|| मकरंद देशपांडे

समाज हिरो बनवतो. हिरो समाजाचं प्रेरणास्थान बनतो. त्याच्या नावाने चतन्य येतं. त्याच्याबद्दल बोलल्याने अभिमान वाटतो. समाजात हिरो नसेल तर जीवनात मरगळ येईल. २००५ साली पाकिस्तानविरुद्ध तीन नंबरला येऊन माहीने १४८ धावा केल्या आणि तो वन-डेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरला. लहानांपासून ते मोठय़ांपर्यंत सगळ्यांचाच ‘माही’ (महेंद्रसिंग धोनी) हिरो झाला.

क्रिकेट हिरोवर लिहिण्यासाठी नाटक हे माध्यम नव्हे. कारण क्रिकेट हा खेळ दाखवण्यासाठी प्रेक्षकांनी खच्च भरलेलं मदान आणि खरं वाटणारं, प्रत्यक्ष खेळलं गेलेलं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं क्रिकेट दाखवण्यासाठी चित्रपट  किंवा डॉक्युमेंटरी ही माध्यमं योग्य. मला वाटलं, माहीचे जितके छोटे फॅन होते तेवढेच मोठेही होते. पण मला लहानांसाठी नाटक लिहायचं होतं. लहान मुलांसाठी नाटकाचे विषय शक्यतो प्राणी, चेटकीण आणि देव असे असतात. अगदीच वेगळी नाटकं लिहिली जातात तेव्हा ती लहान मुलांना काही शिकवण्यासाठी (समज) लिहिली जातात.

मी विचार केला- माही नाही, पण माहीचा छोटा फॅन स्टेजवर आला तर काय होईल? आपल्याला त्या छोटय़ा फॅनवर नाटक लिहिता येईल का? मोठय़ांसाठी छोटय़ांना जेव्हा नायक किंवा नायिका केलं जातं तेव्हा ते नाटक/ चित्रपट  शक्यतो रडवणारे असतात. मला लिहायचं होतं एक प्रेरणादायी, पण खूप गमतीजमती असणारं नाटक; जेणेकरून लहान नाटकप्रेमी मोठा होऊन नाटकवेडा होईल. ठरलं.. माहीच्या छोटय़ा  फॅनवर नाटक लिहायचं. पण तो समाजाच्या कुठल्या थरातला मुलगा? शिवाजी पार्कवर जी लहान मुलं खेळतात त्यांतला एक? की झोपडपट्टीतील मुलं- जी रस्त्याच्या कोपऱ्यात खेळतात? की न खेळता फक्त बघणारा? पण तो कोण? त्याचे आई-बाबा कोण? या विचारांत असतानाच दारावरची बेल वाजली. धोबी आला होता. मी विचारात होतो. त्याच्याकडून इस्त्रीचे कपडे घेतले. आणि आता त्याला इस्त्रीसाठी कपडे द्यायचे होते तर तो आपल्या छोटय़ा मुलाला म्हणाला, ‘‘ले लो कपडे.’’ मी त्या छोटय़ा मुलाला विचारलं, ‘‘क्रिकेट खेलते हो?’’ तो लाजला आणि पळाला. मी धोब्याला म्हणालो, ‘‘शर्मिला है.’’ त्यावर तो धोबी हसून म्हणाला की, एक नंबर का बदमाश है. दो मिनट शांति नहीं. दिनभर खेलता है. ना ईस्कूल, ना खानापिना.. बस खेलता है. मी पुढं काही बोलण्याआधीच त्यानं शेजारच्या दारावरची बेल वाजवली आणि संभाषण थांबलं. मला राहवलं नाही. मी दोन तासाने धोब्याकडे गेलो. त्यानं विचारलं, ‘‘कपडा अर्जंट चाहिये था?’’ मी म्हटलं, ‘‘नहीं, बस- तुम्हारे बच्चे को देखना था.’’ त्याला कळलं नाही. पण मला त्यानं ‘‘क्यों? काहे को?’’ असे प्रश्न विचारले नाहीत. त्याचा मुलगा ज्या दिशेला होता तिथं त्याने बोट केलं. मी त्याच्याजवळ गेलो. तो भिंतीवरून बिल्डिंगच्या कंपाऊंडमध्ये क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना पाहत होता. मी त्याला विचारलं, ‘‘खेलना है?’’ तो पुन्हा लाजला आणि ज्या भिंतीवर चढायला मी दोन मिनिटं घेतली होती, त्यावरून तो कसलाही विचार न करता उडी टाकून पळाला. तो बदमाश नक्की नव्हता. फक्त स्वतच्या विश्वात होता. त्या विश्वात त्याला माझ्यासारखे प्रश्न विचारणारे, वडिलांसारखे अडवणारे नकोसे होते. मी घरी आलो, जेवलो आणि पृथ्वीला गेलो. जाताना त्या धोब्याच्या मुलाला मनात घेऊन गेलो.

