मी अशा प्रदेशात आहे की जिथं दिशाच नाहीत, जिथं क्षितीजच नाही अशा पैसात मी आहे. तिथं दिशाच नाहीत. कुठली पूर्व, कुठली पश्चिम- अर्थच नाही त्या शब्दांना तिथे. काळ नाही, अवकाश नाही. मी कुठेही उभा राहिलो तरी तिथंच आहे, त्याच्या मध्यबिंदूवरच आहे. असं असलं तरी तिथं पोचण्यासाठी माझं तीन मितींचं आयुष्य सोडल्याशिवाय मला तिथं जाताच येणार नाही. तर लेखनात मी हे कसं साधणार? तिथं गेल्यानंतर मागचा क्षण, आताचा क्षण, पुढचा क्षण, भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ असं तर काहीच राहत नाही. तिथं तुम्ही तसेच त्याच्यात राहता. तर लेखक म्हणून त्रिमितीत जगता जगता यापल्याड जर आपल्याला जायचं झालं तर आपल्याला भविष्यकाळ, भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांच्याशी खेळता आलं पाहिजे. यांच्याशी खेळत, मैत्री करत त्यांचा निरोप घेऊन पुढे जाता आलं तरच शक्य होईल.

म्हणून ‘त्रिबंध’मधील लेख तसे आहेत. म्हणजे निदान तसा प्रयत्न आहे. आधीच्या ‘मौनराग’मधील तसे अजिबात नाहीत. ‘मौनराग’ लिहिल्यानंतर मला वाटलं की आपण हा साचा मोडला पाहिजे. लेखकानं कधी एका साच्यामध्ये राहू नये. साचा यशस्वी झाला की तो मोडून टाकावा. यशस्वी झाले होते ते लेख. आणि यशाइतकी वात्रट बुद्धिभेद करणारी गोष्ट नाही. अपयश हाच खरा आपला मित्र असतो. तो तुमचे पाय जागेवर ठेवतो आणि नवीन काहीतरी करायला उद्युक्त करतो. त्यामुळे ‘मौनराग’सारखे दहा-बारा लेख मला लिहिता आले असते, पण मला त्यात काही रस नव्हता. शिवाय त्यातून माझी भूक भागतच नव्हती. मला वाटलं, आपण सगळे तिन्ही काळ एकत्र आणायचे आणि त्यांच्याशी खेळायचं. आपल्याला क्षणार्धात त्या काळातून या काळात, किंवा एका क्षणात तिन्ही काळ एकमेकांत कालवून विहार करता आला पाहिजे. आणि ते करताना आपल्याला त्या पैसाचं नुसतं सूचन जरी करता आलं तर किती बरं होईल. म्हणून केलेला तो प्रयत्न आहे. तो साधलाय असं मला वाटत नाही. त्या पैसाबद्दल तुझी काय कल्पना आहे ते मला माहीत नाही. माझी कल्पना आहे तीच तुझी असेल असंही नाही. तुला ते तसं वाटतंय.. परंतु आपण जर तीन मितींच्या बाहेर गेलो आहोत असं जर तुला क्षणभरही वाटलं असेल तर मी कुठेतरी मग बरं लिहिलं असेल.