पृथ्वी कॅफेमध्ये माझ्या नेहमीच्या जागी बसलो. चहा न मागवताच आला. वेटरच म्हणाला, ‘‘कुछ सोच में लगते हो.. नया नाटक?’’ मी चहाचा घोट घेत ‘हो’ म्हणालो. पृथ्वी कॅफेचं त्याकाळचं वातावरण नाटककाराला लिहायला पूरक असायचं. लिहिता लिहिता चहा थंड झाला तर दुसरा गरम चहा न मागवता यायचा. पेनातली शाई संपली तर वेटर-मॅनेजर आपला पेन द्यायचे. कारण नवीन नाटक लिहिलं जातंय, ते थांबता कामा नये याची जाणीव जणू कॅफेमधल्या झाडांनाही होती. एखादी वाऱ्याची झुळूक आपल्या अदृश्य पंखांवर उचलून काही पानं टेबलावर अलगद पाडायची. लिहिता लिहिता मन ताजं व्हायचं. लिहिण्याचा हुरूप वाढवायला कॅफेतल्या पक्ष्यांची किलबिलही सतत होतीच.

नाटकाचा विषय ‘धोनी’ आहे असं कळल्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या, नाटक पाहणाऱ्या, तिकीट बुकिंग करायला आलेल्या सगळ्यांचाच उत्साह वाढला. ‘लहान मुलांसाठी नाटक का?’ असं कुणीही विचारलं नाही. मनात धोब्याचा मुलगा नायक हे ठरलंच होतं. आता नाटकात लागणारी आणखीन पात्रे- म्हणजे भिंतीच्या पलीकडे बिल्डिंगच्या कम्पाऊंडमध्ये खेळणारी मुलं आणि त्या कंपाऊंडमधनं वर पाहिल्यावर दिसणारी एखादी खिडकी.. आणि धोबीसुद्धा.

धोब्याचा मुलगा क्रिकेट खेळायचा की नाही, माही त्याला माहिती होता की नाही, या प्रश्नांच्या उत्तरांची गरज नाटककाराला नसते. तो आता त्या मुलाला नाटकासाठी नाटकीय रूप देतो. म्हणजे त्याच्या हातात क्रिकेटची बॅट नाही, तर कपडे धुवायचा ढोका देतो आणि तो त्या ढोक्यानं धुवायला आलेले कपडे फाडतो. त्यामुळे त्याचे वडीलच त्याच्या आणि क्रिकेटच्या आड येतात. पण त्याचं हे क्रिकेटवेड त्याच्यासाठी भिंतीपलीकडून ‘मॅच’ खेळायची संधी घेऊन येतं. बिल्डिंगमधल्या मुलांना मॅचसाठी एक मुलगा कमी पडतो. ती मॅच आपला हा नायक आपल्या कपडे धुवायच्या ढोक्यानं ‘हेलिकॉप्टर शॉट’ची सिक्सर मारून जिंकून देतो. बिल्डिंगमधली मुलं ‘माही! माही!’ ओरडतात. पण त्या सिक्सरने चौथ्या मजल्यावरच्या खिडकीची काच फुटलेली असते आणि धोब्याला त्याचे पसे द्यावे लागतात.