आपण मितींबद्दल बोलत आहोत. मी एका विशिष्ट वास्तवात राहतो, तीन मितींमध्ये बद्ध असं जगतो. माझ्या अवतीभोवती जे वास्तव आहे त्यात मी राहतो. पण त्यामुळे हेच एक वास्तव आहे आणि हे वास्तव तेवढं खरं असं मात्र मला वाटत नाही. या वास्तवाच्या पलीकडचं वास्तव? ते कोणाला माहीत आहे? हा प्रश्नसुद्धा कोणी ऐकायला तयार होणार नाहीत. म्हणतील (आणि म्हणतातच) की, ‘तुमच्या अवतीभोवतीचं वास्तव दिसत नाही काय? सभोवती एवढे ज्वलंत प्रश्न आहेत.’ मग मी म्हणतो, ‘आहेत ना! ज्वलंत प्रश्न आहेत. मला रोजच भेटतात. त्यांना ज्या पद्धतीनं सामोरं जायचं त्या पद्धतीने व्यक्ती म्हणून माझ्या वकुबाप्रमाणे मी जातोही. परंतु माझ्या लेखनातलं वास्तव हेच हवं, हा हट्ट का? मला निवडू द्या ना माझं वास्तव! माझ्या लेखनातलं माझं जे वास्तव आहे ते अवतीभोवतीच्या वास्तवापेक्षा वेगळं आहे. काल्पनिक जग हेसुद्धा एक वास्तवच आहे. किंवा आपल्या पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेरचं जे (त्या आकाशगंगा, तो अवकाश) आहे तेही एक वेगळं वास्तवच आहे. आणि मी ज्या पैसाबद्दल बोलतोय ते तर चिरंतन वास्तव आहे. ते कधी बदलतच नाही. ते कधी जन्माला आलं, माहीत नाही. ते कधी संपणार, माहीत नाही. तेसुद्धा वास्तवच आहे. मला जर त्या वास्तवाकडे जावंसं वाटलं तर मी जसा काही सामाजिक गुन्हा केला असं बोललं जातं, ते मला कळत नाही. ते कशासाठी? ही वेगवेगळी वास्तवं आहेत आणि त्यामधून मला फिरता आलं तर..? मुक्ताबाई म्हणते, ‘मुंगी उडाली आकाशी!’ कळतं ना! हा अनुभव आहे. तो अनुभव माझ्या कल्पनेत कसा येईल? दिशाच नाहीत, क्षितीजच नाही, असं जे काही आहे ते कसं असेल? ..निर्गुणी भजनात आहे याचं वर्णन. कबीराच्या असेल.. मला या क्षणाला आठवत नाही. पण कुमारजींच्या निर्गुणी भजनात असं वर्णन आहे. (सखियां वा घर, सबसे न्यारा, जहां पूरण पुरुष हमारा) जिथं अनाहत नाद ऐकू येतात. जिथं दिवस-रात्र नाहीत. या सगळ्याच्या पलीकडील जग.. सुफी संगीतातही असं वर्णन आहे.

तर त्यामुळे मग मला असं वाटलं की, इतक्या प्रकारची वास्तवं आहेत आणि ती सगळी खरी आहेत. कोणतीच खोटी नाहीत. अन् म्हटलं तर एक सोडून सगळीच खोटी आहेत. म्हटलं तर माझ्या अवतीभोवतीचं वास्तव हेच खोटं आहे. कारण ते सततच बदलत राहतं. ट्रान्झियन्ट, अनित्य. आज आहे ते उद्या नाही, उद्या आहे ते परवा नाही. सतत बदल बदल बदल.. सतत भवति भवति भवति असं चाललेलं आहे.. तर असं जे हे आहे, हाच खरा भ्रम असेल. पण गंमत अशी आहे की, मग मी लिहितो आहे हाही भ्रमच आहे की आणि मी लिहितो आहे भ्रमांबद्दलच. एक भ्रम दुसऱ्या भ्रमाबद्दल बोलतो आणि प्रकाश टाकतो मात्र एका मूलभूत परम सत्यावरच! हे फक्त साहित्यच करू शकतं. तर हे सगळं मला कुठंतरी अबोध पातळीवर जाणवत होतं. मी अतिशय पद्धतशीर विवरण करतोय याचं असं वाटत नाही. मी प्रयत्न करतोय. मला असं वाटलं की करून पाहिलं पाहिजे. असं आपल्याला जमतं का ते बघू. नाही जमलं तर नाही जमलं. गाजराची पुंगी. नाही जमलं तर काय असं मोठं नुकसान होईल? तर संतकाव्य वाचताना जाणवतं तसं तीन मिती ओलांडून लेखकाला जाता आलं पाहिजे असं वाटत होतं. आणि नेमाडय़ांनी चौथ्या डायमेंशनचा उल्लेख केला तेव्हा मला खूप आनंद झाला. कोणीतरी आपल्यासारखा विचार करणारा माणूस आहे..’’