धोबी आता आपल्या मुलाच्या डोक्यातून कायमचं क्रिकेट काढून टाकायचं असं ठरवतो आणि ‘माही’ होता होता त्याच्या मुलाला पुन्हा भिंतीवर बसावं लागतं क्रिकेट पाहत.. तेसुद्धा चोरून. त्याला त्याचे वडील रामलीलेतले ‘रावण’ वाटतात. त्याच्या स्वप्नात ते रावण बनून त्याच्याकडून बॅट-बॉल घ्यायला येतात. तेव्हा चिडून तो बॉल (हेलिकॉप्टर शॉट) एवढा उंच मारतो की तो चंद्रावर पोहोचतो आणि बिल्डिंगमधल्या ज्या मुलाचा तो बॉल असतो तो रडायला लागतो. आता त्या बॉलचे पसे द्यावे लागणार, या भीतीनं मुलगा स्वप्नातून जागा होतो. समोर त्याची आई असते. ती आपल्या मुलाला सांगते की, त्याला भेटायला बिल्डिंगमधली मुलं आली आहेत. शेजारच्या सोसायटीत टुर्नामेंट असते. त्यात बिल्डिंगवाल्यांनी भाग घेतलेला असतो आणि मोठय़ा मुलांबरोबर खेळायला त्याला बोलावलेलं असतं. तिथे कपडे धुवायच्या ढोक्यानं नाही, तर बॅटनं खेळावं लागणार असतं. पण त्याच्यातल्या क्रिकेटवेडापायी तो बॅटने आता सहाव्या मजल्याच्या काचा फोडतो. तीसुद्धा एक नाही, तर चार सिक्सर्सनी चार!! बिल्डिंगची टीम त्याला ‘माही..माही’ करत डोक्यावर घेते.

सहाव्या मजल्यावर राहणाऱ्या काळेंकडे त्याचवेळी भारतीय क्रिकेटचे सिलेक्टर जेवायला आलेले असतात. त्यांना या गोष्टीचं आश्चर्य वाटतं, की एवढासा मुलगा एवढी उंच सिक्सर मारू शकतो! ते छोटय़ा माहीची ऊर्फ धोब्याच्या मुलाची नोंद घेतात. त्याच्या वडिलांना भेटतात आणि त्याच्या उज्ज्वल भविष्याबद्दल बोलतात. आपल्या मुलाचं कौतुक ऐकताना धोब्याच्या डोळ्यात पाणी येतं. बिल्डिंगमधली मुलं त्याला आपला कॅप्टन बनवतात.

हे नाटक लिहिताना आणि बसवताना आव्हान हे होतं की, प्रेक्षक- वय वर्षे ३ ते १२ आणि त्यांचे पालक! त्यामुळे सतत खेळतं वातावरण हवं. लेखक म्हणून मला धोबी आणि त्याच्या मुलाचं पात्र लिहिताना अप्रुप वाटलं. मनाला बरं वाटलं. घरी येणारा धोबी आणि त्याचा मुलगा आपल्या कलेचा भाग झाले याचा आनंद कोणाला सांगण्यासारखा नाही; पण आज आठवण झाली. आज मी तिथे राहत नाही. त्यामुळे तो धोबी, त्याचा मुलगा या लेखमालेमुळे आठवणीत तरी आठवले.

विजय मौर्यने माही (धोब्याचा मुलगा) आपल्या अप्रतिम विनोदी अंगाने, खोडकरपणे गोड केला. त्याची सिक्सर (हेलिकॉप्टर शॉट) मारण्याची स्टाईल तर मुलांना (प्रेक्षक) आरडाओरडा करायला लावायची. त्याच्या वडिलांची भूमिका त्याच्याच छोटय़ा भावाने- टेडी मौर्यनं केली. त्यामुळे दोघांच्या प्रवेशात खूपच गंमत यायची. खासकरून तो प्रसंग- जेव्हा माहीला आपले वडील दहा तोंडांचे  रावण दिसतात आणि ते त्याच्याकडून बॅट-बॉल घ्यायला जातात आणि तो बॉल एवढा उंच मारतो की बॉल चंद्रावरच जातो.

नाटकाचं नाव सांगायचं राहिलं.. ‘धोनी धो डालता है’! कुणास ठाऊक, पण मी कधी माहीपर्यंत हे नाटक पोहोचवायचा प्रयत्न केला नाही. शेवटी हिरो हे आपले असतात; आपण त्यांचे काही असायची आवश्यकता नाही असं मला वाटतं.

जय धोनी! जय धोबी!

जय नाटक! जय क्रिकेट!

mvd248@gmail.com